November 5, 2024
जेजुरी गड आणि कडेपठार – भाग १

जेजुरी गड आणि कडेपठार – भाग १

Spread the love

१४ ऑगस्ट २०२३ रोजी मी आणि माझे वडील यांनी कैक वर्षांची एक इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. ती म्हणजे जेजुरी गड आणि कडेपठार यात्रा. जेजुरी बद्दल लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, कैक ओळखीच्या मंडळींचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आहे. कुठल्या ना कुठल्या सणावारांना जेजुरी येथे भंडारा उधळल्याचे फोटो वर्तमानपत्रातून बघितलेले आहेत. पण कधी जाण्याचा योग्य आला नव्हता. तो आला आणि आम्ही दोघेही सज्ज झालो. इथे एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे की आम्ही दोघे भाविक आणि आस्तिक आहोच पण याच्याही बरोबर आम्ही उत्तम प्रवासी (traveler) आहोत.

आम्हाला एखाद्या जागी नुसते जाणे आणि स्वतःचे फोटो काढणे रुचत नाही. तुम्हाला जर पर्यटक (tourist) आणि प्रवासी (traveler) यांच्यातला फरक समजून घ्यायचा असेल तर त्यांचा फोटो अल्बम पाहा. ज्यांच्या अल्बम मध्ये त्यांच्यापेक्षा जागांचे आणि वस्तूंचे फोटो अधिक दिसतील ते प्रवासी! आम्ही या कॅटेगरी मधले. कधी कधी एखादी जागा आम्हाला आवडली तर तासभर देखील तिथे बसू शकतो! एखाद्या दरवाज्यावरची नक्षी आवडली तर तासभर त्याचेच निरीक्षण करू शकतो. तर असे आम्ही दोघे जेजुरी गड आणि कडेपठार यांवर माथा टेकायला निघालो!

पुण्याहून जेजुरीला जायला सकाळी साधारणपणे १:३० ते २ तास लागतात. पुण्याहून एसटी सुद्धा जाते. असो.. तर आम्ही जेजुरी येथे पोहोचलो. गाडी पार्क करण्याची सोय आहे आणि त्याचे तिकीट फडणाऱ्यांचे काहीसे गुंडगिरीचे तोरे बघता त्यांचे या पार्किंगवर सार्वभौमत्व आहे हे लगेच समजून येते. आमचे चालक हुशार त्यांनी गावात दुसरीकडे जाऊन गाडी लावली. आम्ही जेजुरी गडाच्या दिशेने निघू लागलो.

बाजारातून चालत निघालो आणि जेजुरी गडाचे पहिले दर्शन झाले तेच लक्ष वेधणारे होते. पावसाळी दिवस होते, तुरळक ढग, आणि त्या प्रांताला झेपेल अशी विरळ हिरवळ. सकाळ असल्यामुळे गर्दी फार नव्हती. म्हणजे असा आमचा समज होता! वाटेत आजूबाजूला जुने वाडे, घरं दिसत होती.

हळूहळू गडाच्या पायऱ्या आल्या आणि आजूबाजूला भंडारा दिसू लागला. त्याक्षणी वातावरण प्रसन्न पण गंभीर वाटू लागलं. मल्हारी हा देव मूळतः योद्धा आणि अरिहंता असल्यामुळे मनावर थोडा अध्यात्मिक दबाव असतोच!

शेकडो पायऱ्या आहेत. आम्ही दोघे माणसांना चुकवत चुकवत वर चढू लागलो. वर जाता जाता एका पायरीवर काही कोरलेले दिसले. आपल्याकडे अनेक मंदिरांच्या पायऱ्यांवर किंवा फरशांवर असे कोरलेले दिसते. विशेषतः दक्षिण भारतात! खूप कमी जणांना याचा अर्थ माहित आहे. हे कोण कोरून घेतलं असेल हा सांगता येत नाही. पण कोण्या काळी एक भाविक आपल्या भक्तीने असे कोरून घेतले असते. कधीकधी ही मानवाकृती लोटांगणाच्या/साष्टांग नमस्काराच्या अवस्थेत असते तर कधी खालीलप्रमाणे. “सदैव परमेश्वराच्या चरणी लीन असावे. मनात कदापि अहंभाव येऊ नये” या विचाराने कोरले जाते. अनेकदा एखाद्या इच्छापूर्तीनंतर देवाप्रती कृतज्ञता म्हणून अशा पायऱ्या कोरल्या जात. ही मान्यता काहीशी आपल्या नावाची पायरी दान करण्यासारखी आहे. पण नवख्या माणसाला अशी पायरी पाहून विचित्र वाटू शकते म्हणून हा उहापोह!

दगडावर कोरलेला मानवी आकार

हळूहळू वर जायला निघालो तेव्हा पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना दगडी मुर्त्या आणि पुतळे बघायला मिळाले. सर्वत्र भाविक होते आणि काही सेल्फी बहाद्दर देखील होते. पण त्याच्याही आधी दर्शनास येतो तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा भव्य पुतळा. खरंच क्षणभर थक्क व्हायला होतं त्या माऊलीच्या डोळ्यातील माया बघून. काही वेळ आम्ही तिथेच घुटमळत राहिलो.

Ahilyabai Holkar Jejuri होळकर जेजुरी
जेजुरी गड येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा भव्य पुतळा
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

आईंच्या पायाशी उभे राहून जेजुरी गावाचे देखील विहंगम दर्शन घडले!

जेजुरी गड
जेजुरी गावाचे सुंदर दृश्य

तिथेच आणखीन एक छोटे मंदिर दिसले जिथे मल्हारी मार्तंडाच्या मूर्ती होत्या. या मूर्तीच्या मागील शेष नागाची मूर्ती आणि महिरप कोरीव होती. मूर्ती आणि भिंतींवरील लाल – शेंदरी रंग आणि त्यावर पिवळा धमक भंडारा. ही रंगसंगती काही निराळीच असते!

इथून पुढे निघालो तेव्हा वाटेच्या कडेला एक हत्तीची मूर्ती दिसली. एकटीच होती पण भाविकांनी भंडारा वाहिल्यामुळे उठून दिसत होती. जेजुरीवर अशा अनेक मूर्ती आहेत ज्या काहीशा बाजूला पडलेल्या आहेत. त्या कोणत्या काळातील आहेत हे सांगणं कठीण आहे.

हळूहळू पायऱ्या संपत आल्या आणि एक मोठा नंदी समोर आला व त्याच बरोबर एक सुंदर दीपमाळ दिसली. याच वेळी समोर अखेरचे द्वार देखील दिसले. तेव्हा लक्षात आले की आपण जेजुरी गडावर आलेलो आहोत! हे द्वार आणि त्याभोवतीच्या भिंती व बुरुज फार बलाढ्य दिसतात.

जेजुरी गडाच्या मुख्यद्वाराच्या बाहेर दोन शरभ मूर्ती आहेत. अत्यंत वेगळ्या आणि काहीशा उग्र. ज्यांना शरभ मूर्ती म्हणजे काय हे माहित नसेल तर थोडक्यात सांगतो. विष्णूचा अवतार नरसिंहाचे शमन करण्यासाठी भगवान शंकर यांनी एका अक्राळ आणि प्रचंड शक्तिशाली पक्षी रुपी अवतार घेतला. त्याचे नाव शरभ. जो दिसायला पक्ष्यासारखा पण डोके एखाद्या राक्षसारखे आणि हातांना मोठी नखे. त्या शरभ ने नरसिंहाला हरवले. काही कथांनुसार मारून टाकले तर काही कथांनुसार नरसिंहाने गंडबेरूंड चा अवतार घेतला आणि शरभ ला १८ दिवसांच्या युद्धात हरवले. त्या गंडबेरूंड बद्दल थोड्या वेळात बोलूच. पण अखेर सगळीकडे शांतता प्रस्थापित झाली.

मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरील शरभ मूर्तींच्या पंजांच्या खाली हत्ती आहेत. मोठे अजब दृश्य आहे. शरभ आणि नरसिंह इत्यादींच्या युद्धात हत्तीचे देखील दमन झाले. या मूर्ती भंडाऱ्याने भरलेल्या असल्या तरीही मी सगळ्यांना नक्की सांगेन की या मूर्तींना जरूर बारकाईने बघा.

जेजुरी गड शरभ मूर्ती
जेजुरी गड येथील शरभ मूर्ती (डावीकडील)
जेजुरी गड शरभ मूर्ती
जेजुरी गड येथील शरभ मूर्ती (उजवीकडील)
जेजुरी गड येथील शरभ मूर्ती (डावीकडील)
शरभ मूर्तीच्या पंजाच्या खाली हत्ती!
शरभ मूर्तीच्या पंजाखाली हत्ती
जेजुरी गड मुख्यद्वार

महाद्वारातून आत गेल्यावर भव्य जेजुरी गड समोर आला! आणि तो मी वर्तमानपत्रात पाहिला होता तसाच होता. भव्य दिव्य एखाद्या देवाच्या आलयासारखा!

जेजुरी गड मुख्य मंदिर
जेजुरी गड “यळकोट यळकोट जय मल्हार”

मंदिराच्या आवारात पोहोचल्यावर जिथे बघू तिथे दिव्यत्व! भावनिकदृष्टया तो अनुभव फार वेगळा होताच पण त्याचबरोबर माझ्यातल्या फोटोग्राफरला देखील खूप काही टिपण्यासारखे मिळाले. एक तर खरे आहे की, मंदिर अत्यंत सुंदर आहे. मंदिराच्या शिखराकडे बघूनच आपोआप हात जोडले जातात. माझ्यासारख्या इतिहासाच्या विद्यर्थ्याला आणि धार्मिक माणसाला हे बघून फार समाधान वाटले की या देवालयाला म्लेंच्छांचा स्पर्श देखील झालेला नाही! रंग आणि कोरीवकाम अगदी टिपण्याजोगे आहेत.

त्यातील काही खाली देत आहे.

मंदिराच्या आवारातील एका बुरुजावर मारुती, गरुड आणि गंडबेरूंड यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. आता या एकाच ठिकाणी का आहेत हे सांगणं कठीण आहे. पण हे दोन डोक्याचे विष्णूचे पक्षी रूप फार भयंकर आणि प्रचंड शक्तिवान होते.

मारुती, गरुड आणि गंडबेरूंड Gandberunda
मारुती, गरुड आणि गंडबेरूंड (जेजुरी गड)

मंदिराच्या आजूबाजूला व्हरांडे आहेत. त्यांची बांधणी देखील बघण्यासारखी आहे. या व्हरांड्यांमध्ये अनेक छोटी मंदिरे देखील आहेत. यात एक हनुमानाचे मंदिर आहे. त्याचे नाव जरांडेश्वर मारुती. ही मूर्ती फार देखणी आहे आणि वीराच्या मुद्रेत आहे. पायाशी शनी आहे. मूर्तीच्या मागे काही भित्तिचित्रे आहेत पण कालांतराने त्यांचा रंग गेलेला दिसत आहे.

त्याचबरोबर जेजुरीच्या व्हरांड्यात आणखीन दोन मंदिर मंदिरे आहेत. एक मोरेश्वर गणपती आणि म्हाळसादेवी. मोरेश्वर गणपती चतुर्भुज आहे. एका हातात परशु आणि दुसऱ्या हातात अंकुश. तर उरलेल्या हातात मोदक. विशेष म्हणजे एकही हात आशीर्वाद देण्याच्या मुद्रेत नाही! मूर्तीच्या च्या बाजूला दोन सेवक आहेत.

त्याचबरोबर म्हाळसादेवीचे देखील एक मंदिर आहे. अर्थातच तिथे महिला भाविकांची गर्दी अधिक दिसते. मातेच्या मूर्तीला चांदीचे मुख आहे. एकंदरीतच भंडाऱ्याच्या रंगामुळे देवी उग्र वाटली. पण अखेर आई असल्यामुळे भीती कमी झाली!

जेजुरी गडाच्या व्हरांड्यात फिरत असताना आणखीन काही गोष्टी लक्ष वेधून घेतात त्या म्हणजे त्यांच्या भिंतींवरील शिलालेख. त्यांच्याबद्दल काही माहिती, एका माहितीफलकात दिलेली आहे. शिलालेख बाळबोध लिपीत असल्यामुळे वाचायला सुलभ आहेत.

व्हरांड्यातील महिरपी आणि छतावरील चित्रकारी बघण्यासारखी आहे.

व्हरांड्याच्या छातीवरील आकर्षक चित्रकारी
व्हरांड्यातील महिरप

जेजुरी गडाच्या या व्हरांड्यातून जेजुरी गावाचे आणि परिसराचे देखील दर्शन घडते!

जेजुरी गडाच्या व्हरांड्यातून जेजुरी गाव आणि परिसर

खालील फोटोच्या डाव्या (पश्चिम) बाजूला असलेले तळे होळकरांनी बांधले असे मानतात. या तळ्याच्या बाजूला जनाईदेवीचे आणि बल्लाळेश्वराचे मंदिर आणि एक पुष्करिणी आहे. या दोन्ही मंदिरांबद्दल सविस्तर लिहू पण पुढील ब्लॉग मध्ये!

होळकर सरदारांनी बांधलेला चौकोनी तलाव

तसेच मंदिराच्या उजव्या (पूर्वेला) एक गोलाकार तलाव आहे. तो ही या व्हरांड्यातून दिसतो. हा तलाव बाजीराव पेशव्यांनी बांधला होता.

श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी बांधलेला गोलाकार तलाव

याच व्हरांड्यात फिरताना अचानक एक कूर्म मूर्ती दिसली पण ती नक्की कोणासाठी आहे समजायला मार्ग नव्हता कारण समोर गणपतीची मूर्ती होती. त्या गणपतीच्या मूर्तीच्या समोर एक हात जोडलेली मूर्ती! माझ्या अभ्यासानुसार ही मूर्ती कोण्या भक्ताने आपल्यासाठी किंवा कोण्या दुसऱ्यासाठी बनवून घेतली असावी. परमेश्वराच्या चरणी करम नतमस्तक राहण्यासाठी अशा मूर्तींची बांधणी जुन्या मंदिरातून केलेली सर्वत्र आढळते.

दर्शन घेतल्यावर आम्ही दोघे कडेपठाराकडे कूच केली आणि महाद्वारातून बाहेर येताच सुरुवातीला न दिसलेल्या शरभ प्रतिमा एका दीपमाळेवर दिसल्या. एकुणातच या मंदिरात शरभ प्रतिमा खूप दिसतात. त्यांची अवस्था बघून आपल्याकडे ऐतिहासिक वास्तूंबद्दल असणारी आस्था दिसून येते!

दीपमाळेवरील शरभ प्रतिमा, जेजुरी गड

कडेपठाराची यात्रा मी पुढील ब्लॉगमध्ये मांडीन. पण जेजुरी मंदिरातून बाहेर येण्याआधी घरच्यांचा “तुमचा एकही फोटो नाही काढला!?” असा प्रश्नात्मक रोष अंगावर येऊ नये म्हणून आम्हा पिता पुत्रांचा एक फोटो “रेकॉर्ड” म्हणून काढून ठेवला! 🙂

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

2 thoughts on “जेजुरी गड आणि कडेपठार – भाग १

  1. आस्वाद घेत यात्रा करणारे कमीच! धन्यवाद! वेगळ्या अंगाने जेजुरी दर्शन झाल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *