चिंचवडचे मोरया गोसावी सर्वविख्यात गणपती भक्त आणि गाणपत्य पंथाचे मुख्य आहेत. त्यांनी गणपती वर अनेक श्लोक आणि आरत्या रचल्या. त्यातील काही प्रसिद्ध “शेंदूर लाल चढायो” आणि “नानापरिमळ दूर्वा“. पण याखेरीजही अशी अनेक स्तोत्रे आणि श्लोक आपण लहानपणापासून ऐकत अथवा म्हणत आलेलो आहोत, जी खरं तर मोरया गोसावी यांनी रचली आहेत हे देखील लक्षात राहात नाही. त्यांच्यापैकी एक स्तोत्र म्हणजे “प्रारंभी विनती करू गणपती”. या ब्लॉगमध्ये हे स्तोत्र पाहू
प्रारंभी विनति करु गणपती विद्यादयासागरा ।
अज्ञानत्व हरोनि बुध्दि मति दे आराध्य मोरेश्वरा ॥
चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी ।
हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहु तोषवी ॥१॥
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे ।
माथा शेंदूर पाझरे वरि बरे दूर्वांकुराचे तुरे ॥
माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनि चिंता हरे ।
गोसावीसुत वासुदेव कवि रे त्या मोरयाला स्मरे ॥२॥
शार्दूलविक्रीडित वृत्तातील हे स्तोत्र अत्यंत मधुर तर आहेच पण, सहज सोप्या भाषेत गणपतीला केलेली प्रार्थना कायम लक्षात राहणारी आहे. या वृत्ताचे हेच वैशिष्ट्य आहे की स्तोत्राच्या चालीत म्हणता येते.