समजायला लागल्यापासून आपण कोकणस्थ आहोत हे समजले आणि काही दुसरे देशस्थ हे देखील समजले! कोकणात राहणारे ब्राह्मण कोकणस्थ ब्राह्मण आणि देशावर राहणारे ब्राह्मण देशस्थ, खरं सांगायचे तर “देशस्थ – कोकणस्थ” हे प्रकरण इतके साधे, सरळ आणि सोपे प्रकरण आहे. पण, सरळमार्गी गोष्टी सरळच राहू देतील ते ब्राह्मण कसले? आणि त्यातून प्रश्न जर वर्चस्व किंवा श्रेष्ठत्वाचा असेल तर विचारायलाच नको. वास्तविक पाहता प्रत्येक समाजात आणि समूहात आजही वर्चस्वासाठी चढाओढ चाललेली दिसते. पण ब्राह्मणांमधले वाद बघण्यात आणि त्याबद्दल बोलण्यात समाजाला देखील मजा येते. कारण, ब्राह्मणांना देखील या वादात फार जास्त स्वारस्य असलेले दिसते. त्यातून पूर्वीच्या काळी इतर समूहातील वाद अनेकदा बाहुबलाच्या जोरावर सोडवले जायचे आणि ब्राह्मणांमधले हे वाद केवळ शाब्दिक पातळीवरच लढले गेले. कदाचित त्यामुळे या वादाची वाच्यता गरजेपेक्षा जास्त होते.
हसू नका! आधी आपापल्या समाजातील, समूहातील वाद सोडवायचा प्रयत्न करा!
या ब्लॉगमध्ये काही अर्थी आंतरिक चेष्टेचा विषय झालेल्या देशस्थ कोकणस्थ वादावर इतिहासाचा आणि वास्तवाचा प्रकाश टाकण्याचा मानस आहे. आशा आहे की ब्लॉग वाचून झाल्यावर या वादाला कोणत्या सीमेपर्यंत खेचायचे हे सगळ्यांनाच समजेल.
देशस्थ कोकणस्थ संबंध
इतिहासाच्या उद्गमापासून ब्राह्मणांच्या अनेक विभाग (शाखा) आणि पोटविभाग (उपशाखा) अस्तित्वात आहेत. त्यांना मी जाणीवपूर्वक जाती आणि पोटजाती म्हणत नाही. प्रत्येक विभाग आणि पोटविभाग आपापले मूळ, कूळ आणि कुळाचार पाळत आलेले आहेत. उपजत रूढी-प्रिय असलेला हा ब्राह्मण समाज तसेही आपल्या विभागाबाहेर, इतकेच काय अनेकदा आपल्या कुटुंबाच्या बाहेर देखील काय घडत आहे याचा फारसा विचार करत नाही. त्याचप्रमाणे आपल्या रूढींमध्येही अतार्किक व विनाकारण केलेले बदल सहन करत नाही. म्लेंच्छांच्या आक्रमणानंतर तर आपापले धर्म जपणे आणखीनच गरजेचे झाले. त्यामुळे हा समाज आपल्या रूढींना आणखीनच जवळ धरू लागला. म्लेंच्छांच्या काळात देखील त्यांचे मुख्य देश न बदलल्यामुळे, एकाच बादशहाच्या किंवा राजाच्या अमलाखाली असूनही त्यांच्यात वाद उत्पन्न झाले नाहीत. हे ही खरे की फार बंधुता देखील निपजली नाही. त्यामुळे मूळतः देशस्थ कोकणस्थ हा वाद तितकासा मोठा नव्हता. जो तो आपापल्या स्थळी आपापला निर्वाह करत होता आणि त्यांच्यात सह्याद्रीची एक सीमारेषा होतीच.
महाराष्ट्राची समाज व्यवस्था बघता एकूणच आपल्याशी मिळत्या जुळत्या कुटुंबाशी पंक्ती व्यवहार आणि लग्न व्यवहार करण्याकडे समाजाचा कल असतो. आणि हा कल फक्त ब्राह्मणांमध्ये असतो असं म्हणणं म्हणजे अज्ञानी असण्याचे लक्षण आहे. असो, मूळ मुद्दा इतकाच की ज्या कुटुंबाशी आपला संबंध येणार आहे, ज्या कुटुंबात आपली मुलगी सून म्हणून जाणार आहे, त्या कुटुंबाची व्यवस्था आपल्याला मानवणारी आहे की नाही? हा प्रश्न इथे अधिक महत्वाचा ठरतो. यात वरकरणी भेदभाव दिसला तरीही त्याचा पाया जातीय, किंवा उच्च – नीच पेक्षा “कौटुंबिक आणि सामाजिक अनुकूलता” हा आहे. अलीकडच्या काळात भौगोलिक अनुकूलता देखील बघितली जाऊ लागली आहे. आणि हाच विचार मुख्यत्वेकरून देशस्थ कोकणस्थ व्यवहारात बघितला जात असे आणि आजही बघितला जातो.
देशस्थ कोकणस्थ संबंध आणि थोरले शाहू महाराज
इतिहासाची पाने उलटत असताना एक गोष्ट मुख्यत्वेकरून लक्षात येते की कदाचित पेशव्यांच्या आधी हे संबंध काही प्रमाणात असावेत पण त्याला इतकेही महत्व प्राप्त झालेले नव्हते की त्यांचा उल्लेख इतिहासकार फार जास्त करतील. कारण लोकांना असलेल्या गैरसमजाच्या विपरीत, शिवाजी महाराजांच्या पदरी देखील कोकणस्थ ब्राह्मण होते. पण त्यांना दिलेली कामगिरी बहुदा कोकण प्रांतापुरती सीमित होती. त्यामुळे महाराजांच्याच पदरी असलेल्या देशस्थ ब्राह्मणांशी त्यांचा कधीच संबंध आलेला नाही, हे म्हणणं चुकीचं ठरेल. काही कोकणस्थ कुटुंबे कोल्हापूर भागात देखील वसली होती. विशेष म्हणजे काही देशस्थ कुटुंबे देखील कोकणात वास्तव्यास होती हे देखील फार कोणाला माहित नसेल. पण तरीही फार काही उल्लेखनीय देखील घडल्याचे पुरावे नाहीत.

देशस्थ कोकणस्थ संबंधाच्या इतिहासात पहिली उल्लेखनीय घटना म्हणजे बाळाजी विश्वनाथ भट यांचे साताऱ्याला आगमन. तोपर्यंत महाराजांच्या पदरी देशावर कोणी कोकणस्थ ब्राह्मण नोकरीला असण्याचे फारसे उल्लेख मिळत नाहीत. बुद्धी, शौर्य आणि स्वामीनिष्ठा यांच्या जोरावर बाळाजी विश्वनाथ भट यांनी थोरल्या शाहू महाराजांचा विश्वास संपादन केला. अर्थात पुढे त्यांना पेशवेपद मिळाले.

मल्हारपंत बर्वे यांचा विवाह
यानंतर घडलेली उल्लेखनीय पण अत्यंत महत्वाची घटना म्हणजे “मल्हारपंत बर्वे यांचा विवाह”! मल्हारपंत बर्वे म्हणजे दादोपंत बर्वे नेवरेकर यांचे पुत्र. दादोपंत बर्व्यांची बहीण राधाबाई म्हणजे बाळाजी विश्वनाथ भट यांच्या पत्नी. मल्हारपंत बर्वे, बाळाजी विश्वनाथांबरोबर देशावर आले आणि थोरल्या शाहू महाराजांकडे रुजू झाले. शाहू महाराजांच्या सैन्याची जमावाजव करण्यात मल्हारपंतांनी चांगला पुढाकार घेतला आणि शाहू महाराजांचा आशीर्वाद मिळवला. पुढे त्यांना सिन्नर जवळील कोठूर गावचे वतन मिळाले. तेव्हा शाहू महाराजांच्या विद्यमाने बहिरोपंत पिंगळे यांच्या भावाच्या मुलीचा विवाह मल्हारपंत यांच्याशी करण्यात आला. इथून देशस्थ कोकणस्थ विवाह संबंध सुरु झाले असे इतिहासकार सांगतात.
यात एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे की, या विवाह संबंधात काहीही गैर आहे असे दोन्ही ब्राह्मण कुटुंबांना वाटले नाही आणि शाहू महाराज ज्यांना धर्माची देखील जण होती त्यांनी लग्नाला आशीर्वाद दिल्यामुळे ही चर्चा इथेच थांबवणं इष्ट ठरेल. थोडक्यात देशस्थ आणि कोकणस्थ यांच्यातल्या संबंधाला कोण्ही विरोध केला नाही आणि अमान्यता देखील दर्शवली नाही.
मग हा वाद कुठून निर्माण झाला? हा महत्वाचा प्रश्न आहे..
देशस्थ कोकणस्थ वादाची ठिणगी
या विषयाकडे येण्याआधी मानवी मानसशास्त्रासंबंधी काही गोष्टी नमूद करणे गरजेचे आहे. महत्वाकांक्षा प्रत्येकाला असते, प्रत्येकाला प्रगती आणि पुरुषार्थ यांची ओढ असते, कोणताही माणूस चटकन आपला वाटा दुसऱ्याला काढून देत नाही, माणसाला कायम आपले गमावण्याची भीती असते, समाज कुठलाही असो वर्चस्व मिळवण्यासाठी प्रत्येक समूह धडपड करत असतो. यात लगेच कोणाला दोषी ठरवून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे अत्यंत चुकीचे ठरेल.
ज्या लोकांना या सगळ्या उद्योगांचे उदात्त उद्दिष्ट माहित असते तेच समाजासाठी काही चांगले करू शकतात. याची उदाहरणे मी पुढे देईनच. तूर्तास या वादाची ठिणगी कुठे आणि कशी पडली ते पाहू.
बाळाजी विश्वनाथ भेट देशावर येईपर्यंत आणि ते पेशवे होईपर्यंत कोकणस्थांना कोकण सोडून इतर भूभाग देखील नीटसा माहित नसावा. पण महाराष्ट्रात उत्तर कोकण हा एक भूभाग आहे जिथे सह्याद्रीने काहीशी विश्रांती घेतलेली आहे. त्यामुळे कोकण आणि देश अगदी एकमेकांना लागून असल्यासारखे वाटतात. तेव्हाच्या काळी दोन्ही शाखांना मंदिरांचे धर्मकार्य करण्याचा अधिकार होता. पण प्रत्येकाने आपापले क्षेत्र अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला होता. थोडक्यात या शाखेचे ब्राह्मण त्या शाखेच्या ब्राह्मणांच्या अधिपत्याखाली असलेल्या मंदिरात अग्निहोत्र वगैरे कार्ये करू शकत नव्हती. आधी म्हटल्याप्रमाणे वाद नसले तरी फार गळामिठी देखील नव्हती.
इ. स. १७३०-३५ काळात वसई प्रांतातील सरदेशपांडे अंताजी रघुनाथ कावळे, देशस्थ ब्राह्मण पोर्तुगीजांच्या धर्मांतराच्या जाचाला वैतागून आणि या भागातील हिंदूंना धर्मांतराच्या जाचातून मुक्ती देण्यासाठी, पेशव्यांकडे आपले गार्हाणे मांडायला आले. तेव्हा पेशव्यांनी त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. पोर्तुगीजांना याची बातमी मिळताच त्यांचे सरदेशपांडेपद काढून घेतले. पुढे १७३९ मध्ये पेशव्यांनी वसई प्रांत हिंदवी अमलाखाली आणल्यावर अंताजी कावळे यांना त्यांचे सरदेशपांडे पद पुन्हा बहाल करण्यात आले. या लढाईत अंताजीचे सामर्थ्य पेशव्यांच्या बाजूने होते. इथपर्यंत ठीक सुरु होतं पण अंताजी कावळे यांचा मृत्यू होताच “निर्मळेश्वराच्या” दारी वादाची पहिली ठिणगी पडली!
पेशव्यांचे प्रांत सुभेदार शंकराजी केशव यांनी वसई येथे निर्मळेश्वराची स्थापना केली. तेव्हा मंदिराच्या प्रासादप्रतिष्ठापनेसाठी कोकणस्थांबरोबर त्या प्रांतातले प्रमुख वेदशास्त्री तुकंभट्ट धर्मभट्ट जावळे पळशीकर यांना देखील बोलावले. पण त्यांनी श्रेष्ठत्वाच्या कारणावरून कोकणस्थांबरोबर पंक्ती व्यवहार करण्याचे नाकारले. हे देशस्थ कोकणस्थ वादाचे बीज आणि इथे खऱ्या अर्थाने वाद सुरु झाले.
पुढे हे वाद अधिकाधिक वाढत गेले ज्याचे पर्यावसान काही कोकणस्थांकडून, वे. तुकंभट्ट धर्मभट्ट जावळे पळशीकर यांच्या अग्निहोत्राचे विच्छिन्न करण्यात झाले. ज्याची फिर्याद १७४३ साली पळशीकरांनी पेशव्यांकडे केली. या फिर्यादीच्या संमतीसाठी केवळ देशस्थच नव्हे तर कोकणस्थ आणि कऱ्हाडे ब्राह्मणांनी देखील पळशीकरांची बाजू उचलून धरली होती. याचे कारण प्रश्न श्रेष्ठ कनिष्ठ हा नसून धर्माचा होता. त्याकाळी हा उदात्त विचार जिवंत होता! अर्थातच पेशव्यांनी पळशीकरांच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे काही कोकणस्थ नाराज झाले. पण या नाराजीला विशेष महत्व प्राप्त झाले नाही कारण पेशव्यांच्या पदरी देशस्थ आणि कोकणस्थ या भेदाला स्थान नव्हते. पेशव्यांनी कौल देताना जे पात्र पाठविले त्याचा मजकूर तर आधुनिक भाषेत सांगायचं झालं तर फ्रेम करून ठेवण्यासारखा आहे.
न्याय जैमिनीकृत ( मीमांसा ) शद्धबुद्ध व्यासाने निर्मलेले धर्ममय ग्रंथ पाहावे आणि विद्वज्जनांनी येथे दोष देऊ नये. अविद्येपासून व्यर्थ भेद उत्पन्न होईल यांकरिता दुग्ध आणि उदक यांच्या भेदाचे ज्ञान ज्या हंसांस आहे त्यांना हे पत्र पाठविले आहे.
असो, हे वादाचे मूळ! अविद्या दोन्ही बाजूंना विनाकारण अनर्थ करण्यास भाग पाडते.
पुढे दोन्ही बाजूंनी अनेक खटले आणि प्रकरणे झाली ज्यातून काही ब्राह्मणांच्या मनात एकमेकांबद्दल आढी निर्माण झाली. पानिपतच्या युद्धाच्या नुकसानीचे खापर एकमेकांवर फोडण्याच्या गोष्टी झाल्या. त्यातून हा वाद आणखीनच वाढला. पुढे नाना फडणीस कोकणस्थांना प्राधान्य देतात असाही आरोप झाला. कैक प्रकारे एकमेकांकडे बोट दाखवण्याची कारस्थाने झाली. या दुहीचा फायदा परकीयांनी घेतला असे ग्रांट डफ सांगतो. पण मराठ्यांचे राज्य बुडण्यास ही दुही जबाबदार आहे हे म्हणण्यात फारसे तथ्य नाही. कारण, अशा प्रकारची दुही खऱ्या अर्थाने सत्ता असलेल्या मंडळींमध्ये अधिक प्रखर होती. असो तो विषय वेगळा. ग्रांट डफ ला पूर्णपणे इतिहासकार म्हणणे देखील चुकीचे ठरेल. असो हा मुद्दा वेगळा.
पण, सुदैवाने या वादाला राजकारणात आणि धार्मिक व्यवस्थेत महत्वाचे स्थान नसल्यामुळे त्याचा परिणाम राज्यावर झाला नाही. आणि हा वाद केवळ “एक धुसफूस” इथपर्यंतच टिकला. ज्याचा उपयोग त्याकाळात सरदार, वतनदार, कुलकर्णी वगैरे अधिकारी मंडळी आपल्या अपयशाचे खापर फोडण्यासाठी करत असत. यातून हे वाद घरोघरी पोहोचले. नानासाहेब पेशव्यांच्या काळात हा वाद अधिक झाला आणि पुढे काळ बदलला, पेशवाई गेली, मराठा साम्राज्य देखील गेले, परदेशी आक्रमणकारी “साहेब” झाले, आणि वर्चस्वाचा हा वितंड वाद विवाहसंबंध आणि चेष्टेपुरता उरला. जो बऱ्याच प्रमाणात आजही बघायला मिळतो.
देशस्थ आणि पेशवे
साधारणतः कोकणस्थांना ज्यांच्याबद्दल अभिमान आहे ते म्हणजे “पेशवे”. अगदी कोकणस्थ वेगळे देशस्थ वेगळे असे मानणारे देखील पेशव्यांबद्दल भरभरून बोलतात. आता पेशव्यांचाच आधार घेऊन काही गोष्टी सांगतो ज्यावरून हे लक्षात येईल की पेशव्यांच्या ठायी हा भेद कधीही उत्पन्न झाला नाही आणि त्याला थारा देखील नव्हता.
१. बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या बरोबरीने लढणारे अनेक सादर देशस्थ होते.
२. बाळाजी विश्वनाथ भट पेशवे कोकणस्थ आणि सरदार पुरंदरे देशस्थ यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते जे केवळ कौटुंबिक पातळीवरच बघायला मिळतात.
३. श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी आणि पुढे त्यांच्या वंशजांनी ज्यांना आपल्या गुरुस्थानी मानले ते ब्रह्मेंद्रस्वामी, शिवरामभट चित्राव हे सगळे देशस्थ ब्राह्मण होत
४. श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या बहिणींपैकी थोरल्या बहिणीचा विवाह घोरपडे जोशी या देशस्थ कुटुंबातील व्यंकटराव घोरपडे यांच्याशी झाला.
५. विश्वासराव पेशवे यांच्या पत्नी राधिकाबाई या देशस्थ गुप्ते घराण्यातील सुकन्या होत्या. हे ही लग्न थोरल्या शाहू महाराजांच्या अनुग्रहाने झाले. आणि गोपिकाबाईंना हे रुचले नव्हते. याचे कारण देखील हाच अंतर्गत वितंड आणि निरर्थक वाद आहे.
हे झाले अगदीच कौटुंबिक दाखले.. आता काही आणखीन दाखले देतो म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठ या निरर्थक वादावर पूर्णविराम लागेल
१. पेशव्यांचे उत्तरेकडचे प्रतिनिधी गोविंद बल्लाळ बुंदेले (खेर) हे कऱ्हाडे. यावरून हे ही लक्षात येते की पेशव्यांकडे “गुणाः पूजास्थानं” हाच नियम होता.
२. पेशव्यांचे सरदार तुळशीबागवाले, विंचूरकरकर, नारोशंकर, अंताजी माणकेश्वर, सखाराम बापू बोकील, नेवाळकर हे सगळे देशस्थ ब्राह्मण होते. ही यादी फार मोठी होऊ शकते पण मुद्दा लक्षात यावा यासाठी हात आखडता घेत आहे.
३. पेशव्यांचे सरन्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे देखील देशस्थ ब्राह्मण
४. साडे तीन शहाण्यांपैकी निम्मे शहाणे नाना फडणीस सोडले तर बाकी सगळे देशस्थ.
ते सांगावी समूळ कथा । तरी विस्तार होईल ग्रंथा ।
यालागीं ध्वनितार्थ बोलिलों आतां । कळलें पाहिजे निर्धारें ॥
~ शिवलीलामृत ११ वा अध्याय
शिवलिलामृताच्या वरील ओवीचा आधार घेऊन दाखले थांबवणे योग्य राहील. माझ्या मते या ब्लॉगमध्ये दिलेल्या दाखल्यांवरून देशस्थ कोकणस्थ हा वाद किती अतार्किक, निरर्थक आणि अकारण वितंड व दरी निर्माण करणारा आहे हे लक्षात यायला हरकत नाही. एका अर्थी हे बरे आहे की काळ जात आहे तसा हा वाद काही प्रमाणात निवळत आहे कारण, आजकाल या दोन विभागांमध्ये किंवा शाखांमध्ये संबंध खुशीने होत आहेत. ज्या वादाला शास्त्राधार नाही धर्माधार नाही त्याचे उच्चाटन होणेच इष्ट आहे. बाकी चेष्टा किंवा थट्टा यांनी आपल्या सीमारेषेच्या आत राहणेच योग्य आहे याची जाणीव सगळ्यांना असली पाहिजे.
आणि याविषयी लोकमान्य टिळकांचे उद्गार माझ्या मताला आणखीन बळकटी देणारे आहेत.
