।।श्री राम।।
नमस्कार,
भाषांची, वाचनाची आणि लेखनाची आवड. सामाजिक विचार, प्रबोधन, इतिहास, निसर्ग, साहित्य इत्यादी विषय जवळचे. याच प्रेरणेतून शब्दयात्री ची संकल्पना मनात आली. शब्दयात्री सगळ्यांसाठी आनंददायी, माहितीपर, प्रेरणादायी आणि विचार करायला लावणारा होवो आणि अंततः सगळेच शब्दयात्री होतील व आपल्या विचारांना मूर्त स्वरूप देतील ही प्रार्थना करतो.
नृपश्रेष्ठा न सोडी धीर ॥ ऐक एक सांगतो विचार ॥ जै पंचभूते नव्हती समग्र ॥ शशिमित्र नव्हते तै ॥
नव्हता मायामय विकार ॥ केवळ ब्रह्ममय साचार ॥ तेथे झाले स्फुरणजागर ॥ अहं ब्रह्म म्हणोनिया ॥
शिवलीलामृताच्या अकराव्या अध्यायात समस्त विश्वाचे स्फुरण, सृजन कसे झाले याविषयी उल्लेख आढळतो. जेव्हा विश्वात काहीच नव्हते तेव्हा शिवतत्त्व “अहं ब्रह्मास्मि” म्हणत विश्वाची निर्मिती करू लागले. एका अर्थाने पाहिलं तर ध्वनिकंपनाने जेव्हा शब्दाचे रूप धारण केले तेव्हा विश्वाला शिवतत्त्वाचा परिचय झाला.
उत्पत्तीचा विचार केला तर असं लक्षात येईल की सर्व सजीव ध्वनी, संकेत निर्माण करू शकतात. पण जोपर्यंत त्या ध्वनींना किंवा संकेतांना अर्थ प्राप्त होत नाहीत तोपर्यंत ते ध्वनी अथवा संकेत संवाद साधण्यासाठी निरुपयोगी ठरतात. माझ्या मते जेव्हा ध्वनी आणि संकेतांना अर्थ प्राप्त होतात तेव्हा शब्द जन्म घेतात. सतत संवाद साधणारे आपण कायम शब्दांच्या शोधात असतो. आत्ताही हे लिहिताना मी शब्दांच्या गावातून योग्य शब्द शोधण्याचा आणि तुम्ही वाचताना त्या शब्दांच्या गावातील खाणाखुणा ओळखून त्यांचे अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहात.
खऱ्या अर्थाने संवाद साधणारे आपण सगळेच शब्दयात्री आहोत!
काही प्रश्न असल्यास किंवा तुम्हालाही “शब्दयात्री” व्हायचं असेल म्हणजेच तुमचे लेखन शब्दयात्री वर प्रसिद्ध करायचे असेल तर माझ्याशी खालील ई मेल वर संपर्क साधू शकता
shabdyatri@gmail.com