नाटक – सिनेमा बघायला गेल्यावर ज्या एका गोष्टीचा मला मनापासून उबग येतो ती गोष्ट म्हणजे सामोसा – वडा विकणाऱ्याच्या समोरील माणसांच्या थप्पीतून वाट काढत काहीतरी विकत घेणे. मला ते दृष्य एखाद्या युद्धासारखे वाटते. पण हा अनुभव फक्त सिनेमाघरात किंवा नाट्यगृहापर्यंत मर्यादित नाही. मला कधी PMT बसमध्ये, मुंबईच्या लोकलमध्ये घुसता आलं नाही, बँकेत मी काऊंटर समोर उभा असताना आजूबाजूनी अचानक लोक आले तर काय करायचं हे मला अजून समजलेलं नाही! आता अनेक लोक मला हसतील, हसतात देखील. पण मला नेहमी हा प्रश्न पडतो की, रांगेत उभे राहून काम करण्याची सवय असणे, त्याचा आग्रह धरणे चुकीचे कसे आहे. सगळीकडे हपापल्यासारखी गर्दी करणे, करता येणे आणि त्यातून दुसऱ्याचा यत्किंचितही विचार न करता आपला आपला कार्यभाग साधणे, यात अभिमान बाळगण्यासारखं काय आहे? मुळात भारतीयांना रांगेची ॲलर्जी का आहे?
अनेक लोकांचं मत आहे की आपली लोकसंख्या जास्त असल्यामुळे कदाचित ही वृत्ती आपल्यात आलेली आहे. काही जण वस्तूंची कमतरता याला कारणीभूत समजतात. मला विचाराल तर मी याला मानवी प्रवृत्ती आणि अनुभवगाथांना जोडून पाहतो. स्वतःला जगवणे (Survival) ही सर्व सजीवांची सगळ्यात प्रबळ अंतःप्रेरणा (instinct) आहे. त्यामुळे त्याच्या अनुषंगाने येणारी कोणतीही कृती आपोआप सगळ्यात महत्वपूर्ण बनते. माणसाच्या भुकेचं मर्म इथे आहे. “आज खायला मिळतंय उद्या मिळेल की नाही? माहित नाही.” जेव्हा हा विचार मनात घर करतो तेव्हा माणूस हपापल्यासारखा संसाधने (अन्न, पैसे, वस्तू) जमवायला लागतो. त्यावेळी त्याला फक्त स्वतःचे जगणे (survival) महत्वाचे वाटत असते. वर्षानुवर्षे बहुतांशी भारतीयांना, त्यांच्या राज्य गाजवणाऱ्या राज्यकर्त्यांनी संसाधनांपासून वंचित ठेवले. याची सुरुवात परकीय आक्रमणकारी, शासकांनी केली जे धर्माच्या आधारावर संसाधनांची विभागणी करत असत आणि त्यांचे स्थानिक हस्तक सामान्य गरीब रयतेला लुटत असत आणि या लुटीचा परमोच्च बिंदू म्हणजे ब्रिटिश राज.
भारतीयांची जेवढी उपासमार ब्रिटिशांनी केली तेवढी क्वचितच कोणी केलेली असेल. इतिहासाची पुस्तके वाचली तर लक्षात येईल की ब्रिटिशांनी भारताला केवळ लुटलं नाही तर त्यांच्या मनात ही ही भावना प्रबळ केली की भारतीय या गोष्टी मुबलक प्रमाणात उपभोगायला लायक नाही आणि वर भारतीयांचा न्यूनगंड! आपल्या आजी आजोबांकडून आपण या भूकबळीचे, उपासमारीचे किस्से ऐकले असतील. त्या काळापासून, “मिळतंय तोपर्यंत घ्या नाहीतर नंतर मिळणार नाही” ही वृत्ती बळावली. आणि दुर्दैवाने आपल्या प्रवृत्तीचा भाग बनली.
दुर्दैवाने स्वातंत्र्योत्तर काळात देखील ही वृत्ती कमी झाली नाही. तेव्हाच्या राज्यकर्त्यांना देखील सामान्य जनतेच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा पुरवण्यात फारसे यश आले नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारतात पडणारे दुष्काळ आणि अन्नासाठी लोकांची झालेली त्राहि माम्. कृषिप्रधान भारतात आपल्याला दुसऱ्या देशातील टाकाऊ धान्य अन्न म्हणून मागून आणावे लागले. आपल्या घरचे वडिलधारी मंडळी सांगत असतील की, पूर्वी कुठलाही सण आला की अनेक खाद्य पदार्थ गायब होत, वस्तू बाजारातून गायब होत. मग तीच वस्तू मागच्या दाराने अधिक किमतीने विकल्या जायच्या. हा दुर्दैवी अनुभव लोकांनी घेतलेला आहे. त्याची परिणीती ही झाली की आजच्या काळात, जेव्हा म्हणावी तेवढी उपासमार नाही, अन्नधान्याची कमतरता नाही तेव्हाही तो पूर्वीचा अनुभव रक्तात गेल्याने, आपण भारतीय “वस्तू संपेल की काय? मिळणारच नाही की काय?” या भितीखाली जगत आहोत.
हीच भीती, माझ्या मते भारतीयांना रांग मोडायला उद्युक्त करते. या प्रवृत्तीने काळानुरूप आपली शकले देखील बदललेली आहेत. आता या भीतीचे परिवर्तन आता हायवेमधील घाईत, बँकेतील गर्दीत, आणि सद्यस्थितीत कोरोना लसीकरण केंद्रावरील गोंधळात झालेले दिसते.
मग प्रश्न हा उरतो की, याचे करायचे काय? माझ्या मते सर्वोत्तम उपाय म्हणजे शालेय शिक्षणात सामाजिक भान आणि सामाजिक शिष्टाचाराचे शिक्षण द्यावे. जर विद्यार्थ्यांना रांगेचे आणि शिष्टाचाराचे महत्व समजावून सांगू शकलो तर मला खात्री आहे की आपण येणाऱ्या पिढीला शिस्त शिकवू शकू. आज आपण पाश्चात्य देशांचे कौतूक करत आहोत, उद्या हा शिष्टाचार आपल्या भारतात रुजला तर?
तुमचे काय विचार आहेत मला नक्की कळवा..