आभाळाच्या झाडावर मेघांचे घरटे थरथर होते. मला माझा एकांत सहसा सलत नाही पण हा एकटेपणा मात्र खायला उठतो. पाऊस सुरू आहे, संथ.. अविरत जणू त्याला मृत्यूचे भयच नाही. अल्लड झालाय हल्ली म्हणे. विचारांनी मला वेढून टाकलंय म्हणू की मी विचारांचे पांघरूण केलयं म्हणू? प्रत्येक प्रसंग अनुभवांच्या पन्हाळीतून आपली ओल मागे ठेवत वाहतोय, एका अगम्य आणि संदिग्ध पोकळीच्या दिशेने. वारा घुमू लागला होता मगाशी पण, आभाळ आज भलताच हट्ट धरून बसलंय. फांदीवरचा पक्षी उडून गेलाय. त्याचे घरटे होते इथे..
त्याचा थवा उडून गेलाय दुसऱ्या गावी, परत न येण्यासाठी. त्याला जायचे ही होते आणि नाही ही. अचानक पाऊस वाढल्याचा भास होतोय, बहुदा कोणीतरी छत्री घेऊन जातंय. नाहीतर थेंबांची एकसंध लय तुटायची गरज नव्हती. थेंबांनी एका मागून एक पडायचं असतं बास.. कोणाला काय लाभेल सांगता येत नाही. घनदाट अंधारात मी काजवे शोधतोय की विचारांच्या जळून, जाळून बोथट झालेल्या ठिणग्या नजरेसमोर पिंगा घालत आहेत? सावल्या हलत आहेत, खिडकीतून डोकावत आहेत. मी स्तब्ध आहे फांदीसारखा. भिजतोय. आणखीन करूच काय शकते बिचारी फांदी?
पाऊस थोपलाय आणि वाराही. फक्त अधून मधून काही थेंब पानांचा सोस सहन होत नसल्याने माहेरवाशिणीच्या वेगाने खाली जमिनीवर उतरत आहेत. सामसूम झाल्यावर कानात एक तीव्र आवाज घुमत राहतो. त्याच्यात आणि त्या उडून गेलेल्या पक्ष्याच्या आवाजात काहीतरी साम्य आहे. त्याला ना लय आहे ना ताल ना सम. फक्त आवाज, अनंताची ग्वाही देणार्या दु:खाच्या शलाकेसारखा. खिडक्यांची तावदाने उघडी आहेत. मन? बंद! आतल्या आत शंकांचा पुंजका कौलातल्या फटींमध्ये भरून ठेवलाय. चुकून पुन्हा चंद्र दिसू लागला तर सगळे अवसान गळून जाईल. वारा थांबलाय हाच काय तो आधार. नाही तर उत्तरे स्वस्थपणे डोळेही मिटू देत नाहीयेत!
पापणी निश्चल आहे आणि बुब्बुळे ही. स्वप्नांवर आता विश्वास ठेवण्याचे धाडस करावेसे वाटत नाही. देठाला चिकटलेले वाळून अस्ताची वाट बघणारे पान, वाऱ्याशी मैत्री करतो ते मुक्त होण्या पुरती. फांदीला कदाचित जाणवत असेल ही ताटातूट एखाद्या नकळत घडलेल्या चुकीसारखी. पक्षी दूर वर गात असावा या आशेत तिनेही किती दिवस काढायचे? पाऊस कमी होत आला आहे आणि आभाळ अजून गडद. पहाट तर उंबरठ्याशी उभी नाही ना? आभाळाला अवगुंठन आणि मनाला ही. घुसमट पक्ष्याला झाली होती, थव्याला नाही. उत्तर नाही मिळाले तर सकाळ होणार नाही. फांदीच्या सावलीचे लवणे हळूहळू कमी होत आहे. तिची बोटे भिंतींना स्पर्श करू पाहत आहेत आणि मी त्या फांदीवरून उडून गेलेल्या पक्ष्याचे पंख!
भिजलेल्या फांदीवरूनी
पक्ष्यांनी केले कूच
माझ्यातील मलाच होतो
माझ्या असण्याचा जाच
अस्तांकुर पर्ण काहूर
पापणीस झऱ्याचे पूर
प्रश्नांनी जाळली सहजी
उत्तरेच जणू कापूर