एकदा झेन गुरू शिचिरी कोजुन, आपल्या घरी मंत्रोच्चारण करत बसलेले होते. एक चोर हातात तलवार घेऊन त्यांच्या घरात शिरतो आणि गुरूंना तलवार दाखवून धमकी देतो
“सगळे पैसे काढा नाहीतर मी जीव घेईन”
शिचिरी गुरू यत्किंचितही विचलित न होता उत्तर देतात
“पैसे तिकडे कपाटात आहेत, तिकडून घे माझ्या मंत्रोच्चारात व्यत्यय आणू नकोस”
चोर कपाटातून पैसे काढायला लागतो तेव्हा शिचिरी गुरू चोराला उद्देशून म्हणतात
“सगळे घेऊन जाऊ नकोस मला उद्या कर भरायचा आहे”
चोर जवळजवळ सगळे पैसे उचलतो. चोर दारापाशी आल्यावर आल्यावर शिचिरी गुरू पुन्हा चोराला उद्देशून म्हणतात.
“ज्या व्यक्तीने आपल्याला उपहार दिलेला असतो त्याचे आभार मानायचे असतात”
चोर दोन क्षण थबकतो आणि “धन्यवाद” म्हणून निघून जातो.
आठवडाभराने चोर पकडला जातो. चोराने बऱ्याच ठिकाणी चोरी केल्याचे उघड होते. चौकशीदरम्यान चोर सांगतो की त्याने गुरू शिचिरी यांच्या घरी देखील चोरी केलेली आहे. जेव्हा न्यायदानाची वेळ येते तेव्हा शिचिरी गुरूंना ओळख करायला आणि जबानी द्यायला बोलावले जाते.
पण शिचिरी गुरू अधिकाऱ्यांना सांगतात
“हा माणूस चोर नाहीये. किमान मला तरी हा चोर वाटत नाही. मी आपणहून याला पैसे दिले होते आणि त्याबद्दल त्याने माझे आभार देखील मानले होते”
पण तरीही इतर चोरीच्या घटनांसाठी चोराला शिक्षा होतेच. कैक वर्ष चोर कारावासात घालवतो.
एक दिवस पुन्हा शिचिरी गुरू आपल्या घरात मंत्रोच्चार करत बसलेले असताना कोणीतरी अचानक दरवाजा उघडून आत येतो. हा माणूस तो चोर असतो जो कैक वर्षांची शिक्षा भोगून आलेला असतो. चोर आता वयस्क दिसत असतो, तो शिचिरी गुरूंचे पाय धरतो आणि म्हणतो
“मला तुमचा शिष्य व्हायचं आहे”
आणखीन झेन कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा..