“अनागोंदी कारभार” वाक्प्रचार
“अनागोंदी कारभार” भारतीयांसाठी आणि विशेषतः मराठी जनांसाठी काही नवीन नाही! सरकार दरबारी तर अनागोंदी कारभार जणू पाचवीलाच पूजलेला आहे. सगळ्यांना या वाक्प्रचाराचा अर्थ माहित आहे. अनागोंदी कारभार म्हणजे पूर्ण अव्यवस्था, भोंगळ कारभार किंवा कशाचा कशाला मेळ नसणे! पण अनेकदा हा प्रश्न पडायचा की हा वाक्प्रचार आला कुठून? अनागोंदीचा काय अर्थ आहे? विशेषतः जेव्हा ऐतिहासिक पत्रांमध्ये जेव्हा “अनागोंदी” चा उल्लेख केलेला दिसतो तेव्हा आणखीन कुतूहल जागृत होते.

अनागोंदी खरं तर मूळ शब्द नाही! चकित होऊ नका. हा अनैगुंडी (म्हणजे हत्तींची फिरण्याची जागा) या कानडी गावाच्या नावाचा अपभ्रंश आहे.
अनागोंदीचा इतिहास
अनागोंदीचा इतिहास बघता काही गोष्टी स्पष्टपणे दिसतात. हे दक्षिण भारतातील विजयनगर राज्यातील एक शहर किंवा गाव होते. ११-१२ व्या शतकापासून या शहराचे उल्लेख सापडतात. त्यातला महाराष्ट्रातील लोकांसाठी फार महत्त्वाचा उल्लेख म्हणजे संत एकनाथ महाराजांच्या पूर्वजांचा म्हणजे भानुदास महाराजांचा (संत एकनाथ महाराजांचे पणजोबा). भागवत संप्रदायाच्या इतिहासानुसार विजयनगरच्या राजाने पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती आपल्या राज्यात बळजबरीने नेली. ती मूर्ती अनागोंदी येथे एक भव्य मंदिर बांधून स्थापिले. भानुदास महाराजांनी ही विठ्ठलाची मूर्ती पुन्हा पंढरपुरास आणून प्रस्थापित केली.
१४ व्या शतकात विजयनगर राज्याचा उत्कर्ष सुरू झाला. सांप्रत हंपी च्या आजूबाजूला हे राज्य मोठे झाले. पुढे परकीय इस्लामी आक्रमणकर्त्यांनी विजयनगर राज्यावर हल्ले केले आणि संपूर्ण राज्य उध्वस्त केले. तेव्हा काही ना काही करून विजयनगर राज्य वाचवण्याचे प्रयत्न झाले. पण हे गाव परकीयांच्या आधिपत्याखाली आले. शिवकालाच्या दरम्यान देखील या भागातील मोहिमांत या गावाचा उल्लेख सापडतो. पुढे हैदर अली आणि टिपू सुलतानावरील मराठ्यांच्या स्वाऱ्यांमध्ये अनागोंदीचा उल्लेख येतो.
आख्यायिका
आख्यायिका अशी आहे की,
“पूर्वीच्या काळी या अनागोंदीमध्ये एक भ्रष्ट राज्यकर्ता होता. जो आपण पृथ्वीचे सार्वभौम राजे असून, बाकीचे सगळे राजे त्याचे मांडलिक आहेत हे आपल्या प्रजेला सांगायचा. आणि हे सांगून आपल्या खर्चांसाठी, प्रजेकडून संपूर्ण पृथ्वीसाठी महसूल वसूल करायचा. त्या राजांकडून खंडणी मिळवली आहे असे खोटेच सांगायचा. अर्थातच या खोट्या नाट्या रकमा जमेच्या बाजूला दाखवायला लागायच्या. त्याची कशीबशी जुळवाजुळव खर्चाच्या बाजूला त्या राजांना दिलेल्या देणग्या, नजराणे, महसूल दाखवून करायचा.”
यावरून या जुळवाजुळवीच्या जमाखर्चाचा उल्लेख “अनागोंदी कारभार” म्हणून होऊ लागला. तेव्हापासून अव्यवस्था, घोटाळे आणि ताळतंत्र नसलेल्या व्यवस्थेसाठी हा वाक्प्रचार प्रचलित झाला!
तर हा आहे अनागोंदी कारभाराचा गमतीदार इतिहास!
शब्दयात्री मधील आणखीन ऐतिहासिक ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा.