बाजीराव पेशवे आणि ब्राह्मणांची बदनामी
१ जानेवारी तारीख जवळ आली की अर्थातच कोरेगावचे युद्ध, आणि बाजीराव पेशवे द्वितीय यांची आठवण येते. हा दिवस जवळ येताच, आपण कोणाला कोणत्या नियमाने देशभक्त मानतो आणि आपल्या इतिहासाची किती माहिती आहे? याचे स्वैर प्रदर्शन मांडले जाते. असो, त्याबद्दल पुढे कधी लिहूच. पण बाजीराव पेशवे द्वितीय यांच्याबद्दल वाचन सुरु असताना अगदी अचानकपणे इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे “भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास” हे पुस्तक समोर आले. शीर्षक रोचक वाटल्यामुळे, पुस्तक वाचायला सुरु केले. आणि अश्चर्यकारकरित्या त्यात बाजीराव पेशवे द्वितीय यांचा संदर्भ आला.
हा संदर्भ एक विचित्र आणि अपरिचित प्रथा “घटकंचुकी” मुळे आला. इतिहासाचार्य राजवाडे त्यांच्या “भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास” या पुस्तकात म्हणतात
मला हा प्रकार, ही प्रथा आणि बाजीराव पेशवे द्वितीय यांचे या प्रथेशी जोडलेले नाव सगळेच विचित्र वाटले. म्हणून थोडे संशोधन करायला घेतले. तेव्हा लक्षात आले की, घटकंचुकी एक वाममार्गी शाक्त प्रथा आहे. कामुक प्रथा असल्याने त्याबद्दल अनेक मते आणि मतांतरे आहेत.
इंटरनेट वर माहिती शोधताना केशव सीताराम ठाकरे यांच्या “ग्रामण्याचा साद्यंत इतिहास” मधील एक अत्यंत अविश्वसनीय मथळा “पेशव्यांचा दैदिप्यमान इतिहास” वाचनात येतो. (अजून मला हे पुस्तक वाचायला मिळाले नसल्याने मी १००% खात्रीने हे सांगू शकत नाही. आपण वाचले असल्यास नक्की कळवा.) यात त्या काळातील अत्यंत अश्लील आणि स्त्रियांच्या दृष्टीने अतिशय अवमानकारक खेळाचा उल्लेख आहे. त्याला श्री ठाकरे यांनी, त्याकाळचे लोक याला घटकंचुकीचा खेळ असे म्हणतात, असे म्हटले आहे. या उल्लेखाला ना कुठला पुरावा देण्यात आलेला आहे आणि ना कुठला संदर्भ!
अगदी मनातलं सांगायचं तर “इतिहास” विषयाच्या नावाखाली आपण काय काय सत्य समजतो? याचा विचार मनात येतो. आणि उदास व्हायला होते. चित्पावन ब्राह्मण समाजावर, पेशव्यांवर टीका करण्यासाठी कपोलकल्पित कथांचा आधार घ्यावासा का वाटला असेल? यामध्ये मानवी द्वेष भावनेची परिसीमा दिसून येते. दुःखद आहे, बाकी काही नाही.
बाजीराव पेशवे द्वितीय आणि आमचे दुर्दैव
आत्तापर्यंत इतिहासाबद्दल अनेक पुस्तके वाचली, साधने वाचली, पत्रे वाचली, रोजनिशी वाचल्या पण कुठेही पेशव्यांच्या अनुषंगाने या प्रथेबद्दल, इतकेच काय पण कोणत्याही पेशव्यांबद्दल अनैतिक कार्याबद्दल वाचनात येत नाही. किमान एखाद्या पत्रात तरी अशा काही घटनांचा पुसटसा उल्लेख सापडायला हवा होता. आणि खरं सांगा? जर खरोखरच हा प्रकार सिद्ध करणारे अस्सल पुरावे किंवा पत्रे उपलब्ध असती तर आत्तापर्यंत त्याला फ्रेम करून पेशव्यांच्या अब्रूची धिंड नसती काढली सगळ्या तथाकथित इतिहासकारांनी?
या सगळ्या इतिहासकारांचे आवडते पुरावे म्हणजे ख्रिस्ती मिशनरींची अज्ञानी वर्णने, इंग्रजी लष्करी अधिकारी यांनी लिहून ठेवलेल्या नोंदी. विशेषतः रावबाजी पेशव्यांबद्दल असली अवमानकारक राळ उठवली जॉन मरे मिचेल याने आपल्या “Recollections of My Early Missionary Life” मधून (ते ही रावबाजींच्या मृत्यूनंतर लिहिलेले) आणि स्टुअर्ट एल्फिन्स्टन याच्या रोजनिशीतून. हे तर बोलून चालून पेशव्यांचे कट्टर वैरी, हिंदू द्वेष्टे आणि भारतीय संस्कृतीचे विरोधक.
आणखीन काही उल्लेख सापडले ते अरविंद ताटके यांच्या इतिहासातील स्मृतिचित्रे या पुस्तकात (पृ १२४, १२५, १२६), ज्यामध्ये लोकहितवादी, तात्याराव केळकर आणि एल्फिन्स्टन यांनी बाजीराव पेशवे द्वितीय यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरेच काही लिहिलेले आहे. ज्याला आजच्या काळात आपण निश्चितच अश्लील, अनैतिक म्हणू शकतो. लोकहितवादींनी आणखीन पुढे जाऊन बाजीराव पेशवे द्वितीय यांनी इतरांच्या स्त्रियांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचे उल्लेख आहेत. अत्यंत धक्कादायक गोष्टी आहेत. जे वाचून रावबाजींच्या चारित्र्याबद्दल शंकाच नव्हे तर घृणा उत्पन्न होईल. उदा. “आश्रित लोकांनी चार – चार पाच – पाच लग्ने करून घरी एक बायको ठेवावी आणि सरकारवाड्यात बाकीच्या बायका पाठवाव्या ! आणि याजकरिताच अन्याबा राहतेकर वगैरे यांनी जास्त लग्ने केली ! जो गृहस्थ वाड्यात बायको पाठविणार नाही त्याजवर श्रीमंताची इतराजी व्हावयाची ! यामुळे अब्रूदार गृहस्थांनी वाड्यात जाण्याचे सोडिले”
समर्थन करू इच्छित नाही पण, त्याकाळात ब्रिटिशांसकट सगळ्यांच्या अंगणात या गोष्टी राजरोस घडत होत्या. कोणाकोणाच्या चारित्र्यावर किती प्रश्नचिन्हे आहेत हे सगळ्यांना ठाऊक आहे. पण कोणाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल इतकी चर्चा कोणी केल्याचे ऐकिवात नाही. तसेच रावबाजींबद्दलचे हे सगळे उल्लेख “अमुक कोणी म्हणाले” याच धरतीचे आहेत. तसेच बाजीराव पेशवे द्वितीय यांच्या आयुष्यात साधारण १८१० ते १८१८ हा काळ सोडला तर अशा कोणत्याच “कथा” ऐकिवात येत नाहीत. इतिहासकारांच्या मते बाजीराव पेशवे द्वितीय ब्रह्मावर्तात आणि नंतर बिठूर येथे ऐषारामात राहात होते. त्यांना बसल्याबसल्या पेन्शन मिळत होती. मग तिथे असल्या घटना घडल्याचा उल्लेख का नाही सापडत कुठे? रावबाजींच्या रोजनिशीत आणि पत्रव्यवहारात धर्मकार्यांसाठी केलेल्या खर्चांची यादी, त्यांच्या विरोधात उभ्या केलेल्या कथांपेक्षा कैक पटीने जास्त आहेत. चारित्र्यहीन माणसाने इतकी धार्मिक आणि समाजोपयोगी अनुष्ठाने का केली असावीत? या रोजनिशीत नाट्यशाळेचा, रंगशाळेचा चुकूनही उल्लेख आलेला अजून तरी दिसला नाही. असे का? या प्रश्नांची देखील उत्तरे द्यावी लागतील इतिहासकारांना.
फक्त बाजीराव पेशवे द्वितीय यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचाराल तर, इतिहासाच्या साधनांचा अभ्यास केल्यानंतर हे आम्ही निश्चितपणे सांगू शकतो की कोणाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे असेल तर, कोणा कोणाची किती अंगवस्त्रे होती? कोणी किती स्त्रियांशी अवैध संबंध ठेवले होते? कोणाच्या किती रंगशाळा होत्या? कोणा कोणाला कशाचे व्यसन होते? कोणा कोणाचे किती फर्जंद होते? कोणाचे कोण वंशज आहेत किंवा नाही? कोणी किती स्त्रियांच्या आयुष्याचे वाळवंट केले? याबद्दल देखील बोलावे लागेल. एवढेच काय ज्या ब्रिटिशांचे कौतुक ऐकतो त्यांनी किती स्त्रियांना पळवून नेले? किती स्त्रियांना बाटवले? किती गावांमध्ये किती वेश्यालये उभी केली? किती ऐय्याशी केली? ते सोडाच आजकालचे लोक जे पेशव्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात त्यांच्या चारित्र्याबद्दल कोणी शपथपूर्वक खात्री घ्यायला तयार आहे का? हे देखील पाहावे लागेल… आहे तयारी?
वैयक्तिक आयुष्याबद्दल विचार करताना selective होऊन चालणार नाही. इतिहास अत्यंत निष्ठुर असतो.
भारतीयांच्या मनात पेशव्यांबद्दल भ्रम निर्माण करणे ईस्ट इंडिया कंपनीच्या भल्याचे होते, हे सांगणे म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो हे ओरडून सांगण्यासारखे आहे. दुर्दैव असे की आपण आपल्या विरोधकांवर, शत्रूंवर आणि भारतीय संस्कृतीच्या द्वेष्ट्यांनी केलेल्या विधानांवर अधिक विश्वास ठेवतो. आणि “कधीही” त्यांनी सांगितलेल्या गोष्टींची शहानिशा करत नाही. आजकालच्या काळात जिथे पेशवे आणि त्या अनुषंगाने ब्राह्मण समाजाविषयी तेढ निर्माण करायची एकही संधी दवडली जात नाही, त्या काळात अशा असत्य आणि अपमानकारक कथांना समाजकंटक इतिहास म्हणून सोशल मीडिया वर पसरवतात. विशेष तर याचे वाटते की इतिहासाचार्य राजवाडे यांनी देखील बाजीराव पेशवे द्वितीय यांच्याबद्दल केलेल्या या विधानाचा संदर्भ दिलेला नाही. किती हे दुर्दैव.. किती हे दुर्दैव!!
इतिहासविषयक मनातलं
जोपर्यंत किमान दोन ते तीन “स्वतंत्र” स्रोत असलेली साधने एखाद्या घटनेचे समर्थन अथवा खंडन करत नाहीत तोपर्यंत त्याला इतिहास समजले जात नाही. फार तर आख्यायिका म्हटले जाऊ शकते. आजकाल आख्यायिका इतिहास म्हणून खपवला जात आहेत. समाजाची मानसिक अवस्था मोठी बिकट आहे. सोशल मीडिया याला अजून दूषित करत आहे.
हे असंच घडलेलं आहे, रावबाजी बाजीराव पेशवे द्वितीय यांच्याविषयी. त्यांच्याविषयी घटकंचुकीच्या अनुषंगाने केलेल्या दोषारोपणाला, ना कुठला पुरावा आहे ना संदर्भ. फक्त आरोपच आहेत. ते ही ईस्ट इंडिया पुरस्कृत, परधर्मी, हिंदू द्वेष्ट्या मिशनरी कडून लिहिलेल्या कपोलकल्पित आणि अवमानकारक उल्लेखातून घेतलेल्या उष्ट्यासारखे!
देव करो आणि लोकांमध्ये इतिहास वाचण्याची आणि समजून घेण्याची बुद्धी, आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे सोशल मीडियावर एकांगी माहितीची शहानिशा करण्याची, प्रश्न विचारण्याची बुद्धी येवो. हीच प्रार्थना 🙏
आमचा विचार
आता वाचक म्हणतील की बाजीराव पेशवे द्वितीय यांच्यात दुर्गुणच नव्हते का? त्यांना पराभव पत्करावा लागला होता हे खरे नव्हे का? तर त्याला स्पष्ट उत्तर आहे, “हो हे सगळे खरे आहे”. बाजीराव पेशवे द्वितीय यांच्यात उत्तम नेतृत्वशक्तीचा अभाव होता. त्यांनी रणांगणावर काही चुकीचे निर्णय घेतले. त्यांना आपल्या सरदारांबरोबर (जे इंग्रजांचे मांडलिक देखील झाले) जुळवून घेता आलं नाही. त्यांचा पराभव झाला, त्यांना इंग्रजांशी अपमानास्पद तह करावा लागला. सगळं मान्य आहे. पण म्हणून पेशवे आणि त्याकाळच्या ब्राह्मण स्त्रिया यांच्याबद्दल कोणताही ठोस पुरावा न देता केलेली अवांछनीय टीका आणि इतिहास म्हणून पसरवलेले अपमानास्पद भ्रम आम्हाला मान्य नाहीत! ज्या दिवशी ठोस/अस्सल पुरावा समोर येईल तेव्हा या गोष्टी मान्य करता येतील. तेव्हा आम्ही आमची चूक जरूर मान्य करू. आणि त्याबद्दल जाहीर देखील करू.
तोपर्यंत आम्ही वाचकांना विनंती करतो की “आपल्याच” माणसांबद्दल, स्त्रियांबद्दल अशा वावड्या उठत असतील तर अस्सल पुरावा मागा. कोणीतरी काहीतरी सांगितले म्हणून त्याला न्यायालयात देखील पुरावा मानत नाहीत!
आणखीन एक घणाघाती लेख
धन्यवाद!