नथुराम गोडसे यांचे बंधू श्री गोपाळ गोडसे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांकडून प्रेरणा घेऊन काही काव्ये रचली. त्यांच्यापैकी हे एक काव्य. तात्याराव सावरकर फक्त एक क्रांतिकारक किंवा स्वातंत्र्यसेनानी नसून एक राष्ट्रचिंतन आहे, एक समाजचिंतन आहे आणि अक्षय्य प्रेरणास्रोत आहे. सावरकरांच्या चरित्रातील काही अक्षरे समजून घ्यायची म्हटलं तरी देखील फार मोठं मानसिक सामर्थ्य आणि वैचारिक बैठक हवी. नाहीतर समाज माध्यमातून तात्याराव सावरकरांवर जितके लिहिले अथवा अर्धबुद्धी नेत्यांकडून जितके बोलले जाते तितक्यापुरतेच ते मर्यादित राहतील. तसे होऊ न देता आपणहून त्यांच्याबद्दल वाचन करणे अधिक योग्य आहे.

श्री गोपाळ गोडसे यांना सावरकरांचा सहवास लाभला हे त्यांचे भाग्य. या सहवासातील जे काही अनुभव त्यांना आले त्याच्यावरून श्री गोपाळ गोडसे यांनी सावरांच्या चरित्राचे अनेक पैलू आपल्या कवितांद्वारे लोकांपुढे मांडले आहेत. सावरकरांचा त्याग, राजकारणाच्या धूम्रपटलामागे कायमच मुद्दाम झाकला जातो. ती संदिग्धता दूर होते या काव्यांमुळे. इथे श्री गोपाळ गोडसे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनाच्या, तत्वांच्या व्याप्तीचा आणि त्यांचा राष्ट्रनिर्मितीसाठी असलेल्या योगदानाचा पट आपल्यासमोर मांडला आहे. “हे स्वातंत्र्यासाठी आयुष्याचा त्याग करणाऱ्या वीरा, आम्हाला तुझ्या जीवनाचे सार समजले”!. अशा कविता विरळच वाचायला मिळतात. मला इथे विंदांची “जीवन त्यांना कळले हो!” देखील आठवते! श्री गोपाळ गोडसे यांच्या कवितेतील हे शब्द आणि सावरकरांचे महात्म्य सर्वांपर्यंत पोहोचावे या हेतूने खालील कविता सादर करत आहोत.
स्वातंत्र्याच्या वीरा आम्हां कळले जीवनसार ।
तुझे रे कळले जीवनसार ।
तव नवजन्मी पाहशील तूं स्वप्न तुझे साकार
भारती स्वप्न तुझे साकार ॥धृ०॥
तेजस्वीचें तेज तूं स्वतां ।
धर्मक्षेत्री कृष्ण भारता ।
द्रष्टा, गीतेचा उद्गगाता ।
आम्ही ठेवूं जागृत गीता करण्या आत्मोद्वार
तुझे रे कळले जीवनसार ॥१॥
रुद्रांमध्ये असशी तुं हर ।
आयुधांतला वज्र भयंकर ।
क्रांतिकारकांचा सावरकर ।
देशाचा अनु-रेणु-रुप तूं, राष्ट्राचा ओंकार
तुझे रे कळले जीवनसार ॥२॥
राष्ट्राने द्यावे तुज वंदन ।
असा तुझा तत्त्वार्थ चिरंतन ।
देशासाठी होतां मंथन ।
होइल पश्चिम, पूर्वा, दक्षिण, उत्तरभर विस्तार
तुझे रे कळले जीवनसार ॥३॥

श्री गोपाळ गोडसे यांच्या इतर रचना आम्ही लवकरच रसिकांसमोर मांडू. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र सर्वदूर पसरावे हाच उदात्त हेतू. नक्की वाचा आणि लोकांपर्यंत पोहोचवा.