द्वितीय युद्ध आणि बुडलेले जहाज
“देव तारी त्याला कोण मारी ?” किंवा “वह शमा क्या मुझे जिसे रोशन खुदा करे”, हे खरं आहे! आपला काळ सरण्याच्या आधी कोणीही जात नाही आणि आपला काळ झाल्यानंतर कोणीही राहात नाही. आयुष्यात असे कित्येक प्रसंग येतात जेव्हा असं वाटतं की आता आयुष्य उरलेलं नाही. छोट्या छोट्या आजारांनी सुद्धा माणसं ग्रासलेली असतात, चिंताक्रांत झालेली असतात. पण जगात Poom Lim सारखेही काही लोक असतात, ज्यांच्यावर देवही प्रसन्न असतो आणि ज्यांच्यात जगण्याची उर्मी देखील असते. अथांग समुद्रामध्ये एकटा पडलेला असताना देखील ज्याची स्वयंप्रेरणा जगण्याची इच्छाशक्ती कुठेही कमी झाली नाही तो Poom Lim. खरंतर आज त्याचा जन्मदिन नाही आणि मृत्युदिन देखील नाही. तरीही आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण आज त्याचा पुनर्जन्म झाला तोही तब्बल १३३ दिवसानंतर. लिखित इतिहासात १३३ दिवसानंतर समुद्रात जिवंत सापडलेला हा पहिला माणूस. त्याचीच ही रोचक गोष्ट.
द्वितीय महायुद्धाचा काळ होता. एका बाजूला जर्मनी आणि दुसर्या बाजूला इंग्लंड अमेरिका हे एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत होते. युद्धामध्ये एकमेकांची जितकी हानि करता येईल तितकी हानि करण्याचा प्रयत्न करत होते. याच सगळ्या झटापटीमध्ये, जर्मनीच्या एका यु बोट (U-172) ने २३ नोव्हेंबर १९४२ साली, इंग्लंडच्या एका व्यापारी जहाजाला बुडवलं. त्या जहाजावर Poom Lim, एका steward चं म्हणजेच व्यवस्था पाहाण्याचं काम करत होता. Poom Lim मुळत: चीनचा रहिवासी. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे जहाज बुडून गेले आणि त्यातील एक सोडून सर्व खलाशांचा मृत्यू झाला. तो वाचलेला खलाशी म्हणजे Poom Lim. एक मात्र म्हणावंच Poom Lim चे नशीब थोर! जहाज बुडाले तेव्हा सगळ्यांनी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. पण अखेरपर्यंत हाच जिवंत राहिला.
Poom Lim नशीबवान!
जहाज बुडायच्या आधी त्याने समुद्रात उडी मारली. काही वेळ पाण्यात पोहत राहिला आणि थोड्या वेळाने त्याला एक राफ्ट म्हणजे एक प्रकारचा तराफा सापडला. तराफ्याला गोणपाट सदृश वस्तूचे छत होते. त्या भक्कम तरफ्यामध्ये जवळपास 40 लिटर पाणी, बिस्किटांचे टिन चे डबे, काही चॉकलेट काही साखरेचे मोठे खडे, काही flares दुर्घटनेच्या वेळेस लक्ष वेधून घेण्यासाठी धूर करण्यासाठीची दोन पाकिटे , दोरखंड आणि एक टॉर्च बॅटरी इत्यादी गोष्टी होत्या. अर्थातच या सगळ्या खाण्यापिण्याच्या गोष्टी फार काळ टिकणार नव्हत्या त्यामुळे Poom Lim ला स्वतः मासे पकडायची, पक्षी पकडायची वेळ आली. तहान भागवण्यासाठी कधी पावसाचे पाणी लाईफ जॅकेटवर जमा करावे लागत असे. मग त्या तरफ्यावर मिळतील अशा वस्तूंनी त्याने गळ बनवला दोरखंडातून धागे काढले आणि मासे पकडू लागला. माशांचे तुकडे वापरून त्याने पक्षांना देखील पकडलं. ऐकताना अत्यंत क्रूर कदाचित किळसवाणे देखील वाटेल पण त्याने तहान भागवण्यासाठी पक्षांचे रक्त देखील प्यायले. त्यालाही दुसरा पर्याय नव्हता कारण त्याला “जिवंत” राहायचं होतं. त्याला स्वतःला नीट पोहता येत नव्हतं. काही प्रमाणात पाण्याची सुद्धा भीती वाटे. त्यामुळे पोहायला जाताना हाताला दोरी बांधून मगच पाण्यात उतरत असे. त्याच्या म्हणण्यानुसार त्याने एकदा शार्क सुद्धा पकडला होता त्याच्यासाठी त्याला भरपूर झटापट करायला लागली होती. गरज माणसाला कसं सृजनशील बनवते याचे आणखीन एक उदाहरण असे की बिस्किटांचे डबे होते त्याचे तुकडे करून Poom Lim ने त्याची सुरी बनवली होती.
सुरुवातीला दोरीचे वळसे घालून तो नक्की किती दिवस झाले हे मोजत असे. पण नंतर त्याला त्याचाही कंटाळा येऊ लागला कारण “जगणं” हेच महत्त्वाचं होतं. हळूहळू त्याने दिवसांचा हिशोब सोडला आणि पौर्णिमाचा हिशोब मांडायला सुरुवात केली. त्याच्या म्हणण्यानुसार एक दोन वेळा असंही झालं की त्याच्या आजूबाजूने काही प्रवासी जहाज आणि युद्धनौका देखील गेल्या. काही तर इतक्या जवळ आल्या होत्या की तो काय बोलतोय हे सुद्धा त्यांना ऐकू गेलं. तो स्वतः जरी चीनचा असला तरीही त्याला इंग्रजीत व्यवस्थित बोलता येत होते. आपली व्यथा मांडून देखील त्या जहाजावरच्या लोकांनी त्याला वाचवलं नाही. Poom Lim च्या म्हणण्यानुसार लोकांनी तो दिसायला “युरोपियन” वाटत नाही म्हणून त्याला त्यांनी वाचवलं नाही. पण याची दुसरी बाजू अशी की पूर्वीच्या काळी अशा छद्मी रूपामध्ये शत्रू देश एकमेकांच्या सैनिकांना जहाजांना शह द्यायचा प्रयत्न करत असत. त्यामुळे जर्मन काय, युरोपियन काय कोणत्याच जहाजावरच्या लोकांना Poom Lim वर विश्वास बसत नव्हता. तो काळच तसा होता! जणू काही त्याचे मरण समुद्रातच होते.
१३३ दिवस.. Poom Lim तरला!
आणि एके दिवशी म्हणजेच ५ एप्रिल १९४३ रोजी तब्बल १३३ दिवसानंतर त्याचं भाग्य बदललं. समुद्राच्या लहरी आणि प्रवाह यांच्यामुळे त्याचा तराफा हळूहळू जमिनीच्या दिशेने येत चालला होता. पाण्याच्या बदलत्या रंगावरून Poom Lim ने देखील हे जाणलं होतं की आपण जमिनीच्या जवळ येत आहोत. अर्थातच तो ब्राझीलच्या जवळ होता. शेवटी ब्राझीलच्या तीन कोळ्यांनी त्याला वाचवलं आणि त्याला किनाऱ्यावर घेऊन आले. जेव्हा लोकांनी Poom Lim ची हकीकत ऐकली तेव्हा लोकांना विश्वासच बसला नाही. इतके दिवस कोणी माणूस समुद्रामध्ये कसा काय जिवंत राहू शकतो याचा सगळ्यांनाच अचंबा वाटत होता. Poom Lim चे वजन जवळपास 20 पाऊंडने कमी झाले होते. इतके दिवस पाण्यात राहूनही Poom Lim मानसिकदृष्ट्या सुदृढ राहिला होता. इतकेच नव्हे तर, जमिनीचा स्पर्श देखील झाला नसला तरीही तराफ्यातून उतरल्यावर कोणाचाही आधार न घेता तो चालू शकला.
त्याने काही दिवस ब्राझीलच्या एका इस्पितळामध्ये घालवले आणि शेवटी इंग्लंडचे सैन्य त्याला घेऊन इंग्लंडला गेले. इंग्लंडला गेल्यानंतर तिकडच्या सैन्य अधिकाऱ्यांनी त्याचे कौतुक केले. Poom Lim ला “British Empire Medal” ने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे त्याच्या अनुभवांना Survival Manuals मध्ये देखील जोडण्यात आलं. जेव्हा त्याला हे सांगण्यात आलं की समुद्रात सगळ्यात जास्त दिवस जिवंत राहणारा तू माणूस आहेस, हा एक record आहे, मानक आहे! तेव्हा त्याचे उत्तर होते की “मी प्रार्थना करतो इथून पुढे असं जिवंत राहण्याची वेळ कुणावरही येऊ नये, आणि हे record तोडायची वेळ येवू नये.”
Poom Lim त्यानंतर अमेरिकेमध्ये स्थलांतरित झाला आणि तिथेच राहिला. देवाने तारलेला हा माणूस आणि त्याची ही रोचक कथा.
कथा आवडली असेल तर इतरांपर्यंत पोहोचवायला नक्की मदत करा. यासारख्या अजून रोचक कथा वाचायचे असतील तर इथे क्लिक करा.