आपल्या सगळ्यांना हिटलर, त्याची नाझी पार्टी आणि त्याने ज्यूंवर केलेले अनन्वीत अत्याचार यांबद्दल इतिहासाच्या पुस्तकांमधून शिकवलं गेलेलं आहे. पण, जे काही शिकवलं गेलं ते दुसऱ्या महायुद्धाच्या अनुषंगाने. मला हा प्रश्न कायम पडायचा की मुळात हिटलर सत्तेत आलाच कसा? जर्मनीचे लोक तर हुशार समजले जातात. मग त्यांनी अशा क्रूर आणि खुनशी माणसाला निवडून कसं आणलं? त्याने ज्यूंच्या विरोधात चालवलेला प्रचार सगळ्यांना माहिती आहे. पण हिटलरचा संपूर्ण जर्मनीवर काबीज व्हायचा इतिहास फारसा कुणाला माहिती नाही. हिटलरचा जर्मनीवर एकछत्री अंमल सुरु झाला ३० जून १९३४ पासून. या दिवसाला Nacht der langen Messer म्हणजेच इंग्रजीमध्ये Night of the long knives असं देखील म्हणतात.
३० जून ते २२ जुलै १९३४ हिटलर आणि त्याच्या हाताखालच्या गेस्टापो, Schutzstaffel (SS – नाझी पार्टीची अर्धसैन्यबल) यांनी अधिकृतरीत्या ८५ लोकांचा जीव घेतला (काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार ही संख्या १५० ते २०० असू शकते) आणि हजारोंना बंदी बनवलं. मृत व्यक्तींमध्ये Sturmabteilung (SA – नाझी पार्टीचे मूळ/पहिले अर्धसैन्यबल) च्या प्रमुखांचा, नाझी पार्टीशी संलग्न व्यक्तींचा, डाव्या विचारसरणीच्या महत्वपूर्ण व्यक्तींचा आणि हिटलरच्या विरोधकांचा समावेश होता ज्यात Vice-Chancellor (उप-पंतप्रधान) Franz von Papen यांचे समर्थक देखील होते. हे हत्याकांड Operation Hummingbird या नावाने घडवून आणलेलं होतं.
तर इतिहास असा आहे की,
Sturmabteilung (SA) ने हिटलरला निवडणुकांमध्ये मदत केलेली होती. SA च्या सदस्यांचा इतिहास पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीत झालेल्या स्थानिक युद्धांपर्यंत जातो. SA चे बहुतांश सदस्य जर्मनीच्या सैन्यदलात होते आणि पहिल्यापासूनच “नोव्हेंबर क्रांती” मधून निर्माण झालेल्या सरकारांच्या विरोधात. नोव्हेंबर क्रांतीनंतर तत्कालीन राजेशाही संपुष्टात आणून तिथे लोकशाही सरकारची “Weimar Republic” स्थापना झाली.पण हे सरकार मुख्यतः साम्यवादी पार्टीचे होते. ज्यांना रशिया च्या साम्यवादी सरकारची साथ होती. जर्मन सैन्य आणि रशियन सैन्य यांच्या वितुष्टाचा एक मोठा इतिहास आहे. त्यामुळे सैन्यदल आणि सरकार यांच्यात खटके उडू लागले ज्याचं रूपांतर हिंसक संघर्षात देखील झालं. संघर्षविराम झाला तरीही ते कायम नोव्हेंबर क्रांती घडवून आणणाऱ्या “नोव्हेंबर गुन्हेगारांच्या” विरोधातच उभे राहिले.

१९२० ते १९३० च्या दरम्यान नाझी पार्टी NSDAP (Nationalsozialistische Deutsche Arbeiterpartei) म्हणजेच National Socialist German Workers’ Party चा एक प्रमुख नेता हिटलर याला पुढे केले. हिटलरने SA चे हिंसक दबावतंत्र वापरून नाझी पार्टी साठी सत्ता हस्तगत करायला सुरुवात केली, विरोधकांच्या सभा उधळायला सुरुवात केली, नेत्यांना धमक्या देणं नेहमीचं होऊ लागलं. हिटलरचे प्रमुख सावज साम्यवादी पार्टी (Communist Party) होती.

१९३० च्या दशकाच्या सुरुवातीला SA आणि साम्यवादी पार्टी यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आणि त्याने भयानक हिंसक वळण घेतले. शेकडो लोकांचा नाहक जीव गेला आणि “Weimar Republic” अस्थिर झाले. नाझी पार्टीने हे मुद्दाम घडवून आणलं असे इतिहासकार सांगतात. याच काळात Ernst Röhm अर्न्स्ट रोहम SA चे अध्यक्ष झाले. अर्न्स्ट रोहम कधीकाळी हिटलरचे सहकारी होते.

३० जानेवारी १९३३ साली नाझी पार्टीचे सर्वेसर्वा आणि जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष पॉल व्हॉन हिंडेनबर्ग यांनी पार्टीतील सहकाऱ्यांच्या दबावाखाली हिटलरला Chancellor (मोघम भाषेत सांगायचं झालं तर पंतप्रधान) घोषित केलं. वास्तविक १९३२ मध्ये हिटलरने, हिंडेनबर्ग यांच्याविरुद्ध राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. पण त्यात हिटलर हरला होता. हिटलरच्या हातात बरीच शक्ती एकवटली आणि इथे सुरुवात झाली हिटलरच्या क्रूर, रक्तपिपासू राज्यलालसेला.
चॅन्सलर (Chancellor) होताच हिटलरने नाझी पार्टीच्या सर्व विरोधकांना बंदी बनवायला, त्यांचे शोषण करायला आणि त्यांना अटकाव करायला सुरुवात केली. त्याचे एकच उद्दिष्ट होते काहीही करून Reichstag (Lower House, भारतीय लोकसभेसारखे सदन) मध्ये नाझी पार्टीला बहुमत मिळवून द्यायचे. त्यासाठी हिटलरने दबावतंत्र, हिंसा, राजकीय आरोपांखाली हत्या आणि दहशत या सगळ्यांचा वापर केला. २८ फेब्रुवारी १९३३ ला राष्ट्राध्यक्ष हिंडेनबर्ग यांनी आणीबाणी घोषित केली आणि जनतेचे लोकशाही अधिकार संपुष्टात आणून नाझी पार्टीचे एकछत्री अंमल लागू केले. ३ मार्च १९३३ च्या निवडणुकीत नाझी पार्टीला ४९.३% मते मिळाली पण तरीही Reichstag वर अधिपत्य मिळाले नाही.
२३ मार्च १९३३ ला हिटलर ने एक Enabling Law (वटहुकूम कायदा) चा प्रस्ताव मांडला ज्याच्यापास होण्याने चॅन्सलरला कुठलाही निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा आणण्यासाठी Reichstag ची गरज लागणार नव्हती. थोडक्यात हुकूमशाहीचा प्रस्ताव मांडला. त्या कालच्या भीतीच्या वातावरणात तो कायदा पास करण्यात आला. राष्ट्राध्यक्ष हिंडेनबर्ग यांची देखील या कायद्याला सहमती होती. २४ मार्चला हा कायदा पास झाला आणि आता सर्व सत्ता हिटलरच्या हातात आली. आता हिटलर कुठलाही फर्मान काढायला मुखत्यार झाला.

या घटनांबरोबर SA देखील वाढत होती आणि त्याचबरोबर अर्न्स्ट रोहम यांचे लोकांमधले व पार्टीमधले वजन देखील वाढत होते आणि याचबरोबर हिटलरशी वितुष्ट देखील. रोहम आपल्याला भारी पडणार ही आशंका हिटलरच्या मनात घर करू लागली आणि आपल्या विरोधकांना नामोहरम करण्याची मानसिकता असलेला हिटलर अर्न्स्ट रोहम यांना वाटेतून बाजूला करण्याचा विचार करू लागला. १९३४ च्या सुरुवातीपासून हिटलरचे सर्वाधिकाराचे आणि अर्न्स्ट रोहम यांना वाटेतून हटवण्याचे डावपेच सुरु झाले आणि जून येता येता त्यांना पूर्ण स्वरूप येऊ लागलं.
८ जून १९३४ ला हिटलने, अर्न्स्ट रोहम यांच्यासकट SA बऱ्याचशा उच्च अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं. २८ जून १९३४ रोजी हिटलरने, अर्न्स्ट रोहम यांना सगळ्या उच्च अधिकाऱ्यांना घेऊन Bavaria प्रांतातील Bad Wiesse येथे एका हॉटेलमध्ये जमा व्हायचा आदेश दिला. आदेशानुसार अर्न्स्ट रोहम आणि SA चे अनेक उच्च अधिकारी जमले. २९ च्या रात्री हिटलर स्वतः तिथे पोहोचला आणि ३० जूनला सकाळी रोहम सक्त सगळ्यांना बंदी करायचे आदेश Schutzstaffel (SS) म्हणजेच हिटलरच्या वैयक्तिक सैन्याला दिले आणि त्याच दिवशी रक्तरंजित शुद्धीकरण (Purge) सुरु झालं.
जमलेल्या सगळ्यांना म्युनिच मधल्या एका तुरुंगात डांबलं आणि पुढचे ३ दिवस म्हणजे, २ जुलै पर्यंत हत्यासत्र सुरु राहिले. रोहम ना मारण्याबाबत हिटलर साशंक होता पण शेवटी त्याच्या आदेशानुसार १ जुलै १९३४ ला अर्न्स्ट रोहम यांना देखील ठार मारण्यात आलं. त्या हत्येबद्दल नोंद अशी आहे की अर्न्स्ट रोहम SS चे अधिकारी Theodor Eicke आणि Michael Lippert रोहम यांच्या बंदिगृहात एक पिस्तूल घेऊन गेले आणि म्हणाले की १० मिनिटात तुम्ही आत्महत्या करा नाहीतर आम्हाला तुम्हाला मरावं लागेल. अर्न्स्ट रोहम म्हणाले की, जर मारायचंच असेल तर हिटलरला येऊन मारायला सांगा. Eicke आणि Lippert, हा संदेश घेऊन गेले आणि थोड्या वेळाने पार्ट आले. अर्न्स्ट छाती काढून उभे होते. त्या दोघांनी मिळून रोहम यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना ठार केलं. आख्यायिका अशी आहे की रोहम मारताना “हेल हिटलर (Heil Hitler)” म्हणाले!
मृतांमध्ये भूतपूर्व चॅन्सलर, त्यांची पत्नी व साथीदार, Bavaria चे अध्यक्ष ज्यांनी १९३३ मध्ये हिटलरचा विरोध केला होता आणि अनेक नाझी नेत्यांचा समावेश होता. Vice Chancellor व्हॉन पापेन थोडक्यात बचावले होते पण त्यांच्या साथीदारांची हत्या करण्यात आली. हीच ती Night of the long knives एक रक्तरंजित रात्र ज्या रात्रीच्या नंतर हिटलर नावाच्या भस्मासुराचा उदय झाला, संपूर्ण जर्मनी त्याच्या अधिपत्याखाली आली.

विशेष म्हणजे ३ जुलै १९३४ ला या हत्याकांडाला जर्मनीच्या Reichstag ने राष्ट्रहितार्थ संमती दिली आणि हत्याकांड राष्ट्राच्या दृष्टीने हिताचे आणि गरजेचे होते असा ठराव मान्य केला. १३ जुलै १९३४ च्या Reichstag मधील भाषणात हिटलरने अधिकृतरीत्या आपण जर्मनीचे एकछत्री राज्यकर्ते असल्याची घोषणा केली. बाकी पुढचा इतिहास बहुदा सगळ्यांना माहितीच आहे.
आज ३० जून २०२०, या घटनेला ८६ वर्षे झाली. ८६ वर्षांपूर्वी घडलेल्या या हत्याकांडाचे जगावर फार दूरगामी परिणाम झाले.