तारीख २१ फेब्रुवारी. माझ्यासाठी महत्वाचा असलेल्या या दिवशी आम्ही कुटुंबीयांनी थेऊर आणि नंतर मोरगाव येथे जाऊन श्रींचे दर्शन घ्यायचे ठरवले. ही दोन तीर्थक्षेत्रे ठरताच, वडिलांनी आणखीन एका प्राचीन शिवालयाचे नाव सुचवले “पांडवेश्वर”. खरं सांगायचं तर मला पांडवेश्वर या शिवल्याबद्दल काहीही माहिती नव्हती. पांडवांनी या शिवालयाचे स्थापना केली अशी आख्यायिका आहे. वडिलांना वर्तमानपत्रे किंवा तत्सम लेखातून पुरातन वास्तूंबद्दल काही माहिती आली तर ती जपून ठेवायची आणि वेळ आली की त्यांना भेट द्यायची उत्तम सवय आहे! मलाही प्रवास आणि विशेषतः पुरातन वास्तूंना भेट देण्याची आवड असल्यामुळे येथेही जाणे अगदी सहज निश्चित झाले. मोरगाव ते जेजुरी या रस्त्यावर अर्ध्या वाटेतच, जवळार्जुन/जवलार्जुन नावाच्या गावाकडे जाणारा फाटा येतो. हे गाव पार केले की आपण थेट पांडवेश्वर मंदिराजवळ येऊन ठेपतो.

पांडवेश्वर मंदिर “कऱ्हा” नदीच्या काठी आहे. अर्थातच फेब्रुवारी संपत आल्यामुळे नदीत फारसे पाणी नव्हते. लोक पायीच नदीला पार करून जात येत होते. आजूबाजूला पानझडी वनस्पतींचा गराडा आहे (असायचाच, कारण हा भूभागच तसा आहे).
मंदिराच्या प्रवेशद्वारात उभे राहताच लक्षात आले की या मंदिराकडे फारसे कुणाचे लक्ष नाही. आता याचा कुणाला द्यायचा आणि कुणाला नाही हा मुद्दा अलाहिदा. पण हे शिवालय महाराष्ट्रातल्या शेकडो (कदाचित हजारो) दुर्लक्षित हिंदू मंदिरांपैकी एक आहे याची खात्री पटली. पहिली दोन पाऊले चढून गेल्यावर डाव्या हाताला एका वडाच्या पारावर एक भग्नावशेष नजरेस पडला आणि मन खिन्न झाले.. आणखीन एक भग्न मंदिर! या भग्नावशेषावरून मला थेट हंपी ची आठवण झाली. उन्मत्त म्लेंच्छांनी तिथल्या देवी देवतांच्या मुर्त्यांची केलेली वाताहत कुणीही जाऊन बघू शकतं. तिथे देखील अनेक मुर्त्यांचे आता फक्त पायाच्या बाजूचे काही तुटलेले अवशेष शिल्लक आहेत. खरंच उदास व्हायला होतं असं काही पाहिलं की. म्लेंच्छांनी आंपल्या मंदिरांवर अत्याचार केले हा त्यांचा आततायीपणा पण आपण आपल्या भग्न मंदिरांची पुनःउभारणी केली नाही/ उद्धार केला नाही हा आपला करंटेपणा! असो..

थोडे पुढे जाताच आपण शिवालयाच्या प्रांगणात जातो आणि चालुक्य काळात बांधलेले हे भव्य पांडवेश्वर शिवालय दृष्टीक्षेपात येते. कधीकधी मनात विचार येतो की, काळ पुढे गेला पण कातळात घडवलेल्या या वास्तूच खऱ्या चिरंतन आहेत! आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी हा ठेवा सुरक्षित राहावा म्हणून घेतलेले कष्ट! प्रांगणात गेल्यावर आणखीन एक गोष्ट समजते जी विशेषतः महाराष्ट्रातल्या अनेक मंदिरांबद्दल ठळकपणे दिसते. ती म्हणजे ही मंदिरे आणि हे देव स्थानिक ग्रामस्थांसाठी आजही महत्वाची आहेत. दुर्लक्षित पण महत्वाची! किती विचित्र विरोधाभास आहे. हा विरोधाभास म्हणजे आपले आपल्या संस्कृतीप्रती असलेली भावना दर्शवतो. दुर्लक्षित पण महत्वाची..

शिवालय म्हटले की नंदी महाराज आलेच. पण दुरून पाहता हे समजणे सोपे आहे की नंदी महाराजांच्या मंदिराचे बांधकाम तसे नवीन आहे. नंदी कोरीव आणि सुबक आहे. काळाची अनेक चक्रे अंगावर झेलत केवळ आपल्या स्वामीनिष्ठेला स्मरून शांतपणे बसलेला दिसतो हा नंदी. नंदी मंदिराच्या गाभाऱ्याची अवस्था अगदी या मंदिरांबद्दल असलेल्या आपल्या अनास्थेला दर्शवते.

नंदी मंदिराच्या मागच्या बाजूला मिनार सारखे एक उंच बांधकाम आहे. मी आत्तापर्यंत कुठल्याही मंदिरात पाहिलेली ही सगळ्यात विशेष गोष्ट. या मिनार चे कारण अद्याप समजलेले नाही. पण यात आत जाणाऱ्या पायऱ्या आहेत आणि बाहेरील बाजूस मुर्त्यांचे कोरीव काम आहे.


या वास्तूच्या शेजारी एक वीरगळ देखील आहे.

पांडवेश्वर मंदिराच्या बाहेर मध्यकाळात म्लेंच्छांनी खंडित केलेल्या मंदिरांसारखेच या मंदिराच्या द्वारपालांचे भग्न देह समोर येतात. या मुर्त्यांकडे पाहून आणि त्यांच्यावर केलेले नाजूक नक्षीकाम बघून अचंबा वाटतो हे निश्चित!


मंदिराच्या भिंतीकडे लक्ष गेलं तेव्हा आणखीन एक विशेष गोष्ट लक्षात आली. दगडी भिंतीत दगडांच्या खिडक्या अथवा झरोके आहेत. मला ही गोष्ट विशेष वाटली. कारण या खिडक्या कोरलेले दगड एकमेकांवर एक रचून आणि त्या खाचेत बसवून बनवलेल्या आहेत. अशा प्रकारचे बांधकाम मला दुर्लभ वाटले.


मंदिराच्या आत पाऊल ठेवताच बाहेरील आवाज लुप्त होतो आणि संपूर्ण वातावरण थंड होते. थंडावा, काळोख आणि अध्यात्मिक गंभीरता. आपण शिवालयात आलेलो आहोत याची दैवी प्रचिती येते. आतल्या बाजूला कातळातले कोरीव आणि शक्तिशाली खांब आहेत ज्यांच्या आधारावर हे पांडवेश्वर उभे आहे.


माझ्या मनात विचार आला की ‘हेच बघायला सगळे हंपीला जातात. हंपीचा उदोउदो होतो. त्याला जागतिक वारसा म्हणून घोषित केले जाते. मग आपल्याकडच्या मंदिरांना हा सन्मान का मिळत नाही.‘
शिवालयाच्या आत अत्यंत शांत वाटते. जणू भगवंताच्या सानिध्यात, जगापासून दूर कुठेतरी एखाद्या गुप्त समाधीच्या ठिकाणी येऊन ठेपलो आहोत. हा अनुभव आणि ही अनुभूती विशिष्ट शक्तीच्या सानिध्यातच येऊ शकते.


नंदी महाराज आणि शंकराच्या पिंडीवरील फुले पाहताना मनाला शांतता मिळाली की आजही कोणी ना कोणी आपापल्या कुवतीनुसार या देवांची काळजी घेत आहे. दुर्दैवाने आज याच मंडळींना समाजात वाईट ठरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत तो मुद्दा वेगळाच. पण दर्शन घेऊन छान वाटले. गाभाऱ्यात संपूर्ण शांतता आणि समोर शंकराची ही पांडवेश्वराची सुंदर पिंड. इथे येण्याचे सार्थक झाले.

दर्शन घेऊन बाहेर पडलो तेव्हा मंदिराचा विस्तार तसेच पांडवांच्या शिळा पाहून घेतल्या. त्यात कुंतीची शिळा जवळून बघण्याचा योग्य आला.तसेच आजूबाजूच्या भिंतींवरील (भग्न) मुर्त्या पाहिल्या.




पण दुर्दैवाने वेळ कमी असल्याने अगदी बारकाईने बघता आले नाही. म्हणूनच मी याला “दर्शन घेऊन बाहेर पडलो तेव्हा मंदिराचा विस्तार तसेच पांडवांच्या शिळा पाहून घेतल्या. त्यात कुंतीची शिळा जवळून बघण्याचा योग्य आला.तसेच आजूबाजूच्या भिंतींवरील (भग्न) मुर्त्या पाहिल्या.


मंदिराच्या आजूबाजूच्या भिंतीवर अनेक मूर्ती कोरलेल्या दिसतात पण त्या देखील दुरावस्थेत आहेत. सवयीने म्हणा किंवा निगरगट्टपणा म्हणा मला आता मंदिरांमध्ये हे बघणे आता विशेष वाटत नाही. दुर्दैवी आहे.




दुर्दैवाने वेळ कमी असल्याने अगदी बारकाईने बघता आले नाही. खरं तर पांडवेश्वर येथे मी अनेक तास बसू शकतो, पाहू शकतो इतक्या गोष्टी आहेत. पण नाईलाज झाला. म्हणूनच मी याला “अपूर्ण तीर्थाटण” म्हणत आहे. कारण पुन्हा मी इथे जाणार हे निश्चित. मी जेव्हा जैन तेव्हा आणखीन लिहीन. तूर्तास इथे थांबतो. तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही देखील पांडवेश्वर शिवालयाला जाऊन या!
शब्दयात्री मधील इतर ब्लॉग्स वाचण्यासाठी हा दुवा पाहा