मोरोपंत पराडकर “महाकवी”
मोरोपंत पराडकर, मराठी साहित्यातील अखेरचे महाकवी म्हणून ज्यांची ओळख आहे ते मोरोपंत पराडकर. रामभक्त मोरोपंतांचे शके १७१६ चैत्र शुद्ध पौर्णिमेला देहावसान झाले. इतिहासकार त्यांच्या अखेर क्षणाचे वर्णन “मोरोपंत रामरूप झाले” असा करतात. मोरोपंत संत नव्हते पण अत्यंत चारित्र्यवान पुरुष होते. थोर रामभक्त आणि मराठी भाषेवर, निस्सीम प्रेम करणारे कवी होते. कविता करायची नसते, ती स्फुरावी लागते. जीवात चैतन्य जसे स्वयंगतीने फिरते तशी कविता देखील स्वयंभू चेतनेप्रमाणे मनात उमटते. वाग्देवी सरस्वतीचा आणि इष्ट देवतेचा आशीर्वाद मिळाल्याखेरीज, समस्त प्राणिमात्रांना पुन्हा सजीव करण्याचे सामर्थ्य असणारी कविता जन्म घेत नाही. ती शक्ती मोरोपंतांना प्राप्त झालेली होती. संस्कृतप्रचुर मराठीच्या आराधनेचे महत्कर्म मोरोपंतांनी केले. आज ही मराठी फारशी ऐकायला देखील मिळत नाही. अशा वेळी मोरोपंतांची केकावली कानावर पडली की मराठी सरस्वतीसारखी शुभ्रवसना होते असे वाटते!
मोरोपंत सत्चरित्र पुरुष होते तसेच आस्तिक देखील. मोरोपंतांचे कुटुंब कोकणातून देशावर आले आणि अखेरपर्यंत देशावरच राहिले. मोरोपंत बारामती येथे ब्रह्मकमंडलु किंवा कऱ्हेच्या काठी आपल्या काव्यसाधनेत लीन राहिले. एकाग्रचित्ताने केलेली साधना व्यर्थ जात नाही. त्यामुळेच कदाचित आजूबाजूला इतक्या उलाढाली असताना देखील त्यांनी जवळजवळ पाऊणशे कवितांचे देणे देऊ केले.
मोरोपंतांचा अंतसमय
१७१६ चा चैत्र आला, प्रभू श्रीराम मोरोपंतांचे इष्ट. दरवर्षीप्रमाणे मोरोपंतांनी आपल्या घरी रामनवमी उत्साहात साजरी केली. दशमीपर्यंत पारणे सुटले आणि एकादशीस मोरोपंतांना ताप भरला आणि द्वादशीला आणखीन वाढला. आपला अंतसमय निकट येत आहे अशी जाणीव मोरोपंतांना झाली. तेव्हा त्यांनी आपल्या आप्तेष्ट मंडळींना बोलावले आणि अंतक्षणी कोणी माझ्या आजूबाजूला बसून रडारड करू नका . याउलट माझ्या आजूबाजूला अखंड रामनामाचा गजर होऊ द्या, माझ्या जाण्याचे दुःख नव्हे तर सोहळा साजरा करा! अशी निकराची सूचना त्यांनी दिली. अखेर चैत्र शुद्ध पौर्णिमा उगवली, सर्वत्र रामनामघोष सुरू असताना मोरोपंत रामरूप झाले. अखेरक्षणी मोरोपंतांना ना कुठली तळमळ होती, ना कुठल्या अपुऱ्या इच्छा ना कुठला मोह. सात्विक प्रेरणेने कवित्व वागवलेले मोरोपंत केकावली, मंत्रभागवत इत्यादींच्या लेखनसमयीच मोहापासून, सांसारिक तापापासून मुक्त झालेले होते. जसे संत भक्तीरसात न्हाऊन आपल्या परमेश्वराशी एकरूप होतात तसेच, कवीचा मोक्ष म्हणजे कवितेशी म्हणजेच शब्दब्रह्मरुपाशी एकरूप होणे होय. “मिसळे जसे नभ नभी, की तेजी तेज, तोय तोयांत” म्हणत मोरोपंत रामरूप होऊन संसारपाशातून मुक्त झाले.
मोरोपंतांच्या आयुष्याचे सार्थक झाले. त्यांनी आपल्याला मिळालेल्या आयुष्याविषयी, ज्यांनी ज्यांनी म्हणून त्यांचे पालन पोषण केले, प्रेरणा दिली त्या सर्वांविषयी आपली कृतज्ञता प्रांतप्रर्थनेत व्यक्त केलेली आहे. (असे किती लोक आहेत ज्यांनी आपल्या प्रांताचे, मायभूमीचे आभार मानले आहेत). मोरोपंतांना याची प्रेरणा देखील “जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी” म्हणणाऱ्या प्रभू श्रीरामांकडून मिळाली असावी असे मला वाटते. अर्थात याला कोणतेही प्रमाण नाही पण भक्ताने आपली परमेश्वराच्या पाऊलखुणांना सर्वथा मानले तर यात नवल काय? त्यातील ओव्या खालीलप्रमाणे. “प्रांतप्रर्थाना” मधील प्रत्येक ओव्या करुणेने आणि कृतज्ञतेने ओतप्रोत भरलेली जाणवेल.
“प्रांतप्रर्थना” करुणेची केका
दुग्धादी स्वरसे बहु पोषण केले, सदैव, गाई हो । गोमय दानें अंती मज दीना उद्धराची आई हो! ॥१॥ प्रथम स्मरण गोमातेचे जीने आई होऊन दूध, तूप देऊन सदैव पालन पोषण केले. आता अंत समयी गोमयाचे दान करून जगात उद्धार कर. यज्ञ किंवा चिताग्नी यांची सुरुवात गोमयापासून होते. तेव्हा अंतसमयी गोमयाचे दान दे असे मोरोपंत म्हणतात. (आजकाल गोमय म्हटलं की लोकांना काहीतरी अ-भारतीय भावना मनात येतात. पण गोमयाचे महत्त्व माहित नसलेला भारतीय आत्मा नसलेला देहच!) विश्वंभरे! क्षमे! तू देऊनि शयनार्थ दर्भ, कामातें । या पुरवुनिया अंती देवी! करी धन्य अर्भका मातें! ॥२॥ विश्वम्भरा म्हणजे पृथ्वी. गोमातेचे वंदन झाल्यावर पृथ्वीचे वंदन. मोरोपंत पृथ्वीमातेला आवाहन करतात की तिथे दर्भादी देऊन या अंतसमयी शयनासाठी जागा द्यावी. (दर्भ यज्ञात अग्नीला समर्पित केले जातात. त्याप्रमाणे अंतसमयी या देहाचा पवित्र यज्ञ होवो आणि त्यासाठी पृथ्वीमातेने उदार होऊन अर्भकाप्रमाणे आपल्या पोटी जागा द्यावी अशी याचना मोरोपंत करत आहेत) मातें तुळसि! असो तव दळ वदनीं, मुळमृत्तिका भाळी । प्राणावसान समयीं, इतुकीच दया करुनी सांभाळी! ॥३॥ हे तुळशी माते, आता (या अंतसमयी) तुझे पान मुखात राहो आणि तुझ्या मुळांशी असणारी माती कापली लावावयास मिळो ही प्रार्थना. प्राण जातासमयी हे मते दया करून माझा (लौकिकाचा आणि पारलौकिकाचा) सांभाळ कर. (किती करुणा आहे मोरोपंतांच्या शब्दांत) अंती हें आस्य वसिव, जेवीं दशरथास्य रामनामा तें । त्वत्कामनाची वाढो, न स्पर्शो अन्य कामना मातें! ॥४॥ आणि शेवटी हे मते मुखी सदैव रामाचे नाम राहो. त्याचीच कामना राहो बाकी सर्व कामना (मोह) स्पर्शूही नये! श्रीशिवनामा! त्वां बा रसनेला लाविलीच चट सारे । परि अंती जप, केलं कारुण्य वृथा बुडेल चटसारे !॥५॥ श्री शिव (शंकरा) तू या जिव्हेला गोड चवीची सवय लावली. रससारज्ञान तू दिलेच. पण शेवटी अंतःसमय येत जप करतो. कारुण्य घेऊन बसलो तर जमवलेले सारे व्यर्थ जाईल. भगवज्जन हो! वंदुनी पदर पसरितो, असोचि द्या स्मरण । तरण तसे मज पाजा, श्रीहरिहर नामें, पातल्या मरण! ॥६॥ संतसज्जन हो, कळकळीची विनंती आणि याचना करतो की, माझे संपूर्ण असू द्या (मला विसरू नका, माझ्यावरील कृपा कमी करू नका, मला सोडू नका). तरण म्हणजे रोगी मनुष्याला द्यायची पेज. मोरोपंत म्हणतात की श्रीहरिहरनाम मुखी येता मरण यावे असे तरण (पेज) मला द्या! हेच माझ्यासाठी औषध.. मोहाया न करावा प्रांजली जो मी 'मयुर' या तजर । आप्त मुदीत हो! सुखवा हरिनामाचा करुनिया गजर! ॥७॥ मला या जगाच्या मोहात अडकवविण्याचा प्रयत्न करू नका. मी अगदी प्रांजळपणे केका (तजर म्हणजे आरडा ओरडा) करणारा मयूर आहे. माझ्या आप्तांनो, शोक न करता हरिनामाचा गाजर करून माझ्या आत्म्याला सुख द्या. (रडू नका, नामाचा गाजर करा) त्रैलोक्यपावनत्वें भगवज्जनमंडळीच गंगा हो । यास्तव अंती माझ्या प्राप्त इचे संनिघान अंगा हो ॥८॥ ही भगवज्जनमंडळीच म्हणजेच संधू संत महात्मे ही मंडळीच त्रिलोकात पावन करणारी गंगा आहे. माझ्या अंत समयीमी यांच्या सन्निद्ध राहो, यांचा सहवास मला लाभो ही प्रार्थना.
मोरोपंत आणि आपण
मोरोपंतांचे कुटुंब पुण्यातील नाईकांच्या घरी आश्रयास होते. मोरोपंतांच्या निधनानंतर दहनभूमीवर श्रीरामाचे मंदिर उभे करावे अशी पांडुरंग नाईकांची फार इच्छा होती पण पंतांच्या इच्छेनुसार अस्थी पंढरपुरी पुंडलिकाच्या समाधीसमोर चंद्रभागेत अर्पण केल्या. त्यांच्या अस्थींबरोबर मोतोपंतांचे कुटुंब व लेखनाचे बाडे देखील पंढरपुरी गेले.
मोरोपंत आर्येविषयी म्हणतात,
आर्या आर्यासि रुचे, ईच्या ठार्यी जशी असे गोडी ॥
आहे इतरा छंदी गोडी परि यापरीस ती थोडी ॥
एका ब्लॉगमध्ये मोरोपंत सामावणार नाहीत. खरं तर कितीही लिहिले तरीही त्यात मोरोपंत सामावणार नाहीत हे माहित असूनही हा तोकडा प्रयत्न करत आहोत. महाकवी मोरोपंत म्हणजे दगडांची भाषा मराठीत उमटलेली सुमधुर आणि आणि सात्विक केका देणारे साहित्य-मयूर! मोरोपंत गेले आणि जणू आर्या पोरकी झाली. असा कवी पुन्हा होणे नाही.. मोरोपंत गेले आणि तो काळच हरवून गेला! शब्दयात्री तर्फे मोरोपंतांना साष्टांग दंडवत.
खुप सुंदर
धन्यवाद 🙏