नको देवराया – संत कान्होपात्रा यांची मूळ रचना आणि भावार्थ

नको देवराया – संत कान्होपात्रा यांची मूळ रचना आणि भावार्थ

Spread the love

संत कान्होपात्रा, महाराष्ट्रातील महान संत परंपरेतील एक अत्यंत आदरणीय नाव. पांडुरंग परमेश्वराने जिचे प्राण आपल्या स्वरुपामध्ये मिळवून घेतले ती संत कान्होपात्रा. आपला जन्म कुठल्या कुळात आणि समाजात व्हावा हे आपल्या हाती नसते. पण, आपल्या जन्माचे सार्थक ईश्वरभक्तीने कसे करावे याचे अप्रतिम उदाहरण म्हणजे, संत कान्होपात्रा! एका गणिकेच्या पोटी जन्म झाला पण लहानपणापासूनच त्यांच्या मनात पांडुरंगाबद्दल भक्तिभाव होता. आख्यायिका अशी ही आहे की, संत कान्होपात्रा पंढरपूरला यायच्या आधी त्यांच्या आईने, त्यांना देखील गणिकेचा व्यवसाय करण्याची लालसा दाखवली. पण संत कान्होपात्रांनी काहीही न ऐकता पंढरपूरचा रास्ता धरला.

संत कान्होपात्रा दिसायला देखील अत्यंत सुंदर होत्या. दुष्ट पुरुषांची नजर त्यांच्यावर पडताच त्यांच्या आयुष्यावर मोठे संकट आले. संत कान्होपात्रा भक्तिभावाने पांडुरंगाची सेवा करत होत्या. तेव्हा राजाचे सैनिक त्यांना न्यायला आले. तेव्हा कान्होपात्रा म्हणाल्या “मी भगवंताचा निरोप घेऊन येते, तुम्ही इथेच थांबा”. आपल्यावर आलेले संकट पाहून संत कान्होपात्रांनी पांडुरंगाचा धावा केला. तो काळ आपण समजू शकतो किती बिकट असेल जेव्हा महाराष्ट्रावर अधर्मी म्लेंच्छांचे राज्य होते आणि निःसत्व स्थानिक राज्यकर्ते देखील त्यांच्या चाकरीत होते किंवा मांडलिक झालेले होते!

मंदिराच्या महाद्वारी राजाचे सैनिक राजाकडे घेऊन नेण्यासाठी उभे पाहून आपले पावित्र्य वाचवण्यासाठी संत कान्होपात्रांनी विठ्ठलाचे पाय धरले आणि त्यांच्या मुखातून काही करून शब्द आपसूक आले. इथे हे सांगणं गरजेचं आहे की, या अभंगाचे गीतात रूपांतर केले पण त्यात मूळ शब्दरचना बदललेली दिसते,

नको देवराया अंत पाहू आतां ऐवजी नको देवराया अंत आतां पाहू,

प्राण हा सर्वथा फुटो पाहे ऐवजी प्राण हा सर्वथा जावू पाहे

आणि

मोकलोनी आस जाहले मी उदास ऐवजी मोकलोनी आस जाहले उदास

मूळ अभंग खालीलप्रमाणे

नको देवराया अंत पाहूं आतां । प्राण हा सर्वथा फुटो पाहे
हरिणीचे पाडस व्याघ्रें धरियेले । मजलागीं जाहले तैसें देवा
तुजवीण ठाव न दिसे त्रिभ्रुवनीं । धावे हो जननी विठाबाई
मोकलोनी आस जाहले मी उदास । घेईं कान्होपात्रेस हृदयांत

आपल्यावर आलेली ही आपत्ति पाहून संत कान्होपात्रांनी पांडुरंगाचा धाव केला! नको देवराया अंत पाहूं आतां हा देह नश्वर असला तरीही त्याला अपवित्र होण्यापासून वाचावं रे देवराया पांडुरंगा! उत्तम रूप आणि सौंदर्य त्यांच्यासाठी शाप बनले. आता हे राक्षस, श्वापद आपल्याला राजाकडे घेऊन जातील आणि..? या भीतीपोटी त्या टाहो फोडतात प्राण हा सर्वथा फुटो पाहे. प्राण जाऊ पाहात आहे! इथे संत कान्होपात्रांनी प्राण जाण्याऐवजी फुटू पाहात आहे असा शब्द वापरला आहे. आपले काय होणार या भीतीने त्राण तर जात आहेतच पण, प्राण देखील एखाद्या विस्फोटाची प्रतीक्षा करत आहे असे त्यांना वाटले. खरंच कुठल्याही स्त्रीवर अशी वेळ येऊ नये ती वेळ त्यांच्यावर गुदरली होती.

बाहेर श्वापदीं वृत्तीने मत्त झालेले सैनिक, मुक्तीचा दुसरा कुठलाही मार्ग नाही. या संकटातून सोडवणूक करण्याला कोणीही येणार नाही. अशा वेळी त्यांच्या मनाची अवस्था जणू जंगली वाघाने आपल्या प्रचंड दाढांमध्ये हरिणीचे सुकुमार पाडस धरावे, हरिणीचे पाडस व्याघ्रें धरियेले अशी झालेली दिसते. सर्वबाजूंनी संकट आणि सुटण्याचा एकही मार्ग नाही! फार भयानक परिस्थिती आहे ही.

आता अशा निर्वाणीच्या क्षणी संत कान्होपात्रांना परमपरमेश्वर पांडुरंगाशिवाय आणखीन कोण आठवणार? संकटात सापडलेल्या माणसाचे देखील असेच होते. जेव्हा माणसाला कुठलाच रस्ता, उपाय किंवा मार्ग दिसत नाही तेव्हा तो देवाच्या द्वारी हात जोडून उभा राहतो. कारण देवाशिवाय त्याला कोणताही उपाय कोणताही ठाव दिसत नाही! तुजवीण ठाव न दिसे त्रिभ्रुवनीं.. एखादे बाळ जसे घाबरून आपल्या आईला हाक मारते तशा संत कान्होपात्रा विठ्ठलाला धावे हो जननी विठाबाई म्हणत निर्वाणीची हाक मारतात. हे जननी, हे माउली सत्वर ये आणि मला या धर्मसंकटातून सोडव.

पण आता प्रश्न असा येतो की या संकटातून मुक्तीचा मार्ग कुठला उरला? बाहेर जात येत नाही, आत लपून राहता येणार नाही मग काय उपाय उरला? देवाचा कितीही धाव केला तरीही माणसाला वास्तवापासून दूर जात येत नाही. कुठलाच मार्ग दिसत नाही तेव्हा मन कासावीस होते, नकारात्मक होते, उदास होते मोकलोनी आस जाहले मी उदास.. आणि आता या संकटातून बाहेर निघण्याचा एकच मार्ग उरला म्हणजे परमेश्वराने या देहरूपी अस्तित्वातून मुक्ती देणे! संत कान्होपात्रा म्हणतात हे विठ्ठला मला मुक्ती दे! घेईं कान्होपात्रेस हृदयांत एकदा या देहाच्या जाळ्यातून मुक्ती मिळाली की या धर्मसंकटातून मुक्तता होईल या आशेने कान्होपात्रांनी हा अखेरचा धावा केला!

आणि अहो आश्चर्य! भक्तांसाठी आपले वैकुंठ देखील सोडून येणारा पांडुरंग तेथे आला, संत कान्होपात्रांना आपल्या बरोबर घेऊन गेला आणि मागे उरला तो त्यांचा निष्प्राण देह. सामिप्य मुक्ती अशीच असते! धन्य त्या संत कान्होपात्रा 🙏🏻

Click to rate this post!
[Total: 4 Average: 4.8]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *