विराणी किंवा विरहिणी म्हटलं की सहज मनात येतात ते म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. पण किती जणांना हे ठाऊक आहे की संत तुकाराम महाराजांनी देखील विराणी रचलेल्या आहेत. उदाहरणार्थ “हाचि नेम आतां”! भारतीय अध्यात्मिक पद्य साहित्यात अनेक प्रकार आहेत. संत मंडळींनी रचलेल्या पद्य रचनांचा मूळ उद्देश सर्वसामान्य लोकांना समजेल आणि भावेल अशा भाषेत आपला संदेश पोहोचवणे हा आहे. आपले विचार सादर करत असताना ऐकणाऱ्यांचे लक्ष विचलित होणार नाही याचा देखील विचार करावा लागे. अध्यात्मिक पद्य प्रकारांत अभंग, ओव्या, भारूड, लावणी (होय पूर्वी फडात अध्यात्मिक विषयांवर लावण्या रचल्या जात), भजन आणि विराणी या काव्यप्रकारांचा प्रामुख्याने उल्लेख केलाच पाहिजे. यात विराणी हा काव्य प्रकार अत्यंत प्रसिद्ध आहे.
विराणी हा शब्द विरहिणी या शब्दाचा अपभ्रंश आहे. आणि विरहिणी हा शब्द विरह या शब्दावरून आलेला आहे. संत मंडळींनी प्रेयसी आणि प्रियकर यांचे रूपक अध्यात्मिक जगातील भक्त आणि देव यांच्यातील संबंधासाठी वापरलेले आहे. ज्याप्रमाणे प्रेयसी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी आतुर असते त्याचप्रमाणे भक्त देखील देवाला भेटण्यासाठी व्याकुळ झालेला असतो. ज्याप्रमाणे प्रेयसीला प्रेमात आपल्या प्रियकराशी एकरूप व्हायची ओढ असते त्याचप्रमाणे भक्ताला भक्तिरसात न्हाऊन परमेश्वराशी एकरूप व्हायचे असते. या रुपकामुळे काव्यात कथा आणि पात्रे देखील येतात आणि काव्य केवळ काव्य न राहता एक प्रकारचे कथन किंवा इंग्रजीत ज्याला narration म्हणतात होऊन जाते. कधी कधी विराणीत तर विवाहितेला प्रेमात घर सोडून परपुरुषाशी संग करताना देखील वर्णिले जाते. पण त्याचा अर्थ मायारूपी संसाराला, षड्रिपुंना, इंद्रियभोगाला आणि विषयांना सोडून नित्यानंदी परब्रह्माशी संबंध जोडणारा भक्त असा आहे. अर्थातच कथाकथन सर्वांनाच आवडते. प्रेम आणि भक्ती या भावना वैश्विक आणि तितक्याच दैहिक असल्यामुळे प्रत्येकाच्या कल्पनेला छेडणारा कथनाला अग्रक्रम देणारा हा काव्य प्रकार अत्यंत लोकप्रिय आहे.
हाचि नेम आतां न फिरें माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥
घररिघी जालें पट्टराणी बळें । वरिलें सांवळें परब्रम्ह ॥२॥
बळियाचा अंगसंग जाला आतां । नाहीं भय चिंता तुका म्हणे ॥३॥
या विराणीतही संत तुकाराम महाराजांनी रूपक वापरले आहे ते प्रेयसीचे. जी म्हणते की, हाच नेम केलेला आहे, प्रतिज्ञा घेतलेली आहे, प्रण केलेला आहे की आतां न फिरें माघारी, आता त्या मायारूपी संसारात पुन्हा जायचे नाही. अध्यात्माचा मार्ग धरायचा. हाच प्रण करून ही विरहिणी बैसली शेजारीं गोविंदाच्या! गोविन्द म्हणजे अर्थातच विष्णू. पण याच्याही पलीकडे जाऊन गोविंद या शब्दाची निवड किती उत्तम आहे बघा कारण, गोविंद म्हणजे इंद्रियांना सुख देणारा, शांती देणारा असा देखील अर्थ होतो! थोडक्यात भक्ताने इंद्रियभोगी, वीषयभोगी जगाचा त्याग केलेला आहे आणि आता तो नित्यानंद गोविंदच्या शेजारी जाऊन बसलेला आहे!
विरहिणी म्हणते मी घररिघी, घररिघी म्हणजे आपणहून आलेली, मागे लागून आलेली, बळेने पट्टराणी झाले! इथे थोडे विवेचन गरजेचे आहे. कारण राणी ही फक्त राजाची असते आणि पट्टराणी म्हणजे लाडकी राणी. विरहिणी म्हणते मी बळेच, आपणहून, जाणून बुजून घर सोडले आणि राजाशी लग्न केले. आता हे बळ कोणते तर भक्तीचे, प्रेमाचे. परमेश्वराच्या भक्तीच्या आणि प्रेमाच्या बळाने भक्त परमेश्वराकडे ओढला जातो जणू गुरुत्वाकर्षण शक्ती! पट्टराणी झाली ती परमेश्वराची वरिलें सांवळें परब्रम्ह. इथे तुकाराम महाराज म्हणतात की भक्ताने विठ्ठलाला पूर्णपणे आपलेसे केले आहे जणू विवाह. भारतीय संस्कृतीत विवाह केवळ कागदावर लिहिलेला करारनामा नसून जन्मोजन्मीचे नाते आहे. भक्ताने परमेश्वराशी अनंत काळासाठी जोडलेले नाते!
एकदा परमेश्वराचा संग झाला, बळियाचा अंगसंग जाला की भय कशाचे आणि चिंता कशाची? बळी म्हणजे परमेश्वर. एकदा परमेश्वराने आपल्या पायाशी जागा दिल्यावर माणसाला कुठलेच भय उरत नाही, निर्भय होतो! त्याच स्थितीचे वर्णन तुकोबा करतात की पांडुरंगाचा संग मिळाला आता नाहीं भय चिंता फक्त मोक्ष!
इथे खरं तर विवेचन संपतं पण ही विराणी वाचून मला खरी आठवण आली ती विष्णुप्रियावतार रुक्मिणीची. घरचे बळजबरीने एका दुष्टाशी लग्न लावून द्यायला निघाले होते पण रुक्मिणीने मनोमन श्रीकृष्णाशी विवाह केलेला होता. तेव्हा तिच्यावर आलेले हे संकट दूर करण्यासाठी आणि तिच्या भक्तीचा, प्रेमाचा मान ठेवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण विदर्भास जातात आणि रुक्मिणीहरण करतात. रुक्मिणी सुद्धा “लग्न करेन तर श्रीकृष्णाशीच” हाचि नेम करून आपले घर सोडून जायला तयार होते. अखेर श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचे लग्न होते आणि कवींनी त्यांचे वर्णन अनेकदा झोपाळ्यात एकत्र बसलेले आहेत, असे केलेले आहे! तसे पाहायला गेले तर रुक्मिणीचे प्रारब्ध हेच होते आणि हाच अवताराचा देखील मोक्ष होता!
किती अप्रतिम काव्य आणि अप्रतिम प्रतिमा!