संथ वाहते कृष्णामाई! – चित्रपट आणि भावार्थ

संथ वाहते कृष्णामाई! – चित्रपट आणि भावार्थ

Spread the love

संथ वाहते कृष्णामाई – एका दुपारची गोष्ट

संध्येच्या दिशेने झुकत चाललेल्या एका निवांत दुपारी गिटार वाजवत असताना अचानक राग “वृंदावनी सारंग” चे काही स्वर आपोआप छेडले गेले आणि नकळत “संथ वाहते कृष्णामाई” या गीताचे बोल वाजवू लागलो. लहानपणापासून हे गाणे ऐकत आलेलो आहे. या नितांत सुंदर आणि भावपूर्ण गीताचे बोल मला वाजवता आले याचा आनंद होताच. पण, या गीतातील शब्द आणि स्वर इतके आल्हाददायक आहेत की ते गाणे गुणगुणताना कधी आपण संथ वाहणार्‍या कृष्णामाईच्या पाण्यावर एखाद्या पानासारखे वाहून जातो समजत नाही. या गाण्यातील शब्द आणि स्वर यांना एकमेकांपासून विलग करणं निव्वळ अशक्य आहे. खरं तर गदिमा आणि बाबूजी यांच्या सगळ्याच गीतांबद्दल हे सांगता येईल. या गीताचे संगीतकार दत्ता डावजेकर, ज्यांच्याबद्दल हल्ली क्वचितच कुणाला माहित असते, हे एक मोठे दुर्दैव!

असो, गाण्याचे बोल वाजवत असताना, गात असताना माझे कवी मन शब्दांच्या मागचे सूक्ष्म आणि उघड अर्थ, दडलेले भावार्थ शोधू लागले. अर्थातच मा‍झ्या मनात भावार्थाची तोरणे चढू लागली. पण तरीही जाणवत होतं की काहीतरी कमतरता आहे. गाणे माहित असले तरीही, ते चित्रपटातले असल्यामुळे ते चित्रपटात नक्की कुठे आलेले आहे? कशाच्या संदर्भात आलेले आहे? कोणते पात्र गात आहे? या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात (निदान पूर्वीच्या चित्रपटांमध्ये तरी महत्त्वाच्या होत्या!) तोपर्यंत मी केवळ या गाण्याचा व्हिडीओ पाहिलेला होता ज्यात श्रेष्ठ अभिनेते कै. राजा परांजपे एखाद्या गरीब वयस्क ब्राह्मणासारखे दिसतात ज्यांना कृष्णा नदीबद्दल अत्यंत आदर आहे, भक्ती आहे आणि करुणा देखील. पण याच्या पलीकडे काहीच माहित नव्हते! त्यामुळे शेवटी, “संथ वाहते कृष्णामाई” हा चित्रपट पाहिला!

संथ वाहते कृष्णामाई राजा परांजपे
कै. राजा परांजपे (संथ वाहते कृष्णामाई)

चित्रपटाबद्दल काही

चित्रपटाचे नाव आणि या गाण्याचे शीर्षक एकच असल्याने या गीताचे महत्त्व अधोरेखित तर होतेच शिवाय या गीताच्या प्रत्येक शब्दाकडे बारकाईने बघणे देखील आवश्यक होते. संथ वाहते कृष्णामाई या चित्रपटाचे कथानक कृष्णेकाठच्या एका गावाच्या पार्श्वभूमीवर आहे. मुख्य नायक अरुण सरनाईक. एक आदर्शवादी सुशिक्षित तरुण ज्याला आपल्या दुष्काळग्रस्त गावासाठी, तिथल्या शेतकऱ्यांसाठी काही करायचे आहे. चंद्रकांत मांढरे मुख्य खलनायक, त्या भागातले देशमुख. पैसा आणि पत यांनी उन्मत्त राजकारणी व्यक्ती. आणि मनावर परिणाम झालेले पूर्वीच्या काळचे, गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जीवाचं रान केलेले इंजिनियर राजा परांजपे, मुख्य catalyst किंवा उत्प्रेरक. या तीन मुख्य पात्रांच्या भोवती फिरणारे कथानक. त्या काळातील आणि काही प्रमाणात आजच्याही काळातील सामाजिक व राजकीय प्रश्नांवर भाष्य करणारे कथानक.

संथ वाहते कृष्णामाई चित्रपट
संथ वाहते कृष्णामाई चित्रपटाचे पोस्टर

एका गर्विष्ठ बड्या माणसासमोर एका सामान्य पण प्रामाणिक माणसाचे आव्हान! शेवटी तो सामान्य तरुण गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवतो आणि गर्विष्ठ देशमुखाला आपली चूक लक्षात येते. शेवटी देशमुख स्वतःला कृष्णेला अर्पण करतो! यात आणखीन एक विषय येतो, खोट्या मजारचा. कोण्या एका फकिराचे थडगे, सांगून जमीन लाटण्याचा केलेला प्रयत्न. राजकारणापोटी आणि जमिनीच्या मोहापोटी देशमुखाने त्या खोट्या दाव्याला दिलेला दुजोरा! (असे प्रयत्न कैक वर्षे भारतात होत आहेत) वेड्या इंजिनीयरच्या सांगण्यानुसार पुढे कागदोपत्री हे फकिराचे थडगे नसून, एका हिंदू संन्याशाची समाधी आहे हे सिद्ध होते. इतकेच नव्हे तर राजाभाऊ परांजपे ते थडगे तोडून, जमीन खणतात तेव्हा तिथून संन्याशाच्या अस्थी असलेला घट सापडतो! त्या काळात आणि आजच्या काळात फरक इतकाच आहे की तेव्हाचे कलाकार हे दाखवण्याची हिम्मत करत होते! असो..

त्या पार्श्वभूमीवर वेड्या इंजिनीयरच्या भावना अगदी ठळकपणे दिसतात. लोकांची स्वतःच्या फायद्यासाठी काम करण्याबद्दल असलेली उदासीनता, आळशीपणा, राजकारण्यांची – सक्षम माणसांची अकर्मण्यता आणि स्वतःच्या समस्या सोडवण्याबद्दल असलेली साशंकता यांना पाहून कृष्णामाई चे पाणी लोकांच्या भल्यासाठी वापरू पाहणाऱ्या इंजिनियरला मनातून दुःख झालेले आहे. “लोक असे का आहेत?” या प्रश्नाने ग्रासलेला हा इंजिनियर आपला “प्लॅन” जपून ठेवतो. कदाचित कुणी येईल आणि या कृष्णामाई च्या वाहून जाणाऱ्या पाण्याचा सदुपयोग करेल या आशेवर हा इंजिनियर एका पडीक मंदिरात जगत असतो. जगाकडून मिळालेल्या नकारार्थी प्रतिसादाने वेडावलेल्या इंजिनियरशी कोणी बोलत नाही. तो इंजिनियर सुद्धा कोणाशी बोलायला इच्छुक नाही. कृष्णामाई ला एक पवित्र गंगा मानणाऱ्या इंजिनियरच्या मनातील करुणेचे उत्कट दर्शन या गीतातून होते. तसेच त्यांची भूमिका देखील स्पष्ट होते. आदर्शवादी तरुण (अरुण सरनाईक) वेड्या इंजिनियरच्या शब्दांतून प्रेरणा घेतो आणि कृष्णेचे पाणी गावाकडे नेतो व गावाला दुष्काळापासून मुक्ती देतो!

संथ वाहते कृष्णामाई – काही समज आणि गैरसमज

जे शब्द कानावर पडून तरुणाला स्फूर्ती मिळते ते शब्द म्हणजे “संथ वाहते कृष्णामाई” हे गीत. या गीताबद्दल माझ्या मनात अनेक समज आणि काही गैरसमज होते जे चित्रपट बघितल्यावर दूर झाले.

पहिला गैरसमज म्हणजे गीतात दोनच कडवी आहेत. मूळ गीतात तीन कडवी आहेत. पण अनेक माध्यमांमध्ये केवळ दोनच कडवी ऐकायला मिळतात, गायकही बहुदा दिनच कडवी गातात त्यामुळे हा समज झाला.

दुसरा गैरसमज म्हणजे “आळशास ही व्हावी कैसी गंगा फलदायी” या पंक्तीत “आळशास” आणि “ही” यांच्यामध्ये अंतर आहे! गाणे ऐकताना कायम “आळशासही” असेच ऐकल्याने वेगळाच अर्थ वाटायचा. पण या अंतराने पंक्तीचा अर्थच बदलला आणि चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर या पंक्तीला एक निराळाच अर्थ प्राप्त झाला.

तिसरा म्हणजे हे भक्तीगीत किंवा भक्तिभावाच्या जवळ जाणारे गीत नसून, समाजासाठी काही करू पाहणाऱ्या आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता असणाऱ्या माणसाच्या मनातील भाव आहेत आणि लोकांच्या मानसिकतेवर केलेला कटाक्ष आहे.

संथ वाहते कृष्णामाई या संपूर्ण गीताचे बोल खालील प्रमाणे

संथ वाहते कृष्णामाई
तीरावरल्या सुखदुःखाची जाणीव तिजला नाही

नदी नव्हे ही निसर्ग-नीती, आत्मगतीने सदा वाहती
लाभहानिची लवही कल्पना, नाही तिज ठायी  

कुणी नदीला म्हणती माता, कुणी मानिती पूज्य देवता
पाषाणाची घडवुन मूर्ती, पूजित कुणी राही

सतत वाहते उदंड पाणी, कुणी न वळवुन नेई रानी
आळशास ही व्हावी कैसी, गंगा फलदायी?

रसग्रहण

गाण्याच्या पार्श्वसंगीताच्या पहिल्या स्वरापासूनच कृष्णामाई चा शांत आणि संथ प्रवाह मनात वाहू लागतो! तिच्या तरल आणि शांत लहरींवर स्वर होऊन बाबूजींचे स्वर, गदिमांचे शब्द घेऊन येतात. पाण्याच्या प्रवाहात आपण उभे आहोत आणि कृष्णामाईच्या लहरी जाणवतात. स्वयंप्रवाही, स्वयंस्फूर्त आणि कर्मयोगिनी नदीचे निर्गुण वर्णन पुढच्या पंक्तीत येते. तीरावरल्या सुखदुःखाची तीला जाणीव नाही, तिचे कर्म आणि धर्म वाहात जाणे आहे! हेच ती करत राहणार, हे माणसावर अवलंबून आहे की तिच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघायचंय.

पुढच्या कडव्यात गदिमांनी नदीचे मूळ नैसर्गिक स्वरूप दाखवले आहे. की ही नदी म्हणजे नुसता पाण्याचा प्रवाह नसून निसर्गचक्रातील एक महत्त्वाचा घटक आहे. ही एक नीती आहे जिच्या अवतीभवती सबंध विश्व उभे राहाते. ही नदी आत्मगतीने वाहाते, हाच निसर्ग आहे. हेच तिचे सच्चिदानंद रूप आहे. तिला लाभ आणि हानी यांची पर्वा नसते, पूर्ण स्थितप्रज्ञ! भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणे “दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः। वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते।।” नमूद केल्यानुसार कृष्णामाई स्थितप्रज्ञ आहे. स्वतःच्या धर्माचे पालन करत आहे. परोपकार करत आहे!

नदीला नदी म्हणून न बघणे, हे एका इंजिनियरचे दुःख पुढच्या कडव्यात समोर येते. माझा एक गैरसमज होता की या कडव्यात केवळ लोकांचे नदीच्या प्रति असलेला भक्तिभाव नमूद केला जात आहे. पण चित्रपट पाहून एक गोष्ट लक्षात आली की हे वर्णन नसून एक कटाक्ष आहे. याचे मुख्य कारण शेवटचा शब्द “राही” ज्याचा उपयोग सतत सुरू असणाऱ्या गोष्टीबद्दल केला जातो. इंजिनियर इतकी वर्षे गावातील लोकांना हेच करताना बघत आहे! या पात्राची पार्श्वभूमी, चित्रपटाचे कथानक यांच्याकडे पाहून निराशेतून आलेले हे शब्द आहेत. लोकांचे नदीबद्दल अनेक समज आहेत आणि फक्त पूजा करण्यापुरतेच नदीकडे बघत राहतात! याच विचारामुळे इंजिनीयरचा चित्रपटातही गावकऱ्यांच्या बाबतीत असलेला राग दिसून येतो.

शेवटच्या कडव्यात इंजिनियर राजाभाऊ परांजपे कृष्णामाई ची खरी आराधना कशी करता येईल याबद्दल सूतोवाच करतात. या नदीत उदंड पाणी वाहात आहे, म्हणजेच वाहून देखील जात आहे. एका अर्थी वाया जात आहे. पण कुणालाही या नदीचे पाणी वाळवून आपल्या शिवारात, गावाकडे घेऊन जाण्याची बुद्धी (कशी) होत नाही?! हे त्या इंजिनियरच्या मनातील दुःख आहे. माणसाने प्रयत्नच नाही केले तर प्रगती कशी होणार? उद्धार कसा होणार? जो स्वतःसाठी कार्य करत नाही त्याचे भले कसे होणार? हे तर सत्य आहे. इथे माझा गैरसमज मी अधोरेखित केलेला आहे. मला आधी वाटायचे की “आळशास ही व्हावी कैसी, गंगा फलदायी?” म्हणजे आळशी माणसाला देखील ही कृष्णामाई, हा गंगा फलदायी होते! पण चित्रपट बघून लक्षात आलं की या पंक्तीचा अर्थ, “आळशी माणसाला ही गंगा, कृष्णामाई कशी काय फलदायी होणार? त्याला कष्ट करणं भाग आहे” असा आहे. कर्म करणे गरजेचे आहे त्याशिवाय गंगादेखील आशीर्वाद देत नाही!

एकुणच चित्रपट पाहिल्याने या गीताकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला! हा चित्रपट सगळ्यांनी जरूर पाहावा हा माझा आग्रह आहे. तसेच हे चित्रपटाचे आणि गीताचे विवेचन आवडल्यास नक्की लोकांपर्यंत पोहोचवा. आपल्या दिग्गजांच्या कलाकृती आपण लोकांपर्यंत नाही पोहोचवणार तर कोण पोहोचवणार?


कविता आणि रसग्रहणाबद्दल आणखीन ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा!

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

4 thoughts on “संथ वाहते कृष्णामाई! – चित्रपट आणि भावार्थ

  1. सुंदर , आणि माहित नसलेले काहितरी ऎकायला वाचायला मिळाल। चितरपट पहावा लागेल

  2. तात्यासाहेब बारगळ

    The Real Person!

    Author तात्यासाहेब बारगळ acts as a real person and verified as not a bot.
    Passed all tests against spam bots. Anti-Spam by CleanTalk.

    The Real Person!

    Author तात्यासाहेब बारगळ acts as a real person and verified as not a bot.
    Passed all tests against spam bots. Anti-Spam by CleanTalk.
    says:

    खुप सुंदर वर्णन…हे गीत माझ्या खुप आवडीचं आहे.. मी चित्रपट पाहिला नव्हता..पण कथानक आज समजलं..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *