आग्र्याला नजर कैद होण्याआधी एक महत्वाची घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडली ती म्हणजे, दिल्ली दरबारात छत्रपती आणि औरंगजेब यांच्यात झालेली आमने-सामने. आजवर इतिहासाच्या पुस्तकात आपण या भेटींदरम्यान काय झाले? यांचे वर्णन वाचलेले आहे.
या ब्लॉगमध्ये मराठी वाचकांना काहीसे अपरिचित स्कॉटिश इतिहासकार “जेम्स डग्लस” यांनी, छत्रपतींच्या दिल्ली दरबारातील भेटीचे केलेले वर्णन वाचूया.
(सदर उतारा, जेम्स डग्लस यांच्या “बॉम्बे अँड वेस्टर्न वर्ल्ड” या पुस्तकातील इंग्रजी उताऱ्याचा मराठी अनुवाद आहे).
“छत्रपती शिवाजी महाराजांचे १६६६ साली दिल्लीच्या दरबारात झालेले आगमन ही एक दिव्य घटना होती. तशी घटना फक्त एकदाच घडली, त्यानंतर कधीच असं काही घडलं नाही – एकमेवाद्वितीय. सगळे कवी, चित्रकार, कलाकार कुठे आहेत? ज्यांनी त्या क्षणांना पुनरुज्जीवित केलं असत, त्या क्षणांना अमर केलं असतं. ज्या क्षणांमध्ये, त्या काळाचे सटीक दर्शन घडत होते, खोलवर जाणारी करुणा – दुःख दिसत होते, अत्युच्च महत्वाकांक्षा दिसत होत्या, दृष्य – अदृष्य शोकांतिकांचे रंग दिसत होते, मृत्युएवढे शाश्वत आणि दृढ प्रेम व स्नेह आणि कबरीएवढा क्रूर दुःस्वास एकाच वेळी दिसत येत होते, आणि या सगळ्या भावना, हे सगळे रंग एखाद्या प्रचंड वजनदार थप्पीप्रमाणे एकत्र आले होते जणू काही एखाद्या महान जादूगाराची प्रतीक्षा करत आहेत. स्कॉट (१९ व्या शतकातील एक प्रसिद्ध चित्रकार) इथे असता तर त्याने या सगळ्या घटनांवर, लोकांवर ताबडतोब काम सुरू केले असते आणि जोवर छत्रपती शिवाजी महाराज या दिल्लीच्या दरबारात आहेत तोपर्यंत आपल्या संबंध ताकदीनिशी, आपल्या भात्यातील सर्व रंग वापरून, या सर्व व्यक्तींची आणि घटनांची चित्रे रेखाटून, भारताचा हा आकर्षक इतिहास लोकांपुढे मांडला असता!”.
पुढे जेम्स डग्लस यांनी १८८३ साली लिहिलेल्या आपल्या “अ बुक ऑफ बॉम्बे” या पुस्तकात छत्रपतींच्या आग्र्याहून सुटकेचे, त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे, धैर्याचे आणि शारिरीक सहनशक्तीचे वर्णन काही अशा प्रकारे केलेले आहे. (सदर उतारा हा पुस्तकातील उताऱ्याचा मराठी अनुवाद आहे)
“छत्रपती शिवाजी महाराजांची सहनशक्ती हे एक फार मोठे रहस्यच आहे. याचा परिचय त्यांच्या आग्र्याहून (लेखात दिल्लीहून लिहिलेले आहे) सुटकेवरून येतो. आग्र्याहून सुटले, तिथून अलाहाबादला पोहोचले. त्यांच्याबरोबर त्यांचा ९ वर्षांचा मुलगा (छत्रपती संभाजी महाराज) देखील होता, जो जवळजवळ पहिल्यांदाच दख्खनी टट्टुवर (घोड्यावर) स्वार झाला होता. आधी त्या दोघांनी घोड्यावर प्रवास केला. नंतर फकिराच्या वेषात पायी चालले. चेहऱ्यावर प्रवासाची धूळ उडत होती. नदी – नाल्यांमधून वाट काढत होते. मुघल साम्राज्याच्या अति शीघ्र आणि वेगवान खबऱ्यांना देखील लीलया पछाडत होते. छत्रपती शिवाजी महाराज हा प्रवास, मान्सूनच्या पावसात आणि अलाहाबाद ते बनारसच्या,बनारस ते गया, गया ते कटक, कटक ते हैदराबाद या मार्गातील घनदाट जंगलातून करत होते.”
परदेशी इतिहासकारांना देखील, छत्रपती शिवाजी महाराजांचे तेज, असामान्य धैर्य – शौर्य यांचे कौतुक करण्याचा मोह आवरता आलेले नाही हे निश्चित !
“छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका” – ब्लॉग मालिका