‘फुले बटाटे आणि मी’ .. ! Pathway and Rain Drops

‘फुले बटाटे आणि मी’ .. !

Spread the love

पानांचे रंग हळूहळू उतरू लागलेत. आता काही दिवसांनी लाल पिवळी पाने वाळू लागतील आणि वाऱ्याच्या हलक्या स्पर्शानिशी जमिनीवर येतील. अजब ऋतूबदल आहे हा ! हवेत गारवाही वाढू लागला आहे. एक शांत पक्षी अर्ध्या निष्पर्ण फांदीवर उभा एकटक कुठेतरी पहातो आहे आणि समोर बरीच झाडे. त्याला आठवत असेल का .. आत्तापर्यंत किती घरटी बांधली आणि ऋतू बदलला की सोडून दिली ? ऋतू बदलले किंवा त्या बदलाची चाहूल लागली की पक्षी आपली जुनी घरटी सोडून नव्या घरट्याच्या जागेसाठी फांदी शोधायला लागतात. तुम्ही विचाराल यात काय विशेष आहे ? मीही हेच विचारलं असतं.. काही वर्षांपूर्वी ! प्रत्येक माणूस कधी ना कधी कल्पना करतोच की तो पक्षी झाला आहे.. भरारी घेत आहे. मीही केली आणि त्यावेळी मात्र मी बदलणाऱ्या ऋतुंचा विचार केला नव्हता. पण आज मी एका कोपऱ्यावर उभा आहे.. पुन्हा एकदा.. एकटक पहात .. नव्या  फांदीच्या शोधात.. !

एक शांत पक्षी अर्ध्या निष्पर्ण फांदीवर उभा एकटक कुठेतरी पहातो आहे आणि समोर बरीच झाडे. त्याला आठवत असेल का .. आत्तापर्यंत किती घरटी बांधली आणि ऋतू बदलला की सोडून दिली ?

नियती, तिचे चक्र आणि तिच्या चक्राचा वेग आणि दिशा यांचा माग लावायचा प्रयत्न करणे मी करू इच्छित नाही. पण, एक गोष्ट निश्चित आहे की ती जर कधी भेटलीच तर मला नक्की काही प्रश्न विचारायचे आहेत. प्रश्न विचारण्याचे हक्क मी अजूनही राखून ठेवले आहेत की नियतीने अजून मला प्रश्नरहीत करायचा कट रचलेला नाही याबद्दल मला थोडी शंका आहे. कारण प्रश्न असूनही कधी विचारता येत नाहीत आणि कधी विचारायचं मन होत नाही. ती तरी काय करणार बिचारी आणि मी तरी काय करणार ? आणि तरीही ऋतुबदलाचे संकेत मिळताच मी माझे छोटेसे विश्व मुठीत धरतो आणि बाहेर पडतो. अजून पर्यंत तरी मला ‘का ?’ विचारावं लागलं नाहीये. आपसूक पावलं चालू लागतात.

प्रत्येक जुनं घरटं सोडताना लक्षात येतं की या जुन्या छोट्याशा घरट्यात आपण जवळपास ब्रम्हांड कोंबलेल आहे ! त्या घरट्याच्या प्रत्येक धुळीच्या कणात एकेक आठवण दडलेली असते. वेळीअवेळी पडणाऱ्या पावसासारखे घरट्यात डोकावणारे गणगोत, वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने केलेल्या मेजवान्यांचे सुगंध, उदास एकट संध्येला मन रमवणाररी खिडकी, भिंतींवर रंगवलेल्या कवितांच्या ओळी, देवघरात दरवळणाऱ्या उदबत्तीचे सुवास . हवेत उडणाऱ्या प्रत्येक कणाबरोबर एकेक आठवण मी मागे टाकण्याचा निष्फळ प्रयत्न करतो. ओलावलेल्या डोळ्यांच्या कडांना अगदी सफाईने पुसून घेतो. ते सारं विश्व एकत्र झालं की बाहेर पडतो मागे फक्त आठवणीच उरतात. मग शोध.. प्रत्येक नवी फांदी सापडली की मी पुन्हा खुश होतो आणि काडी, गवत यांच्या शोधात फिरू लागतो. रंगीबेरंगी कड्यांच्या आणि गवताच्या किमती पाहतो आणि झेपेल एवढ्याच काड्या घेऊन येतो. पण एक मात्र निश्चित अजून तरी सूर्य आणि पाऊस यांना डोक्यावरच्या कौलांना शह देता आला नाहीये. निसरड्या फांदीवर तोल सावरत मुश्किलीने कड्या गवत एकात एक रोवून घरटे उभे करतो .. पुन्हा एकदा. एकदा घरटे बांधण्याचे काम पूर्ण झाले की जरा दूर जातो आणि घरट्याकडे नजर टाकतो. कसंही असो पण नवीन घरटे त्या गाण्यातल्या चिऊताईच्या मेणाच्या घरासारखे दिसते. पण नुसत्या भिंती एकमेकांना टेकून उभ्या राहिल्या म्हणजे त्याला कोणी घर म्हणत नाही ! दरवेळेस हा विचार डोक्यात येतो आणि मी परत एकदा जमवाजमव करू लागतो. खरे तर ही जमवाजमव निरंतर सुरूच रहाते. काही दिवसांनी विसरही पडतो या सगळ्या धावपळीचा आणि मी रमून जातो .. पुन्हा एकदा !

 नियातीप्रमाणे सवय ही सुद्धा आणखी एक सखी माझ्याबरोबर असते नेहमी. परत एकदा.. ती चांगली की वाईट या प्रश्नाच्या फंदात न पडता एक नक्की सांगेन की जो पर्यंत एखादी गोष्ट शाश्वत आहे, निरंतर टिकणारी आहे यावर विश्वास नसतो तोपर्यंत त्या गोष्टीची सवय होत नाही. वेळेच्या आणि काळाच्या चक्रात न अडकू पाहणाऱ्या मला आसपासच्या बऱ्याच गोष्टी अशाच आहेत आणि राहतील यावर विश्वास बसतो कधी कधी. आणि जगात निरंतर टिकणारी एकंच गोष्ट आहे ती म्हणजे बदल ! हे माहित असूनही सवय करून घेण्याची चूक करतो. अशा वेळी स्वतःलाच सांगावंसं वाटतं

सवय होत आहे 
सवय करून घेण्याची 
जरा पापणी हलता 
नव्याने निष्पर्ण होण्याची 

काही काही सवयी मात्र मला हवालदिल करून टाकतात. रागही येतो आपल्याच घरट्याची, आपल्याच फांदीची सवय का होवू नये !? यात काय गैर आहे ? अर्थात मी हे प्रश्न माझ्यापाशीच ठेवतो, घाबरतो की चुकून कधी मी हे प्रश्न जोरात उच्चारले आणि नियतीने ऐकलं तर काय होईल ? एक तर हा देश आपला नाही, माणसे ओळखीची नाहीत गाव नवे. त्यातून हा ऋतूंचा बदल केवळ काहीच दिवसांपुरता. एक दिवस हा परदेस सोडून पुन्हा एकदा ‘आपल्या’ घरी जायचंय या एका विश्वासाच्या जोरावर मी प्रवास करतोय, या ऋतूचक्रात स्वतःला गुंतवून घेतोय. दररोज एकदा तरी ‘आपल्या’ घरी जाण्याचा विचार येतोच. कधीकधी अगदीच अनावर होतं, हे सगळं सोडून निघून जावसंही वाटतं, आपल्याच हाताने बांधलेलं घरटं अगदी खायला उठतं. तेव्हा मी एकंच गोष्ट करतो माझ्या घरट्यात एका कोनाड्यात ठेवलेल्या देवांच्या तसबिरींपुढे हात जोडून उभा रहातो आणि तेव्हा कुठे जीवात जीव येतो. पुन्हा एकदा आपल्या ध्येयाची आठवण होते. मी देवापुढे उदबत्ती लावतो जेवतो आणि झोपून जातो.. पुन्हा एकदा..

बना तो लिया है आशियाँ मैंने फ़िरसे 
डरता हूँ तो बस बादलोंसे 
कब उनके मिजाज बदल जाएँ  !

हे चक्र गेली काही वर्षे नित्यनेमाने फिरत आहे. आजही एक चक्र पूर्ण झालेले आहे. आधार एकंच की वेळेचा वेग. पापणी लवते न लवते तोच वर्षानुवर्षे निघून जातात. नवीन घरटेही बांधून झालेले आहे.. देवासाठी एक कोनाडा निश्चित करून झालेला आहे, भूकही लागली आहे आणि नेहमीप्रमाणे मी पहिली खरेदी करून घरी परतत आहे एकटा.. पुन्हा एकदा. प्रत्येक जण आपापल्या शाश्वतात रमलेले आहेत. समोर मंद सूर्यास्त दिसत आहे. पावला पावलाला गर्द होत जाणाऱ्या क्षितिजावर शंकांचे तारे उमलून येत आहेत. अजून किती घरटी बांधायची आहेत ? अजून किती फांद्या माझी वाट पहात आहेत ? अशा प्रश्नांची गर्दी सारत सारत मी चालत आहे. हे दरवेळेस का होते कुणास ठाऊक !? पण, आजही रस्त्यावर फक्त आम्हीच आहोत.. पुन्हा एकदा.. 

‘फुले बटाटे आणि मी’ .. !     

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *