शब्द आणि त्यांचा इतिहास, हा एक अत्यंत रोचक आणि मनोरंजक छंद आहे. या छंदाची जोपासणी करताना कधी काय सापडेल याचा काही नेम नाही? यातच भारत इतिहास संशोधक मंडळातील काही कागदपत्रे वाचत असताना “चौधरी” या शब्दाच्या व्युत्पत्तिबद्दल माहिती समोर आली. वि. का. राजवाडे यांच्या एका लघुलेखात ही माहिती दिलेली आहे. अजूनही काही स्रोतांच्या मार्फत ही माहिती सत्य असल्याचं आपण खात्रीने सांगू शकतो.
चौधरी या शब्दाचा साधारण अर्थ जवळपास सगळ्यांना माहित आहे. ब्रिटिशांच्या काळात चौधरी हुद्दा न राहता अनेक वेळा जात म्हणून सुद्धा वापरला जाऊ लागला. पण त्या शब्दाचा इतिहास वाचल्यावर मूळ अर्थ आणि इतिहास आणखीन उत्तम प्रकारे लक्षात येतो.
चौधरी या शब्दाचे मूळ, संस्कृत शब्द “चक्रधारी” या शब्दात आहे.
चक्रधर म्हणजे चक्र + धारी. संस्कृतमध्ये चक्र या शब्दाचा एक अर्थ चार गावांचा समूह किंवा नुसताच गावांचा समूह किंवा एखादे क्षेत्र, राज्य, घेरा इत्यादी. धारी म्हणजे पालनकर्ता, पालक इत्यादी. त्यामुळे एखाद्या गावांच्या समूहाचा किंवा क्षेत्राचा पालनकर्ता या अर्थाने “चक्रधारी” हा शब्द आला. पुढे चक्रधारी या शब्दाचे अपभ्रंश होत होत शेवटी चौधरी या शब्दाची निर्मिती झाली. या अपभ्रंशांबद्दल दोन प्रमाद आहेत
चक्रधारी -> चकरधारी -> चअरधारी -> चवधारी -> चौधरी
किंवा
चक्रधारी -> चक्कधारी -> चव्वधारी -> चौधारी -> चौधरी
अपभ्रंशांची शृंखला कोणतीही असली तरीही अभ्यासकांचे यावर एकमत आहे की चौधरी या शब्दाचे मूळ चक्रधारी या शब्दात आहे.
अपेक्षा आहे की तुम्हाला ही माहिती रोचक आणि माहितीपर वाटली असेल. आवडल्यास नक्की शेअर करा!