समईच्या शुभ्र कळ्या – (संपूर्ण कविता)
समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते केसातच फुललेली जाई पायांशी पडते. भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागे-पुढे मागे मागे राहिलेले माझे माहेर बापुडे. साचणाऱ्या आसवांना पेंग येते चांदणीची आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची. गाठीमध्ये गं जिवाच्या तुझी अंगार्याची बोटे वेडी उघडाया जाते उगा केतकीचे पाते थोडी फुले माळू नये, डोळा पाणी लावू नये पदराच्या किनारीला शिवू शिवू ऊन गं ये. उगा बावरते मन भरू येताना केसर अशा वेळेची, वाटते, अंगावर घ्यावी सर डोळ्यातल्या बाहुल्यांनी घरीदारी उतरावे असे काहीसे वाटते याला कसली गं नावे? हसशील, हास मला, मला हसूही सोसेना अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का दुणा !
“समईच्या शुभ्र कळ्या” आरती प्रभु यांची ही एक प्रसिद्ध कविता. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली ही कविता आपण आशाताई भोसले यांच्या स्वरात अनेक वर्षे गुणगुणत आहोत. पण गाण्यात संपूर्ण कडवी सामील केलेली नाहीत. पण रसग्रहणासाठी संपूर्ण कविता समोर ठेवणे अत्यावश्यक आहे. संध्याकाळच्या पार्श्वभूमीवर अनेक विचारांमुळे एका स्त्रिच्या मनाची झालेली चलबिचल या कवितेत प्रकर्षाने जाणवते. या कवितेत एक प्रकारची अव्यक्ताची भीती, शंका, स्वतःला प्रश्न विचारण्याची – उत्तरे देण्याची मानवी वृत्ती, वास्तवाच्या पटलावर स्वप्नरंजन अशा अनेक छटा दिसतात. प्रचंड अस्वस्थतेचे चित्रण करणारी ही अफाट आणि अचाट कविता!
मनोगत
रसग्रहण समोर ठेवण्याआधी रसिकांना काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात.
कविता ही अनंत पैलू असलेल्या लोलकाप्रमाणे असते. प्रकाश कुठून येत आहे? आणि तुम्ही लोलकाकडे कुठल्या दिशेने बघत आहात? यावरून तुम्हाला किती व कोणते रंग दिसतील हे अवलंबून असतं. त्यामुळे लोलक जरी एकच असला तरिही, आपापल्या प्रकाशानुसार आणि स्थानानुसार प्रत्येकाला वेगवेगळे रंग दिसू शकतात!
रसग्रहण वैयक्तिक असू शकते किंवा मूळ संकल्पनेला धरून देखील असू शकते. एका वाक्याचे संदर्भ बदलताच वेगवेगळे अर्थ निघू शकतात. त्यामुळे अमुक अर्थ योग्य तमुक अर्थ अयोग्य या फंदात न पडता कवितेचे वेगवेगळे पैलू शोधता येतात का? आपण ज्या अर्थांचा आधार घेऊन रसग्रहण करत आहोत त्यांच्यामागे तर्कांचे पाठबळ आहे का? याचा विचार करणे मला जास्त योग्य वाटते.
कवितेचे रसग्रहण म्हणजे नुसते शब्दार्थांची रांग नसते. प्रत्येक कवीची प्रकृती, सौंदर्यस्थळे आणि पार्श्वभूमी वेगळी असते. या सगळ्याचा परिणाम त्यांनी केलेल्या रचनेवर, त्यांनी बांधलेल्या शब्दांवर होत असतो. त्यामुळे कुठल्याही कवितेचे रसग्रहण करताना या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, नाहीतर रसग्रहण म्हणजे वरवर घेतलेला रसास्वाद होऊन जाईल आणि शब्दांमागे दडलेले सगळे रस हातून निसटून जातील. कवी हा “कवी” असतो “कलाकार” असतो त्यामुळे रसग्रहण करताना मुखार्थ (समोर दिसणारे अर्थ), गर्भितार्थ, अन्वयार्थ आणि संदर्भ या सगळ्याचा विचार करणे आवश्यक आहे.
खरं तर आरती प्रभूंच्या कवितेतील अर्थ शोधणे. तर्कांच्या पाठीवर संदर्भांचा भाता ठेवणे हे मोठे जिकिरीचे काम आहे. कधीकधी असं वाटतं की आपण कुचेष्टा तर करत नाही ना? मग असा विचार येतो की एखादी कविता वाचून आपल्याला काय काय वाटले हे सांगण्यात काय गैर आहे? ही कविता समजून घेताना माझ्या मनात अनेक छटा उमटल्या. अनेक चित्रे डोळ्यांसमोर आली. तीच तुमच्यासमोर मांडत आहे.
या कवितेचे रसग्रहण करताना मला या कवितेत स्त्रीत्त्वाच्या, स्त्रीच्या दैहिक आणि भावनिक विश्वाच्या अनेक छटा दिसल्या, शब्दांची विशिष्ट मांडणी व त्यातून जन्म घेणारे वेगवेगळे अन्वयार्थ दिसले. त्यामुळे मला जे जे रंग या कवितेत दिसले ते तुमच्यासमोर मांडत आहे. प्रत्येक रसग्रहण वेगळे आहे आणि त्यांना संदर्भ व तर्क लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.
खाली दिलेल्या लिंक्सवर तीन वेगवेगळ्या मितींनी मी या कवितेकडे पाहू शकलो. आशा आहे हा प्रयास तुम्हाला आवडेल. 🙏🏻
रसग्रहण आणि अर्थ – १
समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते
केसातच फुललेली जाई पायांशी पडते.
पहिले वाक्य वाचून, काही काही गोष्टी अगदी निश्चित होतात. एक कोणी स्त्री समई चेतवते आहे, बहुदा देवघरापाशी. त्यांनतर वाकून किंवा झुकून नमस्कार करायला जाते. नमस्कार करायला जाणार तेवढ्यात सकाळी कधीतरी माळलेल्या गजऱ्यातील, आता फुलून पोक्त झालेली जाईची फुले केसांतून खाली निखळून पडतात. थोडक्यात कोणत्याही जाणकार माणसाच्या डोळ्यांसमोर आतापर्यंत एक जुने घर, त्यातले देवघर आणि त्याच्या समोर बसलेली एक स्त्री हे दृष्य डोळ्यासमोर येईल.
भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागे-पुढे
मागे मागे राहिलेले माझे माहेर बापुडे.
भिवया म्हणजे भुवया आणि दिठी म्हणजे दृष्टी. समई लावून झाली आणि काही फुलेही गळाली. आता भुवयांची फडफड होत आहे. पण, त्यांचे अन्वयार्थ या डोळ्यांना जे दिसते आहे त्याच्या पलीकडचे आहेत. एक प्रकारची धाकधूक जाणवते आहे, अनिश्चितता आहे. कुठली भुवई हे निश्चित समजत नाही त्यामुळे हे संकेत शुभ आहेत की गडद समजणं अवघड आहे. पण आता काहीही जरी झालं तरी मागे वळणे शक्य नाहीये. आता हेच आपले जग आहे! “मागे” या शब्दावर दिलेला जोर बघता इथे माहेर म्हणजे “बालपण” तर अभिप्रेत नसेल ना? अशी पुसट शंका मनात येऊन जाते.
साचणाऱ्या आसवांना पेंग येते चांदणीची
आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची.
इथे एक प्रकारची मानसिक अवस्था प्रकर्षाने दिसून येते. माझ्या आकलनानुसार “पेंग येते चांदणीची” म्हणजे जेव्हा चांदणीला हळुहळु झोप येऊ लागते. थोडक्यात पहाटे. त्यामुळे पहिल्या पंक्तीचा अर्थ असा काहीसा निघतो. रात्रभर डोळ्यात साचलेले अश्रु पहाटे कधीतरी लुप्त होतात आणि मग झोप येते. म्हणजेच नायिकेला कदाचित रात्रभर झोप येत नसावी. कुठल्यातरी कारणाने ती विचलित होत असावी आणि समोर दाटलेली अनिश्चितता बघून तिला अश्रु अनावर होत असावेत, रात्रभर पाणावलेले डोळे घेऊन ती जागत असावी आणि पहाटे कधीतरी थकून डोळा लागत असावा. वर सध्या अशी काही मानसिक अवस्था झाली आहे की, सगळं काही विसरायला होत आहे. मन स्थिर नाही.
गाठीमध्ये गं जिवाच्या तुझी अंगार्याची बोटे
वेडी उघडाया जाते उगा केतकीचे पाते
या कडव्यात नायिकेचे स्वतःचे स्वतःशी बोलणे दिसत आहे. कोणी दुसरी स्त्री नायिकेशी बोलत आहे असे वाटणे सहज शक्य आहे. पण माझ्या मते नायिकाच थोडी प्रगल्भ भूमिका घेत स्वतःशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. देव्हाऱ्याशी समई उजळताना तिथे कोणी बरोबर असेल असे वाटत नाही. आणि एकटेपण नसते तर चेहऱ्यावरील भाव दाखवता आले नसते. नायिकेची चलबिचल पकडली गेली असती. पण रात्री एकट्याने रडणाऱ्या नायिकेकडून ही अपेक्षा नाही. पहिल्या पंक्तीत, “तुझी अंगाऱ्याची बोटे” हे शब्द लक्ष वेधून घेतात. यात एक प्रकारची दाहकता आहे, वेदना किंवा क्लेष आहे. पण हा दाह कशाचा आहे? या प्रश्नाचे उत्तर “जिवाच्या गठीमध्ये” सापडते. जिवाची गाठ हे शब्द वाचताच मनात येते ती म्हणजे एखादे घट्ट नाते. कोण्या गाठीने बांधलेले नाते, नवरा आणि बायकोचे नाते!
या बंधात नायिका दुःखी तर नाही ना? किंवा कुठेतरी कशाचीतरी उणीव तर नाही ना? सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ही अंगाऱ्याची बोटे नायिकेची आहेत. यावरून असेही वाटते की कुठे ना कुठे नायिकेचा दोष आहे असे तिला वाटत आहे. पुढच्या पंक्तीत नायिका म्हणते केतकीच्या पानांनी झाकलेले फुल (फुल ही पूर्णतः माझी कल्पना) बघायचा प्रयत्न करत आहेस वेडे. वाचकांच्या माहितीसाठी म्हणून, केतकीच्या पानांना असतात. त्यामुळे केतकीच्या झाडापाशी जरा जपूनच जावे लागते. त्यामुळे दाहकता असलेले बंध समोर ठेवले की केतकीच्या काटेरी पानांना उघडण्यापासून थांबवणे म्हणजे जखमेवरची खपली काढण्यासारखे आहे की काय असे मनात येऊन जाते. उलगडा करायचा प्रयत्न करू नकोस वेडे तुझी बोटे अंगाऱ्याची आहेत त्यातून निष्पन्न काहीच होणार नाही फक्त दुःख बळावेल.
थोडी फुले माळू नये, डोळा पाणी लावू नये
पदराच्या किनारीला शिवू शिवू ऊन गं ये.
एकदा पोक्तपणाची भूमिका घेतल्यावर नायिका स्वतःला समजावण्याची आणि उभारी देण्याचा प्रयत्न करत आहे असं काहीसं दिसत आहे. पहिला सल्ला असा की केसात फुले मळताना काळजी घेत जा. सुटी सुटी फुले माळशील तर ती अशीच गळत राहणार. (स्त्रियांना अधिक माहिती असेल की ज्या गजऱ्यात फुले अगदी विरळ माळलेली असतात तो गजरा लगेच खराब होतो. त्यातील फुले लगेच गळून पडतात) कुठे ना कुठे ती स्वतःला सांगत आहे की, कुठलीही निश्चित पार्श्वभूमी नसलेले विचार मनात येऊन देऊ नकोस, अस्थिर होऊ नकोस. दडपण येऊ देऊ नकोस. याने तुला उगाच उदासी येईल आणि तुझे डोळे पाणावतील. रडू नकोस शांत हो!
वरील कडव्याच्या “गाठी”चा संदर्भ घेऊन आपल्याला म्हणता येईल की हा पदराचा किनार लग्नात बांधलेल्या गाठीचा किनार! ज्या गाठीला सोडवायला नायिका थबकत आहे. “पदराच्या किनारीला शिवू शिवू ऊन गं ये” हे वाचून आणि गाठीचा संदर्भ पाहून हे समजणे सहज शक्य आहे की पोक्तपणाची भूमिका घेणारी नायिका स्वतःची समजूत काढत आहे की, या गाठीबरोबर ऊन देखील येतं. थोडी फार दुःखे येणारच किंवा सगळंच मनासारखं होईल असे नाही. काही नावडत्या गोष्टी देखील होतील. वैवाहिक जीवनात हे होतंच!
उगा बावरते मन भरू येताना केसर
अशा वेळेची, वाटते, अंगावर घ्यावी सर
संध्याकाळी काळोख पसरत आहे. देवघराशी एकटी नायिका, स्वतःशी मनातल्या मनात बोलत आहे, कुणाला माणची अवस्था सांगायची सोय नाही, विचारांचे-प्रश्नांचे काहूर माजले आहे, अनिश्चितता अकारण मनाचा ठाव घेत आहे. त्यामुळे नायिकेला थोडं विचलित झाल्यासारखे होत आहे, बावरून गेल्यासारखं होत आहे. संध्याकाळ आपल्याबरोबर अंधाराची चाहूल देखील घेऊन येते. प्रश्नांकित मनाला अंधाराची जरा भीती वाटतेच. अशा वेळी तिला अचानक अतिरेकी पाऊल उचलायचा देखील विचार येतोय.
विचार आणि प्रश्नांनी गुरफटलेल्या नायिकेला असे वाटणे साहजिकच आहे. कारण अशा वेळी माणसाला “आपण इथे कसे आलो?” हा प्रश्न मनात येतोच आणि मग एखाद्या विजेसारखा विचार मनात चमकतोच की “सोडून द्यावं सगळं, सगळी बंधने तोडून निघून जावं!” अर्थातच असं होणार नसते. ही सर अंगावर घेणे, म्हणजे सगळ्या प्रकारच्या बंधनांतून मुक्त होण्याचा विचार नायिकेच्या मनात येत आहे. अशा वेळी ती नैतिक – अनैतिक चा विचार करताना दिसत नाहीये!
डोळ्यातल्या बाहुल्यांनी घरीदारी उतरावे
असे काहीसे वाटते याला कसली गं नावे?
हे कडवे वाचून, नायिकेला अचानक आपल्या दिशाहीन आणि काहीशा अल्लड विचारांची जाणीव झालेली दिसते आहे. त्यामुळे ती म्हणते की डोळ्यातल्या बाहुल्यांनी घरीदारी उतरावे. डोळ्यातली बाहुली म्हणजे असे छिद्र ज्यातून बाहेरचा प्रकाश आत येतो. थोडक्यात सगळं काही नायिकेला बघायचं आहे. सगळं काही चांगलं, स्वप्नवत झालेलं नायिकेला बघायचं आहे. डोळ्यातल्या बुब्बुळांच्या बाजूला दिसणाऱ्या डागांनाही बाहुली म्हणतात असे मी लहानपणी ऐकले होते. ज्यांच्या डोळ्यांत हा डाग असतो त्यांना दृष्ट लागत नाही असे ऐकले होते. त्याचा आधार घेऊन मनात हा विचार देखील मनात येतो की, नायिका घरादाराला दृष्ट लागू नये याची स्वप्ने बघत आहे. एखाद्या अल्लड मुलीप्रमाणे स्वतःलाच विचारत आहे, असे विचार मनात येण्याला काय म्हणावे? स्वप्नरंजन.. !?
हसशील, हास मला, मला हसूही सोसेना
अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का दुणा !
अशा वेळी आपला अल्लडपणा (काहीसा लहानपणा देखील) लक्षात आल्यावर पोक्तपणाची भूमिका घेतलेली नायिका स्वतःलाच हसत आहे. त्याच वेळी नायिकेचे मन या पोक्तपणाला चिडवून आणि काहीसे स्वतःशी लाजत, खोट्या रागाने म्हणते “आता तू मला हसशील नाही का? हास.. जरूर हास. पण तुला काय माहित माझी अवस्था काय झालेली आहे? मला तर आता हे हसणे सुद्धा सोसत नाहीये.
हे विचार मनाला खूप खोल घेऊन गेले आहेत. त्यापेक्षा मला सांग, माझी ही अवस्था बघून तो चंद्र दुणावेल का? त्याला तरी माझी दया येईल का?” पण प्रश्न असा येतो की नायिकेला हसू सोसत का नाहीये? कारण कितीही विचार केला, कितीही भूमिका घेतल्या, कितीही स्वप्नरंजन केले तरीही, प्रश्नांनी वेढलेले वास्तव टळणार थोडेच आहे? अश्रू खोल झाला आहे. प्रश्नांच्या खुणा आता मनात खोल गेल्या आहेत. मनासारखे किंवा स्वप्नवत आयुष्य झाले तरीही आता त्या खुणा लवकर मिटणार नाहीत. पण चंद्र तर दुणावू शकतो, आणखीन चांदणे पसरवू शकतो तो का उदार होत नाही? इथे चंद्र दुणावणे म्हणजे मुखचंद्र खुलणे, चेहरा खुलणे आणि मनाला उभारी येणे असाही घेता येऊ शकतो..
रसग्रहण आणि अर्थ – २
समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते
केसातच फुललेली जाई पायांशी पडते.
इथे पहिल्या वाक्यात एका कळीचे उमलवणे आहे आणि दुसऱ्या वाक्यात एका उमलून जून झालेल्या कळीचे गळणे आहे. इथेच मला शंका येते की कवितेची नायिका कोणी पोक्त बाई तर नाही ना? कोणत्यातरी कारणाने ती देवासमोर रोज नव्याने प्रार्थना करत आहे आणि रोज उभारी आणून तिने केसांत माळलेल्या कळ्या, संध्याकाळी जून होऊन तिच्या स्वप्नांचे प्रतीक होऊन गळत आहेत.
भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागे-पुढे
मागे मागे राहिलेले माझे माहेर बापुडे.
इथे त्या पोक्त बाईच्या मनःस्थितीचे काही कंगोरे दिसतात मला. कुठल्यातरी प्रश्नामुळे ती अधीर किंवा कदाचित अगतिक देखील झालेली आहे. त्यामुळे आजुबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेत ती काही ना काही संकेत शोधत आहे. तिला हे निश्चित माहीत आहे की आता माहेराचे दार आपल्यासाठी उघडले तर ते विशिष्ट कारणांसाठीच उघडले जाईल. कायमसाठी नाही. त्यामुळे हा सगळा आयुष्याचा पसारा इथेच सोडून जाण्याचा प्रश्नच येत नाही. दिठीच्या मागे आणि पुढे.. दृष्टीच्या पुढे दिसते ते वास्तव आणि मागे दिसते ती कल्पना किंवा स्वप्न. त्यामुळे ही भुवयांची फडफड या पोक्त बाईला वास्तव आणि स्वप्न यांच्यामध्ये तर झुलवत नसेल ना? मोठी अनिश्चित आणि अधांतरी अवस्था आहे. वर महेर देखील आता मागे राहिलेले आहे. मर्ढेकर म्हणतात त्याप्रमाणे “ऐशा टापूत चौफेर, नाही सासर माहेर..” पण अजून ही तिची अवस्था का झालेली आहे ते समजलेले नाही?
साचणाऱ्या आसवांना पेंग येते चांदणीची
आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची.
कुठल्यातरी दुःखाने बाईचे मन विचलित केलेले आहे. कुठल्या तरी विचारांनी तिला अस्वस्थ केलेले आहे. इतके की तिला रात्रभर झोप लागत नाही. अनामिक दुःखाने तिला रडू येत आहे पण जोरात रडण्याची मुभा दिसत नाही. आपले दुःख कोणाला सांगायची सोय नाही, कोणीही “तिचे” असे नाही जिच्याजवळ ती मन मोकळं करू शकेल. कदाचित हे दुःख चारचौघात सांगितले तर उपहास होण्याची भीती तर नसेल? मग सांगणार कोणाला, दिवसा रडू आले तर लोक विचारतील. मग बिचारी रात्री स्वतःशीच रडत बसते, संध्याकाळी लावलेल्या समईसारखी. पहाट होता होता इथे हिच्या डबडबलेल्या डोळ्यांवर झोप येते आणि तिथे समईच्या शुभ्र कळ्या फुलून मिटू लागतात.. अंधार करण्यासाठी!
स्वतःच स्वतःची केलेली संभावना म्हणजे स्वतःच स्वतःच्या अवस्थेवर करुणेची चादर पांघरणे. इथे ती स्वतःच्या अतिविचारांमुळे झालेल्या अस्थिर मनःस्थितीबद्दल स्पष्टीकरण देत आहे. हा “मुलुखाचा विसरभोळेपणा” म्हणजे मराठी भाषेने परकीय शब्दांचे करुणेच्या धाग्याने गुंफलेला अलंकारच म्हणावा लागेल. जुने मराठी वाचणाऱ्यांच्या एव्हाना लक्षात आलेच असेल. इथे हा विसरभोळेपणा आलेला असला तरी तो कशामुळे हे अजून समजलेले नाहीये. स्त्रियांच्या शरीरात काही विशिष्ट वेळी विशिष्ट बदल घडत असतात त्यामुळे देखील हे होते. या सगळ्याची उकल पुढे होते का पाहू..
गाठीमध्ये गं जिवाच्या तुझी अंगार्याची बोटे
वेडी उघडाया जाते उगा केतकीचे पाते
बाईला माहित आहे की कुठे ना कुठे उणीव तिच्यात आहे. ती स्वतःला दोषी समजत आहे. प्रत्यक्षात तिचा दोष नसो पण तिचे स्वतःला दोषी मानणे “तुझी अंगाऱ्याची बोटे” वरून जाणवते. “जिवाच्या गाठीत” म्हणजे गर्भ असा अर्थ घेतल्यास हे नक्की होते की काही ना काही कारणाने गर्भाला जिवंत ठेवण्यात ती असमर्थ ठरत आहे. एखाद्या राक्षसीसारखी ती वारंवार गर्भाला मारत आहे. विदारक वाटू शकते, पण उदासीनता माणसाला स्वतःत एखाद्या राक्षसाला बघायला देखील भाग पाडू शकते हे मानसशास्त्रीय सत्य आहे. ही बाई आतून खूप दुःखी आहे, स्वतःवर देखील दुःखी आहे. ‘हे सगळं माझ्यामुळे घडतंय’ हा तिचा ठाम विश्वास झालाय त्यामुळे ती पुढे म्हणते की मी ही इतकी वेडी आहे की जे करताना वेदना होणार हे निश्चित आहे ते करण्याचा प्रयत्न करत आहे. केतकीच्या पणाला काटे असतात. त्यामुळे ती एकमेकांना देखील अडकवून ठेवतात. छे! फार वेदनादायक आहे हे सगळं.
थोडी फुले माळू नये, डोळा पाणी लावू नये
पदराच्या किनारीला शिवू शिवू ऊन गं ये.
या उदासीबद्दल बाई आता स्वतःशी बोलत आहे. “थोडी फुले” या शब्दांना वाचून एका वेगळ्याच मनःस्थितीचा अंदाज येतो. स्वतःला थोडा धीर देखील देत आहे, समज देखील देत आहे. थोडी फुले माळायची थांब, थोडा धीर धर. इतकी अधीर होऊ नकोस. नाहीतर, समई तेवताना ती अशीच रोज ही, अधीरतेची फुले गळून पडतील. का तुला अशी थोडी थोडी फुले माळून डोळ्याला पाणी आणायचे आहे? का तुला दुःखी होऊन रडायचे आहे? शेवटी तुझ्या आयुष्यात ऊन जे येणार आहे (मूल!) ते तुझ्या पदराला धरून येणार आहे. पदराची काळजी घे! या कवितेची वेळ संध्याकाळची, काळोखाची आहे त्यामुळे इथे ऊन येण्याला देखील एक वेगळा अर्थ प्राप्त होतो. बाई स्वतःला समजावत आहे, तुझ्या मुक्तीचा मार्ग या उन्हातून जातो. हे तुझ्याच हातात आहे!
उगा बावरते मन भरू येताना केसर
अशा वेळेची, वाटते, अंगावर घ्यावी सर
तर्काच्या लवचिक फांदीवरपुढे मागे होणाऱ्या वास्तवाच्या हिंदोळ्यावर बाई बसलेली आहे असं जाणवत आहे. स्वतःला सांभाळायचं देखील आहे, धीर देखील द्यायचा आहे त्याच प्रमाणे नीती – अनीतीचे पाश देखील मोडायचे आहेत. आरती प्रभूंच्या कवितेचा रसास्वाद घेताना, दैहिक भावनांना सोडून चालणार नाही. कवी ग्रेस म्हणतात तशी ही एक व्याकुळ संध्याकाळ आहे. अशा वेळी पदराशी स्वप्न बाळगणाऱ्या या बाईच्या मनात अनेक विचार येत आहेत. बावरून जायला होत आहे. कारण सगळीकडे प्रश्नांचा अंधार दिसत आहे. त्यातच तिला या सगळ्या बंधनातून मुक्त व्हावे असे देखील वाटत आहे. अंगावर सर घेणे, याचा सरळसरळ अर्थ मला कात टाकणे असा वाटतो. ही पोक्त बाई या नैतिकतेच्या बंधनातून, निःपुत्रिकतेच्या सामाजिक लज्जेतून मुक्त होऊन जगण्याची मनापासून इच्छा होत आहे. मला इथे राहवून आरती प्रभूंच्या “रात्र काळी घागर काळी” या कादंबरीची आठवण होत आहे.
डोळ्यातल्या बाहुल्यांनी घरीदारी उतरावे
असे काहीसे वाटते याला कसली गं नावे?
या कडव्यातील पंक्ती वाचून एक वेगळीच गोष्ट मनात येते की “डोळ्यातील बाहुल्या” म्हणजे हवेहवेसे मुलं आणि त्याचे लहान लहान पावलांनी घरभर धावणे तर नसेल? इथे मला एका स्त्रीच्या मनाची बरीच वर्षे मूल न झाल्यामुळे झालेली अवस्था डोळ्यासमोर येत आहे. अशा बाईला हे भास होणे देखील स्वाभाविक आहे. आणि आपल्याला त्या पावलांची चित्रे डोळ्यासमोर येण्याचे भास, हे भास होते याची जाणीव होते. वास्तवाची जाणीव झाल्यामुळे ती पुन्हा एकदा करुणेने स्वतःला विचारते आहे, याला वाटण्याला काय म्हणावे गं? या कल्पनांचे या भासांचे काय करावे? माझ्या मते एका करुण प्रदेशातून या बाईचे मन चालत आहे.
हसशील, हास मला, मला हसूही सोसेना
अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का दुणा !
हे सगळे विचार मनात येत असताना, देव्हाऱ्याच्या समोर बाई बसलेली आहे, थोड्याच क्षणांपूर्वी समईतील वाती तेवल्या आहेत. आणि केसातील फुले गळल्यापासून हे विचारांचे जाळे मनाभोवती संध्याकाळच्या अंधारासारखे पसरत गेले आहे. पण या विचारात असताना ती समोर बघत असेल तेव्हा काय दिसत असेल? देव! हा विचार मनात आल्यावर ती देवालाच तर म्हणत नसेल ना की “हसशील, तर हास मला.. हसून घे. तूच माझे नशीब लिहिलेस आणि आता तूच माझ्याकडे चेहऱ्यावर स्मित ठेवून हास! तुला तसं हसणं सोपं आहे पण मला आता हे माझे दुःख लपवणे अवघड झाले आहे, जगाला सगळं काही ठीक आहे असे भासवत चेहऱ्यावर खोटे हसू आणणे आता सहन होत नाहीये. आता अश्रू खोल खोल गेलेला आहे, हे दुःख खूप खोल गेले आहे. वरवर काहीही असलं तरीही वास्तव काळोखी आणि दाहक दिसत आहे. पण तुला त्याचे काय? माझे दुःख बघून चंद्र थोडेच पूर्ण मोठा होऊन माझ्या आयुष्यावर सुखाच्या चांदण्याचा वर्षाव करणार आहे? मला वास्तवात जगणे भाग आहे! रात्रीच्या अंधाराची वाट बघणे भाग आहे. पुन्हा एका पाणावलेले डोळे घेऊन उद्याची वाट बघणे भाग आहे”.
रसग्रहण आणि अर्थ – ३
समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते
केसातच फुललेली जाई पायांशी पडते.
या कडव्यात आरती प्रभुंनी दिवेलागणीच्या वेळेची पार्शवभूमी दिलेली आहे. केसात माळलेली जाई वाचताना एक बाई समई तेवत आहे हे लक्षात येते. एक चलचित्र डोळ्यासमोर येते, की पदर सावरत समई तेवताना एक बाई थोडी झुकते किंवा पायांवर बसते आणि एकेक वात तेवू लागते. तेवढ्यात तिच्या केसातील सकाळी माळलेल्या व आता फुललेल्या, कळ्यांच्या गजऱ्यातील काही कळ्या खाली गळून पडतात. ती फुले पाहून बाई थोडी थबकते, गळालेल्या फुलांकडे बघून तिच्या मनात काही क्षणांसाठी अनेक विचार येऊ लागतात. पण कशाचे? हे पुढे पाहूया..
भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागे-पुढे
मागे मागे राहिलेले माझे माहेर बापुडे.
तिच्या भुवया फडफडू लागल्या आहेत. पण डावी की उजवी हे माहित नाही. तरिही भुवया फडफडणे हा एक शकुन आहे, एक संकेत आहे. त्यामुळे या फडफडण्याचा काहीतरी अर्थ आहे याचा विचार ती करत आहे. अस्पष्ट शकुन “दिठीच्याही मागे पुढे” जाणारे. दिठी म्हणजे दृष्टी. यावरून असे लक्षात येते की, ही बाई फडफडीचा संबंध, जे घडून गेलेलं आहे “भूतकाळ” आणि जे दिसत नाही “भविष्य” यांच्याशी जोडू पाहत आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्य यांचा विचार मनात येताच तिला जाणीव होते की तिचे महेर आता खूप खूप मागे राहिलेले आहे. इथे पुसटशी शंका येते की, ही बाई स्त्रित्वाच्या एका महत्वाच्या उंबरठ्यावर उभी आहे, जो एकदा ओलांडला की मागे फिरणे शक्य नाही..!
साचणाऱ्या आसवांना पेंग येते चांदणीची
आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची.
“पेंग येते चांदणीची” हे शब्द वाचून, हल्ली तिला लवकर झोप येत नाही असेच दिसते. रात्रभर ती विचारात असते, थोडी बेचैन असते. काही बाही विचारांमुळे तिला थोडं रडू देखील येतं आणि त्यांच्यावर ताबा मिळवायचा ती प्रयत्न करते. कदाचित कुणाला कळू नये हा हेतू असावा! विचार करत करत पहाटे डोळे मिटू लागतात. सध्या ती विसराळू देखील होत आहे आणि हे तिला जाणवत देखील आहे. रात्रभर डोळ्याला डोळा न लागणे, थोडी बेचैनी होणे (पण इतकीही नाही जोरात रडू कोसळेल. फक्त चिंता) आणि विसराळूपणा ही सगळी लक्षणे कशाची आहेत? आधी म्हटल्याप्रमाणे ही बाई स्त्रित्वाचा एक महत्वाचा उंभरठा ओलांडण्याच्या मार्गावर आहे.. मातृत्वाचा! कसा ते पुढच्या कडव्यात पाहू.
गाठीमध्ये गं जिवाच्या तुझी अंगार्याची बोटे
वेडी उघडाया जाते उगा केतकीचे पाते
कवितेच्या नायिकेला आता तिच्या आत एका नव्या जीवाची चाहूल येत आहे. त्या जीवाची हालचाल जाणवत आहे. या हालचालीमुळे बाईची बेचैनी फारच वाढलेली आहे. यावरून एक गोष्ट तर लक्षात येते की ही पहिलटकरणी आहे. त्यामुळे तिलाही हे सगळं नवीन आहे. आपल्यात होणारे हे अनेक बदल तिला नवीन आहेत आणि काहीसे घाबरवणारे देखील! (स्त्रियांना या भीतीचा अनुभव अधिक आहे त्यामुळे त्यांना, समजणं थोडं सोपं जाईल). पहिलटकरणीच्या मनात अनेक भीती, शंका आणि विचार येत असतात. पुरुषांना जरा अवघड वाटेल पण पहिलटकरणीला कधीकधी हे सगळं संपून जावं असे देखील विचार मनात येतात (अंगाऱ्याची बोटे!) तेव्हाच ती स्वतःला म्हणते आता मोठी हो आणि केतकीच्या पानांना उघडायला जाऊ नको, काटे लागतील आणि रक्त येईल! केतकीच्या पानांना काटे असतात त्यामुळे, केतकीच्या बनात जपून जावे लागते. आततायी विचार करू नकोस..
(इथे अंगाऱ्याची बोटे, याचा देवाचा अंगारा लावलेली बोटे असाही एक अर्थ मनात येतो. देवापुढे समई वगैरे लावल्यावर संध्याकाळी अंगारा लावणे ही जुनी पद्धत आहे. कुणाची दृष्ट लागू नये, वाईट शक्तींपासून संरक्षण व्हावे यासाठी अंगारा लावतात. त्यामुळे इथे एका बाजूला सगळं चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न करत असताना तुला केतकीची काटेरी पाने उघडून स्वतःला इजा होईल असं कशाला वागायचं आहे? असं ती स्वतःला म्हणत असेल असेही वाटते.)
थोडी फुले माळू नये, डोळा पाणी लावू नये
पदराच्या किनारीला शिवू शिवू ऊन गं ये.
मुलुखाची विसरभोळी तर ती झालीच आहे, त्यामुळे स्वतःला समज देत आहे. “अगं थोडी फुले का माळत आहेस? फुलं म्हणजे सुखाचं आणि आनंदाचं प्रतीक. स्वप्न बघायचीच आहेत तर पूर्ण पहा. प्रार्थनेला आणि स्वप्न रंगवताना आखडता हात कशाला? सगळं ठीक चालू आहे तर शंकाकुशंका कशाला मनात आणतेस आणि डोळे ओले करतेस? नको असं करुस. आत्ता संध्याकाळ असली आणि पुढे अंधार दिसत असला तरीही या घरात ऊन आणि प्रकाश तुझ्याच पदराला धरून एक नवजीवन घेऊन येणार आहे.” असं म्हणत स्वतःला धीर देत आहे, उभारी द्यायचा प्रयत्न करत आहे. एक तान्हं ऊन तिच्या पदराचे टोक धरून धरी येणार आहे!
उगा बावरते मन भरू येताना केसर
अशा वेळेची, वाटते, अंगावर घ्यावी सर
संध्याकाळी क्षितिजावर जशी केशरी छटा गडद होत जात आहे तशी ती अधिकच बावरत आहे. तिच्या सध्याच्या मनःस्थितीला हे अगदीच सामान्य वाटत आहे. त्यातून आजुबाजूला कोणी नाही, कदाचित यजमान देखील जवळ नाहीत म्हणून या एकटेपणामुळे तिला अजूनच बावरायला होत असावं. त्यामुळे तिच्या मनात आलं असणार की असा संधिप्रकाश मनावर घेण्यापेक्षा पावसाच्या सरीखाली चिंब भिजून जावं! क्षितिजाप्रमाणे मनावर पसरलेला मळवट धुवून टाकावा. नाहून निघावं. सगळ्या काळजी आणि शंकांतून मुक्त व्हावं. प्रश्नांनी आणि शंकांनी वेढलेल्या मनाला वाटत राहते की काहीतरी किमया घडावी आणि सगळे प्रश्न सुटून जावेत! तसंच काहीसं या पहिलटकरणीला का वाटू नये!?
डोळ्यातल्या बाहुल्यांनी घरीदारी उतरावे
असे काहीसे वाटते याला कसली गं नावे?
अर्थातच या पहिलटकरणी बाईला गर्भात काहीतरी घडत असल्याच्या जाणीव होत असणार, चाहुली असणार आणि त्याचबरोबर तिच्या डोळ्यात रोज नवनवीन स्वप्ने पंख पसरत असणार. घरातल्या प्रत्येक भागात, कोपऱ्यात, अंगणात, परसात बाळ कसे रांगेल? कसे खेळेल? याच्या कल्पनांनी ती मोहरून जात असेल. मातृत्त्व म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्मच. पण हा पुनर्जन्म ती स्वतःच्या डोळ्यांसमोर असताना बघत असते. त्यामुळे तिला त्याचे, रंग-ढंग मनातल्या मनात रंगवण्याची मुभा असते. तेच ही करत आहे. कल्पना रंगवून लाजत आहे आणि लाडीकपणे स्वतःलाच विचारत आहे “या अशा स्वप्नांना, स्वप्नरंजनाला काय गं म्हणावं? सगळ्या बायकांना असंच होतं का?”
हसशील, हास मला, मला हसूही सोसेना
अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का दुणा !
आधीच्या कडव्यात लाडीकपणे स्वतःशीच बोलली आणि स्वतःलाच मनातल्या मनात हसली. कधीकधी प्रेमात पडलेल्यांची अशी अवस्था होते. स्वतःच स्वतःशी बोलतात. तशीच काहीशी अवस्था या बाईची देखील झालेली आहे. स्वतःच्याच वागण्याचे स्वतःलाच सलज्ज हसू आल्याने त्या हसणाऱ्या प्रतिमेला लाडाने आणि खोट्या रागाने म्हणते. “हास हो.. हास! तुझ्यावर वेळ अली असती म्हणजे कळले असते की चलबिचल कशी होते ते. तुला काय जातंय हसायला? मला तर बाई तुझ्यासारखं हसू सोसवत नाहीये. अशी मनाची चलबिचल तुला नाही कळणार! अश्रू खोल झाला आहे, आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. आता मागे फिरणे नाही.” आणि हे सांगून झाल्यावर माझ्या डोळ्यांसमोर गरोदरपणामुळे चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आलेली आणि पहिलीच वेळ असल्याने मनातून जरा बावरलेली स्त्री येते. देवासमोर समई लावताना सगळ्यात शेवटी तिच्या मनात येतं “माझ्या स्वप्नांचा हा चंद्र (पोटातले बाळ) दुणावणार का? पौर्णिमेच्या चंद्रासारखा सुंदर, गोंडस, तेजस्वी आणि तरीही शीतल होणार का?” पहिलटकरणीला याहून कुठली मोठी काळजी असणार? देवापुढे समई लावताना याहून कुठली महत्वाची प्रार्थना असणार?
पहिलटकरणीच्या मनाचा ठाव घेणारी आणि अव्यक्ताला शब्द देणारी ही एक अप्रतिम कविता!