मॅडम तुसाद – एक प्रसिद्ध अपरिचित कलाकार
मॅडम तुसाद (Madame Tussaud) (१ डिसेंबर, १७६१ – १६ एप्रिल, १८५०), एक प्रसिद्ध मूर्तिकार. त्यांचे मूळ नाव “मेरी”. आज त्यांनी स्थापित केलेली मेणाच्या पुतळ्यांची संग्रहालये Madame Tussauds जगभरात प्रसिद्ध आहेत. गरिबीतून मार्ग काढत, नशिबाची साथ मिळत नावारूपास आलेल्या मॅडम तुसाद यांची आयुष्यगाथा खूप रोचक आहे. खरं सांगायचं तर मॅडम तुसाद यांचे नाव प्रसिद्ध आहे पण त्यांच्या आयुष्याबद्दल फार कुणाला माहित नाही. एक काळ असा होता की कदाचित त्यांना जीव गमवावा लागला असता. त्यांच्यावर अत्यंत दुर्दैवी प्रसंग देखील आले. त्यांच्या आयुष्याच्या पूर्वार्धाबद्दल थोडं सांगणार आहेच पण, या ब्लॉगमध्ये मुख्यत्वे फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये मॅडम तुसाद कशा अडकल्या आणि त्यांच्या जीवावर कसं बेतलं होतं?
पूर्वार्ध – मेरी तुसादचे आयुष्य
मेरी तुसाद यांच्या जन्म स्ट्रॉसबर्ग येथे झाला. त्यांच्या जन्माच्या आधी १७६१ साली त्यांच्या वडिलांचे स्ट्रॉसबर्गच्या लढाईत निधन झाले. त्यामुळे मेरी तुसाद यांच्या आईने, स्वित्झर्लंड मधील बर्ने गावी राहणाऱ्या, डॉक्टर फिलिप कर्टीयस (Philippe Curtius) यांच्या घरी घरकाम सुरू केले. डॉक्टर कर्टीयस यांना मेणाचे पुतळे बनवण्याचा छंद होता आणि त्यात ते प्रवीण देखील होते. डॉक्टर लोकांना त्यांच्या मागणीनुसार मेणाचे पुतळे बनवून देत असत. त्यांच्याकडे अर्धाकृती पुतळ्यांचा एक संग्रह होता. आणि इथेच मेरीच्या आयुष्याला पहिले वळण मिळाले. लहान मेरीला हे मेणाचे पुतळे बनवणे आवडू लागले आणि बघता बघता मेरी तुसाद डॉक्टर कर्टीयस यांच्या शिष्या झाल्या.
कालांतराने मेणाच्या पुतळ्यांच्या निमित्ताने, डॉक्टर कर्टीयस यांचा संबंध फ्रान्समधील उच्चभ्रू लोकांशी येऊ लागला. तेव्हा आपल्या नोकरांसह डॉक्टर कर्टीयस फ्रान्सला राहायला गेले. तिथे मेरी तुसाद यांचा संबंध देखील मोठ्या आणि उच्चभ्रू लोकांशी येऊ लागला. याच काळात मेरी तुसाद यांनी मेणाचे पुतळे बनवण्यात प्राविण्य मिळवले. साधारण १७८० च्या दरम्यान मेरी तुसाद यांची फ्रान्सचे राजे लुईस सोळावा याच्याशी झाली. मेरी तुसाद यांची नेमणूक राजाने त्यांची बहीण मॅडम एलिझाबेथ यांची कला शिक्षक म्हणून केली. आणि “मेरी तुसाद” ची “मॅडम तुसाद” झाली!
आचार्य चाणक्यांनी फार पूर्वी सांगितलेलं होतं की राजपरिवाराशी संबंध जपून करावेत. मॅडम एलिझाबेथ यांच्या शिक्षिकेचे काम सुरु झाल्यावर काही दिवसांनी त्याची परिणीती मॅडम तुसाद यांना आली.
मॅडम तुसाद आणि रक्तरंजित फ्रेंच राज्यक्रांती
१७९४ च्या दरम्यान रक्तरंजित फ्रेंच राज्यक्रांती सुरू झाली आणि राजघराण्याबाबतीत लोकांचा क्षोभ उसळून आला. राजघराण्याशी संबंध असलेल्या सगळ्यांची धरपकड सुरू झाली. त्यांना पकडण्यात आलं, वपन करून गावातून धिंड काढण्यात येऊ लागली आणि शेवटी मुंडकी उडवण्यात आली. याच “क्रांती”च्या दरम्यान मॅडम तुसाद यांना देखील बंदी बनवण्यात आले. त्यांचे केस कापून कारागृहात ठेवण्यात आले. मॅडम तुसाद तीन महिने कारागृहात, मृत्यूची वाट बघत होत्या. पण दैव बलवत्तर होते आणि काळ आला तरी वेळ आलेली नव्हती.
डॉक्टर कर्टीयस यांच्या ओळखीने आघाडीच्या क्रांतिकारक जीन-मेरी कोलॉ डी हरबोई (Jean-Marie Collot d’Herbois) यांनी तुसाद यांना सोडवले. पण त्यांचे शुक्लकाष्ठ इथेच संपले नाही. आपण राजघराण्याला सहानुभूती दाखवत नाही हे सिद्ध करण्यासाठी क्रांतिकारींनी तुसाद यांना, राजघराणे आणि त्यांच्याशी संबंधित लोकांच्या शरीरापासून अलग केलेल्या डोक्यांचे वापर करून मेणाचे पुतळे बनवायला लावले. यात त्यांची मैत्रीण Marie Thérèse Louise of Savoy, Princesse de Lamballe ज्यांना जमावाने मारून टाकले होते, राणी Marie Antoinette आणि प्रसिद्ध वकील Maximilien Robespierre यांचा समावेश होता. हे सगळे अत्यंत वेदनादायी होते, मनाला हेलावून सोडणारे होते.
Madame Tussaud’s – संग्रहालय
१७९४ मध्येच डॉक्टर कर्टीयस यांचा मृत्यू झाला आणि त्यांनी आपल्या मेणाच्या पुतळ्यांचा मोठा संग्रह मेरीसाठी मागे ठेवला. १८०२ मध्ये मॅडम तुसाद इंग्लंडला गेल्या. तिथे त्यांनी या पुतळ्यांचे आणि त्यांनी बनवलेल्या पुतळ्यांचे प्रदर्शन भरवणे सुरू केले. वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शन मांडल्यानंतर शेवटी त्यांनी लंडनमध्ये कायमस्वरूपी संग्रहालय बांधले. ८० च्या घरात वय गेल्यावर त्यांनी स्वतःचा एक पुतळा बनवला आणि प्रदर्शनात ठेवला. लोक तो पुतळा बघायला यायचे आणि तुसाद यांना स्वतःला त्या प्रदर्शनाची तिकिटे देण्यात आनंद वाटत असे. १९२५ च्या आगीत अनेक पुतळे भस्मसात झाले आणि द्वितीय महायुद्धात जर्मनीच्या हल्ल्यात अनेक पुतळे उद्ध्वस्त झाले. पण त्यांचे साचे शाबूत राहिल्याने ते पुतळे पुन्हा बनवता आले! हळूहळू मेणाच्या पुतळ्यांची संग्रहालये जगभर उभी राहू लागली.
तर ही आहे कहाणी मॅडम तुसाद आणि रक्तरंजित फ्रेंच राज्यक्रांतीची!
इतिहासाशी निगडित असे रोचक ब्लॉग्स वाचण्यासाठी इथे क्लीक करा.