संत तुकाराम महाराजांच्या अत्यंत प्रसिद्ध तसेच करुणेने ओतप्रोत भरलेल्या अभंगांपैकी एक म्हणजे “अगा करुणाकरा”. भक्तिमार्गाचा उद्गम जरी द्वैतात असला तरीही त्याचे अंतिम ध्येय अद्वैतातच आहे! भक्ताने परमेश्वराशी एकरूप होण्याशी याचा संबंध आहे. परमेश्वर देखील भक्ताची परीक्षा घेत असतो. या परीक्षेला संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना देखील सामोरे जावे लागले. भक्त तर “भेटि लागी जीवा” म्हणत परमेश्वर प्राप्तीकडे चातकासारखा बघत असतो. अस्तित्वाकडून शून्यतेकडे जाणारा हा मार्ग बिकट आहे. हे अलौकिक प्रेम आहे ज्याच्यात आपले अस्तित्व जोपर्यंत शून्य होत नाही तोपर्यंत परमेश्वरप्राप्ती अशक्य आहे. संत कबीरांनी देखील या अवस्थेचे अत्यंत सुंदर वर्णन केलेले आहे, “जब मैं था तब हरि नहीं, अब हरि हैं मैं नाहिं। प्रेम गली अति साँकरी, तामें दो न समाहिं।” या अलौकिक भक्तीच्या मार्गावर शून्यावस्था परमेश्वरप्राप्ती आहे! किंवा संत सोयराबाई म्हणतात तसे “अवघा रंग एक झाला“
खालील अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात हे परमेश्वरा हे करुणाकरा, लवकर ये आणि या प्रपंचाच्या जंजाळातून मला मुक्त कर. माझ्यावर कृपा कर आणि शून्यावस्थेकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त कर! आता हा जगाचा ताप सहन होत नाही. हे परमेश्वर तुझ्यापासून अंतर सहन होत नाही. लवकर ये आणि या जन्म-मृत्यू आणि मायेने ग्रासलेल्या चक्रापासून मला मुक्ती दे. आता माझे स्वतःचे असे काही आणि खरे तर मी ही काही उरलेलो नाही! हे करुणाकरा, तुझ्या करुणेचे आणि कृपेचे दान दे आणि मला मुक्ती दे. आता आणखीन उशीर करू नकोस. तुझ्याविना मन कासावीस होत आहे, उतावीळ होत आहे. राहून राहून या प्रपंचाचे आणि संसाराचे धागे पुन्हा मला ओढू पाहात आहे. मला त्यात पुन्हा जायचे नाही. कारण या संसारपाशापासून मी इतका दूर आलेलो आहे की आता मला ना मागे भूतकाळ आणि ना पुढे भविष्यकाळ. कारण जिथे मी’च नाही तिथे माझे असे काय? मला कोणीही विचारले की “तू कोण? तुझे काय?” तर माझ्या मुखी फक्त “शून्य” हेच उत्तर येते. फक्त तुझ्या भक्तीच्या जोरावर हे पाय चालत आहेत. करुणाकरा तुझ्या भेटीच्या मोहाने मी चालत आहे. देवा आता उशीर करू नकोस. मी सारे काही सोडून तुझ्या भेटीसाठी निघालो आहे. मला मुक्ती दे, मोक्ष दे.. अगा करुणाकरा मला मक्ती दे!
अगा करुणाकरा करितसें धांवा । या मज सोडवा लवकरि ॥१॥
ऐकोनियां माझीं करुणेचीं वचनें । व्हावें नारायणें उतावीळ ॥ध्रु.॥
मागें पुढें अवघा दिसे रिता ठाव । ठेवूनि पायीं भाव वाट पाहें ॥२॥
उशीर तो आतां न पाहिजे केला । अहो जी विठ्ठला मायबापा ॥३॥
उरलें तें एक हें चि मज आतां । अवघें विचारितां शून्य जालें ॥४॥
तुका म्हणे आतां करीं कृपादान । पाउलें समान दावीं डोळां ॥५॥
संत तुकाराम महाराजांचा प्रत्येक अभंग, प्रत्येक शब्द म्हणजे जणू रत्न आहे. असेच एक रत्न म्हणजे हा अभंग.तसेच एक गोष्ट जी मला कायम सांगावीशी वाटते ती म्हणजे आपल्या संत मंडळींनी आपल्या धर्माचा आणि समाजाचा त्याग न करता, त्यातील अनिष्ट रूढी, परंपरा दूर करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच कदाचित आज ते देवतुल्य वंदनीय आहेत!