तर गोष्ट अशी की, बऱ्याच वर्षांपूर्वी एका नदीच्या किनारी एक साधू राहत होते. त्यांच्याकडे रोज सकाळी एक निरक्षर आणि साधी भोळी गवळीण दूध देण्यासाठी येत असे. पण तिच्या येण्याची वेळ निश्चित नसायची. याचे कारण म्हणजे तिचे घर नदीच्या पलीकडे होते. त्यामुळे तिला येण्याजाण्यासाठी नावाड्यांवर अवलंबून राहणे भाग होते. जोपर्यंत नावाडी आणि नाव उपलब्ध होणार नाही तोपर्यंत तिला नदी पार करून, साधूंच्या घरी जाणे शक्य नव्हते. साधूंनी एके दिवशी तिला येण्याच्या अनियमित वेळेबद्दल विचारलं.
“तुझी वेळ निश्चित कशी नाही? कधी लवकर कधी उशिरा!”
“महाराज, मी रोज वेळेतच नदीकाठी पोहोचते. पण, जोपर्यंत नावाडी उपलब्ध होत नाही तोपर्यंत मला नदी पार करून येणं शक्य नाही!” गवळीण उत्तरती झाली.
साधूने काहीशा अहं आणि काहीशा मिश्किल भावाने सांगितले “अगं, देवाचे नाव घेत घेत लोक आयुष्यरुपी समुद्र, भवसिंधु पार करतात. तुला साधी नदी पार करता येत नाही!?”
गवळीण आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली “मला हे माहीतच नव्हतं. मी नक्की असंच करेन”
त्या साध्या भोळ्या गवळीणीचे उत्तर ऐकून, साधू मनोमन हसला. पण दुसऱ्या दिवसापासून गवळीण रोज वेळेत येऊ लागली. बरेच दिवस वेळेची गल्लत झालेली नाही हे पाहून, शेवटी साधूने गवळीणीला विचारले.
“अगं, इतके दिवस तुझ्या येण्याची वेळ अनियमित होती पण, अचानक तू रोज वेळेत कशी काय येऊ लागली आहेस?”
गवळीणीने अगदी साधे उत्तर दिले “महाराज आपणच मार्ग दाखवला”
“म्हणजे !?” साधूने विचारले
“आपणच तर सांगितलं की, देवाचं नाव घेत घेत नदीदेखील पार करता येईल. मी तसंच करते, देवाचे नाव घेत घेत, चालते आणि नदी पार करते” गवळीण म्हणाली
“काय सांगतेस !?” साधूला विश्वासच बसेना. “म्हणजे तू पाण्यावर चालतेस!?”
“हो” गवळीण म्हणाली
“चल दाखव मला” साधू म्हणाला
दोघे नदीकाठी गेले. गवळीण देवाचे नाव घेत घेत नदीच्या पाण्यावर चालू लागली. काही पावले टाकल्यावर मागे बघते तर साधू अजून नदीकाठी आहेत. साधूंनी पाण्यात भिजू नये म्हणून आपले सोवळे वर धरले होते आणि विचारात पडले होते. ते पाहून गवळीण म्हणाली
“साधू महाराज, तुम्ही देवाचे नाव घेत घेत येत का नाही? तुम्ही जर असेच पाण्यात भिजण्याच्या भीतीने नदीकाठी उभे राहिलात तर नदी कशी पार करणार? देवाचे नाव घेत घेत तुम्हाला नदी पार करता आली नाही तर भवसिंधु कसा पार करणार?”
साधू नदीवर चालणाऱ्या गवळीणीकडे बघत राहिला!
इतर कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
Atishay sundar lekh
धन्यवाद 🙏🏻