अबीर गुलाल उधळीत रंग।
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग॥ धृ ॥
उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातिहीन|
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन|
पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग॥ १ ॥
वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू।
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ।
विठ्ठलाचे नाम घेऊ होउनी निःसंग ॥ २॥
आषाढी-कार्तिकी भक्तजन येती।
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती।
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग॥ ३॥
“अबीर गुलाल..” एवढे दोन शब्द जरी उच्चारले तरी सगळ्यांना एकंच अभंग मनात येतो तो म्हणजे “अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग” वारकरी संप्रदायातील महान संत, संत चोखामेळा यांचा हा अभंग. स्व. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी आपल्या स्वरांनी समस्त मराठी मानसावर (मनावर) कायमचा कोरलेला आहे.
या अभंगाचा अर्थ समजून घेताना किंवा चिंतन करताना खरं तर पहिल्याच पंक्तींना अडखळायला होते.
“अबीर गुलाल उधळीत रंग।नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग॥”
यातही ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ हे शब्द वाचले की गुलाबी, केशरी रंगांची उधळण होत आहे हे समजतं. माझ्या मतानुसार ही पहाटेच्या आभाळातील रंगांची उधळण आहे. पहाट का? आणि संध्याकाळ का नाही? याचा संदर्भ पुढील कडव्यांतून मिळतो. तो आपण त्या कडव्यांचा अर्थ समजून घेताना पाहू.
संबंध अभंगात, सगळ्यात जास्त बुचकळ्यात टाकणारी पंक्ती म्हणजे ‘नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग’ आणि यातही अधिक बुचकळ्यात टाकणारा शब्द म्हणजे “नाथा”
सरळसरळ अर्थ पहिला तर असाच होईल की, नाथाच्या घरी, माझा मित्र पांडुरंग, अबीर गुलालाची उधळण करत नाचत आहे. पण स्वतः पांडुरंग असताना आणखीन हा “नाथ” कोण आहे? यावाक्याकडे दोन तीन वेगवेगळ्या विचारकोनांनी बघण्याची फार ईच्छा होते.
इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. अनेक (म्हणजे खरंच खूप) जणांच्या मते नाथ म्हणजे संत एकनाथ महाराज. पण हे अगदीच अशक्य आहे कारण, संत चोखामेळा १४ व्या शतकातले तर संत एकनाथ महाराज सोळाव्या शतकातले!
एक सरळसरळ अर्थ जो चटकन मनात आला तो म्हणजे, नाथा घरी म्हणजे “परमेश्वराच्या घरी” आणि परमेश्वराचं घर म्हणजे पंढरपूर! तर एक कल्पना अशी की पहाटेच्या उजाडायचा वेळी अबीर गुलाल रंगांच्या पार्श्वभूमीवर संत चोखामेळांना पंढरपुरातील पांडुरंगाचे मंदिर दिसले असावे आणि त्यांच्या मनात हे शब्द उमटले असावेत!
आणखी एक अर्थ जो मनात आला तो म्हणजे, संत चोखामेळा सर्वाभूती परमात्माला, पांडुरंग संबोधून तर नाथा घरी म्हणजे आभाळात, अबीर रंग उधळून आणि नाचून म्हणजे जणू काही सर्व दिशांना नवचैतन्य पसरवत आहे, असं तर म्हणायचं नाही ना? मी स्वतः कवी असल्यामुळे कवी मन कशाची उपमा कशाला देईल आणि कुठले रूपक कुणासाठी वापरेल याची खात्री नसते हे खात्रीलायक सांगू शकतो.
पण या दोन्हीपेक्षा आणखीन एक सूक्ष्म पण करुणेने भरलेला अर्थ मला उमगला. तो सांगायच्या आधी त्याची पार्श्वभूमी म्हणून हे सांगणं आलंच की, संत चोखामेळा जातीने महार असल्याने त्यांना आणि त्यांच्या पत्नी संत सोयराबाई यांना अनेक अपमान आणि अत्याचार सहन करावे लागले. इतकेच काय तर आख्यायिका अशीही आहे की पंढरपूरच्या मंदिरात प्रवेश केला आणि विठ्ठलाच्या चरणांना स्पर्श केला म्हणून, संत चोखामेळांना प्रसंगी शारीरिक छळ देखील भोगावा लागला. “समाजाला नको असल्याचे दुःख, समाजाने तिरस्कृत केल्याची आणि दूर लोटल्याची खंत” कायम त्यांच्या मनात सलत असणार आणि शेवटी पांडुरंग भक्तीत त्यांना एक प्रकारची शांतता मिळत असणार, असा माझा अंदाज आहे. इतकं असूनही या संत मंडळींची विठ्ठलभक्ती तसूभरही कमी झाली नाही, ज्या समाजाने त्यांची उपेक्षा केली त्या समाजाचे भले कशात आहे सतत याचाच विचार केला आणि अद्वैताचा व भक्ती-कर्म योग यांचा प्रचार करत राहिले. यामुळेच हे संत महान आहेत.
हा सगळा विचार केल्यानंतर “नाथा घरी” याचा एक वेगळाच अर्थ उमगला. नाथ म्हणजे मालक. पूर्वीच्या काळी सवर्ण जणूकाही समाजाचे मालक होते. त्याचमुळे मंदिरे देखील त्यांच्याच मालकीची होती. दलितांना या तथाकथित उच्च जातीच्या मंडळींना जवळजवळ मालक मानावे लागत असे. त्यामुळे विडंबना अशी झाली की, तिन्ही लोकांचा स्वामी असलेल्या पांडुरंगाच्या मंदिराचे म्हणजेच घराचे मालक हे उच्चवर्णी (?) लोक! त्यामुळे संत चोखामेळा नाथा घरी म्हणताना कुठेतरी या विडंबनेबद्दल, या विरोधाभासाबद्दल तर बोलत नाहीत ना? हा विचार मनात येतो.
हा विचार केला तर “नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग” या पंक्तीचा अर्थ जो समोर येतो तो असा की, तिन्ही लोकांचा जो स्वामी आहे तो माझा मित्र पांडुरंग, समाजाच्या नाथांच्या/मालकांच्या/ठेकेदारांच्या घरी म्हणजे मंदिरात नाचत आहे! त्या बिचाऱ्या स्वतःला मालक म्हणवून घेणाऱ्यांना हे माहितच नाही की, त्यांनी ज्याला आपल्या घरी, दारामागे स्पृश्यास्पृश्यतेच्या मागे लपवून ठेवलेला आहे तो माझा मित्र आहे, सखा आहे!
एकाच पंक्तीत विडंबना, विरोधाभास आणि समाजाने केलेली क्रूर चेष्टा यांचे दर्शन, संत चोखामेळा घडवतात.
उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातिहीन|
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन|
पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग॥ १ ॥
आधी नमूद केल्या प्रमाणे संत चोखामेळा महाराज, महार जातीचे असल्याने जातिहीन होते. जातिहीन चा ढोबळमानाने अर्थ नीचजातीचे (मला हे लिहिताना देखील त्रास होत आहे!) हाच आहे. जात नसलेले म्हणजे जातिहीन. थोडक्यात ज्या जातीला काही अस्तित्व नाही असे. जातिहीन म्हणजे हीन जातीचे असाही अर्थ होतो. पण एकंदरीत या सगळ्यांचा परामर्श एकच आहे. या कडव्यात संत चोखामेळांचे दुःख अगदी लख्खपणे समोर येते “उंबरठ्यासी कैसे शिवू?” कारण जातिहीन असल्याने त्यांना मंदिरात प्रवेश निषिद्ध होता. प्रवेश नाही त्यामुळे पांडुरंगाचे दर्शन नाही, आणि दर्शन नाही त्यामुळे ते रूप बघण्यात लीन (तल्लीन) होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही!
पण तरीही कुठे ना कुठे अद्वैताच्या एखाद्या खऱ्या भक्ताप्रमाणे, संत चोखामेळा महाराज दारातच उभे राहून म्हणतात तुम्ही प्रवेश नाही दिलात म्हणून काय झालं? आम्ही पायरीशी उभे राहू, अभंग गाऊ आणि दंग होऊ!
वाळवंटी गावू आह्मी वाळवंटी नाचू।
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ।
विठ्ठलाचे नाम घेऊ होउनी निःसंग ॥ २॥
पहिल्या कडव्यात हे सिद्ध झालं की तुम्ही प्रवेश नाकारला म्हणून आम्ही पांडुरंगाला सोडणार नाही, त्याची भक्ती सोडणार नाही. मंदिरात जाता नाही आले म्हणून काय झालं आम्ही, चंद्रभागेच्या वाळवंटावर जाऊ, नाचू आणि गाऊ! चंद्रभागेच्या पाण्यात न्हाऊ. तुमचे राज्य मंदिरापुरते, या वाळवंटावर तर तुमचे राज्य नाही.. चंद्रभागेच्या पाण्यावर तर तुमचे राज्य नाही! मग तिथे आम्ही नाचू, गाऊ, पांडुरंगाच्या नामस्मरणात दंग होऊ.. निःसंग होऊ! निःसंग म्हणजे सांग सोडून/टाकून. अर्थात नश्वर देहाचा सांग सोडून परमात्म्याशी एकरूप होऊ म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचं तर तल्लीन होऊ.
अजून एक सूक्ष्म अर्थ जो सांगावासा वाटतो तो म्हणजे वाळवंट! चंद्रभागेच्या तीरावर वाळवंट आहेच पण मराठीमध्ये वाळवंट म्हणजे केवळ वाळूचा प्रदेश नव्हे. मराठीत वाळवंट म्हणजे यातनांचा प्रदेश या अर्थाने देखील वापरला जातो. संत चोखामेळा महाराजांना असं तर सांगायचं नसेल ना? की तुम्ही मंदिरात येऊ देत नाही तर हे दुःख आणि ही यातनांनी तयार झालेल्या आमच्या मनाच्या वाळवंटात जाऊ, भक्तीच्या पाण्यात न्हाऊ आणि पांडुरंगभक्तीत लीन होऊ! थोडा वेगळा विचार आहे पण माझ्या मनात हा विचार येऊन गेला की, संतांनी मनातल्या दुःखाला वाळवंटाची उपमा तर दिली नसेल ना?
आषाढी-कार्तिकी भक्तजन येती।
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती।
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग॥ ३॥
या पंक्तीचा अर्थ त्यामानाने समजायला सोपा आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला गावोगावीचे विठ्ठलभक्त एकत्र येतात. संत मंडळी या चंद्रभागेच्या तीरावरील वाळवंटात आपली कीर्तने करतात. याला संत मंडळी भक्तांचा मळा देखील म्हणतात. नाना तऱ्हेचे, कुळाचे, जातींचे आणि पार्श्वभूमीचे लोक या वाळवंटावर एकत्र येतात आणि एकमुखाने पांडुरंगाचे नामस्मरण करून दंग होतात.
आषाढी आणि कार्तिकीला भक्तमंडळी सकाळी सकाळी पंढरपुरात यायला सुरुवात होते म्हणून माझा कयास असा की अबीर गुलाल म्हणजे उजाडताना आकाशात दिसणारी अबीर आणि गुलाली रंगांची उधळण..
थोडं खोलात गेलं तर, आधीच्या कडव्यात सांगितल्याप्रमाणे वाळवंट याचा दुसरा अर्थ ध्यानात घेतला तर, “पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती” या पंक्तीचा असाही अर्थ निघू शकतो की संत चोखामेळांसारखे अनेक उपेक्षित संत, महात्मे, भक्त या दुःखाच्या वाळवंटात एकत्र येतात. समाजाने दिलेले दुःख त्यांना एकत्र आणते किंवा ते दुःख त्यांच्यातल्या परस्पर स्नेहाला कारणीभूत ठरते. आणि ते सगळे ‘समदुःखी’ आणि त्यांच्या दुःखावर स्नेह आणि करुणेचा लेप लावणारे इतर भक्तगण या यातनेच्या आणि दुःखाच्या वाळवंटात आपल्या भक्तीचा मळा फुलवतात, कीर्तन गातात-ऐकतात आणि आपली सगळी दुःखे पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून फक्त त्या पांडुरंगाच्या नामस्मरणात दंग होतात.
हा मला उमगलेला, समजलेला संत चोखामेळा यांच्या “अबीर गुलाल उधळीत रंग” या अभंगाचा भावार्थ आणि रसास्वाद.
In first stanza you have written Sant Eknath Maharaj. Maybe you are trying to say Sant Chokhamela?
Same thing goes for the second stanza
Yes, thank you for pointing out. It’s a blunder from my side. Corrected it!
नमस्कार, खूप छान पद्धतीने आपण या अभंगाचा अर्थ, भावार्थ सोपा करुन सांगितला आहे कि त्यांच्या वेदना मनाला जाणवल्यात.किती कठिण असेल अश्या सर्वांचे जगणे…धन्यवाद.
👍👍👌👌💐💐💐💐
Dhanyawad!
Great explanation Sir . I enjoyed the explanation very much .
Khup khup abhar!
अतिशय सुंदर भावार्थ सादर केलात आपण .धन्यवाद अगदी मनापासून…