संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा खालील अभंग “तुकाराम गाथा” मधून घेत आहोत.
आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥१॥
रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥२॥
तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन अवघें खोटें ॥३॥
~ संत तुकाराम महाराज (तुकाराम गाथा, अभंग ३०२)
आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥१॥
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी अगदी सोप्या आणि थेट शब्दांत मनाची अवस्था, त्यानुरूप भासणारे जग आणि वस्तुस्थिती, याचे विवेचन केलेले आहे. मनात जसे विचार तसे जग दिसते पण वास्तविक जग तसे नसतेच. आंधळ्याला सगळ्या जगाला देखील आपल्यासारखे दिसत नाही असे वाटत राहते. इथे तुकाराम महाराजांना ‘आंधळेपण’ म्हणजे ‘सत्य बघू न शकण्याची प्रवृत्ती’ किंवा ‘सत्य मान्य न करता अज्ञानाच्या अंधःकारात जगण्याची प्रवृत्ती’ तर म्हणायचे नसेल ना? हा देखील विचार मनात येतो.
स्वतःला सत्य नीट दिसत नाही म्हणून जगाला देखील सत्याचा उलगडा झालेला नाही, असे सत्य न समजणारा किंवा सत्य मान्य न करणारा समजतो. पण वास्तव तसे नाही. एखाद्याला सत्य दिसत नाही म्हणून जगात सत्य कुणालाच समजलेले नाही किंवा एखादा अज्ञानाच्या गर्तेत बुडालेला आहे म्हणून सगळे जग अज्ञानी आहे हे समजणे म्हणजे चक्क सत्याशी फारकत आहे!
रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥२॥
रोग्याला देखील तोंडाची चव गेल्याने मिष्टान्न देखील विषाप्रमाणे बेचव लागते. पण याचा अर्थ असा नव्हे की अन्न बेचव आहे! पुन्हा एकदा महाराज सांगतात की जशी माणसाची अवस्था असते त्याला सगळ्या गोष्टी तशाच भासतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे जर एखाद्या दिवशी आपण चिंताग्रस्त असलो तर सगळ्या जगाकडे आपण “जग देखील चिंताग्रस्त आहे” अशा नजरेने बघतो! किंवा आपण आनंदी असलो तर संपूर्ण जगात चैतन्य पसरल्यासारखे वाटते.
इथे रोगी म्हणजे फक्त शारीरिकदृष्ट्या आजारी हाच अर्थ घेऊन चालणार नाही. इथे रोग म्हणजे “विकार” किंवा “विषयबाधा” असा देखील अर्थ घेतला जाऊ शकतो. त्यामुळे षड्रिपुंनी ग्रासलेल्या माणसाला, त्याला सांगितलेली चांगली गोष्ट (मिष्टान्न) देखील वाईट किंवा अपायकारक वाटू लागते. अशा माणसाला साधू संतांचे वचन देखील असत्य, सत्त्वहीन किंवा निरर्थक वाटू लागते.
तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन अवघें खोटें ॥३॥
संत तुकाराम महाराज म्हणतात, जो मनुष्य आतून शुद्ध नाही त्याला अवघे जग खोटे, निरर्थक, सत्त्वहीन आणि असत्य वाटू लागते. मन शुद्ध नसेल तर विचार जे आजूबाजूला घडणाऱ्या घटनांनाचा मानाने केलेला परिपाक असतो, ते शुद्ध कसे राहतील? विचार शुद्ध नसतील तर आचरण शुद्ध कसे असेल? अशा माणसाला स्वतःचे जगणे सत्त्वहीन झाल्यामुळे जग देखील सत्त्वहीन झालेले आहे असे वाटत राहते. त्यामुळे तुकाराम महाराज हा उपदेश करत आहेत की आधी स्वतः शुद्ध व्हा! म्हणजे जग देखील शुद्ध वाटू लागेल. तुमच्या शुद्ध आचार – विचारांनी तुम्ही कुंठित, रोगट आणि पूर्वग्रहदूषित मनोवृत्ती सोडून तुमचे कर्म करू शकाल.
हा झाला अभंगाचा भावार्थ. पण, अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे “शुद्ध” म्हणजे काय?
अनेक संतांनी शुद्धीच्या अनेक व्याख्या दिलेल्या आहेत पण तूर्तास संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे विवेचन करत आहोत तर त्यांच्याच शब्दांत शुद्धीची व्याख्या पाहू.
पुढील दळण अभंग वाचून तुम्हाला “शुद्ध” या शब्दाची जरा प्रचिती येईल. इथे संत तुकाराम महाराजांनी शुद्धी, अन्न, स्वाद आणि स्त्रीधर्म यांची सांगड घातलेली दिसते आणि प्रत्येक पंक्तीत शुद्ध असण्याची वेगवेगळी लक्षणे समोर येतात.
शुद्ध दळणाचें सुख सांगों काई । मानवित सईबाई तुज ॥१॥
शुद्ध तें वळण लवकरी पावे । डोलवितां निवे अष्टांग तें ॥ध्रु.॥
शुद्ध हें जेवितां तन निवे मन । अल्प त्या इंधन बुडा लागे ॥२॥
शुद्ध त्याचा पाक सुचित चांगला । अविट तयाला नाश नाहीं ॥३॥
तुका म्हणे शुद्ध आवडे सकळां । भ्रतार वेगळा न करी जीवें ॥४॥
शेवटची पंक्ती माझ्या मते सगळ्या अभंगाचा परिपाक आहे जिथे महाराज म्हणतात, “भ्रतार वेगळा न करी जीवें”. भ्रतार म्हणजे यजमान किंवा नवरा. पण अध्यात्मिक विचारांची माहिती असलेल्या वाचकाला, श्रोत्याला या रूपकामागची भूमिका त्वरित समजेल की, इथे विषय नवऱ्याचा नाही तर आपल्यात परमेश्वर निवास करत आहे त्याला सोडून जाऊ नका हा उपदेश आहे. थोडक्यात अद्वैतावर श्रद्धा असणारा, परमेश्वराची भक्ती करणारा “शुद्ध”.
आणखीन एक उदाहरण देऊ शकतो. आणखीन एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात,
"तुका ह्मणे नवविध । भक्ती जाणे तो चि शुद्ध"
नवविधा भक्तीचा अवलंब करणारा “शुद्ध”. नवविधा भक्ती द्वैतापासून अद्वैताकडे घेऊन जाणारा भक्तिमार्ग आहे!
आशा आहे या विवेचनानंतर “शुद्ध” शब्दाबद्दल देखील शंका दूर झाली असेल. पांडुरंग पांडुरंग ..
आणखीन अध्यात्मिक साहित्य वाचण्यासाठी इथे क्लिक करा.