त्रिशुंड गणपती – थोडी पार्श्वभूमी
काही कलाकृती, काही जागा आणि काही मंदिरे दुर्दैवाने अपरिचित राहतात. पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिर हे असेच एक अत्यंत अपरिचित, दुर्लक्षित आणि अद्भुत मंदिर! १७५४ च्या दरम्यान बांधलेले त्रिशुंड गणपती मंदिर हे एका दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देते. हिंदू मंदिरे केवळ धार्मिक स्थळे नाहीत. हिंदू मंदिर ही कला, श्रद्धा आणि इतिहास यांचा संगम आहे. “आयटी”च्या युगात पुणे म्हणजे केवळ कंपन्या, मौज मजा आणि गर्दी अशी समजूत झालेली (आणि काही प्रमाणात तयार केलेली आहे). आधुनिकीकरणाच्या ओघात तसेही हिंदू मंदिरांबद्दल फार जास्त निरूत्साह दिसून येतो. आता तर जे भाग पुण्यात नाहीत त्यांनाही “पुणे” म्हणून संबोधले जाते. असो..
पण ज्यांना पुण्याबद्दल प्रेम आहे, पुण्याच्या इतिहासाबद्दल आदर आहे आणि भारतीय संस्कृतीबद्दल आस्था आहे त्यांना त्रिशुंड गणपती मंदिर नक्की माहित असायला हवे. त्यासाठी केलेला हा प्रपंच. (टीप: सगळे फोटो मीच काढलेले आहेत)
माझा या त्रिशुंड गणपती मंदिराशी पहिला परिचय झाला तो, २०१७ मध्ये. मी आणि माझा मित्र कसबा गणपती मंदिरात गेलो होतो आणि मंदिराच्या बांधणीबद्दल गप्पा मारत होतो. तिथे सहज एका काकांशी परिचय झाला. त्यांनी त्रिशुंड गणपती मंदिराबद्दल माहिती दिली. खरं सांगायचं तर खजील व्हायला झालं. स्वतःला “पुणेकर” म्हणवून घ्यायचं आणि आपल्याला पेशवेकालीन गणपती मंदिराची माहिती नाही! मी आणि मित्राने चंग बांधला की या मंदिरात जायचेच. मग एके दिवशी आम्ही दोघे मिळून या त्रिशुंड गणपती मंदिराला भेट दिली. रस्ता कसबा पेठ, मंगळवार पेठ, सोमवार पेठ या अत्यंत जुन्या पेठांमधून जातो. अनेक वळणे घेत घेत या आपण या मंदिरात जातो. कसबा गणपती मंदिरापासून त्रिशुंड गणपती मंदिरापर्यंतचा रस्ता खाली देत आहे.
महाराष्ट्रात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. पण या मंदिराची बांधणी अत्यंत निराळी आहे. मंदिराच्या आवारात सापडलेल्या शिलालेखावरून हे मंदिर १७५४ साली इंदूर जवळील धामापूर येथील एक साधन गोसावी भीमगिरजी यांनी बांधले. १७७० पर्यंत या मंदिराचे बांधकाम सुरु राहिले.
जेव्हा मी या मंदिराच्या शोधात निघालो तेव्हा पहिल्या खेपेला हे मंदिर मला दिसलेच नाही. खरं तर दिसले नाही म्हणण्यापेक्षा मंदिरांबद्दल असलेली माझी (आणि बहुदा सगळ्यांची) समजूत, “मंदिरांना कळस असतो”. एक दोन वेळा हे मंदिर माझ्याकडून चुकले याचे कारण असे की रस्त्यावरून जाताना मी मंदिराचा कळस शोधत होतो आणि गमतीचा मुद्दा असा की या मंदिराला कळसच नाही! कधी कधी हे मंदिर एकाच एकसंध खडकात कोरलेले आहे की काय अशी शंका येते!
त्रिशुंड गणपती – मंदिर
हे मंदिर पुण्यात किंवा महाराष्ट्रात दिसणाऱ्या मंदिरांपेक्षा खूप वेगळे आहे हे प्रथमदर्शी दिसतेच. पण जसजसे आपण हे मंदिर जवळून पाहू लागतो तसतसे आश्चर्यचकित व्हायला होते. मंदिराच्या बाहेर उभे राहताच समोर त्रिशुंड गणपती दिसतो. पण त्याच्याही आधी समोर येतात ते म्हणजे जवळजवळ माणूसभर उंचीचे द्वारपाल! त्यांची घडण अत्यंत सुंदर आहे, सुबक आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित आपोआप भक्तांचे स्वागत करते. एक विचित्र गोष्ट अशी की, त्यातल्या एका द्वारपालाचा चेहरा गुळगुळीत आहे आणि एकाचा नाही. याचे नक्की कारण मला समजलेले नाही. कदाचित काही डागडुजी किंवा सतत हात लावल्यामुळे असे झाले असावे हा माझा अंदाज.
आणखीन काही मुर्त्या आणि पाषाणातील आकृत्या ज्या हे मंदिर बघताक्षणी दृष्टीचा ठाव घेतात त्या म्हणजे, दारावरील शेंदरी रंगातील गणपती, दारावरील महिरप, भिंतीवरील महिरपी कोनाडे, त्याच्यावरील शेषशायी विष्णू, वेगवेगळ्या व्यक्तिरेखा, एकशिंगी गेंडा, त्यांच्या आजूबाजूला टोपीवाले इंग्रज आणि यळी! माझ्या मते या मंदिरांच्या भिंतीवरील पाषाणमूर्ती संपूर्ण भारतातील मूर्तिंशैली दर्शवतात. त्यांचे फोटो खाली देत आहे.
१७५०-७० म्हणजे इंग्रज आणि भारतीय यांच्यात बंगाल येथे सुरु असलेल्या लढायांचा काळ. त्याचा निश्चित प्रभाव आपल्याला आढळून येईल. एकशिंगी गेंड्याकडे नीट पाहिलं तर लक्षात येईल की या गेंड्याच्या पायात साखळी आहे आणि ही साखळी टोपीवाल्याने बांधलेली आहे. भारताची देखील हीच अवस्था झालेली होती! दुर्दैवाने इंग्रजांनी आपल्या मनावर घातलेली साखळी आपण अजूनही तोडू शकलेलो नाही.. असो!
वरील चित्रात एका बाजूला तीन टोपीवाले एकमेकांच्या गळ्यात हात घालून दिसत आहेत. माझ्यामते हे त्यांच्या उन्मत्त विलासितेचे द्योतक आहे.
या गेंड्याच्या आणि टोपीवाल्यांच्या शिल्पाच्या वर असलेला महिरपी कोनाडा खालच्या फोटोत पाहा. त्याच्यावर पक्ष्यांच्या आकृत्या पाहा. खरं तर कोणत्याही प्रसिद्ध मंदिराच्या तोडीचे हे शिल्प आहे. सुबक आणि सुंदर कोरीव कामाचा एक उत्तम नमुना. त्याचप्रमाणे या कोनाड्याची मेघडंबरी काहीशी राजस्थानी किंवा उत्तर भारतीय वाटते. आधी नमूद केल्याप्रमाणे या मंदिरातील शिल्पकामात भारतातील विविध भागांचा प्रभाव जाणवतो.
प्रवेशद्वारावरील डाव्या सोंडेची गणपतीची भंगलेली मूर्ती पाहून सहज लक्षात येईल की या मंदिराचे संवर्धन किती गरजेचे आहे. अत्यंत दुर्दैवी आहे हे सगळं. कोण आवाज उठवणार देव जाणे पण तुम्हाला देखील याची माहिती असायला हवी हे मुख्य कारण.
त्रिशुंड गणपती मंदिराच्या प्रवेशद्वारावर अनेक प्रकारची शिल्पे दिसतात. त्यातील काही परिचयाची आहेत आणि काही अपरिचित. त्यात शेषशायी विष्णू, यक्ष, किन्नर, पोपट मंगलकलश, भैरव, हत्ती, मोर आणि यळी इत्यादी मला समजलेली शिल्पे. काही ठिकाणी माणसे कुस्ती सारखे डावपेच करत असल्यासारखी शिल्पे आहेत. माझ्या मते ते यक्ष आहेत.
खालील दोन फोटो, मोठे करून पाहा. जेणेकरून तुम्हाला सगळी शिल्पे नीट बघता येतील.
मंदिराच्या बाहेरील भिंतीच्या उजव्या कोपऱ्यावर पांडुरंग आणि रुक्मिणीच्या प्रतिमा आहेत.
मंदिरात प्रवेश करायच्या आधी या प्रतिमांना आणि यक्षांना पाहायचं विसरू नका
त्रिशुंड गणपती मंदिर – गाभारा
मंदिरात प्रवेश करताच मंदिराचा प्रशस्त गाभारा येतो. बाहेरून अंदाज येणार नाही इतका मोठा हा गाभारा आहे. त्यावर पेशवेकालीन दगडी बांधणीची छाप आहे. अशाच प्रकारची बांधणी आपल्याला पुण्यातील इतर पेशवेकालीन शिवमंदिरात आवर्जून दिसेल. उदा. ओंकारेश्वर मंदिर, पुणे. विशेष गोष्ट म्हणजे, या मंदिरातील प्रवेशद्वारांची उंची हळूहळू कमी होत जाते.
आत जाताच एका विशिष्ट प्रकारची ऊर्जा जाणवते. बाहेरील विश्वाचा जणू विसर पडतो. जागृत देवस्थाने अशीच असतात. त्या ऊर्जेचा अनुभव घ्यायचा असतो. गाभाऱ्यात जाताच, दृष्टीस पडते ते काळ्या पाषाणात घडवलेले गर्भगृहाचे प्रवेशद्वार! अत्यंत कोरीव असे काम या द्वारावर आहे.
या द्वारावरील गणपतीची प्रतिमा विशेष आहे. उजव्या सोंडेचा हा गणपती (मुख्य द्वारावर डाव्या सोंडेचा आहे!) त्याच्या एका मांडीवर कोणी आहे. माझ्या मते शक्ती देवता आहे. माझ्या या तर्काचे कारण पुढे सांगतो पण याबद्दल तशी फारशी माहिती उपलब्ध नाहीये.
२०१९ मध्ये या प्रतिमेवर खूप शेंदूर होता. नुकतेच पाहिले तेव्हा शेंदूर काढलेला दिसला. या महिरपीसाठी वापरलेला पाषाण हा मंदिरासाठी वापरलेल्या पाषाणापेक्षा वेगळा दिसतो हे मात्र निश्चित.
या गणपतीच्या खालच्या बाजूस, दाराच्या चौकटीवर गणेशयंत्र कोरलेले आहे. दारातून प्रवेश करताना, चौकटीकडे पाहा हे यंत्र दिसेल. हा यंत्राचा अनुभव आल्यानंतर, हल्ली मी प्रत्येक मंदिरात प्रवेश करताना दाराला असे यंत्र आहे का पाहतो!
त्रिशुंड गणपती मंदिर – गर्भगृह
एकदा गर्भगृहात गेल्यावर या “त्रिशुंड” गणपतीची मूर्ती अगदीच समोर येते. दिसायला अत्यंत वेगळी ही मूर्ती! सहसा अशा त्रिशुंड गणपतीच्या मुर्त्या भारतात आढळत नाहीत. विशेष म्हणजे हा गणपती मयूरावर आरूढ आहे! डाव्या मांडीवर शक्ती देवता आहे. उजवी सोंड मोदक पात्राला स्पर्श करत आहे, एक सोंड शक्ती देवतेच्या हनुवटीला स्पर्श करत आहे (ही कोणती माया आहे? हे माझ्यासाठी एक गूढ आहे) आणि मधली सोंड मूषकाला स्पर्श करत आहे. मयुराच्या दोन्ही बाजूंना रिद्धी – सिद्धी आहेत. खाली गण. गणेशाच्या हातात अंकुश आणि परशु आहेत. २०१९ मध्ये या मूर्तीवर शेंदूर होता, आत्ता गेलो होतो तेव्हा शेंदूर काढलेला दिसला. त्यामुळे मूळ स्वरूप समोर आले!
खरं सांगायचं तर मूर्तीकडे पाहात राहावे अशी ही मूर्ती आहे! तमोगुण, सत्वगुण आणि रजोगुणांनी युक्त.. या मूर्तीत आशीर्वाद देणारा हात नाही, हे मला विशेष वाटलं. कदाचित वर नमूद केल्याप्रमाणे तिन्ही गुणांनी युक्त असल्याने नसेल. काहीसा उग्र वाटणारा ही पुण्यातील “त्रिशुंड गणपती”!
या गणपतीच्या मूर्तीच्या मागे शेषशायी विष्णूची पाषाण प्रतिमा आहे. त्याच्यावर गणेशयंत्र! पाहताक्षणी मन मोहावे अशा या प्रतिमा आहेत.
शेषशायी विष्णूची प्रतिमा पाहिली तर, पायाशी लक्ष्मी आणि डोक्याच्या बाजूला एकतारी घेऊन कोणी उभा आहे. माझ्या मते ही विष्णुदास संतांची प्रतिमा आहे. नारद वाटू शकतो पण नारद ऋषी आहेत, पण तसे नसावे. मुकुट किंवा डोक्याचे पागोटे पाहून मी हा तर्क लावत आहे. आणखीन एक प्रतिमा लक्षमीच्या बाजूला आहे. तिच्या डोक्यावर नक्की चंद्र आहे की मुकुट समजणे कठीण आहे.
गर्भगृहाच्या खाली एक तळघर आहे. जे एका जिवंत झऱ्यामुळे कायम पाण्याने भरलेले असते. याच गर्भगृहात गोसावींच्या तळघराचे द्वार आहे. हे द्वार फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी उघडले जाते.
या गर्भगृहातील काही प्रतिमांनी खरं सांगायचं तर डोकं थोडं चक्रावून जातं कारण अशा प्रतिमा फार पाहायला मिळत नाहीत. शेवटच्या दाराच्या कडेला उभे असलेले द्वारपाल पाहा. असे द्वारपाल मी हंपी ला बघितल्याचे आठवतात. जटा, दाढी आणि वेशभूषा पाहता माझ्या मते हे गोसावी (ऋषी) आहेत.
मूर्तीकडे पाठ केल्यावर, गर्भगृहाच्या दाराच्या आतल्या बाजूला दोन स्त्री प्रतिमा आहेत. या प्रतिमा देखील सुबक आहेत.
या मंदिरात एक प्रतिमा आहे जिचा अर्थ मला अजून फारसा समजलेला नाहीये. मूर्तीच्या दाराच्या उजवीकडील द्वारपालाच्या वर ही प्रतिमा आहे. अधिक माहिती असलेल्यांना मी हे विचारणार आहे. कदाचित सूर्यदेव असेल, किंवा किन्नर किंवा दारावरील यक्ष! पूर्वी या प्रतिमेवर देखील शेंदूर होता, तो काढलेला दिसला!
शेवटच्या या प्रवेशद्वाराच्या वर, दोन संस्कृत आणि एक फारसी भाषेत लिहिलेले शिलालेख आहेत.. संस्कृत शिलालेखात बांधकामाचा काळ आणि मंदिर रामेश्वराचे असल्याचे नमूद केलेले आहे. दुसऱ्या चौकटीत गीतेतील श्लोक आहे. फारसी लेखात मंदिर गुरुदेव दत्तात्रयाचे असल्याचे लिहिलेले आहे. शिलालेखाच्या वर “पुण्यनगरीपुरी” असा उल्लेख आहे. इथे हे सांगणं गरजेचं आहे की, पुण्याचे प्राचीन नाव “पुण्यनगरी” आहे. हे नाव पुणेश्वर वरून आलेले आहे. पुनेश्वर बद्दल माहिती नंतर कधीतरी सविस्तर सांगूच. पण सध्या या मंदिराच्या जागी दर्गा आहे ही माफक माहिती ध्यानात असू द्या.
त्रिशुंड गणपती मंदिर – प्रदक्षिणा
जेवढा मंदिराच्या आतील भाग लक्षवेधी आहे तेवढाच बाहेरील भाग देखील आहे! प्रदक्षिणा घालताना पहिली प्रतिमा दिसते ती मेघडंबरातील नाटेश्वराची. मूर्ती कधीकाळी खूप सुंदर असावी. पण, डागडुजी नसल्याने त्याचे तेज आणि सौंदर्य उतरलेले आहे. आपल्या साठी ही लज्जास्पद गोष्ट आहे की आपण आपल्याच देव देवतांच्या मुर्त्यांची नीट काळजी घेत नाही.
याच प्रदक्षिणेच्या वाटेवर, मंदिराच्या मागच्या बाजूला एक अद्भुत शिल्प आहे! एका पौराणिक कथेचेवर आधारित ही ब्रह्म, विष्णू आणि महेश्वर यांची प्रतिमा. या शिवलिंगाला फक्त शाळुंका आहे. पिंडीवर अत्यंत सुंदर पंचमुखी नाग आहे. एक पक्षी, आहे आणि पिंडीच्या पायाशी एक प्राणी आहे. ही लिंगोद्भव शिवप्रतिमा आहे. तो पक्षी म्हणजे हंसाचे रूप घेतलेला विष्णू आणि तो प्राणी म्हणजे विरहाचे रूप घेतलेला ब्रह्म. एकदा विष्णू आणि ब्रह्म यांच्यात श्रेष्ठत्वाबद्दल वाद निर्माण झाला. तो मिटवण्यासाठी एक प्रचंड मोठे अद्भुत अग्नीरूपी शिवलिंग प्रगट झाले. जो या शिवलिंगाचे आदी वा अंत शोधून काढेल तो श्रेष्ठ असे ठरले. विष्णूने हंसाचे रूप घेऊन झेप घेतली. ब्रह्माने विरहाचे रूप घेऊन माती उकरायला घेतली. हंस निम्या लिंगापर्यंत जाऊ शकला पण, शेवटी हंसाला अंत सापडला नाही. जमिनीखाली निम्मे लिंग खोदून निघाले पण, वराहाला आदी सापडला नाही. शेवटी दोघे शिवाला शरण गेले. दोघांपैकी कोणी श्रेष्ठ नाही कोणी कनिष्ठ नाही. दोघे आपापल्या परिने श्रेष्ठ आहेत असे सांगून शिव शंकराने हे लिंग दर्शन दिले. शिल्पकारांनी अत्यंत सुंदर पद्धतीने ही कथा या शिल्पात सांगितली आहे. अशा प्रकारच्या प्रतिमा अत्यंत दुर्लभ आहेत. एकूणच अशी मंदिरे दुर्लभ आहेत.
प्रदक्षिणामार्गावरून पुढे गेल्यावर, भिंतीवर विष्णूची एक वेगळी प्रतिमा दिसून येते. माहिती पत्रकात विष्णू आणि कालभैरवाच्या प्रतिमा असे नमूद केलेले आहे पण मला दोन वेगळ्या प्रतिमा या भिंतीवर आढळून नाही आल्या. कदाचित पुन्हा एकदा नीट पाहावं लागेल!
याच भिंतीच्या पायाशी एक कोरीव आणि जाळीदार दगडी फरशी आहे. दगडाच्या फारशींमध्ये अशी जाळी बनवलेली फारशी कुठे पाहायला मिळत नाही!
त्रिशुंड गणपती मंदिर – आमचे मनोगत
आणि असेच पुढे जाता प्रदक्षिणा पूर्ण होते! आपण पुन्हा एकदा या नितांत सुंदर मंदिराच्या मुख्यद्वारापाशी येऊन पोहोचतो. खरं सांगायचं तर पुण्याच्या मध्यवर्ती भागात इतके सुंदर आणि ऐतिहासिक मंदिर आहे, हे फार कुणाला माहित कसे नाही याचे आश्चर्य वाटते. या मंदिराची डागडुजी होत नाही आणि सरकार किंवा शासकीय यंत्रणा लक्ष देत नाही हे प्रकर्षाने जाणवते. मंदिराचे गुरुजी आपल्या खर्चाने सर्व पूजा आणि फुले वगैरे वाहतात कारण महिन्याला इतके तुटपुंजे वेतन मिळते की त्यातून एक वेळेचा हार आणि फुले मिळाली तरी खूप झाले! मंदिराच्या समोर राहणारे रहिवासी मनापासून येणाऱ्या सगळ्यांना माहिती देतात. पुजारी आणि या रहिवाशांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. खरं सांगायचं तर याच मंडळींमुळे हे मंदिर जिवंत आहे. नाहीतर आत्तापर्यंत आजूबाजूला इमारती बांधून हे मंदिर लुप्त झाले असते. असो, मुद्दा इतकाच की या मंदिराचा “योग्य रीतीने” जीर्णोद्धार होणे गरजेचे आहे. पुढच्या खेपेला पुण्याच्या गाव भागात गेलात तर या मंदिराला अवश्य भेट द्या. लाक्षणिक अर्थाने हा पुण्याचा इतिहास आणि वर्तमान देखील आहे.
आशा करतो की ही माहिती तुम्हाला आवडली असेल. ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यास मदत कराल ही अपेक्षा ठेवतो. नमस्कार 🙏
आणखी ब्लॉग वाचायचे असल्यास इथे क्लीक करा
खूप छान माहिती दिली..
धन्यवाद!!