जपानमध्ये सेन नोरी क्यु नावाचे चहा बनवण्यात निष्णात गुरू होते. ते त्यांच्या चहातील पदार्थांचे आणि प्रक्रियेचे प्रमाण यांच्यासाठी प्रसिद्ध होते. या गुरूंची ही, आयुष्यात योग्य प्रमाणाचे महत्त्व सांगणारी गोष्ट.
एकदा सेन नोरी क्यु गुरूंना आपल्या घराच्या एका खांबावर फुलाच्या परडीसाठी एक खिळा ठोकायचा असल्याने, त्यांनी एका सुताराला बोलावले. सुतार आला आणि त्याने खिळा नक्की कुठे ठोकायचा? विचारलं. सेन नोरी क्यु सांगू लागले. बराच वेळ सेन नोरी क्यु, सुताराला वर-खाली, डावीकडे-उजवीकडे करत मार्गदर्शन करत होते. बराच वेळ हेच सुरू राहिले आणि शेवटी एकदाची योग्य जागा सापडल्यावर सेन नोरी क्यु म्हणाले
“हां, आता ही योग्य जागा आहे, इथे खिळा ठोकूया”
असं म्हणून सेन नोरी क्यु, सुतारासाठी चहा बनवायला निघून गेले. पण सुताराने गुरूंची फिरकी घ्यायचं ठरवलं आणि त्या जागी अगदी छोटीशी खूण करून ठेवली पण खिळा ठोकला नाही.
सेन नोरी क्यु, चहा घेऊन आले. दोघांनी चहा प्यायला आणि सुतार म्हणाला
“मी खिळा ठोकायचा विसरलोय. मला पुन्हा एकदा खिळा कुठे ठोकायचा सांगाल का?”
सेन नोरी क्यु, बरं म्हणतात आणि पुन्हा एकदा सुताराला मार्गदर्शन करू लागतात. पुन्हा एकदा त्यांचं वर-खाली, डावीकडे-उजवीकडे सुरू होतं. पण गमतीचा भाग असा की पुन्हा एकदा बराच वेळ इकडे तिकडे करून झाल्यावर सेन नोरी क्यु, पुन्हा एकदा पूर्वीच्याच जागेवर येतात आणि म्हणतात,
“हां, सापडली जागा. इथे खिळा ठोका! चहा असो नाहीतर खिळ्याची जागा नाहीतर आयुष्य, जोपर्यंत प्रमाण योग्य नसतं तोपर्यंत ती गोष्ट योग्य नसते!”
सुतार सेन नोरी क्यु कडे बघत राहिला..
आणखीन झेन कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा