February 18, 2025
माझी अमरनाथ यात्रा – डॉ. नीलकंठ देव । प्रवासवर्णन

माझी अमरनाथ यात्रा – डॉ. नीलकंठ देव । प्रवासवर्णन

Spread the love

अमरनाथ यात्रा आणि मंदिराबद्दल कोणाला माहिती नाही!? खरं सांगायचं तर प्रवासवर्णन हा काही माझा पुस्तक प्रकारातला आवडता विषय (genre) नाही. त्यामुळे अनेकदा पुस्तकांच्या दुकानातील या विभागाकडे मी बघत सुद्धा नाही. पण, हे प्रवासवर्णन किंवा “यात्रा-वर्णन” देव काकांनी लिहिले असल्यामुळे वाचणे क्रमप्राप्त होते. वाचायला थोडा उशीर झाला हे मात्र खरं पण ते माझ्या आवडी-नावडीमुळे नव्हे तर इतर कारणांमुळे झाला. पण पुस्तक वाचून झाल्यावर हे गोष्ट निश्चितपणे सांगेन की हे पुस्तक वाचल्याचे मला अजिबात वाईट वाटले नाही. उलट, समाधान वाटले आणि आनंद वाटला की अगदी सहज आणि सोप्या मार्गाने माझी देखील “अमरनाथ यात्रा” झाली!

देव काकांनी अत्यंत सरळ, साध्या आणि प्रामाणिक भाषेत लिहिले असल्यामुळे पुस्तकाच्या प्रस्तावनेपासून शेवटपर्यंत सबंध यात्रा आणि ही यात्रा करत असताना देव काकांना आलेले अनुभव डोळ्यांसमोर उभे राहतात. लिहिण्याची शैली देखील अनौपचारिक असल्यामुळे वाचकाला कुठलं दडपण येत नाही. कदाचित याच शैलीमुळे यात्रेत अनेक अडचणी आल्या तरीही त्यांना वैतागून न जाता त्यांना धीराने तोंड कसे द्यावे याचे छोटेखानी मार्गदर्शन सुद्धा झाले!

पुस्तकाची सुरुवात देव काकांचा अमरनाथ यात्रेबद्दल आणि त्यांच्या “मॅनेजरकी”च्या अनुभवांनी होते. ते अनुभव वाचण्यासाठी तुम्हाला पुस्तक वाचावे लागेल. पण पुस्तकात नमूद केलेले अनुभव आणि नमुने मी देखील पाहिले असल्याने त्यांची सत्यता अगदीच वादातीत आहे. यात्रा घडवून आणणे म्हणजे कोण्या दिव्यापेक्षा कमी नाही. दक्शीन भारतात लोकांना रोटीची आणि उत्तर भारतात इडल्यांची आठवण होते! असले लोक प्रवास नक्की कशासाठी करतात हा प्रश्न आहेच! असो.. नकटीच्या लग्नाला सतराशे साथ विघ्न म्हणतात तशी गत असते. पण त्यातूनही कसे मार्ग निघतात, कसे काढता येतात हे देखील देव काकांनी उत्तमरीत्या सांगितले आहे.

या पुस्तकात देव काकांनी अमरनाथ यात्रा अथ पासून इति पर्यंत कुठल्या कुठल्या शहरातून/गावातून जाते? कुठे थांबायचं? कुठे कुठला पस मिळतो? राहायची आणि खायची सोया कशी असते? वगैरे उत्तम माहिती दिलेली आहे. माझ्या सारख्या नवख्या माणसाला देखील अशा शब्दात! मी कधी अमरनाथ यात्रेला गेलोच तर पुस्तकातील मुद्द्यांना वाचून जाणार हे नक्की. बालताल आणि डोमेल यांच्याबद्दल या पुस्तकात सांगितलेले अनुभव देखील लक्षात ठेवण्याजोगे आहेत. रात्रीच्या अंधारात एकट्याने घोड्यावर बसून केलेला प्रवास डोळ्यासमोर आला आणि कुठेतरी वाटून गेलं “आता आपणही गेलं पाहिजे!”

देव काकांच्या लेखनातील आणखीन एका शैलीबद्दल इथे सांगितलं पाहिजे ती म्हणजे “जसे आहे तसे” किंवा “matter of fact” घोडेवाला असो, त्याचे यात्रेकरूंवर अवलंबून असलेले पोट असो, लोकांचे एकमेकांशी असलेले व्यवहार असो किंवा जोडप्यांची गर्दीत उडालेली त्रेधा असो, मिलिटरी बद्दल आदर असो किंवा पैशासाठी कटकट न करण्याचा स्वभाव असो. सगळ्या बाबींकडे त्रयस्थपणे पण तरीही मानवी संवेदनांच्या पातळीवर जाऊन केलेले लिखाण मनाला भावते! पुस्तकात देव काका “मी देवभोळा नाही” असं दोनदा म्हणतात पण देवभोळा असण्यात देखील काही गैर नसते फक्त आपला विवेक जागृत ठेवला पाहिजे! यात्रेत वर्णन केलेल्या लंगर सारखा! येणाऱ्या प्रत्येकाला अन्नदान करणे हा त्यांचा देवभोळेपणा! तो नसता तर भुकेपोटी यात्रेकरूंचे अवघड झाले असते.

पुस्तकाच्या शेवटी अगदी अनपेक्षितरित्या वैष्णो देवीची सुद्धा “बोनस” यात्रा घडली आणि प्रवास संपला!

मला आनंद आहे की माझी अमरनाथ यात्रा हे प्रवासवर्णन / यात्रा वर्णन मी वाचलं. हिमालयाचा तजेला आणि अमरनाथच्या गुहेतील शांतता मनाला लाभली! अशाच अनेकानेक यात्रा करण्याचे आणि आम्हाला पुस्तक रूपाने ऐकवण्याची योग देव काकांना येवोत ही सदिच्छा!

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *