William Wordsworth – She Dwelt among the Untrodden Ways (मराठी रसग्रहण)

William Wordsworth – She Dwelt among the Untrodden Ways (मराठी रसग्रहण)

Spread the love

William Wordsworth

William Wordsworth, इंग्रजी काव्यांगणातील एक अढळ तारा! आज ७ एप्रिल William Wordsworth यांचा जन्मदिवस. एक Romantic Poet किंवा कल्पनाविश्वात रममाण होणारा कवी अशी त्यांची ख्याती. Romantic या शब्दाचा अर्थ प्रणयरम्य असाही होतो. एकंदरीतच प्रेमाच्या अनंत रंगांनी आपले कल्पनाविश्व ज्यांनी रंगवले आणि त्यातच रमले अशा कवींपैकी एक William Wordsworth. त्यांची आठवण म्हणून त्यांचीच एक अत्यंत लोकप्रिय आणि प्रेमाच्या एका विवक्षित भावनेचे स्तर उकलणारी कविताShe Dwelt among the Untrodden Ways” घेऊन आलो आहोत. कवितेसह कवितेचे अनुवादासह रसग्रहण करण्याचा मानस आहे.

"She Dwelt among the Untrodden Ways"

She dwelt among the untrodden ways
Beside the springs of Dove,
A Maid whom there were none to praise
And very few to love:

A violet by a mossy stone
Half hidden from the eye!
—Fair as a star, when only one
Is shining in the sky.

She lived unknown, and few could know
When Lucy ceased to be;
But she is in her grave, and, oh,
The difference to me!

कवी कधी कोणावरच्या प्रेमाच्या अनुभूतीला शब्दकुंचल्यांनी चितारेल सांगता येत नाही. अस्तित्व नसलेल्या अस्तित्वाला जिवंत करणे आणि त्यात जणू तेच सत्य आहे असे जो वावरतो तो Romantic Poet. स्वतःच्या कल्पनाविश्वात प्रत्येक कवितेसाठी एक प्रतिसृष्टी निर्माण करणारा हा कवी!

William Wordsworth marathi मराठी She dwelt among

एक अशी तरुणी Lucy जिचे कधी अस्तित्वही नव्हते, तिच्यावर कवीचे प्रेम जडले. आपण सगळ्यांनी अशा काल्पनिक प्रेमकथा रंगवल्या आहेत! फक्त या कवितेतील Lucy आता मरण पावलेली आहे. प्रत्येक पंक्तीसरशी तिच्यावरील आपल्या प्रेमाचे सात्विक निरीक्षणांचे धागे मोकळे होत जातात.

पहिले कडवे

सुरुवातीच्या कडव्यातच William Wordsworth तिच्या गावाचे वर्णन करतात. नीट आठवून पहिले तर जाणवेल की प्रत्येक मुलाने कधी ना कधी आपल्या कल्पनेतील प्रेमिकेचे गाव मनात रंगवलेले आहे! William Wordsworth म्हणतात

She dwelt among the untrodden ways
Beside the springs of Dove

म्हणजे Dove नावाच्या झऱ्याच्या शेजारी, ती वर्दळ नसलेल्या निर्मनुष्य वाटेच्या बाजूला राहात असे! Dwelt म्हणजे निवास करणे. यावरून असे वाटू शकते की एखाद्या गावातील एका नयनरम्य भागात ती म्हणजेच प्रेयसी राहात आहे!

पण असे नाही, कारण पुढच्या पंक्तीत त्या नयनरम्य ठिकाणी तिचे एकटेपण ठळकपणे समोर येते

A Maid whom there were none to praise
And very few to love:

एक गरीब कष्ट करून पोट भरणारी मुलगी, जिचे ना कधी कौतुक होते ना कधी कोणी प्रेम करणारे आहे. थोडक्यात एकटीच राहणारी एक अबोल आणि दुर्लक्षित, शांत आणि एकटी मुलगी. आपल्या प्रेयसीकडे असे त्रयस्थपणे बघण्याची क्षमता म्हणजे एक विशेष कल्पनाविष्कार आहे. या पंक्ती वाचताना मला “ग्रेस” च्या “चुडा” (तुला पहिले मी नदीच्या किनारी) या कवितेतील खालील ओळी आठवतात

तुझी पावले गे धुक्याच्या महालात
ना वाजली ना कधी नादली
निळागर्द भासे नभाचा किनारा
न माझी मला अन तुला सावली

एकूणच आत्तापर्यंत William Wordsworth यांनी प्रेयसीच्या आयुष्याची पार्श्वभूमी तयार केलेली दिसते.

दुसरे कडवे

पुढच्या कडव्यात William Wordsworth आपल्या कल्पनेतल्या प्रेयसीचे वर्णन करतात

A violet by a mossy stone
Half hidden from the eye!

Violet, एक नाजूक फूल. पण जणू काही शेवाळे दाटून आलेल्या एखाद्या मोठ्या दगडाशेजारी उगवल्यासारखे. Mossy म्हणजे शेवाळे. शेवाळे दाटून आलेल्या डागाकडे बघून त्या डागाकडेच इतके लक्ष जाते की त्याच्या आजूबाजूला असलेल्या अस्तित्वाकडे आपोआपच दुर्लक्ष होते. Half hidden from the eye, म्हणजे जवळजवळ लपलेले. निसर्गाने आणि नशिबाने या नाजूक फुलाकडे, प्रेयसीकडे अशा निर्मनुष्य आणि एकट जागेत वाढवून दुर्लक्षित केलेले आहे. कोणाचेही लक्ष तिच्याकडे जात नाही कारण तिच्या आजूबाजूचा प्रदेश आणि कदाचित लोकही दुर्लक्ष करण्यासारखे आहेत. किंवा तिचे छोटे अस्तित्व लपवणारे आहे. बिचारीकडे कोणीच बघत नाही, माझ्या प्रेयसीकडे कोणीच बघत नाही! हे कवीचे दुःख आहे.

Fair as a star, when only one
Is shining in the sky.

एकटीच किंवा तिला या शेवाळे दाटलेल्या दगडापासून दूर करता आले तर अत्यंत सुंदर आणि तेजस्वी अशी ती आहे. Fair म्हणजे गौरवर्णी किंवा उठून दिसणारी असाही होतो. तिला या गावाच्या पार्श्वभूमीतून आणि तिच्या आयुष्याच्या भोगांपासून दूर नेता आले तर समजेल की ती किती सुंदर आहे! जणू आकाशात चमकणारी चांदणी.

तिसरे कडवे

शेवटच्या कडव्यात कवीच्या कल्पनाविश्वातील वास्तवाचे दर्शन घडते.

She lived unknown, and few could know
When Lucy ceased to be;

तिचे आयुष्य, तिचे अस्तित्व यांच्याबद्दल कोणालाही ददात नव्हती. तिच्याबद्दल फारसे कोणाला माहीतही नव्हते. ती मरण पावली तेव्हा कुणाला कळले देखील नाही आणि कोणी माहिती करून घेण्याचेही कष्ट घेतले नाही. पण,

But she is in her grave, and, oh,
The difference to me!

कुणाला काहीही माहित नसले तरीही मला (कवीला) माहित आहे की ती तिच्या थडग्यात शांत निजलेली आहे. ती तिथेच आहे आणि ती माझ्यासाठी खूप काही आहे. The difference to me म्हणजे आयुष्यात फरक पडणे. तिच्या असण्याने आणि आता नसण्याने माझ्या आयुष्यावर आणि माझ्यावर खूप परिणाम होत आहे. थोडक्यात ती माझ्यासाठी कोण होती मला माहित होते. लोकांना तिच्याबद्दल काहीही संवेदना नसली तरीही मी जाणतो ती माझ्यासाठी काय होती. (नाना पाटेकरांनी सादर केलेली कविता “कैसे बताऊँ मैं” आठवली का?)

कल्पनेतल्या प्रेयसीवर ती गेल्यानंतरही प्रेम करणाऱ्या कवीची ही मनोवस्था! William Wordsworth जणू काही आपल्याला दूर दिसणाऱ्या Lucy च्या गावाकडे जाणाऱ्या वाटेवर नेऊन उभे करतात. अशा प्रेमकविता विरळाच!


आणखीन कवितांचे रसग्रहण या पानावर वाचायला मिळेल – इथे क्लिक करा.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

2 thoughts on “William Wordsworth – She Dwelt among the Untrodden Ways (मराठी रसग्रहण)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *