छत्रपती शिवाजी महाराज यांचा आग्रा ते राजगड हा प्रवास अद्भुत आहे. शिवाजी महाराज, त्यांचे सहकारी आणि त्यांना या प्रवासात मदत करणारे लोक या सगळ्यांनी हा इतिहास रचला. आपल्या पुढच्या पिढ्यांना हा इतिहास माहित असला पाहिजे. त्यासाठी हा प्रपंच.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आग्रा ते राजगड प्रवास
आग्र्याच्या नजरकैदेतून सुटून शिवाजी महाराज अनेक गावे, राज्ये आणि वने पादाक्रांत करत शेवटी राजगडला पोहोचले. या प्रवासाबद्दल अनेक इतिहासकारांनी लिहून ठेवलेले आहे. ते सगळे उल्लेख, इतिहास, किस्से आणि छत्रपती ज्या मार्गाने राजगडला पोहोचले तो मार्ग या ब्लॉग मध्ये एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्रा ते राजगड प्रवासातील टप्पे
आम्ही अनेक पत्रव्यवहार आणि पुराव्यांवरून खालील नकाशा तयार केला आहे.
संदर्भांची यादी
- Scott’s History of Deccan Vol II
- Bombay and Western India – James Douglas
- Western India – James Douglas
- Rairi Bakhar
- सभासद बखर
- औरंगजेबाच्या दरबारचे अखबार
- New History of Marathas Vol 1, रियासतकार सरदेसाई
- The Deliverance or the Escapeof Shivaji the Great from Agra – राव साहेब देशपांडे
- History of Sivagy – Jean de Thevenot
या नकाशात महाराज आणि त्यांचे साथीदार ज्या ज्या ठिकाणी गेल्याचे पुरावे आहेत त्यांची अनुक्रमिक (Sequential) यादी.
रोचक इतिहास, वर्णने आणि किस्से
छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज संभाजी महाराज नजकैदेतून सुटून गेले आहेत हे दुसऱ्या दिवशी समजलं!
छत्रपतींची योजना इतकी उत्तम होती की महालातून पसार झाल्यावर जवळजवळ १२-१५ तास या योजनेचा पत्ता लागला नाही. फौलाद खान, गाफील होता आणि दुपारी महालात गेला तेव्हा समजलं की महाराज आणि युवराज पसार झालेले आहेत! याचा पुरावा औरंगजेबाच्या दरबारच्या अखबारातील या नोंदीतून मिळतो.
आणखी एक महत्वाची बाब अशी की औरंगजेबाने महाराजांना आग्र्याच्या किल्ल्याच्या क्रूर सरदार रद् अंदाज खान याच्या, फिदाई हुसेन या एका नव्या महालात रदबदली करण्याचे ठरवले होते आणि तो बदल १८ ऑगस्ट तारखेला होणार होता. पण महाराजांना आणि राम सिंग (मिर्झा राजे जय सिंग यांचे पुत्र) आधीच खबर मिळाली होती की, औरंगजेबाने महाराजांना या नवीन महालात जीवे मारण्याची योजना आखली गेली होती.
(संदर्भ: New History of Marathas Vol 1, रियासतकार सरदेसाई)
महाराजांचा दूरदर्शीपणा आणि व्यूहचातुर्य
आग्ऱ्यातून निसटल्यानंतर महाराज, युवराज आणि त्यांचे विश्वासू साथीदार निराजी रावजी, बाळाजी आवजी चिटणीस आणि तानाजी मालुसरे, यमुनेच्या काठी गेले. एका नावाड्याला गाठून यमुना पार केली. पैसे दिले आणि नावाड्याला हे देखील सांगितले की “जर कोणी विचारलेच तर सांग की शिवाजी महाराज यमुना पार करून दक्षिणेला गेले”.
पण ही एक योजना होती, एक व्यूह होता! छत्रपती अत्यंत दूरदर्शी होते. त्यांना माहित होते की ही माहिती मिळताच औरंगजेब आपले सैन्य शोधासाठी दक्षिणेला पाठवेल. त्यामुळे आधीच नावाडी निघून गेल्यावर, छत्रपतींनी आणखीन एका नावाड्याला गाठून पुन्हा एकदा यमुना पार केली व उत्तरेला मथुरेच्या दिशेने गेले. महाराजांचा अंदाज खरा ठरला. काही काळ औरंगजेबाचे सैन्य दक्षिणेला गेले आणि महाराजांना मथुरेला सुखरूप पोहोचता आले आणि पुढच्या प्रवासाच्या योजनेसाठी वेळ मिळाला. महाराज, युवराज आणि त्यांच्या साथीदारांनी हा प्रवास ६ तासात पूर्ण केला.
(संदर्भ: The Deliverance or the Escape of Shivaji the Great from Agra – राव साहेब देशपांडे)
महाराजांनी गोसावीचा वेष घेतला
मथुरा येथे पोहोचल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढील प्रवासात त्यांच्या नेहमीच्या वेषात प्रवास करता येणार नाही हे ओळखलं. तेव्हा आपल्या साथीदारांशी सल्ला मसलत केल्यावर महाराजांनी पुढील प्रवास गोसावींच्या वेषात करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी घडलेली एक घटना फार रोचक आहे.
झालं असं की, मथुरेला पोहोचल्यावर महाराजांनी वपन केले, एकतारी घेतली, कानातली कुंडले बदलली आणि गोसाव्यांची भगवी वस्त्रे घेतली. त्यांच्या साथीदारांनी देखील तोच वेष घेतला. महाराज यमुनेच्या तीरावर गेले आणि यमुनेत स्नान करून झाल्यावर आपल्या साथीदारांना म्हणाले
“या घाटांच्या दुरावस्थेकडे बघून असे दिसते की यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. इथे कुठल्याच प्रकारची सुविधा नाही!”
हे उद्गार ऐकल्यावर एक पुजारी/महंत महाराजांना उद्देशून म्हणाले की
“बहुदा तुम्ही खरे गोसावी नाही. खरे गोसावी तर सन्यासी असतात. ते असल्या भौतिक गोष्टींकडे आणि सुखसुविधांकडे लक्ष देत नाहीत”
महाराजांच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. तेव्हाच निराजीपंतांनी पुजाऱ्यांच्या कानात काहीतरी सांगितलं. कृष्णाजी पंतांनी देखील त्यांना समजावले. पुजारी समजायचं ते समजले व त्यांनी महाराजांची क्षमा मागितली आणि पुढील प्रवासासाठी आशीर्वाद देखील दिला. महाराजांनी त्या पुजाऱ्यांना मथुरा तीर्थक्षेत्री आपल्या कुटुंबाचे प्रतिनिधी म्हणून नेमले!
मथुरेहून जवळजवळ ४०-५० सहकारी गोसाव्यांचा वेष घेऊन महाराजांबरोबर पुढील प्रवासाला निघाले. त्यावेळी युवराज संभाजी महाराज यांना मथुरेसच राहू दिले.
(संदर्भ: The Deliverance or the Escape of Shivaji the Great from Agra – राव साहेब देशपांडे)
नरवर (उत्तर प्रदेश) मध्ये महाराज थोडक्यात निसटले
औरंगजेबाने एक मोठी चूक केली आणि त्या चुकीचा महाराजांनी पुरेपूर फायदा उठवला. तो कसा ते पाहू.
History of Sivagy मध्ये Jean de Thevenot म्हणतो की जेव्हा कूटनीती म्हणून, शिवाजी महाराजांनी, औरंगझेबाच्या अमलाखाली कंदाहार ला शासक सरदार म्हणून जायला सहमती दिली तेव्हा त्यांना येण्या जाण्यासाठी तकलिफ होऊ नये म्हणून, औरंगझेबाने त्यांच्यासाठी येण्याजाण्याची व्यवस्था म्हणून हा परवाना बनवून घेतला होता.
या परवान्याचा आणखीन एक दाखल इतिहासकार देतात तो असा,
छत्रपतींनी जेव्हा गरजू मंडळींना दानधर्म करायला सुरूवात केली तेव्हा अनेक ठिकाणचे अनेक लोक महाराजांना भेटायला येऊ लागले. या लोकांना मुघल सीमेत प्रवेश मिळावा यासाठी एक सरकारी शिक्याचा परवाना मिळत असे. (आजकालच्या भाषेत सांगायचं झालं तर व्हिसा) आणि त्या परवान्याच्या जोरावर महाराज प्रयागराज जवळील नरवर भागातून एका चौकशी चौकीतून साफ निसटले.
याचा पुरावा औरंगजेबाच्या दरबारच्या अखबारातील खालील उल्लेखातून मिळतो.
एका चौकीवर महाराज आणि इतर साथीदारांना अडवले गेले होते पण गनिमी काव्याने महाराजांनी स्वतःला आपण शिवाजी महाराजांचे लोक आहोत सांगून तो परवाना दाखवला आणि तिथून निसटले. मुघल सरदार आणि चौकीदार गाफील राहिले त्याचा फायदा महाराजांनी उठवला. कालांतराने तेथील कोतवालाला समजले की निसटून गेलेले शिवाजी महाराजच होते.
इंग्रजीत ज्याला Close Call म्हणतात होती पण महाराजांनी तिथे देखील आपल्या चाणाक्ष बुद्धीचा आणि योजनाचातुर्याचा परिचय दिला. महाराज सुटले आणि महाराष्ट्र देखील बचावला!
कटकला घोड्याच्या व्यापाऱ्याने ओळखले!
ही कथा स्कॉट नावाच्या इतिहासकाराच्या पुस्तकात आढळते.
आग्र्याहून सुटून, मथुरा, प्रयागराज, काशी, गया करत महाराज आणि त्यांचे साथीदार कटकला पोहोचले. पण इतक्या कमी प्रवासात एवढा मोठा प्रवास केल्याने त्यांचे घोडे दामले होते आणि त्याच घोड्यांवरून पुढचा प्रवास अशक्य होता. संपूर्ण प्रवास महाराजांनी गोसावींच्या वेषात केला. तसेच आग्र्याहून महाराज निसटले ही वार्ता कटकपर्यंत पोहोचली होती.
नवीन घोडे घ्यायचे होते पण महाराजांकडे फक्त काही ऊंची रत्ने, हिरे आणि सोन्याच्या मोहरा होत्या. त्यांनी एका घोड्याच्या व्यापाऱ्याला गाठले आणि व्यापाऱ्याला मोहरा आणि रत्ने मोबदला म्हणून दिली. एका गोसाव्याकडे एवढी रत्ने आणि पैसे पाहून तो चमकला व त्याने महाराजांना गोसावी नसून कोणीतरी राजा आहे असे ओळखले. पण काहीही उमगायच्या आणि ही बातमी पसरायच्या आधी महाराज जगन्नाथ पुरीच्या दिशेने निघून गेले आणि तिथे अभिषेक केला.
(संदर्भ: Scott’s History of the Deccan, Vol. II.)
आग्र्यातून सुटकेच्या योजनेतील महाराजांचे काही साथीदार (संपूर्ण यादी शोधण्यावर काम चालू आहे!)
- हिरोजी फर्जंद
- मदारी मेहतर
- त्रिंबक सोनदेव
- रघुनाथपंत कोरडे
- कुडतोजी गुजर
- त्र्यंबकपंत डबीर
- बाळाजी आबाजी
- दत्ताजी त्र्यंबक
- रघु मित्र
- येसाजी कंक
- तानाजी मालुसरे
- मोरोपंत पिंगळे
- कृष्णाजी, काशीराव किंवा काशीपंत, विसाजीपंत किंवा विश्वनाथ (कृष्णाजी हे मोरो त्रिमल पिंगळे म्हणजेच मोरोपंत पेशव्यांचे मेव्हणे होत. कृष्णजींनी अनेकदा उत्तरेच्या यात्रा केलेल्या होत्या. त्यांनी महाराजांना पुन्हा दख्खन ला सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी स्वीकारली)
- कवी कलश (बखरींमध्ये आणि नोंदींमध्ये यांचा ओघवता उल्लेख आहे. आणि इतिहासकारांच्या मते या मोहिमेत मदत केल्यामुळे, शिवाजी महाराजांनी कवी कलश यांना महाराष्ट्रात बोलावून घेतले)
पुढच्या ब्लॉगमध्ये आग्र्याहून सुटकेचा ज्यांनी महाराजांना मदत केली त्यांच्याबद्दल अधिक माहिती देऊ.
महाराष्ट्रातील एका खासदाराने बनवलेल्या सिनेमात “शिवाजी महाराजांचा आग्रा ते राजगड हा प्रवास एक गूढ आहे” असे सांगण्यात आलेले आहे. पण हे धादांत असत्य आहे, हे आम्ही या ब्लॉगमध्ये सपुरावा सिद्ध करत आहोत. सिनेमा आणि सोशल मिडियावरील भूलथापांना बळी पडू नका. इतिहासातील साधनांचा, पत्रांचा, बखरींचा अभ्यास करा हीच नम्र प्रार्थना 🙏
आशा आहे तुम्हाला आमचा या अद्वितीय घटनेचा घेतलेला मागोवा आवडला असेल. आपला स्नेह असाच राहू दे! या विषयावरील मागील ब्लॉग वाचायचे असल्यास इथे क्लिक करा.
~ शब्दयात्री