नमस्कार, लोकमान्य टिळक हे नाव माहित नसलेले लोक शोधूनच काढावे लागतील. पण आपल्याला त्यांच्या आयुष्यातल्या “टरफले” आणि “स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे” किंवा “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?” अशा दोन तीन गोष्टी सोडल्या तर विशेष काहीच माहित नसतं. स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहासकारांनी लोकमान्य टिळकांना फक्त केसरी, मराठा, गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव यांच्यापुरतेच मर्यादित करून ठेवले आहेत. या घटनांतून लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातले निर्णय, त्याग, विचार, तत्व, आचार, इतिहास आणि रोचक घटना तुमच्यासमोर आणायचा मानस आहे!
यादी
- पहिला किस्सा: धीरोदात्त लोकमान्य टिळक
- दुसरा किस्सा: लोकमान्य टिळकांवरील लोकांचे प्रेम आणि श्रद्धा
- तिसरा किस्सा: शब्दभेद – लोकमान्यांची विनोदबुद्धी
पहिला किस्सा
धीरोदात्त लोकमान्य टिळक
१
काळ होता १९०२-०३ चा प्लेगच्या साथीचा. या काळात प्लेगची भयंकर साथ पुण्यात पसरली होती. प्लेगच्या काळात, लोकमान्य टिळक फर्ग्युसन कॉलेजच्या जवळ, परांजपे राहत होते तिथे एक झोपडीवजा जागेत राहत होते. सगळीकडेच प्लेगचा प्रादुर्भाव होता तास इथेही झालेला होता. इतर लोकांवर जशी आपत्ती कोसळली तशी लोकमान्यांवर देखील कोसळली. या प्लेगच्या साथीत लोकमान्यांनी त्यांचे जिवलग देखील गमावले. त्याच्यात त्यांचे ज्येष्ठ पुत्र विश्वनाथपंत या प्लेगच्या साथीत दगावले. २८ वर्षांचे विश्वनाथपंत त्या वेळी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत होते. हाताशी आलेल्या मुलाचे असे जाणे म्हणजे बापाच्या मनावर किती मोठा आघात असतो हे आपण जाणतोच. पण हे दुःख, ही आपत्ती इथेच थांबत नाही. एकाच आठवड्यात लोकमान्यांनी चुलत भाऊ, भाचा यांना देखील गमावलं. या संकटांचा परिणाम लोकमान्यांच्या मनावर काय झाला असेल याची कल्पना आपण करू शकता. या दुःखाच्या प्रसंगी, त्यांचे जावई विश्वनाथ गंगाधरपंत केतकर त्यांना भेटायला म्हणून त्यांच्या झोपडीकडे गेले. लोकमान्य आपल्या झोपडीत काहीतरी वाचत होते, लिहीत होते. विश्वनाथ केतकर, झोपडीच्या बाहेर उभे होते. त्यांच्यात आत जाऊन काय बोलावे हेच सुचत नव्हतं. मोठी कठीण आणि करूण वेळ होती. लोकमान्यांना कसा धीर द्यायचा हेच त्यांना समजत नव्हतं. आपले जावई दारात उभे म्हटल्यावर लोकमान्यांनी त्यांना आत बोलावलं. विश्वनाथपंत फार काही बोलू शकत नव्हते. तेव्हा लोकमान्यच म्हणाले,
“अहो, गावची होळी पेटल्यावर प्रत्येक घरातून गोवऱ्या जाव्याच लागतात! .. त्याप्रमाणेच झालं”
पुत्रवियोगाचं दुःख लोकमान्य टिळकांना झालेलं होतं हे निश्चित होतं. पण त्या दुःखात देखील खचून न जाता, लोकमान्य टिळकांनी आपल्या कर्माकडे लक्ष केंद्रित केलं. यातून त्यांच्या मानसिक कणखरतेचा परिचय येतो.
२
आणखीन एक किस्सा, आहे १९०८ सालचा. ब्रिटिशांनी लोकमान्य टिळकांवर देशद्रोहाचा खटला दाखल केला. केस कोर्टात गेली. पक्ष प्रतिपक्ष यांनी आपली बाजू मांडली. शेवटच्या दिवशी आता फक्त निकाल यायचं राहिलेलं होतं. निकालाच्या आधी मधल्या सुट्टीत लोकमान्य टिळक आणि त्यांचे साथीदार एकत्र बसले होते. हे निश्चित होतं की आरोपींना “काळ्या पाण्याची” शिक्षा होणार! हे समजताच त्याच्या आजूबाजूचे काही या विचाराने व्यथित झाले. काळ्या पाण्याच्या शिक्षेच्या विचाराने काहींच्या डोळ्यात पाणी आलं. आपल्या आजूबाजूला सुरु असलेल्या या प्रकाराकडे बघून लोकमान्य आपल्या धारदार आवाजात म्हणाले,
“ज्यांना रडायचं असेल त्यांनी आत्ताच बाहेर जा! .. इथे बसू नका”
काळे पाणी समोर दिसत असताना देखील, मनाची शक्ती तसूभरही कमी झालेली नव्हती. खरोखरच लोहपुरुष होते लोकमान्य टिळक.
लोकमान्य खचले असते तर, स्वातंत्र्यप्राप्तीचा लढा कमकुवत झाला असता, संपूर्ण स्वराज्याची पेटवलेली मशाल मंद झाली असती! वैयक्तिक दुःखाकडे आपले भाग्य मानून धीरोदात्तपणे जगायचे कसे? हे लोकमान्य टिळकांनी शिकवलं! कठीणातिकठीण प्रसंगात देखील बुद्धी स्थिर ठेवायची, त्या संकटाला न घाबरता आणि न डगमगता तोंड देण्याची प्रेरणा लोकमान्यांचे हे किस्से ऐकून मिळते.
दुसरा किस्सा
लोकमान्य टिळकांवरील लोकांचे प्रेम आणि श्रद्धा
हा किस्सा आहे १९२१ सालचा. लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतरचा. श्री श्रीपाद शंकर नवरे यांनी सांगितलेला किस्सा. हा किस्सा वाचून तुम्हाला कल्पना येईल की, लोकांचे लोकमान्य टिळकांवर किती प्रेम होते, किती श्रद्धा होती. त्यांना उगाच “लोकमान्य” म्हणत नाहीत! तर झालं असं की श्री. नवरे वाई येथील वेदाभ्यास पाठशाळेसाठी काम करत. एकदा काही कामानिमित्त त्यांना १९२१ साली, विशाखापट्टण येथील सेंट्रल जेल मध्ये जाण्याचा योग आला. त्यांना त्या जेलमधील कैदींशी संवाद साधायची संधी मिळाली.
असे संवाद साधताना, त्यांची भेट पुण्यातील एका ब्राह्मण कैदीशी झाली. श्री नवरे पुण्याचे आहेत हे ऐकून तो बोलायला आला. हा कैदी स्वदेशीच्या आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. होय, स्वदेशी साठी जन्मठेप! श्री नवरे, लोकमान्य टिळकांना ओळखतात हे ऐकल्यावर कैदीने उत्साहाने प्रश्न विचारला
“लोकमान्य टिळकांची मुक्तता झाली का?”
श्री नवरे यांना समजेना त्या कैदीला काय उत्तर द्यावे? त्यांना वाईट देखील वाटले आणि कौतुक देखील वाटले. वाईट याचे वाटले की लोकमान्य आता या जगात नाहीत आणि कौतुक याचे वाटले की या कैद्याचे लोकमान्यांवर किती प्रेम होते, श्रद्धा होती! त्याला स्वतःच्या शिक्षेचे काहीही पडलेले नव्हते पण, लोकमान्य सुटले की नाहीत? हे माहिती करून घेण्यात जास्त रस होता!
त्या कैद्याला वाईट वाटू नये म्हणून श्री नवरे यांनी फक्त “होय, लोकमान्य सुटले”, एवढंच उत्तर दिलं. आयुष्यभर ही घटना श्री श्रीपाद शंकर नवरे यांच्या लक्षात राहिली!
धन्य ते लोकमान्य आणि धन्य ते लोक!
तिसरा किस्सा
शब्दभेद – लोकमान्यांची विनोदबुद्धी
लोकमान्य टिळकांचे नाव ऐकताच त्यांची धीरगंभीर मुद्रा, सडेतोड उत्तरे, प्रखर राष्ट्रभक्ती आणि तिखट शब्द मनात येतात. पण त्याकाळच्या साहित्याचे वाचन केले तर लक्षात येईल की, लोकमान्य टिळक वैयक्तिक आयुष्यात अत्यंत प्रसन्न मुद्रा ठेवणारे, नेहमी सकारात्मक विचार करणारे, दुसऱ्याचे म्हणणे प्रामाणिकपणे आणि शांतपणे ऐकून घेणारे आणि उत्तम विनोदबुद्धी असणारे होते. खरंच!
लोकमान्य टिळकांच्या बाबतीत लेखन करणारे, सदाशिव विनायक बापट यांनी सांगितलेला खालील किस्सा वाचून तुमच्या सहज लक्षात येईल की लोकमान्य टिळक फक्त समयसूचक, हजरजबाबीच नव्हे तर उत्तम विनोदबुद्धीचे धनी देखील होते!
किस्सा आहे १९०५ चा. सरतान सिंह नावाचे एक उत्तम धनुर्धर निशाणबाज पुण्यात आलेले होते आणि त्यांच्या निशाणेबाजीच्या कार्यक्रमाला लोकमान्य टिळक हजर होते. या कार्यक्रमात सरतान सिंह यांनी मत्स्यभेद, अदृष्यभेद आणि शब्दभेद यांचे प्रयोग करण्यास सुरुवात केली. अर्थातच आपल्या नावलौकिकाला साजेसा कार्यक्रम सरतान सिंह सादर करत होते. मत्स्यभेद झाला, अदृष्यभेद झाला. आता पाळी होती शब्दभेदाची.
त्यासाठी वेगवेगळ्या रंगांची आणि आकारांची मडकी आणण्यात आली. ती मडकी सरतान सिंह यांना दाखवण्यात आली तसेच त्यांचा आवाज ऐकवण्यात आला. त्यानंतर ही मडकी त्यांची रचना (sequence) बदलून लांब ठेवण्यात आली. आता सरतान सिंह यांना आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधून नुसत्या मडक्याच्या आवाजावरून त्या मडक्याचा बाण मारून लक्ष्यभेद करायचा होता. पण, समस्या अशी होती की, जमलेले लोक भरपूर आवाज करत असल्याने सरतान सिंह यांना त्या मडक्यांचे आवाज ऐकायला त्रास होत होता, नीट ऐकू येत नव्हते. बराच वेळ असाच गोंधळात गेला.
शेवटी लोकमान्य उठले आणि प्रेक्षकांना शांत करण्यासाठी त्यांच्याकडे पाहून विनोदाने म्हणाले
“हा शब्दवेध आहे. म्हणून लोकांनी शांत राहणेच जरूर आहे. राणाजी मडक्याच्या आवाजवरून वेध करणार आहेत तेव्हा जर का कोणाचा बोलताना मडक्यासारखा आवाज निघाला तर नेमका त्याचाच वध होईल हे लक्षात ठेवा व अगदी स्तब्ध बसा!”
हे शब्द ऐकताच त्या ठिकाणी प्रचंड हशा पिकला आणि लगेचच एकदम शांतता देखील झाली. आणि कार्यक्रम पूर्ववत सुरू झाला.
असे होते लोकमान्य आणि अशी होती त्यांची विनोदबुद्धी!
अप्रतिम माहिती .