एकोणिसाव्या शतकात जपानमध्ये नान’इन नावाचे एक झेन गुरू होते. त्यांची ख्याती सर्वदूर पसरलेली होती. त्यांची ख्याती ऐकून एका युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर नान’इन यांना भेटायला येतात. प्रोफेसर पाश्चात्य शिक्षण घेतलेले होते.
प्रोफेसर, नान’इन यांना भेटायला त्यांच्या घरी येतात. झेन गुरू त्यांचे यथोचित स्वागत करतात आणि त्यांच्या येण्याचे प्रयोजन विचारतात.
“आम्ही तुमच्याकडून झेनबद्दल माहिती घ्यायला. झेनबद्दल शिकायला आलेलो आहे” प्रोफेसर म्हणाले. त्यांच्या स्वरात शिक्षणाचा थोडा दंभ जाणवत होता.
“ठीक आहे” म्हणत गुरू पाहुण्यांसाठी त्यांच्या कपमध्ये चहा ओतू लागतात.
आश्चर्याची गोष्ट अशी की झेन गुरू चहा ओतणं थांबवत नाहीत. कप भरल्यावर देखील गुरू चहा ओतत राहतात. चहा कपातून बाहेर पडतो. तरीसुद्धा गुरू, कपमध्ये चहा ओतणं थांबवत नाहीत. संपूर्ण टेबलवर आणि जमिनीवर चहा पसरतो, तरीही गुरू कपमध्ये चहा ओतणं थांबवत नाहीत.
शेवटी न राहवून प्रोफेसर म्हणतात.
“गुरूजी काय करत आहात? कप भरलेला आहे”
झेन गुरू नान’इन चहा ओतणं थांबवतात. शांत होतात.
“ज्याप्रमाणे भरलेल्या पेल्यात आणखी चहा मावू शकत नाही, त्याचप्रमाणे जोपर्यंत तुमचे मन आणि बुद्धी पूर्वग्रहांनी भरलेले राहील तोपर्यंत मी त्यांच्यात नवीन विचार भरू शकत नाही”
तात्पर्य:
कुठलीही नवीन गोष्ट शिकायची असल्यास आधी सगळे पूर्वग्रह सोडून देणं गरजेचं आहे.
आणखीन झेन कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा..