पूर्वी जपानमध्ये झेन पंथाचे एक वृद्ध गुरू होते. त्यांनी आपल्या मोठ्या आयुष्यात अनेक बरे वाईट अनुभव घेतलेले होते. एकदा त्यांची एका मुलींच्या प्रशालेत कुलगुरूपदी नियुक्ती होते. वृद्ध गुरू ती जबाबदारी स्विकारतात.
कुलगुरू झाल्यावर त्यांना अनेक चर्चांमध्ये आणि इतर संवादांमध्ये सहभाग घ्यायला मिळत असे. पण, त्यांच्या लक्षात आलं की तरुण विद्यार्थिनींचे सगळे विषय घुमून फिरून स्त्री – पुरुष यांच्यातील संबंधांवर, प्रेमावर येऊन पोहोचत असे. विषय कुठलाही असला तरी त्याचा शेवट प्रेमात आणि प्रेमाबद्दलच्या उथळ संवादात होत असे.
एक दोनदा त्यांनी खालील उपदेश द्यायचा प्रयत्न केला
“विद्यार्थिनींनो, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. युद्धाच्या प्रसंगी अति क्रोध तुम्हाला चुकीचा डाव किंवा चुकीची रणनीती वापरायला भाग पाडतो. अति क्रोधामुळे तुम्ही जखमी अथवा मरण देखील पावू शकता. तसेच जर तुम्ही धर्माचा आणि धार्मिक विश्वासांचा अतिरेक केलात तर तुम्ही अत्यंत कट्टर व कर्मठ बनून समाजात एकटे पडू शकता आणि लोक तुमचा दुःस्वास देखील करू शकतात.
प्रेमाचं देखील असंच आहे. अति प्रेम देखील वाईट आहे. कारण हळुहळू तुम्हाला लक्षात येईल की ज्याला तुम्ही प्रेम समजत होता तो निव्वळ भास होता. जिच्याबद्दल कल्पना करत आहात ती व्यक्ती प्रत्यक्षात तुम्हाला कधीही मिळणार नाहीये. मग तुम्हाला मानसिक त्रास होईल, तुम्ही नैराश्याच्या गर्तेत जाऊ शकता. त्यामुळे हे स्वप्नरंजन करू नका. प्रेमाचा अतिरेक म्हणजे धारदार सुरीच्या टोकावरच्या मधाच्या थेंबाला चाटून खाण्यासारखं आहे!”
हा उपदेश ऐकून एक तरुण विद्यार्थिनीने वृद्ध गुरूंना खिजवण्यासाठी विचारलं
“पण गुरूजी तुम्ही तर ब्रह्मचारी आहात. तुम्हाला प्रेम आणि स्त्री – पुरुष संबंधांबद्दल आणि प्रेमाबद्दल काय माहिती असणार!?”
वृद्ध झेन गुरू शांत स्वरात म्हणाले
“कधी वेळ मिळालाच.. तर मी संन्यासी का झालो ही कथा तुम्हाला सांगेन”
आणखीन झेन कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा..