दास्तान.. रसिक आणि सीमा ची दास्तान! दास्तान एक फारसी शब्द आहे ज्याचा शब्दशः अर्थ मौखिक इतिहास असा आहे. असा इतिहास जो कुठे लिहून ठेवलेला नाही. ज्यांनी पहिला, अनुभवला त्यांनाच तो समजला! बाकीच्यांसाठी ती फक्त एक घटना असते. दास्तान म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सुशिंची म्हणजेच सुहास शिरवळकर यांची आणखीन एक अजरामर कहाणी! आताशा मला सुशिंच्या कादंबरींना कादंबरी म्हणणं तितकंसं बरोबर वाटेनासं झालेलं आहे. कारण सुशिंच्या कहाण्या, पात्रे आणि पट कादंबरीच्याही पलीकडे जाऊन माझ्या संवेदनांना, व्याख्यांना आणि विचारांना धक्का देत आहेत, स्तिमित करत आहेत. आता मी सुशिंच्या कादंबरीकडे कादंबरी म्हणून न बघता एक कथा किंवा कहाणी म्हणून बघतो.
एक संकल्पना फार प्रसिद्ध आहे “जातिवंत” किंवा “हाडाचा” कलाकार! थोडक्यात जगाला लाथ मारण्याची हिम्मत बाळगतो. आणखीन असभय शब्द वापरता आला असता पण तुम्ही भावना समजून घ्या अशी अपेक्षा करतो. ग्रेस म्हणतात तसं An artist is a special kind of a man! अर्थातच एका कलाकाराचं विश्व, त्याचा दृष्टिकोन आणि त्याची सृजनशीलता या त्याला सामान्य लोकांपासून वेगळं बनवतात. जगाचं सत्य समजून घेण्याची, त्यात वावरण्याची आणि ते व्यक्त करण्याची त्याची तर्हा निराळीच असते. त्याची स्वतःला समजून घेण्याची प्रक्रिया आणि त्याच्या कलेत आणखीन एकरूप होण्याची क्षमता यांच्यासाठी तो कायम धडपड करत असतो. काही हाती लागले तर त्यात रमून न जाता पुन्हा नवा शोध घेऊ लागतो. त्याला जगाशी काहीही घेणं देणं नसतं कारण जागाच सत्य त्याला त्याच्या दृष्टीने समजलेलं असतं.
आणि यातूनच एक विशिष्ट मिश्रण निर्माण होते अहंकार आणि असुरक्षिततेचे. कलाकाराचा अहंकार त्याला कलेच्या विश्वातून बाहेरच्या सामान्य जगात येऊ देत नाही. असुरक्षितता.. कलाकाराची हे असुरक्षितता देखील निराळेच असते. त्याला कोणी आपली कलाकृती चोरेल किंवा लोक आपल्याला नावे ठेवतील याची फिकीर जातिवंत कलाकार करत नाही. त्याला भीती असते ती अशा लोकांपासून, भावनांपासून जे त्याला आपल्या कलेच्या मार्गावर पुढे जाण्यास अडथळा निर्माण करतील. म्हणूनच कलाकार शक्यतो लग्न, प्रेम, नाती या बंधनात अडकून घ्यायला मनापासून तयार नसतो. किंबहुना तो यांपासून दूर पळत असतो.
आणि जेव्हा अहंकार, यश, कीर्ती आणि नाव शिगेला पोहोचलेल्या जागतिक दर्जाचा चित्रकार रसिकच्या आयुष्यात जेव्हा त्याच्याला सर्वस्व अर्पण करणारी, स्वतःला रसिकची अर्धांगिनी मानणारी सीमा येऊ पाहाते तेव्हा त्याची असुरक्षितता त्याला एका विचित्र प्रश्नाच्या गर्तेत टाकते. त्याच्याटाळ्या कलाकाराच्या कोशाचा धागा उसळू लागतो.
इथून सुरु होते रसिक आणि सीमा यांची दास्तान.
कला, संवेदना आणि कल्पना यांच्या विश्वात रमलेल्या रसिकला जगात व्यवहार हे फक्त देह आणि पैशाचे असतात अशीच समजूत झालेली असते. अर्थात या कादंबरीमध्ये त्याच्या इतिहासाबद्दल काही सांगितलेले नाही. पण कलाकाराचे आयुष्य जगताना यावर विश्वास बसणं अवघड नाही कारण या व्यवहारी पैसा नसलेला कलाकार म्हणजे दाराच्या बाहेर ठेवली जाणारी चप्पल असते. आयुष्याचे टक्के टोणपे खात खात त्याला एका गोष्टीची खात्री होते की बहिस्थ जगात दोनच गोष्टींना किंमत आहे पैसा आणि देह. माणसाची शारीरिक भूक की त्याला कुठल्या बंधनांची गरज नसते! आयुष्यभराचे चटके खाल्ल्यावर कलाकार शक्यतो आपल्या जवळ कोणाला येऊ देत नाही कारण त्याने आत्तापर्यंत पाहिलेला असतो तो फक्त व्यापार. कलाकाराला कायम भीती वाटते की आपला पार्टनर, जोडीदार आपल्याला समजून न घेणारा मिळाला तर आपलं आणि आपल्या कलेचं सगळं विश्व उद्ध्वस्त होऊन जाईल! त्यामुळे त्याच्या भावविश्वपासून तो सगळ्यांना दूर ठेवतो. हेच रसिक करतो आणि नियती काही वेगळाच डाव खेळते.
त्याच्या भावविश्वात स्वतःला विसरून जाण्यासाठी आपलं सगळं विश्व सोडून त्याच्या दारावर जेव्हा सीमा येते तेव्हा तिच्याकडेही तो व्यापाराच्या दृष्टीनेच बघतो. कारण असुरक्षितता! जगाचा व्यापार बघत रसिकाच्या मनातून रामाणिकपणा, विशुद्ध प्रेम, सच्चेपणा, शिव, शुचि जे काही आहे त्यावर बहुदा विश्वास उडालेला असतो. आणि इथे सीमाची परीक्षा सुरु होते. रसिकप्रमाणे सीमा सुद्धा चित्रकार आहे. पण रसिकमधल्या कलाकारावर तिचं मनापासून प्रेम असतं. रसिकसाठी सर्वस्व ती द्यायला तयार असते, देते देखील. पण, रसिकला आपला अहंकार आणि आपली असुरक्षितता सोडवत नाही. त्यासाठी वेळप्रसंगी रसिक, सीमाच्या देहाचा सुद्धा व्यापार करतो आणि शारीसुखाचे पैसे देऊ तिच्या अंगावर फेकू लागतो. सीमाला पुनःपुन्हा तिची जागा दाखवून द्यायचा प्रयत्न करतो की जगात फक्त एकच गोष्ट शरीराची भूक आणि स्वार्थ! विशुद्ध भावना वगैरे काहीही नसतं. एका प्रसंगी रसिक सीमावर जबरदस्ती देखील करतो पण त्याचे कारण त्याच्या व्याख्यांना सीमाच्या तर्कशुद्ध आणि भावनाप्रधान वागण्याने बसणारे जबरदस्त आघात असतात. सीमाने आधीच सर्वस्व अर्पण केलेलं असल्यामुळे तिला त्याचे काही वाटत नाही. ती सगळं काही हसून सहन करते कारण तिने प्रेम केलेलं असतं. विशुद्ध प्रेम. तिच्या उत्तरांमधून रसिकच्या विवेकावर एकामागोमाग एक बाण सोडले जात राहतात. रसिक केवळ आपला अहंकार कुर्वाळण्यासाठी आपल्या असुरक्षिततेचा आधार घेत तिला लागेल असं बोलतो, वागतो. पण काहीही केल्या सीमा बधत नाही हे दिसू लागल्यावर रसिकला जबरदस्त धक्का बसतो.
त्याला भीती याची असते की सीमा त्याच्या सर्व अहंकाराला ध्वस्त करून टाकणार आहे. तो तिची परीक्षा घेण्यासाठी आणि स्वतःच्या सर्व व्याख्या “अजमावून” बघण्यासाठी मुद्दाम सीमा ला सांगून इतर स्त्रियांनाही शारीरिक संबंध जोडायचा प्रयत्न करतो. ते सगळे प्रयत्न साफ फसतात. त्यालाही समजू लागलेलं असतं की आपल्या अहंकाराच्या बुरुजाला भगदाड पडलेलं आहे. नकळत आपल्याला सीमेवर प्रेम जडत आहे. रसिकचा विवेक त्याला ओरडून सांगतो की सत्य मान्य कर! पण नाही. रसिक ते करत नाही. ज्या अहंकाराच्या आणि असुरक्षितेच्या जोरावर आपले कलेचे विश्व निर्माण केलेले आहे त्यांना कसं सोडून द्यायचं? रसिक सीमाला पुन्हा तिच्या जगात जायला सांगतो, लग्न करून सुखी व्हायला सांगतो. अखेर ती मान्य करते.
सीमाचं लग्न एका दुसऱ्या पुरुषाशी ठरवलं जातं. अर्थातच ती आधीपासूनच सर्वार्थाने रसिकची असल्यामुळे ते लग्न तडीस जाणं अशक्य होऊन बसतं. सीमा गेल्यानंतर रसिकला अनेक गोष्टींचा उलगडा होतो. त्याने शरीरसुखासाठी फेकलेले पैसे सीमा नोकराला देऊन जाते. जाताना सीमा बजावून जाते की काहीही झालं तरीही ही सीमा तुमची आहे. अखेर रसिकचा विवेक सीमाच्या प्रेमाला शरण जातो! रसिकला आपल्या वागण्याचा पश्चात्ताप होतो. इथल्या रसिकची अवस्था आणि वाक्ये वाचून मला पुलंच्या “ती फुलराणी” मधील मंजुळा घर सोडून गेल्यानंतर जहागीरदार यांची झालेली अवस्था आठवली! रसिकला देखील सीमाच्या असण्याची सवय झालेली होती.
इकडे सीमाच्या लग्नाची धामधूम सुरु असते आणि कथानक आपल्या “अंजाम” जवळ पोहोचते जेव्हा सीमा ला रसिकची तयार मिळते. सीमा मागच्यापुढचा कोणताही विचार न करता केवळ रसिकला भेटण्यासाठी घराच्या बाहेर पडते. कायमची!
त्यांची भेट कशी होते, होते का? आणि त्यावेळेस सीमा काय काय करते आणि बोलते यासाठी तुम्हाला कादंबरी, माफ करा “दास्तान” वाचावी लागेल!
अशी सीमा रसिकच्या आयुष्यात येऊनही न येणं हीच खरी दास्तान! हॅट्स ऑफ टू सुशि. हा मनुष्य प्रत्येक शब्दागणिक मला अचंबित करत आहे..
आत्तापर्यंत मी केलेले समालोचन वाचायचे असल्यास इथे क्लिक करा.
माझा युट्युब चॅनेल देखील आहे. त्यालाही देखील भेट देऊ शकता. त्याची लिंक