रामचंद्र हरी पटवर्धन
मराठ्यांचा इतिहास ज्यांना माहित आहे त्यांच्यासाठी “पटवर्धन घराणे” नवीन नाही. पण त्यांच्याविषयी फारसा कुठे उल्लेख झालेला दिसत नाही. या घराण्याच्या इतिहासाबद्दल आणि शौर्यगाथांबद्दल लिहावे तितके कमीच आहे. आणि एकाच ब्लॉगमध्ये सगळे सामावणे देखील अशक्य आहे. हळूहळू सगळं इतिहास समोर आणूच. पण, आम्ही ज्यांना “मराठ्यांचे Achilles” म्हणतो त्या रामचंद्र हरी पटवर्धन यांच्या आयुष्यातील एका प्रसंगाबद्दल या ब्लॉगमध्ये लिहिणार आहोत.
तुम्हाला माहित नसेल तर थोडक्यात सांगतो. Achilles हा होमर याच्या इलियड काव्यानुसार एक परम प्रतापी ग्रीक योद्धा होता. ज्याने अनेक एकल युद्धे (Single Combat) लढून आपल्या राजासाठी विजय मिळवून दिलेला होता. त्याचे अप्रतिम चित्रण Troy सिनेमातील एका प्रसंगात केलेले आहे. पूर्वीच्या काळी काही वेळा दोन राज्यांमधील युद्ध आपापल्या बाजूच्या सर्वोत्तम योद्धयांमधील द्वंद्वयुद्धावरून ठरवत असत. आम्ही रामचंद्र हरी यांना Achilles का म्हणत आहोत ते पुढे येईलच पण आधी त्यांच्याबद्दल अगदी थोडक्यात माहित देतो.
रामचंद्र हरी पटवर्धन हे जामखिंडी संस्थानाचे मूळ पुरुष. ते धरून हरिभट पटवर्धन यांस सात मुले होती. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील कोतवडे गावातून देशावर येऊन हरिभट बुवा यांनी आपल्या सिद्धीच्या जोरावर नाव कमावले. पुढे गणपतीच्या आशीर्वादाने संतती प्राप्ती झाली. सगळेच पुत्र हुशार आणि कर्तृत्ववान निघाले. पण त्यांच्यापैकीही गोविंद पंत आणि रामचंद्र हरी यांची कर्तबगारी विशेष उल्लेखनीय आहे. वंशपरंपरागत पौरोहित्यापेक्षा स्वराज्याच्या कमी यावे या हेतूने रामचंद्र हरी आपले बंधू गोविंद पंत यांना घेऊन पेशव्यांच्या पदरी रुजू झाले. येथेच त्यांनी शस्त्रविद्येचे संपादन केले.
पंतांचा पराक्रम
गोविंद पंत श्रीमंत बाजीराव बल्लाळ म्हणजेच नानासाहेब पेशवे यांचे सरदार इंद्रोजी कदम भांडे याजकडे फडणीस म्हणून रुजू झाले. तर, रामचंद्र हरी श्रीमंत चिमाजी अप्पा पेशवे यांजकडे राहिले. पेशव्यांबरोबर अनेक लढाया आणि स्वाऱ्यांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. कोल्हापूर चे संभाजी राजांनी जेव्हा इचलकरंजीवर आक्रमण केले तेव्हा नानासाहेब पेशव्यांनी त्यांना थोपवण्यासाठी रामचंद्रपंतांना पाठवले. युद्धात कोल्हापूरकर सैन्याचा पाडाव झाला. संभाजी राजांनी याची तक्रार छपत्रपती शाहू महाराजांकडे केली. पुढे इचलकरंजी आणि कोल्हापूर गादी यांच्यात समेट घडवून आणला.
रामचंद्र हरी यांची शस्त्रकला सर्वश्रुत झालेली होती आणि त्यांचा हात धरू शकेल असा कोणी दृष्टीक्षेपात नव्हता. रामचंद्र हरी यांनी वसईच्या किल्ल्यावरील लढाईत शस्त्र आणि शास्त्र दोन्हींचा परिचय देत, मोलाची कामगिरी बजावली. ठाण्याचा किल्ला काबीज केला आणि केळवे ची लढाई जिंकली. असे म्हणतात की वसईच्या किल्ल्यावर भगवा ध्वज फडकावणारे देखील हेच होते! चिमाजी अप्पांनी त्यांस अडीच हजार राऊतांचे स्वामित्व दिले.

मराठ्यांचे “Achilles”!
पुढे उत्तर भारतातील अनेक स्वाऱ्यांमध्ये देखील रामचंद्र हरी यांनी कर्तबगारी आणि शौर्य दाखवले. विशेषतः जयसिंग बरोबर झालेल्या युद्धात त्यांची कामगिरी विशेष वाखाणण्याजोगी होती. श्रीमंतांनी खुश होऊन त्यांना सरदारी पोशाख देऊन अडीच हजार स्वारांचे स्वामित्व दिले. जयसिंगाबरोबर तह झाला..
आणि इथे मराठ्यांच्या Achilles ची पहिली गोष्ट येते.
जयसिंगाच्या मनात पेशव्यांची कुरापत काढण्याचे आले. त्याच्या मनात पेशव्यांशी झालेल्या तहामुळे वैर तर होतेच पण कोणत्या कारणाने श्रीमंतांची फजिती करता यावी याही मार्गावर तो होता. तेव्हा जयसिंगाने “तुमच्याकडील एक भालेकर आणि आमच्याकडील एक भालेकर यांच्यात युद्ध होऊ दे. आमचा भालेकरमारला गेला तर चौथाई राज्य देऊ” अशी शक्कल त्याने लढवली. त्याच्या मनात श्रीमंतांची फजिती करण्याचे होतेच पण त्यास काय ठाऊक की श्रीमंतांच्या लढवैय्यांच्या नावात रामचंद्र हरी हे नाव देखील होते! उभयांमध्ये द्वंद्व झाले. पंतांवर गजाननाची कृपा अपार. त्यांनी राजपूत भालेकऱ्याला यमसदनी धाडले!
आणि दुसरी गोष्ट नंतर घडली
जयसिंगाचा पूर्ण पाडाव झालेला होता. पण अजून इतराजी होऊ नये आणि श्रीमंतांना खुश ठेवण्यासाठी त्यांनी अनेक कार्यक्रम ठेवले. त्यात दोन मदोन्मत्त हत्तीची झुंज देखील होती. ती झुंज बघायला हजारो लोक जमले होते. झुंज सुरू झाली. अचानक एक मदोन्मत्त हत्ती लोकांवर उसळला आणि एकच गलका झाला. “खरा शूरच या हत्तीला बांधू शकेल” असा स्वर निघाला. तेव्हा रामचंद्र हरी बरची-भाला घेऊन घोड्यावर स्वर झाले आणि काही वेळातच हत्तीला नमवून जेरीस आणले व जागेवर बांधले!
या गोष्टी वाचून रामचंद्र हरी “मराठ्यांचे Achilles” होते यात आम्हाला तरी शंका नाही! वाचकांना देखील नसावी..
शस्त्र आणि शास्त्र हे पुरुषार्थाचे दोन बाहू आहेत. एकानेही कमजोर होऊन चालणार नाही. आपल्या पूर्वजांनी या दोन्हींच्या जोरावर हिंदवी स्वराज्य, टिकवले, वाढवले. त्यांचा आदर्श सदैव राहो हीच अपेक्षा व्यक्त करतो!
अशा ऐतिहासिक विषयांवरील ब्लॉग वाचण्यासाठी या दुव्यावर जा आणि आनंद घ्या..