November 5, 2024
ग्रेस तू का गेलास?

ग्रेस तू का गेलास?

Spread the love

हे आजचं स्वप्न आहे. याला स्वप्न म्हणावं की मनाच्या कुठल्यातरी दूरच्या अंधाऱ्या कोपऱ्यात एका बाळमुठीने लपवलेले एक रंगवलेले पान? आधी तर विश्वासच बसत नव्हता. तसेही ग्लानीत असताना बऱ्याच संदर्भरहीत चित्रांना जोडणं अशक्य होत जातं. काल रात्री खरं तर झोपायच्या आधी मी नक्की काय विचार करत होतो? हे आता स्मरत नाहीये. कारण, त्यानंतर पडलेल्या स्वप्नांच्या रंगांनी या स्मृती पुसून टाकल्या गेल्या आहेत. आधीच मी सर्दी खोकल्याने बेजार, त्यातून झोप येत नाही, चैन पडत नाही. डोळे मिटले आणि हळूहळू डोळ्यांच्या क्षितिजाच्या टोकापर्यंत एक अंधार…

माझ्या मते काही क्षण असेच गेले असावेत. नक्की आठवत नाही, वेळेचं भान राहण्यासाठीचे सारे संकेत रात्रीच्या गहिर रंगात विरून गेले होते. अचानक मी एका १० – १२ वर्षांपूर्वीच्या घरात जावून पोहोचलो. आधी वाटलं मी आमच्या जुन्या घरात गेलोय की काय ?! पण ते घर आमचं नव्हतं. ते घर माझ्या ओळखीतल्या कुणाचंच नव्हतं! अत्यंत फिकट तपकिरी रंगाच्या भिंती. मी एका पलांगासमोर खाली मांडी घालून बसलोय, कुणाची तरी वाट बघत. 

मी डावीकडे नजर फिरवली… भिंतीवर अनेक चित्र विचित्र रेखाचित्रांच्या चौकटी लटकत होत्या, भिंतीना जोडून असलेल्या मेजेवर अनेक वेगवेगळ्या गोष्टी. मी इकडे तिकडे पहात होतो. दुसऱ्या भिंतीवर एका कुरळ्या काळ्या करड्या केसांच्या आणि दाढी असलेल्या माणसाचा एक मोठा फोटो लावलेला त्याच्या बाजूला भिंतीवर लटकणारा एक लाकडी क्रूस आणि त्यावर डोळे मिटून निस्तब्ध येसू. त्याखालच्या टेबलावर ज्ञानेश्वरांची तसबीर आणि त्यापुढे रुद्राक्षांच्या माळेचे वेटोळे… एवढे विरोधाभास!? काही क्षण मी विचारात पडलो की मी नक्की कुठे आलोय?

मी या विचारातच होतो की कोणी एक वयस्कर माणूस खोलीत चालत आला काही क्षण शेजारच्या एका चित्राकडे पाहत उभा राहिला. माझ्याकडे पाठ होती. मी तसाच खाली बसून होतो. मी त्याच्याकडे पाहिलं, एक गोष्ट मानावीच लागेल की या माणसात आणि त्या फोटोतल्या माणसात एक साम्य होतं कुरळे केस फक्त या माणसाचे जरा जस्तच पाढरे होते. मला काय बोलावे काळात नव्हत, की त्यानेच एकदम प्रश्न केला.

“पुण्यावरून कधी आलास ?”

आणि त्याने वळून माझ्याकडे पाहिलं … काही क्षण माझा माझ्यावरच विश्वास बसेना … “ग्रेस !” मी अचानक बोलून गेलो.

पण हे कसं शक्य आहे !? ग्रेस तर ..

ग्रेस समोर बसले आणि मला अचानक वाटलं की मी परत एकदा लहान झालोय, कोणीतरी मला खेळण्याच्या दुकानात किंवा चॉकलेटच्या दुकानात घेऊन गेलाय. या क्षणाला स्वतःला नक्कीच विचारावसं वाटलं मी स्वप्न तर पहात नाहीये ना!?

ग्रेस आपणहूनच बोलू लागले, जणू मी खरोखरीच एक लहान मुलगा होतो. मला लोकांची एक गोष्ट मुळीच आवडत नाही. लोक ग्रेस ला खूप नावं ठेवतात, बऱ्याचदा खरं तर ते स्वतःच्या भाषिक लाचारीचं खापर दुसऱ्यावर फोडू पाहत असतात. मी ऐकत होतो ग्रेस सांगत होते, बोलत होते. मला एकही शब्द ऐकू येत नव्हता. मला फक्त ग्रेस च्या प्रसन्न मुद्रा दिसत होत्या. खरं सांगा जर भावना कळत असतील तर शब्दांची खरंच गरज असते का? जणू कोण्या जादुगाराने मला संमोहीत केले होते. ग्रेस बोलत होते, आपल्याच रंगधून शब्दधून विश्वात राहणाऱ्या ग्रेस ना असं बोलताना मी पहिल्यांदाच पाहत होतो. माझी पहिलीच भेट! किती नशीबवान होतो मी. ग्रेस ना मी माझ्या कवितेतील, माझी आवडती ओळ म्हणून दाखवली.

“नशीबवान तोच जो शब्दांच्या क्षितिजापार गेला !”

ग्रेस ला बहुदा ती ओळ आवडली असावी. नसली आवडली तरी मी त्यांना सांगणार हे ठरवूनच मी गेलो होतो. आमच्या बोलण्याचे विषय श्रावणातल्या अनिश्चित सूर्य किरणांच्या खेळासारखे बदलत होते. याला संवाद म्हणणं चुकीचं ठरेल कारण ग्रेस फक्त बोलत होते आणि मी ऐकत होतो. विषय सुद्धा अगदी ग्रेस च्या मनाच्या जवळचे संध्याकाळ, संधीकाळ, सावल्या, कृष्ण. पण एका विषयावरच बोलणं फार वेळ चाललं होतं ते काही मला ठीक वाटलं नाही ते म्हणजे मृत्यू. कारण इतका वेळ इतकं छान बोलल्यानंतर ग्रेस नी हा विषय का काढला!? पण मला तेही बोलणं थांबू नये असं वाटत होतं. ते बोलणं ऐकून काही ओळी माझ्या मनात आल्या

मृत्यूची आस
फुलपाखरास
आणि त्या फुलास
… नसेलही

तरी एक बीज
बिलगे मातीस
एका जीवनास
… फुलवण्यासाठी

पण तरीही ग्रेस कुठेही उदास दिसत नव्हते. याचा उलगडा झाला की ग्रेस ने जन्म मृत्यू यांना कुठल्या भावनेने गोंदवले नाही. जो माणूस स्वतःच्या आईला फक्त आई न मानता आदी स्त्री समजतो तो कसा काय माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या सामान्य घटनांना एवढं महत्व देईल ? दोन क्षण मला वाटून गेलं की इतके दिवस आपण याच क्षणाची वाट पहात होतो. शेवटी तो क्षण आलाच. देवाने या आजारपणातही माझी एक इच्छा पूर्ण केली आहे! स्वतःच्या नशीबावर मी खुश झालोच होतो की कोण्या स्त्रीचा दुसऱ्या आवाज आला आणि ग्रेस उठून दुसऱ्या खोलीत गेले. त्यांचं पुसटसं बोलणं मला ऐकू येत होतं. पण एकंदरीतच ती स्त्री फार खुश दिसत नव्हती आणि ग्रेस तिला समजावायचा प्रयत्न करत होते. मी वाट पाहत होतो की ग्रेस परत येतील पुन्हा दिलखुलास गप्पा मारण्यासाठी. पण तसं झालं नाही! कुठल्याशा कमनशिबी क्षणाला मी पापणी मिटली आणि…

मी माझ्या घराच्या खिडकीत उभा होतो, एकटाच, समोर सूर्यास्त होत होता. मला खूप एकटं एकटं वाटत होतं. मी थोडासा रागावलोही होतो. ग्रेस .. आता मला ग्रेस ना एकेरी हाक मारावीशी वाटली .. ग्रेस .. तू .. आणि पुढचं काहीच सुचलं नाही. हातातल्या कागदावर हे शब्द उमटलेले होते. ते शब्द कुठून आले कसे आले मला समजलेच नाही? एक निश्चित होतं की ते शब्द ग्रेस साठीच होते.

तुझ्या धुंद हाकांत रे, मुक्त गांधार होता
की देहास चांदण्याच्या, शब्द आधार होता

हरवला तूही आता, हरवल्या साऱ्या खुणा रे
श्वासात तरीही घुमते, कवितेचे मंदस वारे

सजवलीस तू ती, क्षितिजावर सांज वेडी
अर्था-अनर्थात भिजल्या, फुलांची राख थोडी

तुझाच हा प्रदेश, मी तर भरकटलेला कोणी
तुलाच शोधतो आणि, तुझीच गातो गाणी

तुझ्या भाव वेल्हाळ, रंगधून काही ओळी
गुणगुणतो रोज सांजेस, बेचैन काही ओळी

खिडकीवर रोज थकून, किरणांची गर्दी होते
मी झेलतो मुक्याने, आठवांची वर्दी होते

रोज सूर्यास रे बुडताना, निरंतर बघतो मी
निरुत्तर दिसतो तोही, प्रश्नांकित असतो मी

तू नाहीस म्हणून असं वाटतं एवढंच…

सांजवनाच्या पायवाटांत मी एकटा कशाने ?
फिरूनी मागे बघतो, गळलेली शुष्क पाने .. !

अजून बरंच काही विचारायचं होतं मला. खिडकीतून सूर्य हळुहळू लुप्त होताना दिसत होता. 
पण तेवढ्यात डोळे उघडले आणि…

ग्रेस तू का गेलास?

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

2 thoughts on “ग्रेस तू का गेलास?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *