May 19, 2024
केशवकरणी वृत्त – नियम आणि उदाहरणे

केशवकरणी वृत्त – नियम आणि उदाहरणे

Spread the love

वृत्ताचे नाव – केशवकरणी

वृत्त प्रकार – मात्रावृत्त

वृत्त मात्रा संख्या – ध्रुवपद : २७, १६ आणि कधीकधी अंतरा २१ मात्रांचा

मात्रांची विभागणी – ध्रुवपदात पहिल्या चरणात २७ आणि दुसऱ्या चरणात १६ मात्रांच्या विभांगामध्ये विभागले जाते. काही काव्यांमध्ये सगळे काव्य अशाच मांडणीत असते. काही काव्यांमध्ये ध्रुवपद वरीलप्रमाणे आणि अंतऱ्यातील चरणे २१ मात्रांच्या असतात.

यति – निश्चित नियम नाही

नियम
ध्रुवपदाच्या पहिल्या चरणात २७ मात्रा
ध्रुवपदाच्या दुसऱ्या चरणांत १६ मात्रा

क्वचित प्रसंगी
अंतऱ्याच्या चरणात २१ मात्रा

केशवकरणी बद्दल माहिती

केशवकरणी हे एक प्राकृत वृत्त आहे. म्हणजे हे वृत्त किंवा छंदाचे मूळ संस्कृत भाषेत सापडत नाही. उत्तुंग प्रतिभेचे धनी शाहीर रामजोशी यांच्या “केशवकरणी अदभुत लीला..” या काव्याच्या रचनेवरून “केशवकरणी” छंदाची व्युत्पत्ति झालेली आहे!

लावणी आणि पोवाड्यांसाठी या वृत्ताला एक उत्तम चाल लागते आणि गाणाऱ्याला देखील आपले कथन तालाच्या ठेक्यावर करता येते. शाहिरी वाङ्मयाने मराठीला दिलेला हा एक बहुमोल अलंकार आहे.

केशवकरणी वृत्ताची उदाहरणे

केशवकरणी अद्भुत लीला नारायण तो कसा । (२११११२ २११ २२ २२११ २ १२ = २७)
तयाचा सकळ जनावर ठसा । (१२२ १११ १२११ १२ = १६)
माधवमहिमा अगाध गोडी गोविंदाच्या रसा । (२११११२ १२१ २२ २२२२ १२ = २७)
पी जा जीव होइल थंडसा । (२ २ २१ २११ २१२ = १६)

रामजोशींच्या कवित्वावर प्रसन्न होऊन महाकवी मोरोपंत त्यांना “कवीश्वर” किंवा “कविप्रवर” म्हणून संबोधू लागले. दोन महान कवी एकाच ठायी! केवढे भाग्य लाभले असेल त्यांना ज्यांना या विभूतींचा सहवास लाभला असेल!

केशवकरणी वृत्ताची आणखीन काही उदाहरणे खाली देत आहे. यांचा उपयोग वाचक/विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी करू शकतात. तुमचा अभ्यास या ब्लॉगच्या comments मध्ये दाखवू शकता. आणखीन काही उदाहरणे असल्यास ती देखील comments मध्ये देऊ शकता!

महद्नह्ययोनींत महेश्वरवीर्य धरी चंडिका ।
जगाची जननी ही पिंडिका ! !
गर्भवतीचें दिगुदर दाही दिशा फुगेल्या पला ।
लागल्या काळाच्याहि कळा॥
ब्रह्मांडाचा पिंड तेधवां प्रसवे हा ती अजा ।
सर्वही भगवंताची प्रजा ॥
– (“गोमांतक”, हिमानी सावरकर)

नवलाईची गोष्ट अशी की हिंदी कवी “भारतेंदु हरिश्चंद्र” यांनी देखील हिंदी भाषेत लावण्या रचल्या आहेत. त्यांच्यापैकी एक लावणी केशवकरणी वृत्तात बांधलेली आहे!

खड़ी अकेली राह देखती बरस रहा पानी ।।
अंधेरी छाय रही भारी ।
सूझत कहूं पंथ सोच करै मन मन में नारी।
न कोई समझाबनवारी ।
चौंकि चौंकि के उझकि झरोखा झौंक रही प्यारी ।।
विरह से व्याकुल अकुलानी ।।

शाहीर रामजोशी यांची आणखीन एक लावणी “भला जन्म हा तुला लाभला”

भला जन्म हा तुला लाभला खुलास हृदयीं बुधा ।
धरिसि तरि हरिचा सेवक सुधा ॥धृ०॥
चराचरीं गुरु तरावयाल नरा शिरावरि हरी ।
जरी तरि समज धरी अंतरीं ।
हटातटानें पटा रंगवुनि जटा धरिशि कां शिरीं ।
मठाची उठाठेव कां तरी ।
वनांत अथवा जनांत हो कां मनांत व्हावें परी ।
हरीचें नांव भवांबुधिं तरी ।

माधव ज्युलियन यांच्या छंदोरचना मध्ये केशवकरणी छंदात बांधलेल्या संत तुकारामबाबांच्या एका पद्याचा उल्लेख आलेला आहे!

भक्तांसाठीं तो जगजेठी बसुन माळ्यावर । पाखरें उडवी सारंगधर ॥ध्रु०॥
भक्तांमध्यें भक्ति पाहा त्या बोधल्यानें केली । थोट ताटाला कणसें आलीं ॥
कैसा तो देव अनंत विठ्ठल अनंत रुपख्याली । कसी देव भक्तांची माउली ॥
त्याचें चरणा पासीं विनवूं जोडून दोन्ही कर ॥ पाखरें०॥१॥
नामदेवाशीं ह्मणती ब्राह्मण जात तुझी ओंगळ । निघ बाहेर करसी विटाळ ॥
गेला देउळामागें त्यानें केले दगडाचे टाळ । हरीनें फिरविलें देऊळ ॥
अगाध लीला त्याची द्वारका एका खांबावर ॥ पाखरे०॥२॥
जनाईच्या घरीं देवें भरल्या पाण्याच्या घागरी । चहूं हातांनीं रांजण भरी ॥
दळण कांडण धुणें धुवुनी पाटी डोईवरी । गवर्‍या वेंचून आणी घरीं ॥
प्रल्हादाला जेव्हां तारिलें जलद अग्नीवर ॥ पाखरें उडवी०॥३॥
चोख्यामेळ्याचें घरीं देवानें सोडिली द्वादशी । तेव्हां तें श्रुत झाले रायासीं ॥
नेलें पाचारुन रायें तेव्हां शिक्षा दिधली त्यासी । देवा तूं मार त्याचा खासी ॥
आगाध तुझी माव कळेना तुका ह्मणे जोडुनि कर ॥ पाखरें उडवी सारंगधर ॥४॥

केशवकरणी वृत्तातील या ब्लॉगच्या comments मध्ये तुम्हीही आणखीन उदाहरणे देऊ शकता!

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *