डावे – उजवे कुठून आले?
आजकाल राजकारणाचा अभ्यास करणारे, कार्यकर्त्यांना, पक्षांना, विचारवंतांना अगदी सहजपणे डावे – उजवे (Left Wing – Right Wing किंवा Liberals – Conservatives) म्हणतात. पण, फार कमी लोकांना माहित आहे की हे डावे – उजवे कुठून आले? त्यांचा इतिहास काय आहे? या संकल्पनांचा विचारधारणेशी कमी आणि बसण्याच्या जागेशी संबंध आहे हे फारसं कुणाला माहित नसतं! पण, या संकल्पना एका दिवसात रूढ झालेल्या नाहीत. त्या रुळण्यासाठी कैक दशकांचा कालावधी लागला. डावे – उजवे या संकल्पनांचा उद्गम शोधायचा असेल तर फ्रेंच राज्यक्रांतीच्या इतिहासाची पाने धुंडाळावी लागतील.
साल १७८९.. फ्रेंच राज्यक्रांती आपल्या उद्दिष्टांच्या जवळ येऊन ठेपली होती. नवीन आणि सुधारित “फ्रेंच संविधान” बनवण्याची मागणी जोर धरू लागली. जुलै १७८९ मध्ये राष्ट्रीय संविधान सभा (National Constitutive Assembly) भरली. मुख्य प्रश्न होते “संविधानाची मूळ तत्वे कशी आणि कुठली असावी? तसेच फ्रेंच राजा ‘किंग लुई २६वा’ कडे किती अधिकार असावेत? राजाकडे निषेधाधिकार (veto power) असावी का? असलीच तर राजा कुणाला उत्तरदायी असेल का? आणि हा अधिकार किती काळापर्यंत लागू राहील?”
शेवटच्या प्रश्नावर म्हणजे राजाकडे किती आणि कुठले अधिकार असावेत? वर सभा विभागली गेली. परस्परविरोधी मते असलेले दोन पडले. एका गटाच्या म्हणण्यानुसार ‘राजाकडे संपूर्ण निषेधाधिकार असायला हवा’ आणि दुसऱ्या गटाच्या म्हणण्यानुसार ‘राजाकडे निषेधाधिकार मुळीच असता कामा नये’. पहिला गट काहीसा ख्रिश्चन धर्माच्या शिकवणींनी प्रेरित होता, रूढीवादी होता आणि राजाला कुटुंबप्रमुख मानणारा होता. दुसरा गट नवीन विचारांचा होता, रूढिवादाचा विरोधी होता.
हे दोन्ही गट आपापल्या मतावर ठाम होते आणि त्यासाठी वादविवाद करायला तयार होते! हे मतांतर इतके तीव्र होते की दोन गटांचे लोक एकमेकांबरोबर बसायला देखील तयार नव्हते. सभा खरोखरीच विभागली गेली!
त्यामुळे झालं असं की, पहिला गट जो राजाच्या बाजूने आणि रूढीवादी होता, त्याने सभापतींच्या उजव्या हाताला बसणं पसंत केलं. काही इतिहासकार याचं मूळ ख्रिश्चन इतिहासात असल्याचं मानतात, ज्यातील मान्यतेनुसार “देव किंवा कुटुंबप्रमुखाच्या उजव्या हाताला बसणे ही मानाची आणि पुण्याची बाब आहे”. नैसर्गिकरित्या दुसरा गट सभापतींच्या डाव्या हाताला बसला. आणि एक परंपरा उदयाला आली “डावे – उजवे” नावाची!
परंपरा
इथून पुढच्या प्रत्येक सभेला, राजाच्या बाजूने मत असणारे आणि रूढीवादी नेते सभापतींच्या उजव्या बाजूला बसू लागले आणि, त्यांचा विरोध करणारे सभापतींच्या डाव्या बाजूला. बरीच वर्षे फक्त फ्रान्स मध्येच ही परंपरा रूढ होती, पाळली जात होती. वर्तमानपत्रे गटांची किंवा नेत्यांची नावे छापण्याबरोबर त्यांच्यामागे ‘डावे – उजवे नेते’ अशी बिरुदावली लावू लागले. नेपोलियन बोनापार्टच्या काळात ही विभागणी जरा विरळ झाली पण Bourbon Restoration म्हणजे १८१४ नंतर पुन्हा एकदा सभेमध्ये डावे आणि उजवे आपापल्या जागांमध्ये बसू लागले.
१९ व्या शतकात इतर देशांच्या सभांमध्ये देखील डावे – उजवे विचारसरणी असणारे गट निर्माण होऊ लागले. त्यात रशियन राज्यक्रांतीच्या दरम्यान रशियन सभांमध्ये देखील हा फरक दिसू लागला. फ्रान्स मध्ये नेते आणि पक्ष देखील स्वतःला ‘डावे – उजवे’ संबोधू लागले, इतकंच काय अति-डावे (Extreme Left), मध्य-डावे (Centre Left), मध्य-उजवे (Centre Right) आणि अति-उजवे (Extreme Right) देखील संबोधू लागले!
२० व्या शतकात या संकल्पना इंग्लंड, कॅनडा आणि अमेरिकेत पोहोचल्या. तेव्हा आधीपासून एकमेकांविरोधात मत असणारे गटस्वतःला ‘डावे – उजवे’ संबोधू लागले. कॅथोलिक धर्म, धार्मिक विचारांच्या बाजूने असणारे स्वतःला उजवे आणि चर्च व संविधान यांना विभक्त करण्याचे मत असणारे स्वतःला डावे संबोधू लागले. सरतेशेवटी ‘डावे – उजवे’ या बसण्याच्या जागा न उरता विचारसरणी म्हणून रूढ झाल्या.
आज बहुतेक सर्व लोकशाहींमध्ये हेच मुख्य गट आहेत ‘डावे – उजवे’!
तर हा होता ‘डावे – उजवे’ यांचा इतिहास. आवडल्यास नक्की शेअर करा.. शब्दयात्री व्हा!
इतिहासावरील इतर ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा..