“जेजुरी गड आणि कडेपठार” च्या मागच्या भागात आपण जेजुरी गडाची यात्रा केली. आता या ब्लॉगमध्ये आपण जेजुरी गड ते कडेपठार आणि कडेपठाराहून परत जेजुरी गड अशी यात्रा करू. जेजुरी गडावर त्यामानाने गर्दी अधिक असल्यामुळे आम्ही (म्हणजे मी आणि माझे बाबा) कडेपठाराकडे कूच करायचे ठरवले. आणि त्या दिशेने जाऊ लागलो.
पादत्राणे जिथे काढली होती त्या ठिकाणी बाजूला एक बिचारा हत्ती अंग चोरून बसलेला दिसला. खरं सांगायचं तर वाईट वाटलं. आपल्या पूर्वजांनी कोरून ठेवलेली ही धरोहर इतकी दुर्लक्षित कशी? त्या हत्तीचे नशीब इतकेच की कोणीतरी भाविकाने थोडा भंडारा त्याच्यावर उधळला होता. लोकांची आपल्या इतिहासाबद्दल असलेली अनास्था आणि देवावरची उरली सुरली आस्था एकाच ठिकाणी दिसत होती.
तिथेच थोडा चहा घेतल्यावर आम्ही आमची यात्रा सुरू केली. ऑगस्ट चा महिना आणि श्रावण असल्यामुळे ऊन पावसाचा खेळ होणार हे निश्चित होते. पण आम्ही कडेपठाराकडे जाणाऱ्या वाटेच्या दिशेला लागेपर्यंत कडकडीत ऊन होते. मंदिराच्या मागच्या बाजूने कडेपठाराकडे जाणारी वाट आहे. वाटेच्या सुरुवातीला एक कमान आहे त्यामुळे भाविकांनी चुकण्याचा संभव नाही.
कडेपठाराकडे जाणारी सुरुवातीला वाट तशी सामान्य आहे. सुरुवातीला पायऱ्या आहेत. हळूहळू चढण सुरु होते. काही मिनिटे चालल्यावर मी अचानक मागे वळून पहिले तर जेजुरी गड दिसत होता आणि आभाळ देखील भरून आलेले होते. दुरून जेजुरी गड आणखीनच प्रशस्त वाटतो!
पहिल्या टेकडीच्या वाटेवर या मार्गातला पहिला नंदी दिसला. भाविकांनी त्याला भंडारा वाहिला होता. आपल्या स्वामीपासून इतका दूर हा नंदी बसलेला बघून अध्यात्म, निष्ठा, स्वामीभक्ती इत्यादी विचार मनात दाटून आले.
पहिली टेकडी चढतो न चढतो तोच वारा सुटला आणि ढग जमून गडद होऊ लागले. पहिल्या टेकडीवरून उतरताना भुरभुर सुरू झाली. आणि त्या टेकडीच्या पायाशी असलेल्या ताडपत्रीचा आसरा घ्यावा लागला.
जवळ जवळ अर्धा तास झाल्यावर आम्ही पाऊस असून देखील तो ताडपत्रीचा आश्रय सोडला कारण असे थांबून राहिलो तर तिथेच दिवस मावळला असता. माझा कॅमेरा मी मुद्दाम बॅगेत ठेवून दिला आणि मोबाईल व GoPro च्या साहाय्याने फोटो काढत यात्रा पुनश्च आरंभ केली!
पहिली टेकडी उतरताना जी मजा आली ती दुसरी चढताना मावळते की काय अशी भीती वाटू लागली. पण श्रावण सरी आणि वारा यांनी मनोधैर्य वाढवलं. वातावरण अगदी कुंद झालेले होते. आम्ही काही पावले पुढे गेलो आणि खरोखरच श्रवणातला ऊन पावसाचा खेळ सुरु झाला.
दुसरी टेकडी चढल्यावर थोडी मोकळी जागा आली. याला “मेट” असे सुद्धा म्हणतात. या मेटावर काही दगडी रचना आणि जुने अवशेष दिसले. पूर्वी कधीतरी कोण्या भाविकांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी छोटी मंदिरे बांधावीत तशी ती दिसत होती. आधीच्या भागात सांगितल्याप्रमाणे पूर्वी लोक नवरा आणि बायको एकत्र असल्यासारख्या मुर्त्या घडवत आणि देवाप्रती कृतज्ञता म्हणून कायमस्वरूपी मंदिरात ठेवत. या शिलालेख नसले तर या मुर्त्या नक्की कोणाच्या आहेत हे सांगणं कठीण आहे. त्यांच्या बरोबर जुन्या काळातील पाण्याची ठिकाणे दिसली. काही आणखीन भग्नावशेष दिसले. यावरून इतके तर नक्की झाले की ही वाट फार जुनी आहे आणि कधी काळी इथे पूर्ण व्यवस्था देखील होती.
लोकांनी या मेटावर काही दगड एकमेकांवर लगोरी सारखे रचले होते. खरं सांगायचं तर माझ्या माहितीत याला कुठलेही ऐतिहासिक अथवा पारंपरिक महत्व नाही. पाश्चात्य करतात म्हणून आपले लोक करतात!
हे मेट पार करून आम्ही पुढच्या चढणाकडे जाता जाता भुरभुर सुरूच होती! बाजूला एक मोठे वारूळ होते. भाविकांनी त्याच्यावर देखील भंडारा वाहिला होता!
पुढच्या टेकडीच्या चढणाला काही जुन्या पायऱ्या होत्या आणि पायऱ्यांच्या अखेरीस एक प्रवेशद्वार! कोणत्याही नाटकाच्या किंवा सिनेमाच्या सेटला शोभून दिसेल अशी त्यांची रचना होती. त्याच्या एका बाजूला वृंदावनासारखे काही होते आणि त्याच्या पायऱ्यांच्या काही दगडांवर देखील भंडारा दिसत होता.
त्या द्वाराकडे बघून खात्री झाली की या यात्रेच्या मार्गावर पूर्वी पहारा असला पाहिजे. हे चढण चढून वर गेलो आणि मागे वळून पाहिलं तर या दारातून जेजुरी गड काळ्या पाषाणाने सजवलेल्या हिरवाईच्या शेल्यात एखाद्या देवा सारखा दिसत होता. फार सुंदर दृश्य होते ते. त्या दारात मशाली आणि दिवे ठेवायला देखील जागा होती. ते पाहून मनात “पूर्वी हा मार्ग कसा दिसत असावा?” याबद्दल कुतूहल निर्माण झालं. त्याचप्रमाणे जेव्हा या मार्गावर हा सगळं बंदोबस्त असेल तेव्हा आत्ता उघडे बोडके आणि भग्न झालेले हे डोंगर किती सुंदर दिसत असतील नाही?
हे दार ओलांडल्यावर आणखीन एक मेट आले. पण या मेटावर फार काही नव्हते. एकमेव आश्चर्याची गोष्ट म्हणजे लाल माती! या मेटावर आम्हाला लाल माती दिसली. या भागात लाल माती दिसणे जरा विरळाच आहे! मेटावरून आजूबाजूची दृश्ये फार सुंदर दिसत होती. त्यातील काही काही देत आहे.
पुढे पुन्हा चढण सुरु झाले आणि आम्ही आणखीन एका दवारापाशी पोहोचलो. हे चढण मात्र तितके सोपे नव्हते! त्यातून आम्ही दोघेही निश्चितपणे फक्त भाविक नाही हे आजूबाजूच्या लोकांच्या चेहऱ्यावरील भाव सांगत होते. यावर गम्मत म्हणजे मी GoPro सेल्फी स्टिक लावून चालत चालत व्हिडीओ करत असल्याने लोकांना आणखीनच “हे ध्यान कुठून आलं?” असं वाटत होतं बहुदा!. खालील व्हिडीओ मध्ये तुम्ही लोकांच्या प्रतिक्रिया आणि चेहऱ्यावरील भाव बघू शकता! 🙂
या द्वारातून मात्र दिसणारे दृश्य आणखीनच सुंदर होते! डोंगरावरून वर खाली करत येणारी ती वाट, समोर जेजुरी गड, कुंद आभाळ आणि खाली हिरवाई!
हे दार ओलांडून वर आलो तेव्हा मात्र चढण थोडे कमी झाले आणि इथून पुढची वाट फार चढण असलेली नसणार आहे याचे संकेत मिळू लागले. थोड्या फार पायऱ्या आणि जेमतेम उंचवटे! एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कडेपठाराचे मंदिर किंवा सिंहासन या वाटेवरून जाताना दिसत नाही. ते डोंगराच्या पुढच्या बाजूला असल्यामुळे पुढे गेल्याशिवाय त्याचे दर्शन होत नाही.
आता मात्र चालत असताना अचानक पाऊस थांबला आणि उन्हाची तिरीप आली. ज्यांना ज्यांना अशा ठिकाणी जायची आवड आहे त्यांना आवर्जून सांगावेसे वाटते की ही तिरीप चांगली नसते. डोळ्यांना गॉगल आणि डोक्यावर टोपी अत्यावश्यक आहे! इथल्या द्वाराजवळ आम्हाला एक जुना गांजलेला रोप वे सुद्धा दिसला. कधी काळी याचा उपयोग किंवा किमान प्रात्यक्षिक तरी झाले असावे. आम्हाला तरी आजूबाजूला कुठे चालू अवस्थेतील रोपवे दिसला नाही.
इथून पुढच्या पायऱ्यांवर चढताना काही दगडांवर अगदी पुसट कोरीवकाम दिसले. त्याचा अजून तरी उलगडा झालेला नाही. काळ्या कातळावर ही चक्रे आणि रेषा कोणी व का कोरल्या असाव्यात हा मोठा कुतूहलाचा विषय आहे! खाली फोटोत त्या रेषा ठळक दिसाव्या अशा पद्धतीने edit करून दाखवत आहे. त्यातील चक्र आणि रेषा नीट पाहा
या द्वारातून पुढे गेल्यावर चढण आणखीन कमी झाले. थोडे पुढे जाताच पूर्वीचा तपास नाका म्हणजे चेकपोस्ट (भग्न) दिसला. त्यावर काही महाभागांनी आपले गलिच्छ अस्तित्व लिहून ठेवले होते. त्यांची रचना नक्कीच वेगळी होती. असे भग्नावशेष पहिले की आनंद ही होतो की आपले पूर्वज काही चांगलं करून गेले आणि दुःख ही होतं की आपण ते जतन करू शकलो नाही!
आम्ही कुतूहल म्हणून या अवशेषांच्या आजूबाजूला बघण्याचे ठरवले. आणि एका रचनेत एक विचित्र गोष्ट दिसली. एक फार खोल खड्डा! आमचा अंदाज असा की पिण्याच्या पाण्याची येथे सोय असावी. गुप्त मार्ग वगैरे वाटला नाही. तुम्हीच खालील व्हिडीओ पाहा आणि अभिप्राय कळवा..
आता कडेपठार मंदिराच्या वाटेवरचा शेवटचा टप्पा दिसू लागला होता. आता शेवटचा टप्पा आणि समोर एका मंदिराचा कळस दिसत होता. अर्थातच हे कडेपठाराचे मंदिर नव्हते कारण ते इतके लहान असणे माझ्या मनाला अजिबात पटले नाही. पण समोरच्या पठारावर खंडोबाचे मूळ स्थान आहे हे समजताच पाऊले जरा भराभर पुढे पडू लागली. आम्ही जात असताना सकाळीच तिथे दर्शनाला गेलेले काही भाविक पार्ट येत होते. एक मात्र नक्की की जितकी गर्दी खालच्या मंदिरात होती त्याच्या एक दशमांश सुद्धा वरच्या मंदिरात नव्हती. इथून दिसणारी हिरवाई आणि दरी फार सुंदर होती. या दरीत बहुदा कुठले मंदिर असावे. त्याचा कळस पुसटसा दिसत होता. आणि इथूनच मोरांची केका देखील ऐकू येत होती.
याच वाटेवरून पुढे चालत गेलो आणि जेजुरी कडेपठार देवस्थानाचे प्रवेशद्वार आले! देवस्थान अथवा सरकार कोणीतरी हे प्रवेशद्वार सुंदर करणे गरजेचे आहे. गावात जागोजागी कमानी उभ्या करण्यापेक्षा आपल्या तीर्थक्षेत्रांकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे. कधीतरी हे ही होईल अशी आशा करूया.. हा भाग इथेच थांबवतो. प्रवास मोठा आहे. व्यवस्थित लिहिण्यासाठी आणि वाचकांना देखील आनंद मिळण्यासाठी भागांमध्ये विभागणी गरजेची आहे. जेजुरीच्या कडेपठारावरील तीर्थक्षेत्र आणि परिसराचे अनुभव पुढील भागात..
यळकोट यळकोट !!