इतिहासाची पाने उलटताना कधीकधी अचानक धक्कादायक, अजब घटना आणि व्यक्ती समोर येतात. माणूस विचारात पडतो की असं कसं घडलं!? एलिझाबेथ बॅथरी चा (Elizabeth Bathory) जन्म, युरोपमधील हंगेरी मध्ये राजकीयदृष्ट्या एका प्रभावशाली कुटुंबात ७ ऑगस्ट १५६० साली झाला. तिचे काका पोलंड चे राजे आणि पुतण्या ट्रान्सिल्व्हानिया चा राजपुत्र. तिचा पती फेरेंक नाडासडी (Ferenc Nádasdy) हा सुद्धा एक उमराव, सरदार होता होता. तसं पाहिलं गेलं तर तिचं आयुष्य इतकं रक्तरंजित असावं असं काहीही नाही. पण त्या काळी, तिच्यावर जवळपास ६५० मुलींचे बळी घेतल्याचा आरोप केला गेला आणि त्यानुसार शिक्षा देखील झाली.
एलिझाबेथ बद्दल थोडक्यात..
नुसता बळी घेतला असता तरीही एक क्रूर व्यक्ती, दानवी व्यक्ती म्हणून सोडून दिलं असतं. कारण याहून कैक जास्त लोक हिटलर, स्टालिन, माऊ से तुंग, आणि इस्लामी आक्रमणकर्त्यांनी मारलेले आहेत. पण जी गोष्ट ऐकून मनात धस्स झालं ती म्हणजे, एलिझाबेथ वर आरोप हा होता की ती त्या मुलींच्या रक्ताने नहात असे, रक्त पीत असे. त्यांना चावत असे. अत्यंत बीभत्स चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं हे ऐकल्यावर!
प्रभावशाली कुटुंबाची महिला असल्याने एलिझाबेथ च्या हाताखाली भरपूर जमीन आणि सावकारी होती. एलिझाबेथ ने आजूबाजूच्या प्रदेशातील शेतकरी कुटुंबातील मुलींचा, तिच्याकडे कामाला असणाऱ्या नोकर मुलींचा आणि कधी कधी छोट्या कुलीन कुटुंबातील मुलींचा बळी घेतला. त्यांचे बळी घेतले म्हणजे आपले तारुण्य टिकून राहील असं तिला वाटत असे.
पराकोटीचे छळतंत्र
दिसायला सुंदर, कुलीन आणि कुलीन स्त्रीच्या व्यवहाराबद्दल ज्ञानी, अशी एलिझाबेथची ख्याती. पण, मनःस्थिती आणि विचार अत्यंत बीभत्स. आपल्या बळींचा ती आधी भयंकर छळ करत असे. आख्यायिका अशी आहे की हे सगळे छळाचे प्रकार तिने आपल्या सेनानी पतीकडून शिकून घेतले. कुलीन घरचे लोक आपल्या मुलींना तिच्याकडे “कुलीन स्त्रियांनी कसे राहावे/असावे?” हे शिकायला पाठवत असत. पण, एलिझाबेथ आपल्या विक्षिप्त विचारांनी ग्रासलेली होती. ती तिच्या आजूबाजूच्या मुलींना कोठडीत बंद करत असे, शारीरिक छळ करत असे. ऐतिहासिक कागदपत्रांनुसार खालील पद्धतींनी एलिझाबेथ मुलींचा छळ करत असे..
- मुलींच्या अंगावर मध टाकून त्यांच्यावर मधमाशांना सोडणे. जेणेकरून मधमाशांच्या डंखांनी मृत्यू येईल
- आत्यंतिक मारहाण, उपासमार, हात कापणे, अत्यंत थंड पाण्यात बुडवणे
- काही प्रत्यक्षदर्शी आणि बचावलेल्या मुलींनी, शरीरावर, जिभेवर सुईंनी डागल्याचं किंवा कात्रीने वार केल्याचं देखील सांगितलं
- काहीं मुलींनी वक्षांवर, खांद्यांवर, चेहऱ्यावर आणि मानेवर चावा घेतल्याचे सांगितले
- एक आरोप तर असा होता की एका मुलीला तिच्याच शरीरातील मांस खायला लावले!
एलिझाबेथ ने त्या मुलींचा पराकोटीचा अमानुष छळ केला. नुसतं वाचून सुद्धा अंगावर काटा येतो. असं म्हणतात की १६०५ साली तिच्या पतीचे निधन झाल्यानंतर तिचा छळ अधिकच वाढला. एलिझाबेथ या मुलींचे रक्त अंगाला लावते, किंवा पीते हा आरोप तिच्या मृत्यूनंतर लावला गेला त्यामुळे त्याबद्दल साशंकता आहेच. पण, प्रत्यक्षदर्शींनी याची साक्ष दिल्याने संपूर्णपणे नाकारता देखील येणार नाही. तिच्या मनाची ही ठाम समजूत होती की या मुलींच्या बळींमुळे तिचे तारुण्य टिकून राहील.
शेवट
शेवटी या सगळ्या काळ्यापर्वाला विराम लागलाच जेव्हा, एका कुलीन कुटुंबाने एलिझाबेथवर त्यांच्या मुलीचा खून केल्याचा आरोप लावला. आरोप फार गंभीर होता. हंगेरीचा राजा मथायस (King Matthias II) ने आपल्या सर्वात निष्णात मंत्र्याला थ्रूझो ला (György Thurzó) तपास करायला सांगितलं. जवळपास ३०० लोकांनी आपली जबानी नोंदवली आणि अखेरीस एलिझाबेथ आणि तिचे ४ नोकर आरोपी सिद्ध झाले. नोकरांना ताबडतोब फासावर लटकवण्यात आलं. पण थ्रूझो ने राजाला सल्ला दिला की एलिझाबेथला फाशी न देता आजन्म कारावास द्यावा नाहीतर लोकांचा कुलीन लोकांवरचा विश्वास उडून जाईल. त्यानुसार एलिझाबेथ ला आजन्म कारावास ठोठावण्यात आला. आणि शेवटी २१ ऑगस्ट १६१४ रोजी तिचा त्याच चाकस्टाइस किल्ल्यात नजरकैदेमध्ये मृत्यू झाला.
या कुलीन वाटणाऱ्या चेहऱ्यामागे खरोखर कोणी माणूस होता की एक स्त्री ड्रॅक्युला .. देव जाणे! आवडल्यास नक्की शेअर करा.
आणखीन अशा रोचक कथा आणि किस्से वाचायला इथे क्लिक करा