आफ्रिकन चित्ता आणि भारतीय वाघ
भारतात खरं तर पट्टेरी वाघ आणि बिबटे हेच जंगली मार्जार मानले जातात. पण पूर्वी भारतात चित्ते देखील होते हे कधीकधी आठवत नाही. गेले काही दिवस आफ्रिकेतून भारतात आणलेल्या चित्त्यांबद्दल भरपूर चर्चा सुरु आहे. माझ्या मते हे एक चांगले पाऊल आहे. माणसाच्या रक्तपिपासू छंदापायी हा उमदा प्राणी भारतातून विलुप्त झाला. भारतात जर पुन्हा त्याचे आगमन होणार असेल आणि पुन्हा एकदा हा अति वेगवान आणि सुंदर प्राणी स्वतःचे घर बनवू शकणार असेल, तर हा प्रयोग यशस्वी झाला असं समजलं जाईल. भारताच्या जैवविविधतेच्या मुकुटातील एक हरवलेला मणी पुन्हा विराजमान होईल.

हे सगळं चालू असताना अनेक जणांना हा निर्णय पटलेला नाहीये पण, त्याची करणे राजकीय आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल इथे वाच्यता करण्यात अर्थ नाही. अंटार्क्टिकातील जीवांना सगळ्या उपाययोजनांसकट जर भारतात आणले जाऊ शकते तर उष्णकटिबंधीय आणि शुष्क आफ्रिकन प्रदेशातील प्राणी तशाच प्रकारच्या भारतीय वनात का आणले जाऊ शकत नाहीत? असो, हे मुद्दे आपण त्यांच्यावर चर्चा करणाऱ्यांवर सोडून देऊ. पण एक मुद्दा जो ही बातमी वाचल्यानंतर माझ्या मनात आला तो म्हणजे “हे आफ्रिकेतील चित्ते भारतीय उपखंडात, भारतीय वनांत आणि वातावरणात राहू शकतील का?” वन्यजीव आणि वन्यजीवन यांच्याशी थोडा फार संबंध आल्याने हा प्रश्न माझ्या मनात आहे. अजूनही आहे आणि काही वर्षे उलटल्याशिवाय या प्रश्नाचे निश्चित उत्तर मिळू शकेल असे वाटत नाही.
सायबेरियन वाघ भारतात
हे सगळे विचार मनात येत असताना, अनेक वर्षांपूर्वी वाचलेली एक अजब आणि रोचक कहाणी आठवली. ही कहाणी आहे इंग्लंडमधल्या एका प्राणिसंग्रहात जन्माला येऊन वाढलेल्या एका सायबेरियन वाघिणीची “तारा” ची! ताराला एका विशिष्ट उद्देशाने भारतातील जंगलात सोडून देण्यात आले.
या कहाणीची सुरुवात होते १५ ऑगस्ट १९१७ रोजी गोरखपूर येथे. या दिवशी कुंवर “बिली” अर्जन सिंग यांचा, कपूरथला येथील अहलुवालिया राजघराण्यात जन्म झाला. राजघराण्यात वाढलेल्या बिली अर्जन सिंग यांना शिकारीची प्रचंड आवड होती. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर “मी स्वतःला शिकारी म्हणणार नाही. कारण शिकाऱ्यांचेही काही नियम असतात. माझ्या रक्तपिपासू हिंसक वृत्तीची व्याप्ती ही होती की, जो सजीव हलू शकतो त्याची शिकार करायचो. शेवटी मी १९६० च्या दरम्यान शिकार करणे थांबवले. आणि शेवटी मी वन्यजीव संवर्धनाच्या कार्याला स्वतःला वाहून घेतले.”

काळ १९७० च्या दरम्यानचा होता. स्वतंत्र भारतात वन्यजीव संवर्धनासाठी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या देखरेखेखाली अनेक उपक्रम हाती घेतले जात होते. अनेक नवे प्रकल्प सरकारद्वारे चालवणे सुरु झाले होते. वेगवेगळे विचार, तंत्रज्ञान आणि प्रबोधन यांच्यावर संशोधन केले जात होते. तरीही भारतासाठी, भारतीय समाज आणि व्यवस्थेसाठी वन्यजीव संवर्धन हा एक अनोळखी मुद्दा होता. त्याच काळात बिली अर्जन सिंग यांनी, वन्यजीव संवर्धनाची प्रतिज्ञा घेतली. उत्तरप्रदेश मधील तेराई गावाच्या जवळ त्यांनी एक शेत विकत घेतले आणि शेती करू लागले आणि तिथेच राहू लागले. त्या फार्मचेअर्जन सिंग यांनी “टायगर हेवन” असे नामकरण केले. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना वन्यजीवांपासून दूर जावे लागू नये. कारण तेराई, उत्तर प्रदेशमधील प्रसिद्ध “दुधवा” जंगलाच्या सीमेवर आहे.

वन्यसंवर्धन कार्य
बिली अर्जन सिँग यांचे सगळ्यात पहिले वन्यजीव संवर्धनकार्य म्हणजे तेथीलच “घोला” जंगलातील खालावलेली बारासिंगा हरिणांची संख्या. त्यांनी आजूबाजूच्या प्रदेशात संशोधन करून बारासिंगांची योग्य संख्या शोधून काढली. तेव्हा लक्षात आलं की बारासिंगांचा या जंगलातील सरकारी संख्या जरी १५०० होती तरी प्रत्यक्षात तेथे फक्त ६०० च बारासिंगा उरलेले होते. सरकारदरबारी पाठपुरावा करून अखेरीस “दुधवा” जंगलाला अभयारण्याचा दर्जा मिळवला. त्याचप्रमाणे किशनपूर येथे देखील अभयारण्याची स्थापना करण्यात मोलाचा वाटा उचलला.

आणि इथून पुढे अर्जन सिंग यांच्या या कहाणीला एक वेगळे वळण येते. दुधवा अभयारण्यात आणखी एका वन्यप्राण्यांची संख्या अत्यंत धोकादायक पातळीवर खालावलेली होती. ती म्हणजे “पट्टेरी वाघ”. सरकार दरबारी ही संख्या १०४ सांगितली जात होती आणि प्रत्यक्षात दुधवा अभयारण्यात जेमतेम २० वाघ शिल्लक राहिलेले होते. तिथे त्यांचे प्रशासनाशी देखील खटके उडाले. कारण, सरकारी अधिकारी फक्त स्वतःची फाईल जपण्यात गुंतलेले होते आणि अर्जन सिंग वाघांना वाचवण्याच्या प्रयत्नात होते! त्यांनी त्याकाळच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना देखील विनंती केली. शेवटी अर्जन सिंग यांच्या प्रयत्नांना यश देखील आले. १९८८ मध्ये दुधवा अभयारण्य हे व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले.

सायबेरियन “तारा”ची कहाणी
पण, केवळ अभयारण्य स्थापित करून किंवा व्याघ्रप्रकल्प स्थापित करून वाघांची संख्या वाढवता येईल याविषयी अर्जन सिंग साशंक होते. तेव्हा त्यांनी जुलै १९७६ मध्ये, इंग्लंडमधील ट्वाईक्रॉस प्राणिसंग्रहालयात जन्माला आलेल्या इंडो-सायबेरियन मादा बछड्याला भारतात घेऊन आले. तिचे पालनपोषण त्यांनी आपल्या तेराई येथील आपल्या “टायगर हेवन” मध्ये केले. आणि कालांतराने तिला दुधवाच्या जंगलात सोडून दिले. त्यांनी हे पाऊल श्रीमती इंदिरा गांधी यांच्या सहमतीने घेतलेले होते. त्यामुळे अर्जन सिंग यांच्या उद्देशांवर शंका उपस्थित करणं चुकीचं ठरेल. पुढे जाऊन ताराने एकूण नऊ पिलांना जन्म दिला.
हे निश्चित होतं की त्या सगळ्या बछड्यांचे वडील, भारतीय पट्टेरी वाघ होते. तेव्हापासून वन्यजीव प्रेमींना, संशोधकांना सायबेरियन वाघाची चिन्हे, खुणा असलेले वाघ या दुधवा व्याघ्र प्रकल्पात दिसत आहेत. ते सगळे या ना त्या नात्याने ताराशी निगडीत आहेत. १९९७ साली दोन वाघांचे केस DNA परीक्षणासाठी पाठवण्यात आले होते. त्या केसांच्या DNA परीक्षणातून हे निष्पन्न झाले की या वाघांच्या DNA मधील आईकडील गुणसूत्रे सायबेरियन वाघाची आहेत.

वादाचा मुद्दा इथे आहे. अनेक अभ्यासकांचे म्हणणे आहे की सायबेरियन वाघांचे गुणधर्म आणि भारतीय वाघांचे गुणधर्म वेगळे आहेत. दुधवात तारामुळे आंतर-पोटप्रजाती प्रजनन झाल्याने जनुक – पुल (Gene pool) भेसळयुक्त होत आहे असे त्यांचे म्हणणे आहे. त्याला त्यांनी जनुकीय प्रदूषण (Genetic Pollusion) या भेसळीमुळे भारतीय वाघांच्या पोटप्रजातीचे नुकसान होणार आहे, असे देखील टीकाकार म्हणतात. या गोष्टींमुळे बिली अर्जन सिंग यांच्यावर कडाडून टीका झाली.
या टीकेमुळे अर्जन सिंग यांच्याबद्दल लोकांमध्ये गैरसमज तर पसरलेच. पण, ताराबद्दल त्याच्याहून जास्त गैरसमज पसरले. त्यातील सगळ्यात घटक गैरसमज आणि अपप्रचार म्हणजे, “तारा एक नरभक्षी वाघीण आहे”. ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली आणि लोक जणू तिच्या जीवावरच उठले. दुधवाच्या आजूबाजूच्या प्रदेशातून नरभक्षी वाघांच्या बातम्या येत होत्या. तेव्हा सरकारने या नरभक्षी वाघांना मारण्याचे देखील प्रयत्न केले. काळजी पोटी अर्जन सिंग, या प्रत्येक नरभक्षी वाघांना पकडण्याच्या मोहिमेत बरोबर जाऊ लागले. त्यांच्या मनात एकच भीती होती की, ज्या नरभक्षक वाघाला आज पकडायचे आहे ती तारा नसावी! आणि झालंही तसंच. एकही नरभक्षक बघत आणि तारामध्ये काहीही साम्य नव्हतं, किंवा तिच्या कोणत्याही पिलांपैकी ते वाघ नव्हते.

अशी त्या परदेशी ताराची कहाणी! पण पिक्चरअभी बाकी है..
अर्जन सिंग यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी ताराला सगळ्यात शेवटी १९९२ मध्ये पहिले होते आणि त्यानंतर त्यांना ती कधीही दिसली नाही! अर्थातच अर्जन सिंग यांना वाईट वाटलं होतं पण १९९५ मध्ये त्यांना दुधवाच्या जंगलात एक उमदा नर वाघ दिसला ज्याच्या शरीरावर सायबेरियन वाघासारख्या खुणा आणि रंग होते. अर्जन सिंग यांनी लगेचच ओळखले की हा नक्कीच ताराचा वंशज असणार! त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आपल्या अंदाजाची शहानिशा करण्यासाठी त्यांनी त्या वाघाचे केस DNA चाचणीला पाठवले. आणि चाचणीत हे निष्पन्न झालं की या वाघाच्या DNA मध्ये सायबेरियन वाघाची जनुके आहेत! अर्जन सिंग यांचे स्वप्न साकार झालेले होते. एव्हाना दुधवा परिसरामधील वाघांची संख्या वाढलेली होती. त्यांना १९९५ साली भारत सरकार कडून पद्मश्री, १९९६ मध्ये वर्ल्ड वाईल्ड लाईफ गोल्ड मेडल, १९९७ मध्ये ऑर्डर ऑफ गोल्डन आर्क असे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. २००६ मध्ये त्यांचा भारत सरकारने पदं भूषण पुरस्कार देऊन सन्मान केला.
१ जानेवारी २०१० साली बिली अर्जन सिंग यांचे त्यांच्याच टायगर हेवन या फार्म हाऊस मध्ये निधन झाले.. त्यांच्या कर्मभूमीत!
तारा कुठे गेली? कुणालाही माहित नाही पण अजूनही तिचा वंश दुधवा मध्ये टिकून आहे.

तर ही होती एका परदेशी वाघाची कहाणी. कहाणी कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असल्यास इतरांना देखील पाठवा!
Useful information
Thank you !