महाराष्ट्रातील उद्योगधंदे, त्यांना उपलब्ध असलेल्या सुविधा आणि इतर समस्या यांच्यावर सध्या फार चर्चा सुरु आहे. नगर आणि उद्योग यांचा इतिहास माहित असणारे जाणतात की कोणतेही उद्योग उभे करणे, सुरु ठेवणे हे फार मोठे आव्हान आहे. इतिहासातील प्रत्येक काळातील राज्यकर्त्यांना हे आव्हान पेलावे लागले आहे. उद्योगधंदे आणि पेठ वसवणे सोपे नसते. उद्योगधंद्यांना देखील सवलती आणि राजकीय पाठबळ लागते. कारण त्या यशस्वी होण्यासाठी केवळ पैसा गुंतवून चालत नाही. कायद्याचे रक्षण कवच, कर आणि भत्ते यांच्यात सवलती देखील लागतात. याला सोप्या शब्दात “राजाश्रय” म्हणतात. या ब्लॉगमध्ये आपण भवानी पेठ कशी वसली आणि श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या योगदानाबद्दल पाहूया!
इतिहास वाचल्यावर लक्षात येईल की पानिपतच्या युद्धानंतर पुण्याची रयाच गेली होती. पुणेकरांचा आत्मविश्वास तळाशी गेलेला होता. रहदारी, उलाढाल कमी झालेली होती. एकूण सांगायचे तर अवसानच संपले होते. पण या परिस्थितीला सफल उत्तर दिले थोरले माधवराव पेशवे यांनी. अत्यंत कठीण काळात पुण्याला आपल्या पायावर उभे केले थोरल्या माधवराव पेशव्यांनी. पण केवळ स्वतःला पेशवे म्हणून हे झालेले नाही. शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर गावातील उलाढाली, उद्योगधंदे यांना चालना देणे देखील गरजेचे आहे, हे पेशव्यांनी जाणले होते. त्याचाच दाखल या ब्लॉगमध्ये देत आहोत.
पुणेकरांना उद्योग किंवा उद्यम हे शब्द वाचताच दोन जागा मनात येतात. लक्ष्मी रस्ता आणि भवानी पेठ. पुण्यातील भवानी पेठ सगळ्यांना माहित आहे. माहित नसली तरी आज Google करून माहिती शोधता येईल. पुण्याच्या गजबजाटात ही भवानी पेठ जिवंत आहे. पुण्यातील उद्यम संपन्नतेचे प्रतीक अशी या भवानी पेठेची ख्याती आहे. पण किती जणांना माहित आहे की, ही भवानी पेठ थोरले माधवराव पेशवे यांच्या काळात वसवली गेली होती!
खरे तर मी भवानी पेठेचा इतिहास अभ्यासायला घेतलेला नव्हता. पण पुण्यातील “नागझरी” या प्राचीन ओढ्याचा इतिहास वाचत होतो. तेव्हा थोरले माधवराव पेशव्यांच्या रोजनिशीतील १७६७-६८ सालच्या एक – दोन नोंदी समोर आल्या. आणि त्या नोंदींमध्ये भवानी पेठेच्या पूर्वपीठिकेचा उल्लेख आढळला.
वरील नोंदीवरून लक्षात येते की, कोणी महादजी विश्वनाथ लिमये नामक व्यक्तीने कारकूना करवे पेशव्यांकडे, पुण्यातील नागझरीकाठी एक पेठ वसवण्याची परवानगी मागितली होती. इथे या जागेचा उल्लेख नागझरी ओढ्यापासून पूर्वेला भवानी नजीक असा आहे. थोडक्यात भवानी मंदिराचा उल्लेख देखील आहे. या मंदिराबद्दल देखील फार कुणाला माहित नाही. पण हे मंदिर पूर्वी “पुनवडी”च्या वेशीवर स्थापिले होते. यात महादजी लिमये म्हणतात की सात वर्षांचा कौल (आजच्या काळात करसवलत) दिल्यास ते व्यापारी आणि लोकांना घेऊन ही पेठ उभी करतील.
पेशवे सरकारकडून आज्ञा दिली गेली की ही “पेठ भरून आबादी चांगली करणे“. त्यानुसार त्यांना कौल देखील दिला गेला. पुढच्या सनदेत पेशव्यांकडून, शेटे, महाजन, वाणी उद्यमी म्हणजे व्यापारी आणि त्या पेठेत वस्तीसाठी आलेल्या लोकांना पेठ आबाद करण्याचा कौल दिला गेलेला आहे. याहून महत्वाची गोष्ट (विशेषतः महाराष्ट्रासाठी) म्हणजे दुसऱ्या सनदेत दिलेले अभय! “जाजती कोणेविशीं उपसर्ग लागणार नाही. सुखरूप येऊन उदीम व्यवसाय करून राहाणे अभय असे म्हणोन” सरकारकडून असे अभय मिळाल्याशिवाय कोणताही उद्योग आपले पाय त्या जागेत रोवू शकत नाही. (आपल्या महाराष्ट्रात अशा अभयाची नितांत आवश्यकता आहे)
यावरून एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की, ही भवानी पेठ वसवण्याची जबाबदारी पेशव्यांनी त्या त्या लोकांवर ठेवली होती. सरकार सवलत देईल, अभय देईल, अन्याय होणार नाही याची खात्री देईल. यालाच राजाश्रय म्हणतात! आणि हाच उद्योगधंद्यांच्या विकासासाठी महत्वाचा असतो!
आणि याबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे अभय केवळ तोंडी न देता यंत्रणेला देखील याबाबत आदेश दिलेले पुढच्या सनदेत आढळतात. ज्यात पेशवे सरकारकडून अभय दिल्याची माहिती कोतवालला (पोलीस आणि प्रशासन अधिकारी) दिलेली आहे.
या सनदेत जनार्दन हरि कोतवालाला सांगण्यात आलेले आहे की, “भवानी पेठ वसवणाऱ्यांना सात वर्षे कर सवलत दिल्याचे, धान्यावर सारा माफ केले आहे.” या वरून लक्षात येते की सवलत केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरण्याची देखील खबरदारी घेतलेली आहे.
याच रोजनिशीत पुढे राजश्री आपाजी मुंढे यांना पुण्यातील सदाशिव पेठेत निर्धास्त होऊन उद्योगधंदे सुरु करण्याविषयी कौल दिलेला आढळून येईल. या सनदेत देखील पेशव्यांकडून सात वर्षांचा कौल (करसवलत) दिलेला आहे. सरकारकडून अभय देताना “कौल भरेतोपर्यंत सरकारचा आजार लागणार नाही” आणि “तरी बेवसवसा येऊन उदीम वेवसाय करणे. अभय असे“. अशी नोंद आहे.
थोडक्यात सांगायचे असे की, काळ कोणताही असो राजाश्रय आणि अभय मिळाल्याशिवाय राज्यात उद्योगधंदे येऊ शकत नाहीत, विकास करू शकत नाहीत. आजच्या राजकारण्यांना हे कितपत माहित आहे. देव जाणे. पण आपल्याला आपला इतिहास माहित असावा यासाठी केलेला हा प्रपंच.
ही माहिती अनेकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करा! आणि इतिहासाविषयी आमचे ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा.