भारतीय समाजसुधारकांच्या अत्यंत लाडक्या इंग्रजांपैकी एक म्हणजे माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन! हा तोच माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन ज्याने मराठ्यांच्या विरोधातील युद्धात इंग्रज फौजेचे नेतृत्व केले होते. आपापल्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी एल्फिन्स्टन यांच्या लिखाणाचा आधार घेतात. मानवी इतिहासाचा विचार करता, कोणताही विजयी राजा किंवा विजयी राज्य, पराजिताला आपल्या परीने घडवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येईल. पराजिताचे मनोबल तोडायचे असेल तर आधी बदल किंवा उत्थानाच्या आणाभाका देऊन त्याच्या तत्वज्ञानावर हल्ला करून, त्याची संस्कृती, तत्वज्ञान, भाषा आणि धर्म कसे ही दर्जाचे आहेत हे त्याला पटवून द्यावे लागते. या साठी शिक्षण व्यवस्थेत आपल्या फायद्याचे बदल करणे हे एक सर्वोत्तम शस्त्र आहे. कारण शिक्षणव्यवस्थेवर विजयी राज्याचे अधिपत्य असते आणि जनतेला फारसे पर्याय उपलब्ध नसतात! हळूहळू स्थानिक लोकांच्या मनात आपल्याच इतिहासाबद्दल संभ्रम निर्माण होतो आणि अंततः पराजिताच्या तत्वज्ञानाचे स्थान विजेत्याचे तत्वज्ञान घेते. अर्थातच हा इतिहास आपल्यापासून लपवला जातो किंवा त्याबद्दल जराही सूतोवाच केले जात नाही.
भारतात देखील काही वेगळे घडलेले नाही. जे मुघलांनी केले तेच इंग्रजांनी!
माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन ने आयर्विन नावाच्या माणसाला लिहिलेले पत्र आणि त्याचा अनुवाद या ब्लॉगमध्ये देत आहोत. यात एल्फिन्स्टनचे हिंदू धर्माविषयीचे त्रोटक ज्ञान दिसून येतेच पण त्यांच्या मेंदूंना कसे स्वधर्मापासून दूर नेता येईल याविषयी केलेली चर्चा देखील समोर येते. आणि शेवटी हे सिद्ध होईलच की इंग्रजांनी भारतीयांचा पुळका आल्यामुळे शिक्षणव्यवस्थेत बदल केलेला नाही. तर, आपल्याला अनुकूल कारकुनांची फौज निर्माण करण्यासाठी आणि भारतीयांच्या मनातून त्यांच्या देशाविषयी आणि धर्माविषयी असलेल्या प्रेमाचे खंडन व्हावे यासाठी एक वेगळी इंग्रज आणि पाश्चात्त्य धार्जिण शिक्षण व्यवस्था निर्माण केली!


आता या पत्राचा अनुवाद पाहू
प्रिय आयर्विन, मी तू दिलेला (बॉम्बे एज्युकेशन) सोसायटीचा आढावा आणि छापील रिपोर्ट मन लावून वाचला. मी हे मान्य करतो की तुझी सोसायटी आत्तापर्यंत स्थापन झालेल्या कोणत्याही सोसायटीपेक्षा, मानवाच्या हितासाठी कार्य करण्यासाठी अधिक योग्य वाहक ठरेल. (इतर लोकांप्रमाणे) हे माझ्याही फार पूर्वी लक्षात आले होते की, काहीतरी वाचण्यासाठी साहित्य निर्माण करण्याआधी मराठी लोकांना वाचायला शिकवण्यासाठी शाळा उभ्या करण्याचा काहीही उपयोग होणार नाहीये. आणि हे केवळ भाषांतर आणि काळजीपूर्वक निवडीनेच शक्य आहे.१ तुझी सोसायटी हे करण्यास उत्सुक आहे हे मी जाणतो आणि जर योग्य दिशेने व नेटाने मार्गक्रमण केल्यास माझ्या मते ही सोसायटी फार मोठे कार्य करू शकेल. माझा यावर संपूर्ण विश्वास आहे की, आपल्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि स्थानिकांच्या धर्म परिवर्तनासाठी सर्वात परिणामकारी उपाय म्हणजे आपली शिकवण तत्वप्रणाली त्यांच्यावर वाचन येण्याआधी लादणे होय.२ माझ्या मते हिंदू धर्म, या देशातील लोकांचे, युरोपियन लोकांच्या कायदे आणि नीतिमत्ता यांबाबतीत मागे असण्याचे कारण आहे, आणि प्रगतीच्या मार्गातील हा मोठा अडसर दूर झाल्यास मला आनंदच होईल. माझे ठाम मत आहे की असली हास्यास्पद अंधश्रद्धा शिक्षित लोकांना आपलीशी वाटू शकणार नव्हतीच. माझा हा ठाम समज आहे की जोपर्यंत या देशात सध्या अस्तित्वात असलेल्या धर्मात (हिंदू) काळानुसार बदल घडवण्याचा प्रयत्न करून (धर्माचे उत्थापन करून) क्रांती घडवून हा देश परकीयांच्या तावडीतून मुक्त करणारा छद्मी प्रेषित३ जन्माला येत नाही तोपर्यंत भारतात इंग्रजी साम्राज्य अढळ आहे. मला नाही वाटत की अशा भयंकर वादळापुढे आपले साम्राज्य टिकू शकेल, आणि धर्म-परिवर्तन त्याचेच आवाहन करेल. सोसायटी धर्मात ढवळाढवळ करू इच्छित नाही पण मी हे ही जाणतो की तू हा नियम मोडण्यास तयार आहेस. तू एक परकीय आहेस, लोक तुझ्यावर ईर्षा करतात, द्वेष करतात, तुला इथल्या अंधश्रद्धांबद्दल (हिंदू धर्माबद्दल) ज्यांच्यावर तुला हल्ला करायचा आहे किंवा ज्यांना स्थानिक मानतात, त्या धर्माबद्दलचे ज्ञान अर्धवट आहे, आणि तू हिंदू धर्माला येत्या ५० वर्षात नष्ट करण्याची अपेक्षा कशी काय करत आहेस? सोसायटीकडे वळू, सगळ्यात वादातीत हिंदू धर्मग्रंथ शोध, त्यातले वाद निर्माण करतील असा एकही उतारा गाळू नका आणि समजेल अशा भाषेत त्यांचे मराठीत भाषांतर करा. स्वस्त असल्यामुळे या पुस्तकांना इतर हिंदू पुस्तकांपेक्षा अधिक लोकप्रियता मिळेल आणि गरिबांसाठी तेवढा एकच पर्याय उरेल. भाषांतर करताना तुम्ही जर शब्दशः भाषांतर केलेत तर ब्राह्मण लोक देखील त्यावर बोट उगारू शकणार नाहीत.४
टीपा:
१. एल्फिन्स्टनला जर लोकांना साक्षर बनवायचेच असते तर निवडीचा प्रश्न कुठे येतो. धर्मग्रंथ न शिकता माणूस साक्षर होऊ शकत नाही का?
२. याबद्दल मी ब्लॉगच्या आधी लिहिले आहे की परकीय आक्रमणकारी लोकांनी हिंदू धर्माला थोपण्यासाठी योजलेला उपाय म्हणजे आपले तत्वज्ञान त्यांच्यावर थोपणे!
३. इथे एल्फिन्स्टन हिंदूंच्या प्रेषितांना छद्मी म्हणतो कारण त्याच्या मते हिंदू हा चांगला धर्मच नाही
४. संदर्भरहित भाषांतर अखेर भाषांतरच असल्यामुळे त्याला चुकीचे म्हणता येत नाही. पण धर्मग्रंथांचे संदर्भराहीत भाषांतर कोणत्याही व्याख्येनुसार नीतिमत्तेला धरून योग्य म्हणता येणार नाही. तसेच त्या काळी (देखील) हिंदूंच्या परिवर्तनाच्या मार्गात धर्म जाणणारे मोठा अडसर होते.