आज १८ जून, झाशी ची राणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर यांची पुण्यतिथी. परकीयांच्या आक्रमणाला न घाबरता युद्ध करणारी मणिकर्णिका! शस्त्र खाली ठेवलेल्या आप्तांनी परकीयांना मदत केली आणि राणी लक्ष्मीबाई ला आपले राज्य वाचवण्यासाठी हातात शस्त्र घ्यावे लागले. एखाद्या विधवेला हाती शस्त्र घ्यायला विवश करणाऱ्या आप्तांबद्दल फारशी सहानुभूती ठेवण्यात काहीही अर्थ नाही. त्या काळी समाजाचे नियम देखील कडक होते. काहींना वाचताना विचित्र वाटेल पण पती निवर्तल्यावर स्त्रियांनी पाळायचा धर्म वेगळा होता. राणी लक्ष्मीबाईच्या मनात देखील कधी युद्ध करावयाचे नव्हतेच. पण परिस्थिती अशी होती की त्यांना आपला धर्म सोडून हिंदू धर्मासाठी शस्त्र हाती घ्यावे लागले. याची हकीकत “विष्णुभट गोडसे” यांच्या “माझा प्रवास” अथवा “सन १८५७ च्या बंडाची हकीकत” या प्रवासवर्णनात सापडते.
हा संदर्भ देण्याचा उद्देश धर्मशात्र अथवा नीतिशास्त्र शिकवणे हा नाही. ही हकीकत याकरिता सांगणे महत्त्वाचे आहे की धर्म हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. ज्याला जो धर्म पाळायचा असेल त्याला तो पाळता यायला हवा. सनातन धर्मात तर ज्याला सध्या आपण ज्याला “धर्म” समजतो त्याहून फार वेगळ्या व्याख्या आहेत. त्याकाळच्या कोणत्याही धार्मिक स्त्रीप्रमाणे राणी लक्ष्मीबाई यांना आपल्या धर्माचे पालन करायचे होते. राज्यकारभार सांभाळायचा होता, मुलाच्या भवितव्याकडे लक्ष द्यायचे होते आणि उरलेला वेळ परमार्थात घालवायचा होता. पण गोडसे यांनी सांगितलेल्या प्रसंगावरून एक गोष्ट तर निश्चित होती की आपल्या मनात असलेला धर्म सोडून शस्त्र घेऊन बाहेर पडण्यात राणी लक्ष्मीबाई यांची विवशता होती. त्यांच्या वाक्यांत त्यांची अगतिकता आणि दुःख देखील दिसून येते.
कोणत्याही स्त्रीप्रमाणे त्यांची देखील स्वप्ने होती. पाळायचे काही निश्चित धर्म होते. पण आप्तांनी परकीयांना साथ दिली व ते मांडलिक झाले. ज्यांना मांडलिक होता आले नाही त्यांनी युद्ध केले. ज्यात आधी मांडलिक झालेल्यांनी, आपल्याच लोकांना हरवायला ब्रिटिशांची मदत केली. हे दुर्दैवच म्हटले पाहिजे. राणी लक्ष्मीबाई यांच्या दुःखाला ब्रिटिशांपेक्षा भारतीय अधिक कारणीभूत होते हे म्हटले तर वावगे ठरणार नाही. इथे हे देखील सांगणं गरजेचं आहे की आपल्या आजच्या स्वातंत्र्याच्या संकल्पना आणि त्याकाळच्या स्वातंत्र्याच्या संकल्पना यात जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे आजचे चष्मे घालून त्या काळाबद्दल विचार केल्यास दिशाभूल होणार हे निश्चित. तसेच धर्माबद्दल आपल्या संकल्पना आणि इतरांच्या संकल्पना यांच्यात गल्लत होता काम नये हे देखील महत्त्वाचे आहे, कारण प्रत्येकाला आपला धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य आहे आणि ते असले देखील पाहिजे.
दुर्दैवाने १९५७ च्या या युद्धात झाशी ची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे वगैरे भारतीय योद्ध्यांचा पाडाव झाला आणि संबंध हिंदुस्थान ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आला. राणी लक्ष्मीबाई यांच्या मुलाचे पुढे काय झाले हे देखील हृदयद्रावक आहे. त्यांच्यावर आलेल्या या दुःखाला देखील आप्त अधिक जबाबदार आहेत.
या शूर विरांगनेचे स्मरण करूया जिला आपल्याच स्वकीयांच्या मुळे यथोचित अंतिम संस्कार देखील मिळाले नाहीत. तिच्याच काही चाकरांनी यथा तथा जमवाजमव करून अंतिम संस्कार करून घेतले. असे असूनही या धर्माभिमानी वीरांगनेला स्वर्गप्राप्ती झाली असणार यात किंचितही शंका नाही!