December 2, 2024
“रथचक्र उद्धरू दे” : कृष्ण कर्ण संवाद (मोरोपंतांची आर्या)

“रथचक्र उद्धरू दे” : कृष्ण कर्ण संवाद (मोरोपंतांची आर्या)

Spread the love

मराठी साहित्य आणि वाङ्मयीन इतिहासाबद्दल आदर असणाऱ्या सर्व रसिकांना मोरोपंत माहित नाही असं होणं अशक्य आहे. पूर्वी शालेय शिक्षणातील काव्याभ्यासाचे अबकड, मोरोपंतांच्या आर्या, वामन पंडितांची काव्ये इत्यादी असत. मोरोपंतांच्या आर्या हे मराठी साहित्यातील एक अजरामर आणि अवीट गोडीचे संग्रह आहेत. हल्ली या आर्या पुस्तकातून गायब झाल्या आहेत (केल्या गेल्या आहेत !?). तरीही आपल्या येणाऱ्या पिढ्यांना या आर्यांची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. या उपक्रमातील एक प्रयत्न म्हणून हे काव्य तुमच्यापुढे सुगम मराठी अनुवादासकट ठेवत आहे. आशा आहे, तुम्हीही वाचाल आणि इतरांनाही वाचायला प्रवूत्त कराल.

मी या काव्याची वाक्ये सर्वप्रथम पु. ल. देशपांडे यांच्या “बिगरी ते मॅट्रिक” मध्ये ऐकली. कवी मोरोपंतांची आर्या होती ती. ते शब्द आणि स्वर इतके प्रभावी होते की त्या क्षणापासून मी या काव्याच्या शोध घ्यायला सुरुवात केली. महिन्यांच्या शोधानंतर मला कृष्ण – कर्ण संवादाची कडवी सापडली.

हे काव्य म्हणजे कर्ण वधाच्या प्रसंगाचे वर्णन आहे. कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत रुतलेले आहे, अर्जुनाने त्याच्या गाण्डीवावर बाण लावलेला आहे. कर्ण जमिनीवर उतरून त्याच्या रथाचे रुतलेले चाक बाहेर काढायचा प्रयत्न करत असताना तो अर्जुनाच्या हातात ताणलेला धनुष्य बघतो आणि म्हणतो “हे अर्जुना मी निःशस्त्र आहे, जमिनीवर आहे. धर्मानुसार तू माझ्यावर हल्ला करू शकत नाहीस”. अर्जुन संभ्रमात पडतो आणि त्या वेळी कृष्ण भगवान म्हणतात, हे राधेया “आज बरा तुला धर्म आठवला..” अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगावर बेतलेलं हे काव्य, मोरोपंतांच्या “आर्या भारत” या आर्या रुपी महाभारतातील एक भाग आहे.


स्ववधोद्यतार्जुनातें कर्ण म्हणे, “बळ तुझे अनंत रहा
स्वस्थ मुहूर्तभरि, रण-श्रद्धा पुरवील, गा, अनंतर हा. ।।१।।

स्वतःच्या (कर्णाच्या) वधाला सज्ज झालेल्या अर्जुनाला बघून कर्ण (उपहासाने) म्हणाला, “भले अर्जुना तुझे बळ/सामर्थ्य असीमित होवो. पण आत्ता तू जरा अवकाश घे, आपल्या या युद्धात तुला लढण्याच्या अनंत संधी लाभणार आहेत. त्यामुळे जरा धीराने घे.

रथचक्र उद्धरूं दे श्रुति-शास्त्रज्ञा, महा-रथा कुल-जा,
साधु न हाणिति अरिला, पाहति अ-धृतायुध व्यथाकुल ज्या. ।।२।।

माझ्या रथाचे (रुतलेले) चाक बाहेर येउदे, हे श्रुति आणि शास्त्र पारंगत तसेच उत्तम कुलोत्पन्न अर्जुना. साधू (सज्जन, पर्यादित पुरुष) शत्रुला असहाय किंवा कुठल्या समस्येने ग्रस्त पाहून त्यांच्यावर हल्ला करत नाहीत. (त्यामुळे हा धर्म तू पाळ)

तूं स्वरथी, क्षितिवरि मी, तूं सायुध, मी अशस्त्रकवच रणीं;
न वधावें मज, जो मी गुंतुनि गेला असें रथोद्धरणीं. ।।३।।

या रणात, तू तुझ्या रथावर आहेस आणि मी जमिनीवर, तू सायुध (आयुधांनी युक्त, सशस्त्र) आहेस तर मी निःशस्त्र आणि कवचहीन (असुरक्षित)! माझा (अशा प्रकारे) मी रथचक्र बाहेर काढत असताना वध करू नकोस.

भ्यालों न तुज हरीसहि; जो न तुला विमुख, काय कातर तो?
किथतों यास्तव कीं जन धर्में भवसिंधु, नायका, तरतो. ।।४।।

हरी (कृष्ण) जरी तुझ्याबरोबर असला तरीही मी तुला घाबरलेलो नाही! जो कधीही तुझी संगत सोडणार नाही (का विमुख होईल?) मी हे ही जाणतो की कृष्ण जनमानसात धर्माचा भवसिंधु (सज्जनांचा प्रतिपालक आणि संरक्षक) एक नायक म्हणून वास करतो.

रक्षावा धर्म बुधें, कुशळाचा धर्म हा निधी, राहें
स्थिर, जें करिसि निरायुधमथन करिल धर्महानि, धीरा, हें” ।।५।।

त्यामुळे हे धर्म जाणणाऱ्या (अर्जुना) तुझ्या धर्माचे रक्षण कर, कारण योग्य आणि सज्जन माणसासाठी त्याचा धर्म हीच त्याची संपत्ती आहे. तू जर कोण्या निरायुध (शस्त्रहीन) माणसाची हत्या करशील तर त्याने तुझ्याच धर्माची हानी होणार आहे. त्यामुळे धीर धर, थोडा थांब”

कृष्ण म्हणे, “राधेया, भला बरा स्मरसि आजि धर्मातें
नीच व्यसनीं बुडतां निंदिति दैवास, न स्वकर्मातें. ।।६।।

श्रीकृष्ण म्हणाले “राधेया (कर्ण) आज बरी तुला धर्माची आठवण येत आहे! नीच आणि व्यसनी माणसे स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्यावर, नेहमीच आपल्या नशिबाला दोष देतात पण स्वकर्माला कधीही दोष देत नाहीत. (वाईट माणसे कायम आपल्या अपयशाचं, दुर्भाग्याचं खापर दुसऱ्यांवर फोडतात पण कधीही स्वतःच्या कर्मावर दोष धरत नाहीत)

जेव्हा तूं दुर्योधन, दुःशासन, शकुनि एक-मति झालां,
कैसे कपट-द्यूतीं चित्तींहि न धर्म लंघितां भ्याला? ।।७।।

जेव्हा तू, दुर्योधन, दुःशासन आणि शकुनि एकत्र आलात, आणि जेव्हा तुम्ही कपट करून द्यूत मांडलात तेव्हा तुला धर्मोल्लंघनाची भीती नाही का वाटली?

जेव्हां सभेसी नेली पांचाळी, मानिलें मनी न शर्म!
तेव्हां गेला होता कोठे, राधासुता तुझा धर्म? ।।८।।

जेव्हा पांचालीला (द्रौपदी) भर सभेत नेले गेले, तिचा अपमान केला गेला तेव्हा तुझ्या मनाला शरम नाही वाटली का? तेव्हा तुझा हा ‘धर्म’ कुठे गेला होता हे राधासुता?

फेडी वस्त्र सतीचें जेव्हां उघडे करावया आंग,
गेला होता कोठें धर्म तुझा तेधवां? वृषा, सांग ।।९।।

एका सतीचे वस्त्र फेडून तिला निर्वस्त्र केले जात होते तेव्हा हे वृषा (कर्ण) तुझा हा ‘धर्म’ कुठे गेला होता सांग?

चारुनि विषान्न भीमा सर्प डसविले, असें नृपें खोटें
कर्म करवितां, कर्णा, होता तव धर्म तेधवां कोठें? ।।१०।।

भीमाला जेव्हा कपटाने विष खायला लावून विषारी सरपंच दंश दिले, असे पापकर्म राजे (राजकुमार दुर्योधन आणि दुःशासन) करत होते तेव्हा तुझा ‘धर्म’ कुठे गेला होता?

केले दग्ध जतु-गृहीं त्वां पांडव वारणावतीं जेव्हां,
गेला होता कोठें धर्म तुझा, सूत-नंदना, तेव्हां? ।।११।।

(लाक्षागृह) जाळून जेव्हा वारणावत गावी पांडवांना जाळून मारण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा हे सूत नंदन (सूतपुत्र) तुझा ‘धर्म’ कुठे गेला होता?

अभिमन्यु बाळ बहुतीं वधितां, त्वां वारिलें न तें कर्म;
तेव्हा गेला होता कोठें, राधासुता, तुझा धर्म? ।।१२।।

अभिमन्यु हा बालक होता, त्याला युद्धात अनेक जणांनी मिळून मारले, त्यांना तू थोपवण्याचा प्रयत्न करणं तर दूरच तू स्वतः देखील त्या हत्त्येत भाग घेतलास, तेव्हा राधासुता (कर्ण) तुझा ‘धर्म’ कुठे गेला होता?

पूर्वीं धर्म न रुचला, त्यजिला निपटूनि जो जसा कुचला;
आतांचि बरा सुचला! काळगृहा सर्व व्हा परासु चला. ।।१३।।

पूर्वी धर्म रुचला नाही पटला नाही, त्या धर्माचा तू त्याग केलास, त्या धर्माला पायाखाली तुडवलंस आणि आता जेव्हा मृत्यू समोर दिसू लागताच पुन्हा हा ‘धर्म’ तुला आठवला का? (आता मरायला सिद्ध हो!)

मागेंचि धर्म करितां, जरि देतां राज्य, धर्म वांचविता;
न जगें, जो दुर्भिक्ष-व्यसनांपूर्वी न धान्य सांचविता. ।।१५।।

जर तू आधीच धर्माने वागला असता, भले त्या धर्मरक्षणासाठी तुला राज्य (अंग देश) त्यागावे लागले असते. जो मनुष्य दुर्भिक्ष (पूर, दुष्काळ) किंवा व्यसनाधीन होण्याआधी धान्य संचय करत नाही तो फार काळ जगत नाही.

आतां रक्षील कसा धर्म? तुम्हीं वित्त-मद्य-मत्तांनीं
जो लोटिला दहादां, स्वहितहि मानूनि अहित, लत्तानीं. ।।१६।।

आता तुला हा ‘धर्म’ का वाचवेल? तुम्ही पैसा, मद्य (व्यसने) आणि अहंकाराने भरलेल्या तुम्ही लोकांनी याचा धर्माला दहा वेळा (अनेकदा) लोटले आहे (त्याचा खून केला आहे). या दोषांमुळे अंध होऊन तुम्ही, स्वहिताला देखील अहित मानून तुम्ही धर्माला लाथाडले.

रक्षावा धर्म असा करिशी उपदेश, तरि असे मान्य;
रक्षितसों धर्माते; आम्हांला धर्म ठाउका नान्य.” ।।१७।।

तरी देखील ‘धर्माचे रक्षण’ कसे करावे याबद्दल तू उपदेश करणं हे मला मान्य आहे. पण आम्ही या ‘धर्माचे रक्षण’ रक्षण करतो. आम्हाला फक्त ‘धर्म’ काय आहे तेच ठाऊक आहे (बाकी कशालाही आम्ही मानत नाही)”


आणखीन रसग्रहण वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

Click to rate this post!
[Total: 5 Average: 4.4]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *