इतिहास आणि फ्रांस
इतिहासात असे क्वचितच वाचायला किंवा ऐकायला मिळते की ज्यांनी एखाद्या राजाला, सिंहासन मिळवून दिले त्यांनाच राजाने दगा फटका केला. फ्रेंच राज्यक्रांतीच्या बाबतीत हे खरे आहे की ज्यांनी क्रांती आणली, त्यांनाच अखेर या क्रांतीमध्ये शिरच्छेदाला सामोरे जावे लागले. पण राजांनी असे केल्याचे फारसे ऐकिवात नाही. पण जोन ऑफ आर्क च्या बाबतीत मात्र असेच घडले. ज्या राजासाठी तिने जीवावर उदार होऊन युद्धे केली, त्याच राजाने तिला मरणाच्या दारी सोडून दिले. अवघ्या १९व्या वर्षी या रणरागिणीला भर चौकात जिवंत जाळून मारण्यात आले. ही गोष्ट अत्यंत करुण आहे.
इतिहासाचा अभ्यास केला तर हे लक्षात येईल की, स्वतः रणांगणात न उतरणाऱ्या राजाच्या आजूबाजूला कायम त्याचे कान फुंकणारे हुजरे असतात. ज्यांना राजाशी आणि राज्याशी काहीही घेणं देणं नसतं. त्यांना फक्त कर्तृत्ववान लोकांबद्दल ईर्षा असते. अशा वेळी राजा या हुजऱ्यांचे ऐकून आपल्याच सरदारांना किंवा योद्धयांना वाऱ्यावर सोडून देतात किंवा त्यांना क्षीण करतात. भारतात देखील अशी उदाहरणे आहेत. पुण्यातील शनिवारवाड्याचे बांधकाम सुरु असताना अशाच काही घटना घडल्या. असो, तो इतिहास नंतर कधीतरी.
तर फ्रांस..
जोन ऑफ आर्क
काळ होता साधारण १४२२, इंग्लंडने फ्रान्सचा सपशेल पराभव केला होता. इंग्लंडचा राजा ६वा हेन्री फ्रान्सचा अधिपती झाला. बरगंडी प्रांतातील इंग्रज प्रणेते सरदार हेन्रीला पाचारण करू लागले. तेव्हा हेन्रीने उत्तर फ्रांस पादाक्रांत करायला सुरुवात केली. १४१२ मध्ये एका शेतमजूराच्या घरी जन्माला आलेली “जोन” वडिलांबरोबर विस्थापित झाली. तांत्रिकदृष्टया निरक्षर जोन ऑफ आर्क धर्माबद्दल अतीव आस्था असणारी मुलगी होती.
वयाच्या १३व्या वर्षांपासून तिला दिव्य दृष्टांत होऊ लागले, दिव्य आवाज तिला ऐकू येऊ लागले. ज्यात असे सांगितले होते की तिचा जन्म मोठे पराक्रम करण्यासाठी, एका निश्चित कार्यासाठी आणि फ्रान्सला दास्यत्वातून मुक्ती मिळवून देऊन चार्ल्स या फ्रान्सच्या निष्कासित राजाला पुन्हा सिंहासनावर बसवण्यासाठी झालेला आहे. या पवित्र कामाचा एक भाग म्हणून तिने काम ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा घेतली. १६ व्या वर्षी तिच्या वडिलांनी तिचे लग्न करायचे ठरवले तेव्हा तिने वडिलांना आणि चर्चला आपले म्हणणे पटवून देऊन हे लग्न टाळले.
१४२८ साली जोन ऑफ आर्क व्होकुलं (Vaucouleurs) प्रांतात गेली जिथे चार्ल्स चे समर्थक होते. तिथे जोन ऑफ आर्क ने आपल्या दृष्टांतांबद्दल, ब्रह्मचर्येबद्दल आणि राजप्रती निष्ठेबद्दल विदित केले तेव्हा कोणाचाही विश्वास बसला नाही. तेव्हा ती त्या राज्यातील मुख्य अधिकारी Robert de Baudricourt कडे गेली. पण काहीही झाले नाही. उलट तिची थट्टा केली गेली. तरीही तिला आवाज ऐकू येत राहिले. त्यातच तिने एक भाकीत केले की Orleans च्या युद्धात चार्ल्स चा पाडाव होणार. खरे तर आधी लोकांना हे अशक्य वाटले कारण हे युद्ध जिंकण्यासारखे होते. पण जेव्हा चार्ल्स चा पाडाव झाला तेव्हा जोन ऑफ आर्क चे म्हणणे लोक ऐकू लागले, चार्ल्स कडे तिची शिफारस करू लागले.
पुरुषांच्या विश्वात या मुलीने आपले केस कापले आणि पुरुषाचा वेष धारण केला. पुढे ११ दिवस खडतर प्रवास करून ती चार्ल्स ला भेटायला Chinon गावी गेली. चार्ल्सला एका “मुली”वर विश्वास ठेवणे अवघड जात होते. पण जोन ऑफ आर्क ने त्याला आश्वस्त केले की ती Orleans चे युद्ध जिंकू शकते. अखेर चार्ल्स ने परवानगी दिली. जोन ऑफ आर्क एखाद्या पुरुष सरदाराप्रमाणे पांढरा वेष धारण करून एका पांढऱ्या शुभ्र घोड्यावर आरूढ होऊन Orleans ला गेली. आपल्या वाक्चातुर्य, आणि युद्धनीतीच्या बळावर तिने इंग्रजांशी युद्ध केले. विशेष म्हणजे ती युद्धात जाताना हातात तलवारीच्या जागी ध्वज धरत असे. या युद्धात ती जखमी झाली पण युद्ध सोडले नाही. अखेर इंग्लंड हरले आणि जोन ऑफ आर्क च्या नेतृत्वाखाली फ्रान्सचा विजय झाला.
राजाचे कान फुंकले
जोन ऑफ आर्क च्या नावाचा सगळीकडे उदो उदो होऊ लागला. या विजयामुळे चार्ल्स च्या सैन्याला इतर प्रदेश पुन्हा हस्तगत करणे सोपे झाले. अखेर जुलै १४२९ चार्ल्स चा Reims प्रांतात पुन्हा एकदा राज्याभिषेक झाला. जोन चा विचार होता की असाच पराक्रम गाजवत पॅरिस देखील परत घ्यायचे. पण..
आधी नमूद केल्याप्रमाणे राजाचे कान भरणारे अनेक जण दरबारात असतात जे चुकीचे सल्ले देतात आणि राजे त्यांना बळी देखील पडतात. असाच एक हुजऱ्या होता Georges de La Trémoille ज्याने चार्ल्स चे जोन ऑफ आर्क कजय विरोधात कान फुंकले की “जोन तुमच्यापेक्षा लोकप्रिय, शक्तिशाली आणि प्रभावशाली होत चालली आहे!” अर्थात चार्ल्स हलक्या कानाचा होता. या चर्चेत वेळ गेला आणि बरगंडी मधील इंग्रज आणि त्यांच्या मित्रांना राज्याची तटबंदी करायला वेळ मिळाला.
१४३० मध्ये बरगंडी च्या सैन्याने चार्ल्सच्या प्रांतावर आक्रमण केले. तेव्हा Compiège जवळ युद्ध झाले. या युद्धात तिचा प्रभाव निश्चित होताच पण त्यापुढे जाऊन शहराची देखील वाताहत होणार होती. त्यामुळे शहराला वाचवण्यासाठी तिला घोड्यावरून पाडण्यात आले आणि जखमी अवस्थेत शहराच्या बाहेर सोडण्यात आले. शहराची दारे बंद केली गेली आणि अखेर जोन ऑफ आर्क शत्रूच्या तावडीत सापडली. बरगंडी च्या सरदाराने या “युद्धबंदी” ला इंग्रजांना विकले.
जोन ऑफ आर्क: कैद, गुन्हा आणि मृत्यू
जोन चा छळ करण्यात आला. तिच्यावर तब्बल ७० गुन्हे दाखल झाले त्यात जादू टोणा करणे, पुरुषांचे कपडे घालणे, धर्मभ्रष्ट किंवा धर्मविरोधी आचरण (याला काही समाजात कुफ्र म्हणतात) इत्यादी गुन्हे होते. एका धर्मभ्रष्ट आणि धर्मबुडवण्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या यत्कश्चित मुलीबरोबर आपला संबंध जोडला जाऊन आपल्या राज्यारोहणावर प्रश्नचिन्ह उभे राहू नये म्हणून चार्ल्स राजाने तिला काहीही मदत केली नाही. किंबहुना तिला वाऱ्यावर सोडले.
मी १४३१ मध्ये जीवाची धमकी देऊन तिच्याकडून बळजबरीने तिला कुठलाही दृष्टांत झाला नाही असे लिहून घेतले. तरीही तिने आज्ञा झुगारून बंद म्हणून पुरुषांची वस्त्रे परिधान केली. ते पाहून तिच्यावर “पुरुषांची वस्त्रे परिधान करण्याचा” गुन्हा दाखल झाला. ३० मे १४३१ रोजी Rouen गावाच्या जुन्या बाजाराच्या चौकात आणले गेले आणि जिवंत जाळले गेले.
आपल्या देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची देखील पर्वा न करणाऱ्या या रणरागिणीच्या मदतीला कोणीही धावून आले नाही आणि वयाच्या १९व्या वर्षी तिचे निधन झाले.
हा इतिहास आजवर तुम्हा वाचकांना सांगितलं गेला आहे की नाही माहित नाही म्हणून हा प्रपंच. ज्या पाश्चात्य संस्कृतीचे गोडवे आपल्या काही पूर्वजांनी गेले त्यांच्या इतिहासात पुरुषांचे कपडे घातले म्हणून जिवंत जाळण्याची शिक्षा होत असे.. तिला तिच्या मृत्यूनंतर २५-२६ वर्षांनी या गुन्ह्यांमध्ये निर्दोष घोषित केले. पण तेव्हा करून काय उपयोग झाला देव जाणे. १९२० साली तिला संत पद देण्यात आले.
असो..