काटा रूते कुणाला, आक्रंदतात कोणी। मज फूलही रुतावे, हा दैवयोग आहे! हे शब्द कानी पडताच मराठी रसिकांच्या मनात आणि मुखात “वाह” किंवा “आह” या प्रतिक्रिया अगदी नैसर्गिकरित्या उमटली नाही तर त्याला रसिक म्हणावे की नाही अशी शंका मनात येईल. खरं सांगायचं तर, कवयित्री शांताबाई शेळके मराठी वाङ्मयाला लाभल्या, मराठी मातीत जन्माला आल्या हा एक दैवयोगच आहे! सिद्धहस्त लेखक आणि नाटककार रणजित देसाई यांच्या “हे बांध रेषमाचे” संगीत नाटकातील, स्व. पंडित अभिषेकी बुवांनी स्वरबद्ध केलेले हे पद आजही मराठी मनाला मोहिनी घालून आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मानवी जीवनातील अनेक शाश्वत सत्यांपैकी एक सत्य म्हणजे, हतबलता, दुर्भाग्य आणि निरुपाय यांनी ग्रासलेले क्षण. आयुष्यातला हा विरोधाभास जेव्हा सत्य बनून समोर येतो तेव्हा अश्रू ढाळत, निरुपाय होऊन आपल्या दुर्भाग्याकडे बघत हसण्यापलीकडे माणसाच्या हातात काय उरतं?
जेव्हा समोर टाकलेले प्रत्येक पाऊल चुकीचे सिद्ध होते, नशिबाचे फासे काही असे पडतात की हातातला डाव सुद्धा ओंजळीतल्या पाण्याप्रमाणे ओघळून निघून जातात. एका विचित्र कुचक्रात माणूस अडकतो, जिथून बाहेर पडायचा मार्ग सापडत नाही. ज्या गोष्टींची कधी कल्पनाही केलेली नाही त्या गोष्टी वास्तव बनून समोर उभ्या राहतात. तेव्हा माणसाला आतून हारदरायला होतं. त्याच्या व्याख्यांना, समजांना तडा जातो. आणि एक विदीर्ण विषण्णता मन व्यापून जाते. दुर्भाग्य आणखीन काय असते? हे बंध रेषमाचे, नाटकाकरिता शांताबाई शेळके काव्य/गाणी रुचणार हे ठरले. जिथे पात्राला या दुःखाला सामोरे जावे लागते ती जागा (situation) सांगितली गेली. अनेक दिवस गेले पण मनाजोगते शब्द काही सापडेना. तेव्हा शांताबाई शेळके यांनी बुवांना विचारलं “बुवा तुम्हाला नक्की काय हवंय?” तेव्हा बुवांनी एक शेर ऐकवला तो असा…
लोग काँटों से बच के चलते हैं हमने फूलों से जख्म खाए हैं
तुम तो गैरों की बात करते हो हमने अपने भी आजमाए हैं
काट्यांपासून स्वत:ला वाचवलं यात नवल ते काय? दुर्दैवी लोक आहोत ज्यांना फुलांच्या स्पर्षाने जखमी केले. ज्यांच्याकडून कधीही अपेक्षा केली नाही त्यांनी देखील आरोप केले, दुःख दिले!
हा शेर ऐकल्यावर शांताबाई शेळके यांना विषयाचा गाभा समजला आणि त्यांनी काटा रूते कुणाला हे पद रचलं. (हल्ली लोक कविता लिहिली, कविता केली किंवा गाणे लिहिले असं सहज म्हणतात. पण, जेव्हा शब्द केवळ शब्द न राहता एक नैसर्गिक रचना बनून समोर येतात तेव्हा त्याला रचणे हाच शब्दप्रयोग योग्य वाटतो!)
काटा रूते कुणाला, आक्रंदतात कोणी
मज फूल ही रूतावे हा दैवयोग आहे
सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची
चिर-दाह वेदनेचा मज शाप हाच आहे
काही करू पहातो रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही विपरीत होत आहे
हा स्नेह वंचना की काहीच आकळेना?
आयुष्य ओघळोनी मी रिक्त-हस्त आहे
या कवितेवरील माझे विचार मी मुक्तपणे मांडत आहे!
काटा रूते कुणाला, आक्रंदतात कोणी हे तर “दिवा मालवल्यावर अंधार होतो” इतके नैसर्गिक सत्य आहे. पण, जेव्हा दिवा उजळूनही अंधःकार जात नाही तेव्हा त्याला काय म्हणावे? मज फूल ही रूतावे हा दैवयोग आहे! देवाची कृपा असते तशी अवकृपा देखील असते. नशिबाचे फासे असे उलटे पडतात आणि आजवर ज्यांना फूल मानलं त्याच फुलांनी वेदना दिल्या, जखमा दिल्या! पहिल्याच कडव्यात पात्राची हतबलता आणि नशिबाने त्याच्या आयुष्यात निर्माण केलेला दुर्दैवी विरोधाभास समोर उभा राहतो. ही शांताबाईंच्या शब्दांची ताकद आहे!
सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची, काही वेदना, जखमा अशा असतात की सांगता ही येत नाहीत. माणसाला आतल्या आत धुमसत राहावं लागतं. कधी सांगण्याचा धीर होत नाही, कधी सांगूनही फायदा नसतो. तेव्हा माणूस फक्त मनातल्या मनात रडू शकतो. बाकी त्याच्या हातात काहीच नाही. हाच “चिर-दाह वेदनेचा” शाप होऊन आयुष्यात आलेला आहे. आता तो मान्य करण्याखेरीज, सहन करण्याखेरीज गत्यंतर नाही.
काही करू पहातो रुजतो अनर्थ तेथे, दुर्दैव कधी इतके ब्लात्तर असते की चांगल्या मनाने केलेली गोष्ट देखील नुकसान करून जाते, गैरसमज निर्माण करते, वैर उत्पन्न करते. निखळ मानाने केलेली चेष्टा जशी वादाचे कारण ठरते! कोण उपाय केला म्हणजे या कुचक्रातून बाहेर पडेन असं होऊन जातं. विशेष म्हणजे जेव्हा नशिबाचे फासे उलटे पडतात तेव्हा न बोलणे देखील विपरीत म्हणजे उलटे काही करून जाते. बोलण्याने देखील दुःख आणि नाही बोलले तरी दुःख. म्हणजे इंग्रजीत म्हणतात तसं Doomed if you do, doomed if you don’t!
हा स्नेह वंचना की काहीच आकळेना? वंचना म्हणजे फसवणूक! अशा काळात माणसाची अशी काही अवस्था होऊन जाते की जिथे सरळसोट दिसणाऱ्या गोष्टींवर देखील चटकन विश्वास बसत नाही. कारण काहीही केल्याने निरुपाय होत आहे, विपरीत घडत आहे. तेव्हा माणूस विचार करतो की “आत्ता माझ्याशी स्नेहपूर्ण वागणारे नक्की खरेच तसे वागत आहेत की त्यांच्या वागण्यामागे काहीतरी खोट आहे?” माणूस शंका घेऊ लागतो! नसलेले अर्थ शोधून अनर्थ घेऊन बसतो. त्याने हितचिंतकही दूर जातात आणि माणूस अगदी एकटा पडतो. तेव्हा असं वाटतं की हे जगणं कशाला? जर असाच अंत व्हायचा होता तर हे जगणं व्यर्थ गेलं. आयुष्य ओघळोनी मी रिक्त हस्त आहे! आयुष्याच्या अशा सांजवेळी हे दुर्भाग्य नशिबी येणे म्हणजे ओंजळीत जपलेल्या आयुष्याला अकस्मात बोटांच्या फटींतून निसटून जाताना, हताशपणे बघणे आहे! शांताबाईंनी वापरलेला “रिक्त-हस्त” हा शब्द रसिकांच्या मनात एक पोकळी निर्माण करून जातो!
अप्रतिम शब्दात सर्व गाण्याचा अर्थ सांगितला आहे तुम्ही.
धन्यवाद!!