“कांतारा” बद्दल थोडं
रिषभ शेट्टी दिग्दर्शित “कांतारा” हा चित्रपट नसून एक अनुभव आहे. एका अविस्मरणीय कलाकृतीचा अनुभव आहे. पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत कलाकृती. आयुष्यात कधीही न ऐकलेल्या परंपरेबद्दल, अनोळखी भाषेत बनवलेली आणि त्या समाजाबद्दल काहीही कल्पना नसून, एक क्षणही पापणी लवू न देणारी ही कलाकृती. मी या चित्रपटाला फक्त चित्रपट समजत नाही. ही शुद्ध कलाकृती आहे. या कलाकृतीचा आस्वाद केवळ आणि केवळ चित्रपटगृहातच योग्य प्रकारे घेता येईल! त्यामुळे OTT ची वाट बघू नका ही ठळक सूचना..

“कांतारा” ची पार्श्वभूमी
कांतारा किंवा कांतार म्हणजे भारतीय इतिहासातील एक गूढ आणि विस्मयकारी वन. ज्याचा उल्लेख रामायणात आणि वराहमिहिराच्या ज्योतिषशास्त्रात देखील आलेला आहे.
कांतारा, कर्नाटकातील किनारपट्टीशी लागून असलेल्या वनांची, त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांची, त्यांच्या भाव-भावनांची, मानवी हव्यास, कायदा – परंपरा संघर्षाची, आणि शेवटी देव आणि मानव यांच्यातील संबंधाचा एक भावना-चित्रपट आहे. पण सरते शेवटी चित्रपट आहे कांतारा वनाची रक्षा करणाऱ्या दैवाचे योग्य वेळी आपला उत्तराधिकारी निवडण्याची गोष्ट. या सिनेमाची सुरुवात नेहमीप्रमाणे म्हणजेच “एका राज्यात एक राजा होता” अशीच होते. पण सांगण्याची पद्धत आणि भाषा (tone) अगदी साधी, सोपी आणि सरळसोट आहे. प्रेक्षकांना या वनाबद्दल आणि दैवांशी असलेल्या संबंधाबद्दल कुठलीही शंका राहात नाही!
“शिवा” चे वडील भूत कोला या परंपरेतील/उत्सवातील दैव नर्तक (वराहरुपी भूत, पंजुर्ली) असतात आणि ते शिवा आणि त्याचा भाऊ बहिणींना ही गोष्ट सांगत असतात. त्याचे वडील आश्चर्यकारकरित्या “कांतारा” मध्ये लुप्त होतात. दैव म्हणजेच देव, कांताराचे रक्षण करणारे देव. परंपरेनुसार “दैव” ना एक आदराचे आणि महत्त्वाचे स्थान आहे. पण जेव्हा कोणी मानव दैवी शक्ती, निसर्ग यांच्या नियमांचे उल्लंघन करू पाहील तेव्हा दैव त्याचे पारिपत्य करेल हा विश्वास आहे. आणि तसे घडतेही.

“कांतारा” कथेबद्दल थोडक्यात
मी इथे चित्रपटाची कथा मुळीच देणार नाही. कारण आधी म्हटल्याप्रमाणे हा अनुभव चित्रपटगृहासाठी राखीव असायला हवा! तरीही कथेबद्दल नक्कीच बोललं पाहिजे. कांतारा ची कथा एक धागा नसून अनेक धाग्यांनी एकमेकांना पीळ दिलेला एक दोरखंड आहे. जो पहिल्या मिनिटापासून प्रेक्षकांना खुर्चीला जखडून ठेवतो. या सगळ्याला पार्श्वभूमी वनांची, वनांच्या आजूबाजूला साध्या भोळ्या राहणाऱ्या लोकांची आहे. तसेच ही कथा एका वन अधिकाऱ्याच्या कर्मठ स्वभावाची देखील आहे. याउपर ही कथा राजाचे हपापलेले वंशज आणि त्याच्या छुप्या कारस्थानांची आहे. कथा सुटसुटीत आहे. वाचताना यादी मोठी वाटली तरीही गरजेपेक्षा जास्त पात्रे इथे नाहीत. मुख्य पात्र “शिवा” असले तरीही माझ्या मते खरे मुख्य पात्र ज्याला इंग्रजीत Protagonist म्हणतात ते दैव आहे!
रिषभ शेट्टीचे जितके कौतुक करावे तितके थोडे आहे. कारण, रिषभ या चित्रपटाचा दिग्दर्शक, लेखक आणि प्रमुख कलाकार “शिवा” देखील आहे. शिवा ला गावकऱ्यांच्या दृष्टीने बंडखोर दाखवणे महत्त्वाचे होते. तसे नसते तर शिवा चा बंडखोरी, अनैसर्गिक, स्वैर आणि बेजबाबदार जगापासून दैव च्या जबाबदार आणि दैवी अधिष्ठान असलेल्या जगापर्यंत घडणारा प्रवास पूर्ण झाला नसता! ही वाट वन अधिकारी “मुरली” च्या कर्मठपणाला छेद देते, “साहिब” म्हणजे राजाच्या वंशजांच्या हव्यासाच्या आड येते. पुढे त्याची प्रेयसी “लीला” देखील वन विभागात रुजू होते ज्याने कथेला काही सूक्ष्म वळणे मिळतात.

“शिवा” एक समर्थ पण वाया गेलेला मुलगा आहे हे संबंध गावाचे मत असते. तरीही गावावर संकट आले की सगळे शिवा वर अवलंबून असतात. वन अधिकाऱ्यांबरोबर ग्रामस्थांचे उडणारे खटके, वास्तवाला धरून आहेत हे माझ्या अनुभवावरून नक्की सांगू शकतो. हे खटके आजही उडतात. त्यांच्या कारणांबद्दल नंतर कधीतरी लिहीन. तूर्तास टाळी एका हाताने वाजत नाही इतकंच लक्षात राहू द्या. शिवा बंडखोर असला तरीही मनस्वी असल्याने त्याच्या या क्षणिक किंवा इंग्रजीत सांगायचं तर impulsive स्वभावाचा फायदा साहिब किंवा राजा करू पाहतो. मग या सरकारी यंत्रणा आणि लोभी राजा दोहोंच्या मध्ये शिवा अडकतो. त्याच्यात एक दुःखद घटना घडते ती म्हणजे सरळ स्वभावी “गुरुवा” ची हत्या. हत्या कशी आणि का होते यासाठी चित्रपट पाहा.. पण ही घटना शिवा ला विचार करायला प्रवृत्त करते. शेवटी त्याला “दर्शन” घडते.
कथेची मांडणी सरळसोट आहे. पात्रे ठळक आणि नेमकी आहेत. इथे हे सांगणं क्रमप्राप्त आहे की किशोर कुमार जी यांनी वन अधिकारी “मुरलीधर” आणि अच्युत कुमार यांनी “साहिब” किंवा “देवेंद्र सुत्तूरू” या भूमिका चोख वटवल्या नसत्या तर कांतारा च्या कथेला आणि पटाला पूर्णत्त्व मिळालं नसतं. मानसी सुधीर ने शिवाच्या आईची कमला, आणि सप्तमी गौडा ने शिवाच्या प्रेयसी “लीला”ची भूमिका देखील उत्तम केलेली आहे. चित्रपट पाहून कुठेही ही मंडळी Out of place किंवा वेगळी वाटणार नाहीत. सप्तमीचे कौतुक यासाठी करायला हवे की १९९० च्या दरम्यानच्या काळात वन खात्यात महिलेने नोकरी करणे ती ही “गार्ड”ची, हे पडद्यावर दाखवणे सोपे नाही! तिने गावातीलच एक मुलगी आणि वन खात्यातील एक गार्ड या दोन भूमिकांमधील मानसिक संघर्ष आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर शिवा शी असलेले प्रेमाचे नाते उत्तम दाखवले आहे.
एकूणच मला जी गोष्ट भावली ती म्हणजे दैव चे समतोल राखण्याचे आणि वनांच्या संरक्षणाचे व्रत. जवळजवळ संपूर्ण चित्रपटभर पडद्यावर सतत संघर्ष, असमतोल दिसत राहतो. त्यामुळे प्रेक्षकही काहीसा खिळून राहतो. कारण प्रत्येक संघर्ष “पुढे काय झालं?” हा प्रश्न अगदी नकळत घेऊन येतो! शेवटी साधी भोळी माणसे, त्यांची आस्था, त्यांच्या बरोबरीने उभे राहणारी यंत्रणा आणि मानवी लोभ व हव्यास यांच्यात एक प्रचंड संघर्ष होतो. आणि दैव जन्म घेतो, प्रकट होतो! दैव संचारतो आणि आपल्या व्रताचे पालन करण्यासाठी रौद्र रूप घेतो. या संघर्षाला विराम देतो. शांतता प्रस्थापित झाल्यावर शेवटी समतोल साधण्याची दीक्षा देऊन पुन्हा पितरांच्या मार्गावर शिवा निघून जातो. लीला गरोदर असते.. चक्र सुरु राहिले!

“कांतारा” शिवा, दैव आणि वराह
संपूर्ण चित्रपटात शिवा ला कधी दैव दिसण्याचे, कधी वराह दिसण्याचे भास होतात. वराह ही संकल्पना आपण दुर्दैवाने विसरूनच गेलेलो आहोत. पण दक्षिणेत अजूनही वराह पूजन केले जाते. आपल्या “पुरोगामी” समाजात दैव आणि परंपरांची थट्टा केली जाते. त्याचेही चित्रण या चित्रपटात सूक्ष्म रीतीने केलेले आहे. असो, पण शिवाला होणार्या या भासांचे उत्तम आणि काही वेळा अत्यंत थरारक चित्रण दिसून येईल. जेव्हा जेव्हा “शिवा” आपल्या मार्गावरून भटकतो तेव्हा वराह दिसतो आणि जेव्हा जेव्हा काही सूचक अन्वयार्थ सांगायचा असेल तेव्हा दैव दिसतो. हा माझा समज आहे, प्रेक्षकांनी आपापले अनुमान लावायला हरकत नाही! मला अभिमान आहे की भारतात अजूनही आपल्या परंपरांचा आदर करणारे कलाकार आहेत. रिषभ शेट्टी ने शिवा ला होणारे भास कथेत इतके सुंदर गोवले आहेत की प्रेक्षक काही वेळानंतर त्या भासांवर देखील विश्वास ठेवू लागतात. इथे एक प्रकारचे चलचित्रकाव्य किंवा poetic choreography सुरु होते. ज्यात कवी सांगेल तेच सत्य ठरते. कोणत्याही कलाकृतीचा हाच मूल धर्म आहे.

“कांतारा” सादरीकरण
कांतारा ची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे सादरीकरण! असे म्हणतात की चित्रपट एक दृष्य कथाकथन “Visual storytelling” आहे. कांतारा तंतोतंत तेच आहे. अभिनय तर उत्तम आहेच पण स्थानाची (location) योग्य निवड महत्त्वाची आहे. जोपर्यंत वनांची योग्य पार्श्वभूमी नाही तो पर्यंत सगळं फोल आहे.
छायाचित्रीकरणाबद्दल तर बोलूच पण आधी..
अभिनय
रिषभ शेट्टी एक मुख्य पात्र आहे आणि त्याने आपली भूमिका उत्तमरित्या सादर केलेली आहे. मला आवडलेली गोष्ट म्हणजे पडद्यावर दिसणारा त्याचा म्हणजेच शिवाचा आत्मविश्वास. क्षणा क्षणाला जाणीव होते की रिषभ ला “शिवा” समजलेला आहे. वन अधिकारी मुरलीधर म्हणजे किशोर कुमार आणि साहिब म्हणजे अच्युत कुमार यांची जुगलबंदी उत्तम जमून आलेली आहे. हे दोघे प्रति-नायक (antagonist) आहेत. त्यांच्या अभिनयामुळे ही जुगलबंदी बघण्यासारखी झालेली आहे. किशोर कुमार यांच्या चेहर्यावरील साशंक भाव आणि अच्युत कुमार यांच्या चेहर्यावरील कुटिल भाव स्पष्ट दिसतात. सप्तमी गौडा ही त्या गावातील एक सामान्य आणि तरीही काही प्रमाणात भावुक तरुणी म्हणून उत्तम दिसते. शिवाची आई मानसी सुधीर हिला मोजके काम आहे. तिने उद्दाम मुलाच्या आईची भूमिका चांगली बजावलेली आहे. शिवा चे सडाफटिंग मित्र या गंभीर कथेत थोडी श्वास घ्यायला हलकी फुलकी जागा देतात.

अभिनयात विशेष वाखाणण्याजोगी गोष्ट म्हणजे चेहर्याचा वापर आणि त्यावर दिलेला focus. दैव चे डोळे बोलके आणि अस्वस्थ करणारे दिसतात. दैव चा आवाज आणि चेहर्यावरील हाव भाव मनाचा ठाव घेतात. शिवाचे ओरडणे आधी समजले नाही पण जेव्हा चित्रपटाचा शेवट येतो तेव्हा त्याच्या तशा चेहरा बनवण्याचे गुपित समजले. दिग्दर्शकाचे आणि कलाकाराची उच्च पातळी इथे दिसून आली! छोटा संकेत देतो, शिवा कायम संपूर्ण तोंड उघडून, दात दाखवत ओरडताना दाखवला गेलाय. का? बाकीचे तुम्ही चित्रपटातच पाहा. उत्तर तिथेच शोधा म्हणजे आणखीन लज्जत येईल..

आणि हो.. शेवटी १०-१५ मिनिटांत रिषभ ने केलेला अभिनय थक्क करणारा तर आहेच पण स्वतःला “अभिनेते” म्हणवून घेणार्या प्रत्येक कलाकाराला दिलेले एक आव्हान आणि तुलना पातळी (datum) आहे. असा अभिनय करण्यासाठी मला वाटते कधीकधी खरंच “अंगात येणं” गरजेचं आहे. कारण काही गोष्टी अतिमानवीय असतात आणि त्यांच्या सादरिकरणासाठी अशाच अतिमानवीय शक्तीचा संचार होणं गरजेचं असतं.

Color pallet किंवा रंगपट / रंगफळी
Color pallet किंवा रंगपट / रंगफळी ची निवड चपखल आहे. कांतारा म्हणजे फक्त वन नसून त्याला एक गूढतेचे वलय देखील आहे. त्यामुळे केवळ हिरवाई न दाखवता त्यात धूसर निळ्या रंग देखील गरजेचं होता. जो कांतारा मध्ये दिसतो. सध्याच्या भारतीय चित्रीकरणात आलेला एक उत्तम बदल म्हणजे फिल्टर आणि वॉश चा सुयोग्य वापर. Color pallet च्या एका टोकावर धूसर निळा पटल असलेली गडद हिरवाई आणि दुसर्या टोकावर भडक लाल आणि पिवळा दैव. या दोन ध्रुवांच्या मध्ये कांतारा चे रंग प्रेक्षकांना झुलवतात.
कपडेपट
कपडेपट साठी फार जागा नाही ज्याला एकमेव अपवाद आहे दैव! दैव चे कपडे, साहित्य (property) आणि मेक-अप प्रेक्षकांच्या डोळ्यांतून उतरता उतरत नाही. गडद निळ्या – हिरव्या पार्श्वभूमीवर दैव एखाद्या मशालीप्रमाणे उठून दिसतो. अर्थात हा गेटअप पारंपरिक असल्याने स्थानिक लोकांना नवीन वाटणार नाही पण आपल्यासाठी हा एक वेगळाच अनुभव आहे. महाराष्ट्रात (मुख्यत्वे कोकणात) काही प्रमाणात दशावतारी किंवा भुत्या अशी वेशभूषा आणि थाट करतात. पण दैव सोडले तर बाकीच्या कलाकारांचे कपडे नेहमीप्रमाणे दक्षिण भारतीय आहेत. कदाचित याच ठळक अंतरामुळे दैव उठून दिसतात!
संगीत
संगीतात आणि पार्श्वसंगीतात मातीचा रंग स्पष्टपणे दिसून येतो. यासाठी अजनीश लोकनाथ याचे कौतुक केलेच पाहिजे. मी हिंदी dubbed सिनेमा पहिला आहे त्यामुळे मूळ चित्रपटातील गाण्यांबद्दल फारसं सांगता येणार नाही. पण आनंदाची गोष्ट अशी की “कांतारा” शी निगडित सर्व गाणी स्थानिक भाषेत आहेत. विशेष म्हणजे एक गाणे मराठीत देखील आहे! कर्नाटकी शास्त्रीय संगीत आणि स्थानिक संगीत यांची जोड केलेली आढळून येईल. याला सरळ सरळ Fusion म्हणणं मला बरोबर वाटत नाही. कारण ज्या त्या ठिकाणी जो तो संगीत प्रकार आपले अस्तित्व राखून आहे!
एका बाजूला, पाश्चात्य संगीत प्रकारातील Hard rock प्रकारातील गिटार चे पार्श्वसंगीत उत्कंठा वर्धक आहे. संघर्ष, पाठलाग आणि पलायनाच्या वेळी त्याचा पुरेपूर आणि सुयोग्य वापर केलेला आहे. काही वेळा असे वाटले हे संगीत नसते तर? दुसऱ्या बाजूला कर्नाटकी संगीत प्रकार. यात भजने, लोकगीते येतात. लोकगीते केवळ पार्श्वसंगीत नसून कथानकाचाच भाग आहेत आणि विचारपूर्वक निवडलेली आहेत हे मी निश्चित सांगू शकतो. त्यांचा उद्देश लोकांना तालावर नाचवणे नसून, प्रसंगाबद्दल कथन आहे. वराह पूजन आणि कोला, किंवा उत्सवा दरम्यान वापरलेले संगीत मनात एक प्रकारचे दडपण निर्माण करते. कारण वराह विष्णू अवतार असला तरीही काहीसा अघोरी किंवा गडद शास्त्राकडे झुकणारे दैवत आहे! त्याची प्रचिती संगीत ऐकताना नक्कीच येईल.

चित्रपटात एक दोन गाणी आहेत. पण नेहमीप्रमाणे नाचगाण्याची अपेक्षा ठेवली तर अपेक्षाभंग होणार हे निश्चित! ही आणखीन एक आवडलेली गोष्ट. चित्रपटातील नॉर्मल गाणी, दिखावेपणासाठी किंवा नाचण्यासाठी वगैरे केलेले भडक प्रदर्शन नसून गोष्टीला सुसंगत असे पात्रांच्या मनःस्थितीचे वर्णन आहे. जे आजकालचे चित्रपट निर्माते विसरून गेलेले आहेत. ही गाणी कदाचित कोणाच्या लक्षात देखील राहणार नाहीत कारण लाक्षणिक अर्थाने ही गाणी नसून कथनेच आहेत.
एकंदरीतच संगीत आणि पार्श्वसंगीत उत्तम आहे. काही वेळा तर आपण आपल्याच हृदयाची धडधड जाणवू शकते अशी निष्पत्ति झालेली आढळेल. प्रत्येक सूरात, ठेक्यात मातीचे रंग आणि गंध आहेत ज्याला पाश्चिमात्य संगीताची जोड लाभलेली आहे!
छायाचित्रीकरण
खरं सांगायचं तर भारतीय चित्रपटात अशा प्रकारचे छायाचित्रण होऊ शकते यावर माझा विश्वासच बसला नाही! याचे संपूर्ण छायाचित्रकार म्हणून श्रेय अरविंद कश्यप ला आणि दिग्दर्शक म्हणून रिषभ शेट्टी ला दिले गेले पाहिजे. आधी म्हणल्याप्रमाणे कांतारा हे संपूर्ण visual storytelling आहे. प्रत्येक फ्रेम विचारपूर्वक आणि कथेला साजेशी मांडलेली आहे. कॅमेरा कोन आणि प्रकाशयोजना (Camera angles आणि lights) यांच्याशी तर निव्वळ खेळ केलेला आहे. प्रत्येक फ्रेम, छायाचित्रीकरणाच्या पुस्तकातील धडा असल्यासारखा आहे. एक दिग्दर्शक म्हणून मी हे निश्चित सांगू शकतो की दिग्दर्शकाच्या मनात काहीही असू द्या, जोपर्यंत तेवढ्या ताकदीचा छायाचित्रकार मिळत नाही तोपर्यत त्या कथेला चेहरा आणि चरित्र मिळत नाही.
छायाचित्रीकरणाचे दोन ठळक विभाग पाहू शकतो ज्यात. सामान्य माणसांचे आणि दैव किंवा दैवशी निगडित घटनांचे. दैव चे विक्राळ रूप दाखवण्यात अरविंद कश्यप ने यशस्वीरीतीने दाखवले आहे. Wide angles, close-ups, symmetry (सममिती), सावल्या आणि camera movement + focus यांचा एक वेगळाच खेळ (choreography) बघायला मिळते. जिथे घटनेची माहिती किंवा स्थापना करायची असेल तिथेच कॅमेरा स्थिर राहतो. इतर वेळी कॅमेरा सतत हलत राहतो. जिथे वेग किंवा उद्वेग आहे तिथे कॅमेरा आणि पात्रे दोन्हीही हलतात. त्यामुळे प्रेक्षकही त्या कॅमेराबरोबर प्रवास करू लागतात. Close-up म्हणजे वस्तू अथवा पात्राच्या जवळ कॅमेरा असण्याचा इतका मुक्तहस्त वापर विरळाच बघायला मिळतो. कदाचित यामुळेच चित्रपटातील अस्वस्थता, संघर्ष अधिक तीक्ष्ण बनतो. प्रेक्षकही अस्वस्थ होऊन जातो.

वाचकांच्या माहितीसाठी एक रोचक गोष्ट सांगावीशी वाटते. ती म्हणजे “डॉली झूम” चा वापर. आधी डॉली झूम म्हणजे काय ते अगदी थोडक्यात सांगतो. डॉली झूम म्हणजे, कॅमेरा वस्तूच्या जवळ किंवा दूर जात असतानाच कॅमेरा चा focus अशा प्रकारे करणे की पडद्यावर त्या वस्तूचे सापेक्ष आकारमान तितकेच राहील. कोणत्याही वस्तूला किंवा पात्राला त्याच्या पार्श्वभूमीपासून अलग करायचे असल्यास किंवा त्याच्या पार्श्वभूमीवर लक्ष वेधून घ्यायचे असेल तर हा effect वापरतात. कांतारा मध्ये अनेक ठिकाणी हा effect वापरला आहे. त्यामुळे शिवा आणि एक दोन वेळा इतर पात्रांच्या कथेच्या पार्श्वभूमीवर त्याक्षणी असलेल्या मानसिकतेवर लक्ष जाते! ज्यांना माहित आहे त्यांना हे जाणवेल पण नसेल माहित तरीही हे प्रसंग पडद्यावर आल्यावर तुम्हालाही ते वेगळे जाणवतील, जिथे पात्राचा चेहरा जवळ आल्यासारखा वाटेल पण तसे होणार नाही. केवळ त्याचे isolation होताना दिसेल.
अंधारातील छायाचित्रीकरण म्हणजे एक मोठे आव्हान आहे. मोठमोठ्या बजेटच्या बॉलिवूड चित्रपटात हे फार जास्त फसलेले दिसून येते. सध्या येणाऱ्या हिंदी किंवा मराठी चित्रपटात तर रात्रीचे छायाचित्रीकरण म्हणजे एक प्रकारचा विनोदच वाटतो. असो, तो मुद्दा वेगळा. रात्रीचे छायाचित्रीकरण आणि त्यात भासणारी प्रकाशाची आवश्यकता यांच्या दरीतून मार्ग शोधायचा असतो. अरविंद कश्यप ने अंधारात नैसर्गिक प्रकाश स्रोतांचा (सिनेमाच्या भाषेत natural lighting) केलेला वापर वाखाणण्याजोगा आहे. मशाल असो वा दिवटी, गाडीचे दिवे असो वा लोहाराचा भाता! कदाचित यामुळेच रात्रीचे किंवा अंधारातले छायाचित्रीकरण कुठेही “खोटे” वाटत नाही.


Frames आणि formations मध्ये दिग्दर्शक, cinematographer इत्यादींचे योगदान महत्वाचे असते. कांतारा मध्ये नाटकातील formations नकळतपणे वापरले आहेत. दृक माध्यमात हे महत्वाचे आहे. कधी शिवा गावापासून दूर आहे, कधी तो गावात मिसळतो, कधी तो गावाचे प्रतिनिधित्व करतो हे पाहिल्यावर लक्षात येईल की जाणीवपूर्वक या गोष्टी पडद्यावर मांडल्या गेल्या आहेत. इथे शेवटी दैव देखील महत्त्वाचा भाग बनतो. शेवटी दैव जेव्हा “समतोल” आणि “सामोपचार” दीक्षा देतो तेव्हा ते संपूर्णपणे या formations वर दाखवले आहे. ही भाषा दृकभाषा (Visual language) असल्याने कुणालाही अर्थ लक्षात येऊ शकतो. Special effects आहेत पण ते अननुभवी डोळ्यांना जाणवणार पण नाहीत! वराह साठी हे गरजेचं होतं पण तिथेही उत्तम काम केलेले आढळेल. गंमत म्हणून.. जंगलात फिरताना हातात घेतलेल्या मशालींकडे नीट लक्ष द्या.

एकुणच कांतारा चे छायाचित्रीकरण जगातील कुठल्याही उत्तम चित्रपटांच्या तोडीचे आहे हे मी निश्चितपणे सांगू शकतो. प्रेक्षक म्हणून तुम्ही आपल्याबरोबर काही फ्रेम्स आयुष्यभरासाठी घरी घेऊन जाल!
“कांतारा” आणि आपण

मी स्वतःला नशीबवान समजतो की भारतात, नाचगाणी, उथळ विषय, भडक अंगप्रदर्शन, अनाकलनीय पातळीवर जाऊन पोहोचलेले हास्यास्पद VFX effects आणि भारतीय संस्कृतीची विटंबना यांच्या भाऊगर्दीत अशा प्रकारचा चित्रपट बनला. कांतारा मध्ये माझ्यामते भारतीय संस्कृतीला मारक एकही विचार नाही, मांडणी नाही. उलट भारतीय परंपरा आणि संस्कार यांचा पुरस्कार आहे. दुर्दैवाने भारतात भारताच्या परंपरांबद्दल अनास्थेला कांतारा एक सणसणीत उत्तर आहे! पाश्चात्य भौतिक सुखाच्या वाटेवर घेऊन जाणारे शिक्षण आपल्याला आपल्याच मुळांपासून दूर नेत आहे. हा विचार देखील प्रेक्षकांच्या मनात येणार आल्यावाचून राहणार नाही. आणखीन एक जमेची बाजू म्हणजे संबंध चित्रपटात कुठेही विनाकारण समाजवाद, साम्यवाद आणि नक्षलवादी विचारसरणी डोकावत नाही. जातींमधील भेदभावाबद्दल योग्य भाष्य आहे, ज्या भेदभावाचे उच्चाटन गरजेचे आहे. समन्वय, समतोल, सामोपचार आणि एकमेकांच्या सीमारेषांचा आदर हाच “दैव – संदेश” आहे.
आता माझ्या मनातील प्रश्न असा की, आपल्याकडे म्हणजे मराठीत असे चित्रपट होऊ शकतील का? याचे उत्तर वाचकांनी comments मध्ये द्यावे अशी अपेक्षा करतो आणि माझे लेखन थांबवतो. लिहिण्यासारखे, बोलण्यासारखे खूप काही आहे. कांतारा ने मला एक लेखक, निर्माता म्हणून एक वेगळी दिशा दाखवली आहे. प्रेक्षकांनाही बघण्याची एक वेगळी दिशा लाभली असेल यावर विश्वास ठेवतो.. 🙏🏻
One thought on ““कांतारा” एका अविस्मरणीय कलाकृतीचा अनुभव”