November 14, 2024
प्रजादक्ष छत्रपती शिवाजी महाराज – १६ ऑक्टोबर १६७३ चे  एक पत्र

प्रजादक्ष छत्रपती शिवाजी महाराज – १६ ऑक्टोबर १६७३ चे एक पत्र

Spread the love

शिवाजी महाराजांची महती सांगणे हे म्हणजे सूर्य तेजपुंज आहे हे सांगण्यासारखं आहे. आपण या आनंदवनभुवन राजाच्या भूमीत जन्म घेतला हेच मोठे पुण्य आहे. इतिहासाचा अभ्यास करताना वेळोवेळी शिवाजी महाराजांची पत्रे समोर येतात. अशा पत्रांना ऐतिहासिक विषयांच्या अभ्यासाच्या साधनांत अनन्यसाधारण महत्व आहे, अनेकदा बखरींपेक्षा अधिक. कारण, बखरी इतर कोणीतरी लिहिलेल्या असतात, त्याच्यात लिहिणाऱ्याची सापेक्ष बुद्धी डोकावण्याची शक्यता असते. मात्र पत्रे ही त्याच व्यक्तीने लिहिलेली अथवा लिहून घेतलेली असतात त्यामुळे, इथे एखाद्या माणसाच्या मानसिकतेबद्दल आणखीन कोणी काही सांगायची गरज नसते. इतिहासाचा अभ्यास असाच करायचा असतो, सोशल माध्यमांवर सांगितलेली प्रत्येक गोष्ट पारखून घेणं सध्या नितांत आवश्यक झालेलं आहे. असो, मूळ मुद्दा असा की या इतिहासाचा अभ्यास करत असताना, शिवाजी महाराजांचं एक पत्र समोर आलं. या पत्रावरून आपले महाराज किती न्यायप्रिय, काळजीवाहू आणि व्यवहारजागृत होते हे समजून येईल.

हे पत्र शिवाजी महाराजांनी १६ एप्रिल १६७३ रोजी चिपळूण (कोकण) येथील आपल्या जुमलेदार, मामलेदार, हवालदार आणि सैनिकांना उद्देशून लिहिलेले आहे. मजकूर वाचूनच तुम्हाला लक्षात येईल की मी वरील परिच्छेदात पत्राचे महत्त्व आणि महाराजांच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाबद्दल का लिहिले आहे.

कोण्ही कुणब्याचे येथील दाणे आणील. कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले. ऐसे करूं लागलेत म्हणजे जीं कुणबी घर धरून जीवमात्र घेऊन राहिलीं आहेत तेहि जाऊं लागतील. कित्तेक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्याला ऐसे होईल की मोगल मुलकात आले, त्याहून अधिक तुम्ही ऐसा तळतळाट होईल .. हे तुम्ही बरे जाणोन, सिपाही हो अगर पावखलक हो, बहुत यादी धरून वर्तणूक करणे .. कोण्ही रयतेस काडीचा अजार द्यावया गरज नाही .. ज्याला जे पाहिजे, दाणा हो अगर गवत हो, अगर फाटे, भाजीपाले व वरकड विकाया येईल तें रास घ्यावे. बाजारात जावे, रास विकत आणावे. कोण्हावरी जुलूम अगर ज्याजती अगर कोण्हासी कलागती कराया गरज नाही.

अत्यंत साधी आणि न्याय्य गोष्ट म्हणजे “जी गोष्ट आपली नाही ती आपली नाही त्यामुळे जोपर्यंत आपण त्याचे मूल्य देत नाही अथवा मालकाची परवानगी घेत नाही तोपर्यंत त्या गोष्टीला हात लावायचा नाही.” यालाच व्यवहार म्हणतात आणि हेच न्यायाचे मूळ सूत्र आहे. अर्थात आत्तापर्यंत तुम्हाला पत्राचा आशय समजला असेलच.

तरीही हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे की, शिवाजी महाराज किती कर्तव्यदक्ष आणि प्रजादक्ष होते. या पत्रात त्यांनी सक्त ताकीद दिलेली आहे की जी गोष्ट तुमची नाही त्याला हात लावायचा नाही. लोकांनी हिंदवी स्वराज्याकडे आपले राज्य म्हणून बघितले पाहिजे.

हा गुण आजचे राज्यकर्ते अंगी बाणतील तर प्रजा नक्कीच सुखी होईल! जय शिवराय 🙏🏻

शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारे आणखीन ब्लॉग्स इथे वाचा


संदर्भ: The Life and Times of Chhatrapati Shivaji Maharaj by Setu Madhav Rao Pagadi (link from Shivaji and Swarajya by V. Subramaniam, Indian Institute of Public Administration)

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

2 thoughts on “प्रजादक्ष छत्रपती शिवाजी महाराज – १६ ऑक्टोबर १६७३ चे एक पत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *